महाराष्ट्राच्या सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत विवेकवादाचे अध्वर्यु गोपाळराव आगरकर यांचे स्थान हे अग्रमानाचे आहे. गोपाळराव आगरकरांनी विवेकाधिष्ठित सर्वांगीण सुधारणेच्या विचाराला राजकीय स्वातंत्र्यापेक्षाही जास्त महत्त्व दिलेले होते. अर्थात सामाजिक प्रश्नांवर लढत असतानाच आगरकरांनी राजकीय प्रश्नांना चाच्यावर सोडलेले नव्हते. नातू देशपांडे संपादित “आगरकर-वाङ्मयाच्या दुसर्या खंडात आगरकरांचे राजकीय विषयावरील लेख आहेत. त्यांमध्ये त्यांनी मुंबईत आणि इतर ठिकाणी झालेल्या हिंदू-मुसलमान दंग्यांच्या संबंधाने लिहिलेले सहा लेख आहेत. त्यातून हिंदूमुसलमान प्रश्नासंबंधीची त्यांची संतुलित दृष्टी दिसते. या लेखांच्या अनुषंगानेच या प्रश्नावरील आगरकरांच्या विचारांचे हे विश्लेषण असल्याने माझ्या विश्लेषणाचे मर्यादित स्वरूप कृपया वाचकांनी लक्षात घ्यावे.
आगरकरांनी हिंदू-मुसलमानांसंबंधी मांडलेल्या विचारांवर तत्कालीन इतिहासशास्त्र व समाजशास्त्र यांचा प्रभाव टिळकांप्रमाणे दिसून येतो. काही बाबतीत ते टिळकांसारखीच मते मांडतात, परंतु महत्त्वाचे म्हणजे, आगरकर हे टिळकांप्रमाणे एकतर्फी भूमिका न घेता, विवेकाधिष्ठित भूमिका स्वीकारताना दिसून येतात. आगरकरांच्या लिखाणात टिळकांप्रमाणे एकांगी स्वरूपाचे मुस्लिमविरोधाचे राजकारण दिसून येत नाही.
त्या काळात मुंबईत ११ ऑगस्ट १८९३ रोजी हिंदू-मुसलमानांचा फार मोठा दंगा झालेला होता, आणि त्या दंग्याला “प्रभासपट्टण” येथे झालेल्या दंग्यांची, हिन्दूंच्या गोरक्षणाच्या चालविलेल्या चळवळीची आणि राष्ट्रीय सभेच्या निमित्ताने हिन्दू-मुसलमान नेत्यांनी ब्रिटिशांच्या माध्यमातून एकमेकांविरुद्ध सुरू केलेल्या राजकारणाची पाश्र्वभूमी होती. हा दंगा हिदूंनी चालविलेल्या गोरक्षणासारख्या चळवळीमुळे दोन्ही जमातींत शत्रुत्वाची भावना निर्माण होऊन झाला, असे मत प्रमुख ब्रिटिश अधिकार्याने आणि ‘टाइम्स’सारख्या पत्रांनी मांडलेले होते आणि टिळकांनी गोरक्षणाचा प्रश्न तीव्र भावनिक स्वरूपाचा करून दंगा आणि गोरक्षणाचा प्रश्न हे आपल्या राजकारणासाठी वापरले होते, आणि त्या निमित्ताने टिळकांनी हिंदूची एक मोठी चळवळच उभी केलेली होती. किंबहुना या दंग्याच्या निमित्ताने टिळकांनी उभी केलेली चळवळच त्यांच्या राजकीय नेतृत्वाचा पायाभूत आधार ठरलेली दिसून येते. या दंग्यांच्या निमित्ताने सुरू झालेल्या घटनामालिकेतूनच टिळकांचे राजकीय नेतृत्व प्रस्थापित झाले.
