आमचे मित्र डॉ. नी. र. वर्हा डपांडे यांचा ‘समतेचे मिथ्य या शीर्षकाचा एक लेख याच अंकात इतरत्र छापला आहे. त्यात त्यांनी आजचा सुधारकमध्ये प्रसिद्ध झालेल्या स्त्रीमुक्तिवादी लिखाणावर जोरदार हल्ला चढविला आहे. आजचा सुधारकमध्ये प्रसिद्ध झालेले या विषयावरील लिखाण अत्यंत अज्ञतेचे असून ते करणार्याआ लोकांचा या विषयाच्या मानसशास्त्रीय, समाजशास्त्रीय व ऐतिहासिक संशोधनाचा काडीचाही अभ्यास नसतो, एवढेच नव्हे तर ते त्या लेखकांचे ‘जैविकीचे व मानसशास्त्राचे प्राथमिक अज्ञान दर्शविते असे ते म्हणतात. लेखाच्या शेवटी ते लिहितात की आजच्या सुधारकाने अभ्यासशून्य, बेजबाबदार व पुरोगामी हा छाप आपल्यावर लागावा या एकमात्र उद्देशाने लिहिलेले लिखाण प्रसिद्ध केल्याने तो आपल्या समाजप्रबोधनाच्या कर्तव्यात कसूर करीतआहे असे म्हणण्यास जागा होते.
या अत्यंत आक्रमक शैलीत लिहिलेल्या हल्ल्याला तेवढ्याच प्रत्याक्रमक शैलीत उत्तर देणे आमच्या वादपद्धतीत बसत नाही. पण तरीही डॉ. वहाडपांड्यांच्या प्रत्येकआक्षेपाला आमच्याजवळ समर्पक उत्तर आहे. ती उत्तरे आम्ही पुढे देत आहोत.
१.
‘सर्व मनुष्य समान आहेत हे सर्व क्रांतिवाद्यांना प्रिय असलेले घोषवाक्य जर वस्तुस्थितीचे वर्णन करणारे विधान म्हणून मानले तर ते उघडच असत्य आहे हे सांगायची जरूर नाही. शारीरिक शक्ती, मानसिक बळ, बुद्धी, सौंदर्य, स्वभाव इत्यादी अनेक बाबतीत सर्व मनुष्य समान नाहीत हे प्रसिद्ध आहे. परंतु ‘सर्व मनुष्य समान आहेत हे वाक्य वस्तुस्थितीचे वर्णन म्हणून अभिप्रेत नाहीच. ते मनुष्यमात्राच्या हक्कांचे प्रतिपादन करणारे एक नीतिमीमांसीय, राज्यमीमांसीय तत्त्व आहे. त्याचा अर्थ आहे सर्व माणसांचे मूलभूत हक्क समान आहेत. आपले जीवन आपण कसे घालवावे, आपण कोणती कर्मे करावीत हे ठरविण्याची मोकळीक सर्वांना असावी, कोणाला जास्त आणि कोणाला कमी मोकळीक असे पक्षपातित्व असू नये. अपक्षपातित्व (impartiality) हा समतेचा अर्थ आहे.
स्वातंत्र्याचे समर्थन असे करता येईल. मानवाचे नैतिक ध्येय जर जास्तीत जास्त लोकांचे जास्तीत जास्त सुख हे आहे असे मानले (आणि ते मानावे हे बहुधा सर्वमान्य होईल), तर प्रत्येक मनुष्याला हवे ते कृत्य करण्याचे जास्तीत जास्त स्वातंत्र्य असले पाहिजे. स्वातंत्र्य हे कोणत्याही प्रकारचे सुख प्राप्त करण्याचे अपरिहार्य साधन आहे, आणि उलट पारतंत्र्यदुःखाचे प्रधान कारण आहे. परंतु एका मनुष्याचे अमर्याद स्वातंत्र्य अन्य मनुष्यांच्या स्वातंत्र्याला बाधक होऊ शकते, नव्हे ते अनिवार्यपणे बाधक होते, म्हणून स्वातंत्र्यावर बंधने घालावी लागतात. मात्र स्वातंत्र्यावरील बंधन हे अनिवार्य अनिष्ट (necessary evil) आहे. म्हणून ती बंधने किमान असावीत. परस्परांच्या स्वातंत्र्याला बाधक न होणारे जास्तीत जास्त स्वातंत्र्य हा सामाजिक व्यवस्थेचा आदर्श म्हणावा लागेल.
समतेचे मूल्य वेगळ्या प्रकारचे आहे. समता कशाची या प्रश्नाच्या उत्तरावर बरेच अवलंबून आहे. समता ही स्वातंत्र्याची असू शकेल तशी ती पारतंत्र्याची – बंधनाचीही असू शकेल. एखाद्या समाजातील सर्व लोक समान पारतंत्र्यात असू शकतील, किंवा उलट ते सर्व समान स्वतंत्र असू शकतील. दोन्ही व्यवस्थांत विषमतेच्या कारणास्तव कोणालाच तक्रार करण्यास जागा राहणार नाही, परंतु पहिल्या व्यवस्थेत बंधनांवर भर असल्यामुळे तिच्यात ५५ सुखसाधनेवर फार मर्यादा पडणार हे उघड आहे, उलट दुसर्याा व्यवस्थेत सर्वांना मोठ्या प्रमाणात स्वातंत्र्य असल्यामुळे त्या सर्वांना सुखप्राप्तीची शक्यता भरपूर असणार. आपल्या नैतिक ध्येयानुसार ही दुसरी व्यवस्था अधिक चांगली मानावी लागेल. याप्रमाणे समाजात समता असावी, आणि ती स्वातंत्र्याची असावी असे म्हणता येते.
