(पं. रमाबाईंनी शारदासदनाची स्थापना करून त्यामध्ये अनाथ स्त्रियांना आश्रय दिला. तेथील वातावरणामुळे त्या स्त्रियांना ख्रिस्ती धर्माबद्दल आपुलकी वाटू लागली व त्यांपैकी काहींनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला. त्याबरोबर शारदासदनाची लोकप्रियता घटू लागली व पालकांनी भराभर आपल्या मुली तेथून काढून घेतल्या. य. दि. फडके लिखित आगरकरचरित्रामधल्या त्या कालखंडाविषयी ..- सं.)
टिळकांनी संमतिवयाच्या विधेयकाविरुद्ध रान उठवण्यास सुरुवात केली तेव्हा नोव्हेंबर १८९० च्या नॅशनल रिव्ह्यू या नियतकालिकाच्या अंकात लायनेल अॅशबर्नर या साहेबाने हिंदु विधवा या ‘सनदी स्वेच्छाचारिणी’ असतात असा निर्गल आरोप करताच गोपाळराव आगरकर संतापले. तीस वर्षांहून अधिक काळ मुंबई इलाख्याच्या महसूल खात्यात नोकरी करून अॅशबर्नरने गव्हर्नरच्या कार्यकारिणीचा सदस्य बनण्यापर्यंत मजल मारली होती. असल्या सनदी नोकराने हिंदू विधवांना स्वैराचार करण्याची सनद मिळाली असते असा घाणेरडा अभिप्राय दिल्यानंतर गोपाळराव स्वस्थ बसणे शक्यच नव्हते. त्यांनी या अकलेच्या कांद्याने तोडलेल्या तान्यांची दखल घेऊन त्याचे २९ डिसेंबर १८९० च्या अंकात वाभाडे काढले. गोपाळरावांचा हा लेख काशीनाथपंत तेलंगांना आवडला आणि तसे त्यांनी गोपाळरावांना पत्र पाठवून कळवले. ‘शंकित’ या टोपण नावाने तेलंगांनी प्रश्न केला, “मनूपेक्षा अॅशबर्नसाहेबच बरे नव्हेत का?” अॅशबर्नरने हिंदू विधवांच्या नीतिमत्तेवरच हल्ला केला होता. मनुस्मृती’ किंवा ‘गोभिलस्मृती’ यांसारख्या स्मृतिग्रंथांतही सौभाग्यवती स्त्रियाही पतिव्रता असतीलच अशी ग्वाही देता येणार नाही अशा आशयाची वचने आढळत होती. ती धर्मभीरू आधुनिक महर्षीना मान्य आहेत असे समजायचे काय? संमतिवयाचा कायदा नको म्हणणाच्या स्त्रियाही स्मृतिग्रंथातील या वचनांशी सहमत आहेत काय? असे प्रश्न उपस्थितकरणारे ‘शंकिता’चे पत्र नेटिव ओपिनियन, जगद्धितेच्छु, केसरी वगैरे पत्रांनी छापायचे नाकारले.“येथून तेथून सारी स्त्रीजात अट्टल बदमाश! पुरुष पाहिला की धरलाच तिने हात अशा आशयाची मनूसारख्या धर्माचार्यांची वचने आपण हुताशनीस समर्पण करावयास तयार झाले पाहिजे” असे गोपाळरावांनी १६ फेब्रुवारी १८९१ च्या सुधारकात स्पष्टपणे म्हटले. एवढेच नव्हे तर ‘निःशंक या टोपणनावाने पंडिता रमाबाईंनी पाठवलेले विस्तृत पत्र गोपाळरावांनी २३ फेब्रुवारीच्या अंकात छापले. रमाबाईंचे हे पत्र म्हणजे ‘सुधारका’ चे सहासाडेसहा कॉलम व्यापणारा लांबलचक लेखच होता.