आधुनिक काळात तर हिन्दू-मुसलमानांच्या दंगली राजकारणातील एक प्रमुख खेळी बनलेल्या आहेत. त्याची सुरुवातच टिळकांच्या राजकारणाने झालेली दिसते. उलट, आगरकर हे खूप तटस्थ वृत्तीने विवेकाचा आणि समन्वयाचा विचार मांडताना दिसतात. हे करताना आगरकर हे कोठेही मुस्लिमधार्जिणे मत मांडत नाहीत, परंतु टिळकांप्रमाणे केवळ हिन्दूंचे एकांगी समर्थनही करीत नाहीत. दंगलींच्या बाबतीतली टिळकांची प्रतिक्रिया मात्र पूर्णपणे एकांगी होती. टिळकांचे मत होते की, “मुंबईचे हिंदू लोक जे । चवताळलेले आहेत, ते मुसलमानासारखे धर्मवेडाने अगर अविचारीपणाने नव्हे, तर केवळ आत्मसंरक्षणार्थच होय. (वसंत पळशीकर, लो. टिळक – नेतृत्वाची उभारणी, समाजप्रबोधन पत्रिका मार्च – एप्रिल १९७४) टिळकांनी दंगलीच्या प्रसंगी मुसलमानाबद्दल व्यक्त केलेली मते लक्षात घेण्यासारखी आहेत. सर्वप्रथम टिळक सातत्याने हे सांगतात की, दंग्याच्या प्रसंगी नेहमी मुसलमानच प्रथम हल्ला करतात, याचे कारण टिळकांच्या मते हिन्दू लोक मुसलमानांप्रमाणे हिरवट वे रानटी नसल्याने आपण होऊन दुसर्याच्या अंगावर चालून जाण्याचे साहस त्यांच्या हातून बहुधा होत नाही. (उपरोक्त) तसेच टिळकांच्या मते, मुसलमान लोकांतील सिद्दी, पठाण वगैरे काही जाती फाजील आडमुठ्या व आडदांड आहेत आणि आमच्यांतील गुजराथी पांढरपेशे वगैरे लोक असावे तितके धीट व शूर नाहीत (उपरोक्त). पुढे टिळकांनी मुसलमान हे धार्मिकदृष्ट्या उदार नसल्याने, हे सर्व घडत राहते अशी मांडणी केल्याचे दिसते. हिन्दू लोक हे जात्या धर्मासंबंधी सर्व लोकांपेक्षा उदार असतात, त्यांच्या अंगी शांती, क्षमा, दया आणि बंधुप्रीती ही तत्त्वे उपजत असतात. “धर्मवेडाने मुसलमान बेफाम झाल्याची ज्याप्रमाणे शेकडो उदाहरणे आहेत, तशी हिन्दूंची क्वचित सापडतील. दंग्यांचे कारण म्हणून टिळकांनी मुसलमानांच्या धर्म, स्वभाव याबरोबरच आणखी एक गोष्ट मांडली आहे, ती म्हणजे, “ राजकीयहक्क प्राप्तीकरिता काँग्रेस आदिकरून हिन्दू लोक ज्या काही गोष्टी करीत आहेत, त्या ब्रिटिश अधिकार्याच्या डोळ्यांत खुपतात, म्हणून ते मुसलमान लोकांस हाताशी धरून या चळवळीला प्रतिकार करतात आणि …. हिन्दू मुसलमानांतील तंटे सुरू करण्यास मुख्यत्वेकरून कारणीभूत होतात (उपरोक्त)’. उपरोक्त लेखात वसंत पळशीकरांनी टिळक पूर्णपणे हिंदूपक्षपाती भूमिका कशी घेत होते. याचे विश्लेषण समर्पकरीत्या केले आहे.
