… सामाजिक सुधारणांपेक्षांहि राजकीय सुधारणा विशेष आवश्यक आहेत, आणि म्हणून राजकीय सुधारणा अगोदर झाल्या पाहिजेत. सुधारणांचा वास्तविक पाहतां असा क्रम असून आमचे सरकार त्याचा व्युत्क्रम करूं पाहाते, हे आश्चर्य नव्हे काय!.
….. जातिभेद, बालविवाह, असंमत वैधव्य, केशवपन वगैरे दुष्ट चालींपासूनआम्हांस पुष्कळ त्रास होत आहे; पणमिठावरील जबरदस्त कर, दर तीस वर्षांनी आमच्या जमिनीच्या बोकांडीस बसणारा रेव्हेन्यू सर्वेचा फेरा, व यमोदराप्रमाणे प्रतिवर्षी कोट्यवधी रुपये भक्ष्यस्थानी पडले तरी फिरून आपलें हपापल्यासारखे करणारे लष्करी खाते इत्यादिकांपासून आम्हांस जो त्रास होत आहे, त्यापुढे सामाजिक शोचनीय दुराचारापासून होणारा त्रास कांहींच नाही, असे म्हटले तरी चालेल. या घटकेस ज्या विधवा वैधव्यदुःख भोगीत आहेत, किंवा येथून पुढे आणखी शेपन्नास वर्षांत त्यांना जे भोगावे लागेल, त्या सर्वांचे दुःख एके ठिकाणी केले तरी ते १८७५-७६-७७ सालच्या दुष्काळांत जीं साठ लक्ष मनुष्ये अन्नान्न करून मेली, त्यांच्या दुःखाबरोबर येणार नाही, अशी आमची खात्री आहे.