ज्यामध्ये स्त्रियांची निंदा किंवा निर्भर्त्सना केलेली आढळत नाही असा एखादा ग्रंथ या भरतभूमीत सापडेल की नाही अशी आपल्याला शंका असल्याचे सांगून आधुनिक काळातील धर्मवीर स्मृतिग्रंथातील स्त्रीनिंदा आपल्याला मान्य असल्याचे एकदा नव्हे तर शंभरवेळा म्हणतील याबद्दल रमाबाईंना तिळमात्र संशय वाटत नव्हता. न्या. तेलंगांनी आपल्या पत्रात काही संस्कृत अवतरणे त्यांच्या मराठी अनुवादासहित उदधृत केली होती. रमाबाईंनी ऋग्वेद, दक्षस्मृती, महाभारतातल्या अनुशासनपर्वातील भीष्म-युधिष्ठिर संवाद, स्कंदपुराण, बृहत्पराशरसंहिता अशा अनेक ग्रंथातील मूळ अवतरणे त्यांच्या मराठी अनुवादासहित उदधृत केली. स्त्रिया स्वभावतः व्यभिचारिणी, स्नेहशून्य आणि चंचल असतात हे जाणून मनूने शय्या, आसने, भूषणे, काम, क्रोध, कपट, द्वेष, दुराचरण स्त्रियांच्या वाट्याला दिली असल्याचे दक्षस्मृतीत म्हटले आहे, तर बृहत्पराशरसंहितेनुसार पुरुषांपेक्षा स्त्रियांची कामवासना आठपट असते तर आहार दुप्पट असतो.“जशा गाई नव्या नव्या कुरणातील नवे गवत चरायला धावतात तशा स्त्रिया नव्या नव्या पुरुषास धरतात” या युधिष्ठिराच्या मताची पितामह भीष्मांनीही री ओढलेली आढळते. असे अनेक संदर्भ देऊन पंडिता रमाबाईंनी महामहोपाध्याय रामशास्त्री आपटे, टिळक वगैरे धर्मसंरक्षकांचा नावानिशी उल्लेख करून उपरोधाने सुचवले, “अहो शूरांनो, अहो धर्मसंरक्षकांनो, तुमच्या या आर्य पूर्वजांकडे पाहून तुमच्या हितासाठी नाही, तरी मनु, पराशर, याज्ञवल्क्य, दक्ष, गोभिल, भीष्म, नारद इत्यादि महर्षीचा मान राखण्याकरिता तरी निदान शस्त्रास्त्रांनी सज्ज होऊन या बेट्या कृत्यांचा बीमोड होईल असे उपाय योजा.” रमाबाईंच्या या पत्राकडे दुर्लक्ष करण्याखेरीज टिळक तरी दुसरे काय करणार? रमाबाईंवर टीका करण्याची योग्य संधी मिळेपर्यंत टिळक थांबले.
टिळकांनी १६ जून १८९१च्या केसरीत पाच स्फुट सूचना प्रसिद्ध केल्यानंतर माधवराव रानड्यांनी ज्ञानप्रकाशात पंडिताबाईंच्या त्यांना आलेल्या खासगी पत्रातील एक उतारा प्रकाशित केला. शारदासदनाच्या अमेरिकेतील आश्रयदात्याकडून मागवलेले पुण्यातल्या सल्लागार समितीच्या म्हणजेच साहाय्यकारी मंडळीच्या कर्तव्यासंबंधीचे स्पष्टीकरण मिळेपर्यंत सल्लागार समितीच्या सभा भरवण्याचे तहकूब केले असल्याचे जाहीर केले. शारदासदनाबाबत अन्य वृत्तपत्रांत आलेल्या गोष्टी अगदी खोट्या व निराधार आहेत” आणि रमाबाईंनी खासगी पत्रात दिलेली “हकीकत खरी आहे” अशी आपण आणिडॉ. भांडारकर यांनी खात्री करून घेतली असल्याचा निर्वाळा दिला. “आमच्या एकाही आक्षेपास उत्तर नाही” असे सांगून ३० जून १८९१ च्या अंकात केसरी ने लिहिले, “सत्यनिष्ठ (सुबोध) पत्रिकेने किती जरी हलकटपणा केला तरी साह्यकारिणी मंडळीस झुगारून देऊन पंडिता रमाबाई स्वतंत्र झाल्या आहेत, त्यांच्यावर कोणाचा ताबा नाही व त्यांस तो नकोही आहे त्या मुलींस हवे ते शिक्षण देतील, त्यांचे देव लाथेने उडवितील, त्यास हिंदू देवळात जाण्यास परवानगी देणार नाहीत, परंतु ख्रिस्ती देवळातील गंमत पाहण्यास घेऊन जातील वगैरे गोष्टी आता निरुत्तर सिद्ध झाल्या आहेत.” ‘जितं मया’ असे म्हणणाच्या थाटात टिळकांनी लिहिलेला हा मजकूर वाचून गोपाळराव रमाबाईंची कड घेऊन वादाच्याआखाड्यात उतरले.