टिळकविचारांच्या या पाश्र्वभूमीवर आगरकरांचे विचार निश्चितच अत्यंत वस्तुनिष्ठ आणि विवेकनिष्ठ आहेत. सर्वप्रथम, आगरकर हे हिन्दू-मुसलमान दंग्यांचा विचार टिळकांप्रमाणे राजकारणासाठी करीत नाहीत किंवा दंग्यांचे राजकारणही उभे करीत नाहीत त्याचबरोबर दंग्यांबाबत मुसलमानांना दोषी धरत असताना देखील टिळकाप्रमाणे हिन्दूंची एकतर्फी बाजू घेत नाहीत. हिन्दूचे चुकतच नाही, असे आगरकर टिळकांप्रमाणे म्हणत नाहीत. तसेच हे दंगे मुसलमानांच्या स्वभावामुळे, “रानटीपणामुळे”, धर्मवेडामुळेआणि गोहत्येमुळे होतात किंबहुना दंग्यास मुसलमानांचा धर्मच कारणीभूत आहे असेही ते म्हणत नाहीत. आगरकरांची भूमिका अशी आहे की हिन्दू-मुसलमान तंट्यांचा एवढा बाऊ करण्याचे काही कारण नाही कारण त्यांच्या मते इतिहासातील गोष्टी, स्वभावधर्म यांचे भिन्नत्व आणि इतर अनेक स्वाभाविक घटक यामुळे असे दंगे होणे स्वाभाविक असून अशा प्रकारचे दंगे केवळ हिन्दू-मुसलमानांतच होतात हे म्हणणे बरोबर नाही, तर अशा प्रकारचे दंगे सर्व भिन्न भिन्न जाती-जमातींत आणि सर्व देशांत होतात (आगरकर वाङ्मय, खंड २, पा. ४५०), महत्त्वाची गोष्ट म्हणजे आगरकर असे म्हणतात की या तंट्यांचे निमित्त करूनब्रिटिश सरकारने हिंदुस्थानी लोकांना अधिक राज्याधिकार देण्याबाबत चालविलेली टाळाटाळ चुकीची आहे. आणि केवळ दंग्यांवरून हिंदुस्थानी लोक राजकीय हक्कास पात्र नाहीत असे म्हणणे अयोग्य ठरते. दंग्यांचा बाऊ करण्याचा आगरकरांनी मांडलेला मुद्दा दुहेरी स्वरूपाचा आणि विधायक राजकारणाची दिशा दाखविणारा आहे. ब्रिटिश राज्यकर्ते या दंग्यांचा वापर हिंदी लोकांना हक्क नाकारण्यासाठी तर टिळक हिंदुत्वाच्या राजकारणासाठी करीत होते. त्या दोन्ही प्रवृत्तींवर आगरकरांची टीका आहे. परंतु त्याचबरोबर ही भांडणे वाढावीत म्हणून मुसलमानांना हाताशी धरण्याचे राजकारण जर ब्रिटिश लोक करीत असतील तर त्यांनी ते करू नये, अशी आगरकरांची भूमिका होती. परंतु आगरकर हे टिळकांप्रमाणे दंग्यांच्या बाबतीत ब्रिटिशांना सर्वस्वी जबाबदारही धरत नाहीत. उलट ब्रिटिशांच्या न्यायीपणावर विश्वास व्यक्त करतात आणि एखाद्या दुसर्या ब्रिटिश अधिकार्याच्या कृत्यामुळे आणि काही दुष्ट प्रवृत्तीच्या हिंदू किंवा मुसलमानांमुळे असे घडू शकते, म्हणून काही दुष्ट व्यक्तींच्या कृत्यासाठी सर्व जमातीलाच जबाबदार धरू नये ही भूमिका आगरकर मांडतात आणि पुढे विचारतात की, “सरकार मुसलमानांना पक्षपाताने वागविते आणि म्हणून ते शेफारले आहेत असे म्हणण्यास आपणापाशी काय आधार आहे?” पुढे आगरकर म्हणतात की, “सरकारचे किंवा सरकारी अधिकार्याचे विषम वर्तन असल्या तंट्यांचे कारण असते असे म्हणणे, हा शुद्ध बाप्कळपणा आहे.” आगरकरांचे एकूण प्रतिपादन असे दर्शविते की हिंदू-मुसलमानांतील स्वाभाविक भिन्नत्व आणि ऐतिहासिक कलह यांच्या परिणामातून तत्कालीन राजकारणात त्यांचे संघर्ष निर्माण होत आहेत. त्याचबरोबर आगरकर असे अप्रत्यक्षपणे सूचित करतात की सांप्रतच्या हिंदू-मुसलमान संघर्षाला हिंदू आणि मुसलमान नेत्यांचे राजकारणही तितकेच जबाबदार आहे.
