धर्म आणि मूलगामी मानवतावाद (Radical Humanism)

Radical Humanism (मूलगामी मानवतावाद) या नावाने सुमारे साठ वर्षे अस्तित्वात असलेल्या तत्त्वज्ञानाचे मुखपत्र ‘The Radical Humanist’ या नावाने श्री. व्ही. एम. तारकुंडे यांच्या संपादकत्वाखाली दिल्लीहून प्रसिद्ध होत असते. मानवेंद्रनाथ रॉय यांनी स्थापन केलेल्या सामाजिक, राजकीय आणि धार्मिक तत्त्वज्ञानाच्या प्रसाराकरिता त्याचे प्रकाशन होत असते. विवेकवाद (rationalism) आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांच्यावर आधारलेल्या आणि स्वातंत्र्य, समता व न्याय या मूल्यांचा पुरस्कार करणाच्या विचारसरणीचा प्रसार करण्याकरिता Radical Humanist Association ही संस्था प्रयत्न करीत असते.
या संस्थेचे स्मरण आज होण्याचे कारण तिच्या मुखपत्राच्या फेब्रुवारी ९५ च्या अंकात प्रसिद्ध झालेला संपादकीय लेख. लेखाचे शीर्षक आहे ‘Religion and the Radical Humanist Movement’, आणि त्यात धर्माविषयी या चळवळीची पूर्वापार चालत आलेली भूमिका शिथिल करण्याचा प्रस्ताव व्यक्त झाला आहे. हा विचार चुकीच्यादिशेने चालला आहे असे आम्हाला वाटते, आणि म्हणून त्यासंबंधी दोन शब्द लिहिण्याचा
आमचा विचार आहे.
-१ –
लेखात संपादक आरभीच स्पष्ट करतात की मूलगामी मानवतावादी तत्त्वज्ञान आणि व्यवहार जडवादी (materialist) असल्यामुळे ते निरीश्वरवादी अथवा अज्ञेयवादी असून मूलगामी मानवतावाद्यांना धर्म नसतो. परंतु असे जरी असले तरी व्यवहारात त्यांना धर्म मानणार्याम लोकांशी सहकार्य करणे आवश्यकच नव्हे तर इष्टही वाटते. ईश्वरावरील श्रद्धेचा मुद्दा सोडला तर आस्तिक लोकांपैकी अनेकांना मू. मा. ची (मूलगामी मानवतावादाची) स्वातंत्र्य, विवेकवाद आणि स्वायत्त नीती (self-sustained morality) ही मूल्ये मान्य असतात, एवढेच नव्हे तर ते स्वतः एका धर्माचे अनुयायी असले तरी अन्य धर्मीयांचा ते द्वेष करीत नाहीत, आणि त्यांना स्वधर्मीयांपेक्षा वेगळी वागणूक देत नाहीत. शिवाय आपले धार्मिक विश्वास आणि आचार यांची वेळोवेळी विवेकाच्या (reason) कसोटीवर परीक्षा करावी असेही ते म्हणतात. अशा व्यक्तींना धार्मिक मानवतावादी (religious humanists) असे नाव देता येईल असे श्री. तारकुंडे म्हणतात.