‘शारदासदन आणि त्यांचे दुष्ट निंदक’ या मथळ्यानिशी ६ जुलै १८९१च्या सुधारकात गोपाळरावांनी सुरुवातीलाच आपली भूमिका स्पष्ट केली. “आजकाल शारदासदनाविषयी जो निर्गल प्रलाप चालला आहे, त्यासंबंधाने आतापर्यंत आम्ही तटस्थ मौन धरिले होते हे आमच्या वाचकांस ठाऊक आहेच. आम्हांस असे वाटत होते की जे लोक त्या अत्युपयुक्त व निर्दोष संस्थेच्या पाठीमागे हात धुवून लागले आहेत त्यांच्या ज्ञानचक्षुवर आलेले दुराग्रहाचे पटल नाहीसे होऊन आज नाही उद्या या स्खलन पावणाच्या मंदमतींची विचारदृष्टी विशाल होईल, पण हे आमचे अनुमान चुकीचे होते अशी आमची खात्री झाली आहे. पंडिता रमाबाईंनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला आहे म्हणून शारदासदनातील विद्यार्थिनींना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीतीने ज्या ख्रिस्ती धर्म शिकवितात किंवा त्याविषयी त्यांना प्रेम उत्पन्न होईल अशा प्रकारची कोणतीही गोष्ट करतात असे जर कोणी साधार सिद्ध करून देईल तर रमाबाईंच्या किंवा त्यांच्या सदनाच्या वतीने या पत्रात एक अक्षरदेखील कधीही येणार नाही. ख्रिस्ती धर्माचे नाव काढल्याबरोबर आमचे माथे फिरून जात नाही, युरोपिअन किंवा हिंदू ख्रिस्ती पाहिल्याबरोबर आमच्या पायातील आग कपाळात चढत नाही, ख्रिस्ती धर्मात ग्राह्य असा भाग काहीच नाही किंवा परोपकारदि ‘प्रकरणांत वैदिक धर्माहून हा धर्म श्रेष्ठ नसेलच असे आम्हांस म्हणवत नाही. हे सारे जरी खरे आहे तरी ईश्वरोपासना करून आत्म्याचे ऐहिक किंवा पारलौकिक कल्याण करून घेण्यास वैदिक धर्मापेक्षा किंवा दुसर्याई कोणत्याही धर्मापक्षा हा धर्म विशेष उपयोगी पडण्यासारखा आहे अशी आमची खात्री झाली नसल्यामुळे म्हणा, हिंदू स्त्रिया किंवा पुरुषांनी त्या धर्माची दीक्षा घेतल्यापासून या देशातील लोकांचे कोणत्याही प्रकारे हित होणार आहे असे आम्हांस वाटत नाही. झाले तर कदाचित थोडेसे नुकसान होण्याचा संभव आहे. यासंबंधाने आमचा इतर बंधूंशी मतभेद नाही हे उघड आहे.” धर्मविषयक बाबीत ज्याच्या त्याच्या श्रद्धेनुसारआचार व विचार करण्याचे प्रत्येकास स्वातंत्र्य असावे. कोणत्याही एका विशिष्ट धर्माचे शिक्षण शिक्षणसंस्थेत देऊ नये असे गोपाळरावांचे मत होते. धर्मांतर करण्याचा एखाद्याचा वैयक्तिक निर्णय समजावून घेण्यास गोपाळराव तयार असत. मात्र धर्मातराचे समर्थन त्यांनी कधी केल्याचे दिसत नाही.