या सर्व लेखनांतून आगरकरांचे मुसलमानांसंबंधीचे व्यक्त होणारे आकलनदेखील विशिष्ट प्रकारचे आहे. टिळकांप्रमाणेच आगरकरदेखील तत्कालीन इतिहासाच्या मांडणीच्या प्रभावाखाती असले तरी त्यांची मते टिळकाप्रमाणे टोकांची आणि एकांगी नाहीत. टिळकांचे सरळ सरळ म्हणणे होते की मुसलमान हे “रानटी आणि हिरवट असतात, धर्मवेडाने बेकार-होतात, ते असहिष्णू असतात आणि त्यांचा धर्म आणि स्वभाव यामुळे दंगे होतात. अशा प्रकारे टिळकांनी मुसलमानांचे एकांगी चित्रण करून दंग्यासाठी त्यांनाच सर्वस्वी जबाबदार धरले आहे. आगरकर हे टिळकांप्रमाणे मुसलमानच प्रथम दंगे सुरू करतात असे म्हणत असले तरी त्यांनी टिळकांसारखी पूर्णपणे एकतर्फी मांडणी केलेली नाही. आगरकरांचे म्हणणे होते की दंग्याच्या वेळी, जे अपराधी दिसून येतील, त्यांना शासनाने कडक शिक्षा करावी, परंतु “एकाद्या अधिकार्याची एकाद्या दुष्ट हिंदूशी किंवा मुसलमानाशी गाठ पडते, तेवढ्यावरूनच त्यांनी त्या जमातीबद्दलची मते बनवू नयेत. महत्त्वाचे म्हणजे आगरकरांचे म्हणणे होते की मुसलमानांनी पूर्ववैभवाचे स्मरण करून, हिंदूंशी अरेरावी करण्यात अर्थ नाही. त्याचप्रमाणे, मुसलमानांनी केलेली पूर्वीची कृत्ये आज ध्यानात आणून हिंदूनी त्यांचा द्वेष करण्यात किंवा त्यांना खिजविण्यात शहाणपणा नाही. आगरकरांची ही भूमिका समन्वयाची आहे. तसेच राष्ट्रीय चळवळीच्या नावाखाली इतिहासाचा वापर करून, हिंदू-मुस्लिम संघर्षाची भडक वर्णने चितारून टिळकप्रणीत राजकारणाची जी वाटचाल सुरू झालेली होती त्यावर आगरकरांनी केलेली ही टीका अप्रत्यक्ष स्वरूपाची असली तरी महत्त्वाची आहे. आगरकर टिळकांप्रमाणे हिंदु-मुसलमानांच्या कायम विरोधाचा विचार मांडत नाहीत. कारण आगरकरांचा दृष्टिकोण दंग्यांचे निमित्त करून, हिंदु-मुसलमान वैमनस्य चितारून राजकीय डावपेच वाढविण्याचा नाही. श्री वसंत पळशीकरांनी उपरोक्त लेखात दर्शविल्याप्रमाणे टिळक हे पूर्णपणे हिंदूंचीच बाजू घेतात. “हिंदूंकडून हल्ला होण्याच्या प्रसंगी ते घटना मालिकेस महत्त्व देतात, मुसलमानांकडून हल्ला झाला असेल तेव्हा सुरुवात कोणी केली याला महत्त्व देतात. आणि अधिकार्याचा निर्णय हिंदूंविरुद्ध गेला की त्या अधिकार्याला दोषी ठरवतात.”
आगरकर हे दर्शवितात की बहुतांशी मुसलमानांकडूनच प्रथम आगळीक होते. पण त्यांचे प्रतिपादन आहे की, “आम्हा भिन्न धर्माच्या, भिन्न चालींच्या, भिन्न भाषांच्या व भिन्न इतिहासाच्या लोकांत” अशा प्रकारचे तंटे न झाले तरच आश्चर्याची गोष्ट घडेल. परंतु टिळकांप्रमाणे आगरकर मुसलमानांना ‘रानटी’ असे म्हणत नाहीत. त्याचबरोबर ते मुसलमानांची बाजूही घेत नाहीत. त्यांचे प्रतिपादन आहे की, मुसलमानांनी या देशावर आक्रमण केले, हिदूंना बाटवण्याचेही प्रयत्न केले आणि आता दोघेही निराळ्या धर्माच्या तिसर्याच राष्ट्राची प्रजा झालेले आहेत. तेव्हा आता कोणी कोणाशी भांडण्याची गरज नाही.