याप्रमाणे विवेकवाद सोडला तर मू. मा.ची सर्व मूल्ये धार्मिक मानवतावाद्यांना मान्य असल्यामुळे त्यांना मू. मा. मंडळामध्ये प्रवेश द्यावा अशी शिफारस श्री. तारकुंडे करतात. या शिफारशीवर घेतल्या जाऊ शकणाच्या काही संभाव्य आक्षेपांचा विचार त्यांनी केला आहे. उदा. धार्मिक मनुष्यांची नीती स्वायत असू शकेल काय असा प्रश्न ते उपस्थित करतात आणि त्याला उत्तर देतात. ‘स्वायत्त नीती’ (self-sustained morality) याचा अर्थ जी सामाजिक रूढी किंवा धार्मिक दंडक यांच्यावर आधारलेली नाही अशी नीती. आता धार्मिक मनुष्याची नीती धर्माधिष्ठित असणार, ती स्वायत्त कशी असू शकेल? या प्रश्नाला श्री. तारकुंड्यांचे उत्तर असे आहे की बर्यायच धार्मिकांची नीती त्यांच्या स्वतःच्या सदसद्विवेकबुद्धीवर आधारलेली असते, आणि ते आपली सदसद्विवेकबुद्धी किंवा अंतःकरण म्हणजे ईश्वराचा आवाज आहे असे मानतात. एवढेच नव्हे तर त्यांच्यापैकी अनेक लोक सदसद्विवेकबुद्धीने उचित म्हणून सांगितलेला आचार रास्त किंवा न्याय्य (fair) नाही हे लक्षात आल्यावर तो बदलतात. श्री. तारकुंडे यांनी विचारात घेतलेला आणखी एक संभाव्य आक्षेप म्हणजे ज्याची धर्मावर श्रद्धा आहे असा मनुष्य खया अर्थाने विवेकी, विवेकनिष्ठ (rational) असू शकेल काय हा आहे. त्याला त्यांचे उत्तर असे आहे की फार थोडे लोक पूर्णपणे विवेकप्रामाण्य मानून त्याप्रमाणे चालणारे असतात. बाकीच्या लोकांच्या विचारांत बरयाच विसंगती आढळतात. म्हणजे ते एकाच वेळी धार्मिक आणि विवेकवादी दोन्ही असू शकतात. अशा लोकांचे एक उदाहरण म्हणून त्यांनी प्रा. मे. पुं. रेगे यांचे दिले आहे. आजचा सुधारक च्या जानेवारी ९५ च्या अंकातील त्यांच्या ‘मी आस्तिक का आहे?’ ह्या लेखाचा संदर्भ उद्धृत करून ते म्हणतात की प्रा. रेगे मानवतावादी आहेत याबद्दल कोणी शंका घेऊ शकणार नाही.
याशिवाय श्री. तारकुंडे अशा धार्मिकांचा उल्लेख करतात की जे व्यक्तिरूप ईश्वर (personal God) मानीत नाहीत. त्यांचा ईश्वर अव्यक्ति रूप (impersonal) असतो. एवढेच नव्हे तर ते सर्व मानवांचा एकच ईश्वर आहे असे मानतात आणि धर्माधर्मातील भेद निराधार आहेत असे प्रतिपादतात.
शेवटी श्री. तारकुंडे म्हणतात की मू. मा. मंडळाच्या घटनेमध्ये मंडळात फक्त अधार्मिकांनाच प्रवेश द्यावा असे कलम नाही. मू. मा.त व्यक्तीचे स्वातंत्र्य आणि तिची प्रतिष्ठा यांना प्राधान्य असून स्वातंत्र्य, विवेकनिष्ठा आणि स्वायत्त नीती ही त्याची मूल्ये आहेत. मू. मा. ची तत्त्वे प्रथम मानवेंद्रनाथ रॉय यांनी ग्रथित केली, परंतु मू. मा. ही एक बंद, अपरिवर्तनीय व्यवस्था आहे असे कोणी कधी मानले नाही. ते तत्त्वज्ञान लवचीक आहेआणि त्यामध्ये सुधारणा संभवते.
-२-
विवेकनिष्ठेची अट शिथिल करून धार्मिक मानवतावाद्यांना मू. मा. आंदोलनात प्रवेश द्यावा या प्रस्तावाचे श्री. तारकुंडे यांनी दिलेले युक्तिवाद वर संक्षेपाने दिले आहेत. त्यांपैकी एकही निर्णायक नाही आणि वरील प्रस्तावाचे समर्थन करण्यास ते असमर्थ आहेत असे आमचे मत आहे. आम्ही मू. मा. नाही, परंतु मू. मा. ची बहुतेक तत्त्वे आणि मूल्ये आम्हाला मान्य आहेत. सामाजिक आणि राजकीय या दोन्ही क्षेत्रांत व्यक्ती हे मूलभूत तत्त्व आहे, त्याला स्वतंत्र मूल्य आणि प्रतिष्ठा आहे असे मू. मा. प्रमाणे आमचेही मत आहे. व्यक्तिस्वातंत्र्य, विवेकनिष्ठा आणि विवेकाधिष्ठित नीती (हिलाच श्री. तारकुंडे स्वायत्त नीती म्हणतात असे आम्हाला वाटते) ही सामाजिक आणि राजकीय तत्त्वज्ञानाची मूलभूत तत्त्वे आम्हालाही अभिप्रेत आहेत. त्यामुळे त्या तत्त्वज्ञानाविषयी आम्हाला सहानुभूती आहे. विवेकवादाचा पुरस्कार करणार्या. अतिशय थोड्या तत्त्वज्ञानांपैकी ते एक आहे ही गोष्ट आम्हाला महत्त्वाची वाटते. म्हणून श्री. तारकुंडे यांनी सुचविलेल्या प्रस्तावासंबंधी आम्हाला असलेल्या शंका व्यक्त करणे अवश्य आहे असे आम्हाला वाटते.