शारदासदनात वेणू नामजोशीस त्यांनीच दाखल केलेले असल्यामुळे तिथे कसे शिकवले जाते याची त्यांनी माहिती होती. तिथल्या मुलींना बाटविण्याचा रमाबाईंचा इरादा आहे किंवा हिंदू धर्माने निषिद्ध मानलेल्या अनेक गोष्टींचे आचार सदनात दररोज घडत आहेत या विरोधकांनी रमाबाईंवर केलेल्या आरोपात काडीएवढेही तथ्य नाही असे गोपाळरावांनी जाहीर केले. ६ जुलै १८९१ च्या लेखात त्यांनी शारदासदनातील एका विद्यार्थिनीने आपल्या तीर्थरूपांना पाठवलेल्या खाजगी पत्रातला उतारा उद्धृत केला. ही विद्यार्थिनी म्हणजे वेणू नामजोशी आणि तिचे वडील म्हणजे सदाशिवराव भागवत हे उघडे गुपित होते. पत्रलेखिकेने म्हटले होते, “आपले १९-६-९१चे कार्ड पावले. मजकूर समजला. आपण ज्या गोष्टीचा खुलासा मागितला ती गोष्ट अगदी खोटी व निराधार आहे. येथे मुलींवर देखरेखीसाठी व कोठीच्या कामासाठी कृष्णाबाई नावाची एक बाई होती ती आपणास माहीत आहेच. ती बाई फार दुष्ट स्वभावाची व कृतघ्न होती. त्या बाईस रमाबाईंनी ‘तुम्ही येथून जा असे सांगितले यावरून या बाईस राग आला. माझी भागवत धर्मावर जितकी श्रद्धा आहे तितकी कोणत्याही धर्मावर नाही. शिक्षणात अथवा इतर वेळात धर्माची चर्चा चालत असतेही गोष्ट सर्वथैव खोटी आहे.”
६ जुलैच्या या लेखात गोपाळरावांनी पंडिता रमाबाईंच्या खासगी पत्रातलाही एक उतारा उदधृत केला होता. त्यातही रमाबाईंनी स्वयंपाकघराची व कोठीची व्यवस्था पाहणारी ‘दुष्ट बुद्धीची बाई आपल्या शाळेकिद्ध पुष्कळ खोट्या नाट्या गोष्टी सांगत असल्याचा स्पष्ट उल्लेख केला होता. कृष्णाबाई नावाची ही बाई पंडिता रमाबाईंची सख्खी आतेबहीण होती. ६ जुलैच्या सुधारकातील लेखात तिचा नामनिर्देश होताच तिने त्याच दिवशी एक पत्र केसरीकर्यांना पाठवले आणि टिळकांनी ते ७ जुलैच्या केसरीत लगेच छापले ‘सदनावरील बाई व कोठीवरील बाई या मथळ्यानिशी, कृष्णाबाई मंगळूराजवळच्या दुर्गग्रामच्या रहिवाशी. रमाबाईंचे माहेर तेथून दोन कोसांवरच्या माळ या गावी होते. १८९० च्या कार्तिक मासात रमाबाईंचे बंधू वारले तेव्हा रमाबाई आपल्या गावी गेल्या होत्या. तेथून परतताना रमाबाईंनी आपल्या विधवा भावजयीला आणि भावाच्या दत्तक मुलीलाही पुण्यात आणले. त्याच वेळी त्यांची आतेबहीण कृष्णाबाई ही गरिबीमुळे आपली भाची तसेच भाचेसून यांना बरोबर घेऊन त्यांच्याबरोबर पुण्यात आली आणि शारदासदनात स्वयंपाकाची आणि कोठीची जबाबदारी सांभाळू लागली. कृष्णाबाई भाचेसुनेस निर्दयपणे मारहाण करीत असल्याच्या आरोपावरून रमाबाईंनी तिची शारदासदनातून हकालपट्टी केली. त्यामुळे बिथरलेल्या