आणि पुढे ते म्हणतात की हिंदुनी आणि मुसलमानांनी इतिहासातील गोष्टी काढून एकमेकांशी शत्रुत्व करण्यात काही अर्थ नाही. दुसर्या निबंधात त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, मुसलमान प्रबळ होते तेव्हा त्यांनी हिंदूंचा आणि हिंदू प्रबळ होते तेव्हा त्यांनी मुसलमानांचा समूळ नाश केला नाही. पुढे ते म्हणतात की ज्याअर्थी येथे इंग्रजी राज्य होण्यापूर्वी हिंदु आणि मुसलमान हे शस्त्रधारी असूनदेखील त्यांनी एकमेकांचा समूळ उच्छेद केला नाही त्याअर्थी कोणत्याही कारणाने इंग्रजी अम्मल नाहीसा झाला असे मानल्यास दोघेही एकमेकांस नामशेप करतील असे म्हणण्यास काही आधार नाही. त्यांचे म्हणणे आहे की हिंदु आणि मुसलमानांत कलह पूर्वीपासून होत आला आहे, तेव्हा उभयतांत भांडणे होणे हे अगदी स्वाभाविक आहे, तेव्हा ती जेव्हा होतात, तेव्हा, एखादी मोठी असामान्य गोष्ट घडली म्हणून तिची मीमांसा करण्यात तहेवाईक लोक आपल्या कल्पनाशक्तीस इतके का शिणवितात कोण जाणे. आगरकरांची ही भूमिका पूर्णपणे टिळकांच्या उलट आहे. हिंदू-मुसलमान वैमनस्य हे टिळकांच्या हातातील हिंदूंना संघटित करण्याचे प्रमुख साधन होते. त्यांचा राष्ट्रवाद हा इतिहासातील हिंदु-मुसलमानांच्या तथाकथित वैमनस्यावरच उभा होता. याउलट आगरकर, इतिहासातील हिंदु मुसलमान संघर्षाचा आढावा घेतात आणि इतिहासातील गोष्टी उकरून न काढता दोघांनी वैमनस्य सोडून द्यावे असा रास्त विचार मांडतात. महत्त्वाचे म्हणजे, इतिहासातील त्यांचे लढे एकमेकांचा संपूर्ण नाश करणारे नव्हते हा मुद्दा मांडतात. आणि म्हणूनच ते म्हणतात की “आम्हा अत्यंत भिन्न लोकांतील तंट्यातील पुरातन कारणे नाहीशी होऊन आमची पक्की मैत्री होण्यास पुष्कळ वर्षे लागणार आहेत आणि क्रमाक्रमाने ती होत आहे.” आगरकरांची ही भूमिका केवळ समन्वयाची नसून जनसामान्यांच्या पातळीवर हिंदु मुसलमानांची जी देवाण घेवाण औरंगजेबाचा काळानंतर विकसित होत गेलेली होती तिचे भान ठेवणारी आहे.
हिंदु मुसलमान तंट्यांची आगरकरांनी केलेली मीमांसादेखील लक्षणीय आहे. आगरकरांचे म्हणणे आहे की “आमच्यासारख्या लोकांस अधिकाधिक महत्त्वाचे हक्क देणे हे आमच्यामधील तंटे बखेडे मोडून टाकावयाचे मुख्य साधन आहेत. म्हणजे या दंग्यांच्या पाठीमागे जातीजमातीच्या हक्कांचे भांडण असून धर्म, गोहत्या, सरकारी अधिकार्याचा पक्षपातीपणा ही वाह्य कारणे आहेत, असे आगरकर सूचित करतात. टिळकांचे म्हणणे होते की, न्याय मान्य होण्यास प्रत्येक जमातीने आपआपली बाजू यथास्थित रीतीने सरकारपुढे मांडली पाहिजे. ज्याने त्याने आपआपली बाजू तिहाइतापुढे मांडून न्याय करून घ्यावा हाच एक उपाय आहे. टिळक आणि आगरकरांच्या भूमिका येथे स्पष्ट होतात. टिळक हे हिंदू आणि मुसलमानातील संपूर्ण द्वैत किंवा भेद कायम स्वरूपाचे मानतात व प्रत्येकाने आपआपल्या कुवतीप्रमाणे न्याय मिळविण्याचा विचार मांडतात. आगरकर दोघांच्याही हक्कांची गोष्ट सूचित करतात.