प्रथम ज्यांना श्री. तारकुंडे धार्मिक मानवतावादी म्हणतात त्यांच्याविषयी त्यांनी केलेल्या प्रतिपादनाकडे वळतो. ते म्हणतात की ईश्वरावरील श्रद्धा सोडली तर मू. मा. ची सर्व मूल्ये ते स्वीकारतात. परंतु या ठिकाणी मू. मा. आणि धार्मिक मानवतावादी यांच्या मानवतावादी मूल्यांच्या स्वीकारात एक मूलभूत भेद आहे. मू. मा. ची न्याय, समता, स्वातंत्र्य इ. मूल्ये जशी मू. मा. ना मान्य आहेत तशीच ती धार्मिक मानवतावाद्यांनाही मान्य असतील कदाचित. पण या मूल्यांचे समर्थन ते कसे करतात? ती ईश्वराने आज्ञापिलेली आहेत म्हणून आपणती मानली पाहिजेत असे ते म्हणतील. आता ईश्वराच्या आज्ञा जाणून घेण्याचे दोनच उपाय आहेत असे म्हणतात. एक श्रुती किंवा धर्मग्रंथ आणि दुसरा अंतःकरण किंवा सदसद्विवेकबुद्धी. परंतु सर्वच धर्म मानवतावादी मूल्ये मानीत नाहीत, आणि मग कोणती धर्मप्रणीत मूल्ये आपण स्वीकारायची असा प्रश्न उपस्थित होतो. धर्मप्रणीत मूल्ये धर्मप्रणीत म्हणून स्वीकरणीय असे असेल तर सर्वच धर्माची सर्वच मूल्ये आपल्यावर सारखीचबंधनकारक होतील, आणि हे अशक्य आहे, कारण विविध धर्मांनी आज्ञापिलेली मूल्ये अनेकदा भिन्नच नव्हे तर परस्पर विरुद्धही असतात. म्हणून त्यापैकी काहींची निवड आपल्याला करावी लागणार आणि ही निवड करण्याचे एकमेव धर्मप्रणीत साधन म्हणजे अंतःकरण किंवा सदसद्विवेकबुद्धी. परंतु दोन व्यक्तींच्या सदसद्विवेकबुद्धींचे निर्णय अनेकदा परस्परविरुद्ध असतात, आणि त्यांची शहानिशा करण्याचे साधन उपलब्ध नाही. धर्मप्रणीत आज्ञांची किंवा अंतःकरणाच्या आदेशांची शहानिशा विवेकाच्या (reason) साह्याने करता येईल असे कोणी म्हणेल. परंतु तसे करणे विवेकाचा अधिकार धर्मपुस्तके आणि सदसद्विवेकबुद्धी यांच्याहून श्रेष्ठ आहे असे मानणे होईल, आणि एकदा तसे मानल्यानंतर धर्म आणि सदसद्विवेकबुद्धी यांचे अधिकार खंडित होतील. या सर्व कारणांमुळे धार्मिक मानवतावादी मू.मा. चीच मूल्ये स्वीकारतो असे जरी बाह्यतः दिसले तरी वस्तुतः ते खरे नसते. मू. मा. विवेकप्रणीत मूल्ये स्वीकारतो, आणि त्यामुळे दोन विवेकनिष्ठ मनुष्यांत अंतिम मूल्यांसंबंधी मतभेद होत नाही. मू. मा. ला अभिप्रेत असलेली मूल्ये क्वचित योगायोगाने धर्मप्रणीतही असतील, पण हा अपघात असेल, आणि त्यावर आपल्याला विसंबता येणार नाही.