कृष्णाबाईने रमाबाईंबद्दल खोट्यानाट्या गोष्टी गावभर पसरवल्या. त्यांच्या आधारे शिवाजी , पुणेवैभव, जगद्धितेच्छु वगैरे गटारातील खातेच्यात लोळणारी व त्यावरच चरितार्थ करणारी क्षुद्र व अनुदार वृत्तपत्रे काहीही बहकू लागली तरी गोपाळरावांनी त्याकडे दुर्लक्ष केले, पण केसरी आणि मराठा ही पत्रे काही चरितार्थ चालवण्यासाठी काढलेली नव्हती. त्यामुळे गोपाळरावांनी ६ जुलैच्या लेखात टिळकांवर कडक टीका केली.आर्यभूषणातून बाहेर पडणार्यात केसरीने त्यास दूषण येण्यासारखे भाषण करून आपणासहीएका उपहासास्पद अभिधानास, दुराग्रहाच्या भरात पात्र करून घ्यावे हे या सदनावर दंष्ट्रा व नखाग्रे सरसावून चाल करून जाणाच्या त्याच्या विद्वान लेखकाला बिलकुल शोभत नाही. दीर्घद्वेष खरी सात्त्विक प्रवृत्ती नव्हे व धर्मसंरक्षणासाठी अधर्म करणे हे खर्याु धार्मिकाचे शील नव्हे. कौटिल्य व दंभ यांनी संपादिलेली लोकप्रीती क्षणभंगुर आहे हे ध्यानात ठेवून ‘बुद्धेः फलमनाग्रहः’ या मंत्राचा, लोकाराधनरूप घोर पिशाचाने ज्यास फार घेरले आहे त्यानेकाही दिवस जप करावा म्हणजे त्याच्या कचाट्यातून सुटका होईल.”
७ जुलैच्या केसरीत टिळकांनी अपशब्दांचा वर्षाव केला. गेल्या दोन तीन अंकांतून आलेले शारदासदनावरील आमचे लेख वाचून आमच्या सुधारलेल्या बंधूस आपल्या मेंदूतील सडके भाग शोधून काढण्याची पुन्हा संधी मिळाली आहे” अशी सलामी देऊन सुबोधपत्रिका कत्र्यांनी “हलकटपणाची कमाल केली” असे टिळकांनी लिहिले.“हीजी सत्यापलापाची किंवा हलकटपणाची चढाओढ चालली आहे त्यात केसरी बिलकुल पडू इच्छित नाही”. आपली किंवा आपल्या साथीदाराची प्रोफेसरी कायम रहावी अगर पुरी व्हावी एवढ्याच हेतूने तेलंग, रानडे आदिकरून मंडळींचे उघडउघड असणारे दोषही ज्यांच्या लेखणीतून उतरत नाहीत, इतकेच नव्हे तर सदर गृहस्थांच्या नुसत्या नेत्रसंकेतानेही त्यांच्या पूर्वाराधनेस जे कबूल आहेत अशा स्वावलंबनशून्य गृहस्थांनी केसरीकारांवर नीच आरोप करावे हे त्यांच्या शीलास अनुरूपच आहे.” १४ जुलैच्या केसरीत टिळकांचे शरसंधान चालूच राहिले. त्यांनी पाच इंग्रजी उतारे देऊन रमाबाईंचे ख्रिस्ती धर्मप्रसाराचे बिंग फोडण्याचा प्रयत्न केला. केसरीत तेव्हा रा. वि. टिकेकर ‘धनुर्धारी’ नावाने ‘वाग्बाण’ सदर चालवीत असत. टिळकांची री ओढीत टिकेकरांनीही सुधारकाचा उमदा, खंदा लेखक बेमुर्वतखोर असल्याचे म्हटले आणि खुद्द रमाबाई आपली मुलगी मनोरमा बाटलेली आहे असे म्हणत असल्या तरी सुधारककर्ते तसे नाही म्हणत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले.