आगरकर असेही म्हणतात की हिंदू-मुस्लिम तंटे वर नमूद केलेल्या कारणांप्रमाणेच मुसलमानांत सुधारणा नसल्यामुळे होतात. ते विचारतात की ख्रिस्ती लोकांशी आमच्या लोकांचे तंटे का होत नाहीत?आणि मुसलमान लोकांशीच का होतात?आगरकरांचे उत्तर असे आहे की ख्रिस्ती लोकांचे “श्रेष्ठ सुशिक्षण आणि सुनीतीमुळे तंटे होत नाहीत.” पुढे आगरकर म्हणतात की मुसलमानांनी हिंदूंप्रमाणे ब्रिटिशांच्या सुधारणा स्वीकारल्या असत्या तर ते मागासलेले राहिले नसते, आणि हे सांगून ते मुसलमानांचा मागासलेपणा हेही दंग्यांचे कारण सुचवितात. परंतु त्याचबरोबर पुढे सांगतात की, सुधारलेल्या एकाच धर्माच्या लोकांत जर तंटे होतात तर हिंदु-मुसलमानांसारख्या विभिन्न धर्माच्या आणि आचारविचारांच्या लोकांत ते झाल्यास आश्चर्य वाटण्याचे मुळीच कारण नाही,
आगरकरांनी आपल्या ह्या लेखातून हिंदू आणि मुसलमानांतील सर्व प्रकारचे वेगळेपण स्पष्टपणे मांडले आहे. आणि हे भिन्नत्व त्यांच्या संघर्षाचे स्वाभाविक कारण म्हणून देत असताना राजकीय कारणेदेखील दिली आहेत. त्यांनी मुसलमानांना ‘मिजासखोर, शूर, धर्माभिमानी, भांडखोर, कट्टर धर्माभिमानी’ असे त्यांचे वर्णन केले तरी टिळकांप्रमाणे त्यांना रानटी असे म्हटलेले नाही. टिळकांनी मुसलमानांचा रानटीपणा सिद्ध करण्यासाठी ‘सिद्दी, पठाण’ या आडमुठ्या लोकांची पांढरपेशा हिंदूंशी तुलना केलेली होती त्याकाळात इस्लाम स्वीकारलेल्या सिद्दी म्हणजे हबशी किंवा निग्रो वंशाचे अनेक लोक व पठाण यांचा भारतात वावर होता. पठाण व्याजवट्याचा धंदा करीत, हे सिद्दी व पठाण दंगेधोपे करीत, रक्तपात करीत, परंतु त्यांना हिंदुस्थानी मुसलमान म्हणता येणार नाही. हिंदुस्थानात राहणारे इथले नेटिव्ह’ मुसलमान आणि हे सिद्दी आणि पठाण यांच्यात अनेक बाबतींत फरक होता. टिळक त्यांना एकत्रितच लेखत होते आणि सिद्दी आणि पठाण म्हणजे हिंदुस्थानी मुसलमान असे समीकरण मांडत होते. आगरकरांनी तो प्रकार केलेला नाही. इतिहासातील संघर्षाच्या आधारे वैमनस्याचा सिद्धांत मांडण्याऐवजी इतिहासातील सहकार्याच्या घटना दाखवून आगरकर हिंदु-मुसलमान-समन्वयाचा विचार मांडताना दिसून येतात. ते म्हणतात की “औरंगजेबासारख्या एखाद्या धर्मवेड्या बादशहाची गोष्ट सोडून द्या. बहुतेक थोर मनाच्या मुसलमान बादशहांनी व हिंदू राजांनी व महाराजांनी दोन्ही लोकांतील तंटे तोडून टाकण्यासाठी सौम्य उपायांची योजना केली असली पाहिजे.” हे सांगून हिंदु आणि मुसलमान राजांच्या सहकार्याबद्दल ते लिहितात. अशा प्रकारे आगरकर हे इतिहासातील संघर्षाऐवजी समन्वयाची उदाहरणे देऊन, समन्वयाची भूमिका मांडतात. ज्या काळात राष्ट्रवादाच्या नावाखाली हिंदु मुसलमानाच्या संबंधाने वाटेल ते द्वेषमूलक लेखन सुरू होते त्या काळातील आगरकरांची ही मांडणी खरोखर उल्लेखनीय आहे. आगरकरांच्या या मीमांसेचा सविस्तर अभ्यास होणे आवश्यक आहे.