विक्रमादित्याला आता अनेक शतके वेताळाला खांद्यावर घेऊनच हिंडायची सवय झाली होती. त्याचे उत्तर तयार होते. ‘वेताळा, मला संभ्रमात पाडण्याचे तुझे नियत कार्य तू आपल्यापरीने केलेस. तसे करताना तू मूळ प्रश्नावर अनेक रंगांचे थरही दिलेस. तणाव असह्य होऊन कोवळ्या वयात आत्महत्या करणे भाग पडावे ही घटना निःसंशय दुष्ट.’
‘जगातले सर्व विचारवंत एखादी कृती करणे असेल तेव्हा प्रश्न व्यक्तिगत, फार तर कौटुंबिक पातळीवर सोडवतात. तुझ्या तिरस्काराला पात्र असलेल्या इंग्रजीत याला micro-level असे म्हणतात. जेव्हा क्रिया करणे नसेल तेव्हा तोच प्रश्न व्यापक पातळीवर macro-level वर नेऊन सर्वव्यापी उत्तर शोधतात. उत्तर मिळत नाहीच. विचार करता आयुष्य मात्र उत्तम प्रकारे संपते. तर आपण हा प्रश्न दोन्ही पातळ्यांवर सोडवू. मात्र मी तुला प्रथम आदपाव टॅकर तेल जाळून एक सत्य घटना सांगणार आहे. उत्तरही मीच देईन. कारण ते काम नियतीने तुला दिलेच नाही.
‘काही वर्षांपूर्वी महाराष्ट्र राज्यात एका जिल्ह्याच्या गावी सर्वोत्तमतेचे वलय नसलेली, पण चांगल्यापैकी अभियांत्रिकी पाठशाळा होती. येथे एक विद्यार्थी अपार मेहनतीने पूर्वपरीक्षेत उचित गुण मिळवून दाखल झाला. अगदी उच्चवर्णीय, मात्र निम्न मध्यम वर्गीय. त्याचे सहपाठी थोड्याफार फरकाने तसेच, आचार्यदेखील नुकतेच मध्यम वर्गात मुरलेले; वाघिणीचे दूध बन्याच उशीरा प्यालेले. आचार्यांच्या प्रवचनात वाघिणीच्या दुधात बरेच कृष्णेचे पाणी मिसळलेले असे. पचनास अत्यंत सोपे. इथे समस्या वेगळीच होती. या छात्राकडे अपार मेहनत हे एकच शस्त्र होते. त्याचा वापर करून त्याने तेथवर मजल तर मारली. पण वेताळा, इथे हे शस्त्र कमी पडले. दिवसाला तास तर चोवीसच असतात.आपल्या भारतात तेव्हा व आताही अनेक पालक आपल्या अपूर्ण महत्त्वाकांक्षा आपल्या पाल्याकडून पूर्ण करू पाहतात. ह्या मुलाच्या पालकांचा उमेदीचा काळ म्हणजे जेव्हा जवाहरराजा अजून राजा झाला नव्हता, तर इंग्रजांना हाकलण्याच्या तयारीत असे तेव्हा तथाकथित उच्चवर्णीयांपुढे दोनच पर्याय असत : एकतर ICS, वैद्यकी किंवा वकिली। करणे, व ते शक्य न झाल्यास कारकुनी. काही थोडे स्वेच्छेने आचार्यपद स्वीकारीत व जे आपल्याला न जमले ते शिकवीत. पित्याने आपल्या अल्प वेतनाचा मोठा भाग खचून मुलाला अभियांत्रिकीला तर पाठवले, मात्र सतत एकच धोशा, “तू अभियंता बन व आपल्या लहान भावंडांच्या शिक्षणास द्रव्य पुरव.”
‘वेताळा’, अखेर अपरिहार्य तेच घडले. अपार मेहनतीला अपयश आले. पुन्हा त्याकाळी एक जाचक नियम असे. प्रथम वर्षात दोनदा अपयश आल्यास लाक्षणिक अर्थाने पाश्र्वभागावर लत्ताप्रहार करून स्वगृही पाठवणी करत. याला त्याकाळच्या परिभाषेतdebar असे म्हणत. मात्र या छात्राने तेवढी वाट पाहिली नाही. प्रथम प्रयत्नात अपयश येताच त्याने नजीकच्या लोहमार्गावर जाऊन अग्निरथाला देह अर्पण केला.
‘वेताळा’, अशा घटना रोजच घडतात. तेव्हा अनुसूचित जाती, आयायट्या यांनी कथा आकर्षक अवश्य होते, पण मूळ प्रश्न वेगळाच आहे. येथे सर्व आचार्य, सहपाठी त्याचेच जातवाले होते.
‘खरेतर आयायटीची पदवी व आत्महत्या यांमधे इतर अनेक मार्ग असतात. प्रत्येक मार्गावर अपयश दबा धरून असतेच (अगदी आत्महत्येच्याही). उसळते बाल्य व परिपक्व तारुण्य असे आघात अधिक सहजतेने साहू शकते. उभरते तारुण्य असे आघात कधीकधी सहन करू शकत नाही. अशा वेळी जर पालकांनी (खरेतर पित्याने) वाचेने कृतीने असे जाणवून दिले की “यशात अपयशात माझ्या कमी अधिक शक्तीनिशी मी तुझ्या पाठीशी आहे” तर मग जीवशास्त्र, शरीरशास्त्र, गुरुत्वाकर्षण व दोरखंड याबरोबर आपल्यावर प्रेम करणाच्या व्यक्तींचीही आठवण होते, त्याबरोबर एक जाणीव की जीवन आपले एकट्याचेच नसते, त्यावर आपल्यावर प्रेम करणार्यांजचाही हक्क असतो, व मग आततायी कृत्य घडत नाही.’
आता ह्याच प्रश्नाचे सर्वव्यापी उत्तर शोधू. सहपाठी, आचार्य, संचालक, वा पंतप्रधान – राष्ट्रपतीही हा प्रश्न एकत्रितपणे सोडवू शकत नाहीत. तेव्हा एकच मार्ग उरतो ‘धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे’ या वचनाच्या पूर्तीची वाट पाहणे. ते तर समाज करतोच आहे. मात्र एक गोष्ट सोडून द्यायची की मागच्या अवतारात त्याने जगाचेच काय, स्वतःच्या कुटुंबाचेही सर्व प्रश्न सोडवले नव्हते ते आपसात भांडूनच मेले.
वेताळाने अमेरिकेच्या दूतावासातले आपले संबंध वापरले व दुसर्यासच दिवशी राजाच्या हातात Green Card पडले.