मराठा चालवणाच्या वासुदेवराव केळकरांनाही आपले धाकटे भावंड केसरी ज्या तहेने गर्जना करीत होते ती तन्हा रुचली नव्हती. १२ जुलैच्या मराठ्यातल्या इंग्रजी मजकुरातील एका उतार्याहचा मराठी अनुवाद गोपाळरावांनी आवर्जून छापला.“या संस्थेच्या संबंधाने अलीकडे बरेच दिवस जो हमरीतुमरीचा वाद चालला तो पाहून आम्हास फार वाईट वाटते.” त्यात पडण्याची आमची इच्छाही नाही. …….सदनाविरुद्ध तक्रार करण्यास म्हणण्यासारखा आधार नाही व त्यावर तुटून पडण्यास तर मुळीच नाही……… दक्षिणेच्या पावलीबद्दल फाजील चौकशी करीत बसणे नीट नाही हे ध्यानात ठेवावे. टिळक वासुदेवराव केळकरांचा हा सल्ला ध्यानात घ्यायला तयार नव्हते. त्यांनी २१ जुलैच्या केसरीत शारदासदनासंबंधी आठ स्फुट सूचना प्रसिद्ध केल्या आणि ‘मराठा’पत्रकर्त्यांना बजावले, स्वतः लोकांच्या अंगावर भोंकत सुटावयाचे व त्याने बडगा काढला म्हणजे मोर्चा फिरवून पण भोंक त पळत जाणाच्या श्वानाची जी स्थिती तीच या स्वार्थासाठी रावबहादुरापुढे वदनोदरदर्शन करणार्यांयची आहे, करिता त्याबद्दल येथे जास्त लिहीत नाही. .. येथे मुली ख्रिस्ती करण्याचा प्रयत्न मराठी पत्रकर्याच्या प्रत्यक्ष नजरेस आल्याखेरीज त्यांचीआमच्या लेखाबद्दल खात्री होत नाही. पंडिता रमाबाईंची इच्छा व हेतू अमूक आहे इतकेच दाखविण्याचा आमचा हेतू होता. तिने अमूक एका मुलीला बाटविले असे आम्ही कधीही लिहिले नाही. सुधारक्कतें पंडिता रमाबाईचे राघूसारखे बोल ऐकण्याच्या नादात किंवा तिच्या कस्तुरीपरिमलगुणग्रहणाच्या भरात पोचट प्रत्युत्तर देत असतात असे सांगून टिळकांनी पंडिता रमाबाई तसेच गोपाळराव या दोघांनाही एकाच माळेचे मणी ठरवले.पंडिता रमाबाईंचे ठायी विद्वत्ता व साहस यांचेबरोबरच ‘साहसमनृतं माया’ हे गुणही आहेत जशी आमची खात्री झाली आहे व ती कोणाच्याही नादास भुलून न जाता लोकांपुढे मांडणे हेआमचे कर्तव्य आहे असे आम्ही समजतो…. पंडिता रमाबाईंची मोराची पिसे पहात बसण्यातच काय, परंतु त्यांपैकी दहापाच पिसे उसनी घेऊन पंडितेबरोबर सुधारकर्त्यांनी आपणही नाचावयास लागावे म्हणजे आणलेल्या सोंगाची चांगली बतावणी होईल अशी बंधुत्वाच्या नात्याने त्यांस आमची सूचना आहे.”