श्री. तारकुंडे काही धार्मिक मानवतावाद्यांविषयी असेही म्हणतात की आपले सिद्धांत आणि व्यवहार यांची विवेकाच्या कसोटीवर परीक्षा व्हावी याला त्यांची तयारी असते. परंतु अशी परीक्षा नव्याने करण्याची गरज राहिलेली नाही. ईश्वराचे अस्तित्व सिद्ध करण्याकरिता गेली कित्येक हजार वर्षे शेकडो तत्त्वज्ञांनी अनेक युक्तिवाद वापरले आहेत. पण त्यांपैकी एकही युक्तिवाद निर्णायक नाही हे अधिकारी लोकांनी वारंवार दाखवून दिले आहे. त्यामुळे ईश्वर, परलोक इत्यादींविषयी स्वीकारण्याची विवेकवादी भूमिका फक्त अज्ञेयवादी शिल्लक राहते. मू.मा. ची भूमिका अशीच आहे, आणि ती सोडणे म्हणजे मू. मा. चा त्याग करण्यासारखे आहे.
स्वायत्त नीतीचा मुद्दा घेऊन विचार केला तरी तोच निष्कर्ष आपल्या हाती लागतो. स्वायत्त नीती म्हणजे जी प्रस्थापित सामाजिक व्यवहार किंवा धर्मप्रणीत आचार यांवर आधारलेली नाही अशी नीती. अशी नीती फक्त विवेकावरच अधिष्ठित असू शकते. म्हणून स्वायत्त नीतीचा आग्रह धरायचा झाला तर विवेकवादाचा आधार सुटता कामा नये. परंतु वर पाहिल्याप्रमाणे ईश्वर, धर्म किंवा सदसद्विवेकबुद्धी यांपैकी कशाचाच विवेकवादाच्या कसोटीपुढे निभाव लागत नाही. त्यामुळे त्यांची कास धरणारा कोणीही विवेकनिष्ठ आहे असे म्हणता येत नाही.
श्री. तारकुंडे यांनी आपल्या प्रस्तावाच्या बाजूने आणखी एक विचार मांडला आहे. ते म्हणतात की मू. मा. आंदोलनात तरुण सदस्य फारसे नाहीत. याचे कारण समाजातील बहुतेक प्रौढ लोक धार्मिक असल्यामुळे त्यांच्या कुटुंबात जन्मलेल्या मुलांवर पहिले संस्कार धर्माचेच होतात. त्यांपैकी काही उत्तरायुष्यात विचाराने निरीश्वरवादी होतात. जर आपण मू. मा. आंदोलनात प्रवेशाच्या अटी शिथिल करून धार्मिक तरुणांस प्रवेश दिला तर कालांतराने ते विवेकवादी होण्याचा संभव बराच असेल असे म्हणताना धर्म मानणाच्यातरुणांना प्रवेश द्यायचा तो त्यांना उमेदवार म्हणून, probationer म्हणून द्यायचा किंवा कसे हा मुद्दा स्पष्ट झालेला नाही. परंतु या अटीवर कोणी मू. मा. मंडळात प्रवेश घेण्यास तयार होईल हे शंकास्पद आहे.
या बाबतीत आम्हाला एवढेच म्हणावयाचे आहे की अन्य मानवतावादाहून मू. मा. चे वैशिष्ट्य तो विवेकनिष्ठ (rationalist) आहे हेच आहे. तसे पाहिले तर लोकशाही समाजातील बहुतेक लोक मानवतावादी मूल्ये मानणारेच असतात. परंतु त्यांच्यापैकी फारच थोडे खर्याी अर्थाने विवेकनिष्ठ असतात. ही गोष्ट शोचनीय आहे हे, खरे; परंतु विवेकवाद आचरणे म्हणजे तारेवरचे चालणे आहे, आणि ते करू शकणारे लोक केव्हाही अपवादात्मकच असणार, त्यांची संख्या वाढविण्याचा सोपा उपाय नाही, आणि धार्मिक लोकांना मू. मा. मंडळात प्रवेश देणे हा तर तो खचितच नाही. उलट तो आत्मघातकी ठरू शकतो.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.