शारदासदनाबद्दलच्या आरोप-प्रत्यारोपांची धुळवड मनसोक्त खेळल्यानंतर या वादाचा भर ओसरू लागला. पंडिता रमाबाईंनी पुणेवैभक्कार केळकरांना आपली बदनामी केल्याच्या आरोपावरून न्यायलयात खेचले आणि माफी मागायला लावली. गोपाळराव आगरकर वेणूची विचारपूस करण्याकरता घोडागाडीत बसून शारदासदनात पंडिताबाईंना भेटायला जात असत. प्रकृती बरी नसल्यामुळे गोपाळरावांना फार वेळ चालल्यावर दम लागत असे. ते पुणेवैभवावरील खटल्यात रमाबाईंच्या वतीने साक्षही देणार होते. त्याचा तिरकस उल्लेख टिळकांनी १ सप्टेंबर १८९१ च्या केसरीत शारदासदनासंबंधी चार स्फुट सूचना लिहिताना केला. “भाड्याची गाडी करून शारदासदनात जावयाचे व गाडी बाहेर उभी करून गाडीवाल्याजवळ करार केलेल्या वेळेत घारीप्रमाणे शारदासदनाचे स्वल्प निरीक्षण करून पंडिताबाईंशी शेकहॅड करून परत आलेली मंडळी असल्या कामी साक्ष देण्यास बिलकुल नालायक आहे व आम्ही दिलेल्या लेखी प्रमाणापुढे तर त्याची योग्यता शून्याहूनही कमी समजली पाहिजे.” शारदासदनाबद्दलची टिळकांची टीका अयोग्य आणि असभ्य असल्याचेवासुदेवराव केळकरांनाही वाटत होते. त्यांनी टिळकांबरोबरची भागीदारी संपुष्टात आणण्याचे ठरवले. १३ सप्टेंबरच्या मराठ्यात केळकरांनी संपादकत्व सोडत असल्याचे आणि दोन्ही पत्रे एकट्या टिळकांच्या मालकीची झाली असल्याचे जाहीर करण्यात आले. केळकरांचा आधीच रंगभूमीकडे अनिवार ओढा होता. मराठा पत्राचे संपादकत्व सोडल्यावर त्यांचा कॉलेजव्यतिरिक्तचा सगळा वेळ शाहूनगरवासी मंडळीच्या बिर्हामडी जाऊ लागला. त्यांचे ‘त्राटिका’ हे नाटक विशेष लोकप्रिय झाले. गणपतराव जोश्यांसारख्या नटसम्राटाच्या भूमिका बसवून देण्यात वासुदेवराव रमले ते अखेरपर्यंत.
टिळकांबरोबरच्या मतभेदामुळे केळकर दुरावले तर त्या आधी ऑगस्ट महिन्यात आगरकरांनी २४ ऑगस्ट १८९१ च्या अंकात यापुढे ‘सुधारका’ च्या इंग्रजी विभागाचे संपादन गोपाळराव गोखले करणार नसल्याची घोषणा केली. फर्गसन कॉलेजला बी. ए. चा दुसर्याब वर्षाचा वर्ग उघडण्याची मुंबई विद्यापीठाने परवानगी दिली होती. त्यामुळे गोखल्यांचे कॉलेजमधले शिकवण्याचे काम वाढणार होतेच. याशिवाय सार्वजनिक सभेच्या त्रैमासिकाच्या संपादनाचे काम गोखले आधीपासूनच करीत होते. या कामाच्या व्यापामुळे सुधारक’साठी लेखन करण्याइतकी सवड मिळणे त्यांना शक्य नव्हते, “उद्योग, हौस, निर्लोभ, बुद्धिमत्ता व विचारसाम्य” या गोखल्यांच्या गुणांमुळे त्यांच्यासारख्या मित्राला संपादनाच्या जबाबदारीतून मुक्त करणे गोपाळराव आगरकरांना कठीण झाले.