आता समाजातील सर्वच व्यक्तींना त्यांचे लिंग, वय, जात इत्यादि काहीही असले तरी आपापल्या इच्छेप्रमाणे जगण्याचे समान स्वातंत्र्य असले पाहिजे हा सामान्य नियम केल्यावर त्याला काही अपवाद संभवतात काय ते पाहू. कारण काही अपवादात्मक परिस्थितीत एखाद्या व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर इतरांच्यापेक्षा अधिक मर्यादा घालणे योग्य असू शकेल. उदा. स्वार्थामुळे इतरांच्या हक्कावर गदा आणणार्याप लोकांवर अधिक बंधने घालावी लागतील, तसेच एखाद्याला सांसर्गिक रोग झाला असल्यास त्याच्या हालचालीवर बंधने घालणे युक्त होईल. त्यामुळे समतेचे सामान्य तत्त्व मान्य केल्यावरही थोड्याफार प्रमाणात विषमता अवश्य असू शकेल.
२.
आता आपण डॉ. वर्हाथडपांड्यांच्या स्त्रीपुरुषसमतेवरील आक्षेपांकडे वळू.
डॉ. वर्हावडपांड्यांनी आरंभी दोन आक्षेप घेतले आहेत. हे दोन्ही आक्षेप आजपर्यंत हजारो वेळा घेऊन झाले आहेत आणि त्यांचे समर्पक खंडनही तितक्याच वेळा केले गेले आहे. खरे सांगायचे तर ते दोन्ही आक्षेप समतेच्या स्वरूपाविषयीच्या प्राथमिक गैरसमजातून निर्माण झाले आहेत. पहिला आक्षेप असा आहे की समतेचा अर्थ चोर आणि साव दोघांनाही सारखीच वागणूक दिली पाहिजे; म्हणजे दोघांनाही तुरुंगात पाठविले पाहिजे किंवा दोघांनाही सोडून दिले पाहिजे. किंवा सर्व गणिते बरोबर असलेली उत्तरपत्रिका आणि एकही गणित बरोबर नसलेली उत्तरपत्रिका यांना समान गुण दिले पाहिजेत. दुसरा आक्षेप समता म्हणजे समान संधी ह्या अर्थावर आहे. हा अर्थ केला तर ज्याला साधी बेरीज-वजाबाकीकरता येत नाही असा मनुष्य आणि रामानुजम या दोघांनाही गणित शिकण्याची समान संधी असावी असे म्हणावे लागेल.
हे दोन’ बालिश आणि वेड घेऊन पेडगावला जाणारे आक्षेप घेतल्यावर डॉ. -वर्हाीडपांडे स्वतःच समतावाद्यांना अभिप्रेत असणारा योग्य अर्थ सांगतात. मात्र ते म्हणतात की खरे मूल्य समता नाही. खरे मूल्य न्याय हे आहे. पण न्यायाच्या तत्त्वात समता अंतर्भूत आहे हे. ते विसरतात. समतेच्या तत्त्वाशिवाय न्यायाचे तत्त्व विशद करता येत नाही. ज्याला वंटनात्मक न्याय (distributive justice) म्हणतात ते तत्त्व एवढेच सांगते की समानांना समान वागणूक आणि असमानांना असमान वागणूक देणे म्हणजे न्याय. जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात सत्ता, संपत्ती किंवा अन्यसंधी यांची वाटणी करताना व्यक्ती-व्यक्तींमधील काही भेद प्रस्तुत असतात, तर इतर अनेक अप्रस्तुत असतात. उदा. एखाद्या सेवेकरिता उमेदवारांची निवड करताना त्या सेवेकरिता अवश्य असणारे गुण उमेदवारांत आहेत की नाहीत ही गोष्ट प्रस्तुत आहे, परंतु त्यांचे सौंदर्य किंवा त्याची जात किंवा लिंग या गोष्टी अप्रस्तुत आहेत. नियम निःपक्षपातीपणे सर्वांना सारखाच लागू केला जावा. अप्रस्तुत भेदांमुळे त्यांना दिली जाणारी वागणूक भिन्न असू नये असे न्यायाचे तत्त्व सांगते. आणि ही गोष्ट तत्त्व म्हणून डॉ. वर्हािडपांड्यांना मान्यच आहे. ते म्हणतात, ‘अप्रस्तुत व अनावश्यक गोष्टी समान आहेत, म्हणजे त्यात फरक असला तरी तो विचारात घ्यायचा नाही या अर्थी समान आहेत. या विधानात त्यांनी शब्द जरी वेगळ्या प्रकारे वापरले असले तरी त्यांचा मथितार्थ तोच आहे असे म्हणता येईल.
३.
आता आपण स्त्रीपुरुषांच्या समतेच्या प्रश्नाकडे वळू. समतेच्या सामान्य तत्त्वानुसार स्त्रिया आणि पुरुष यांचे सर्व हक्क समान असावेत असे निष्पन्न होईल, आणि तरीसुद्धा समतेच्या दुय्यम तत्त्वानुसार त्यांच्यावर कमीजास्त बंधने घालावी लागतील काय ते पाहू.
या संबंधात डॉ. वर्हाडपांडे म्हणतात की किन्से नावाच्या एका संशोधकाने हजारो स्त्रीपुरुषांची पाहणी करून असे शोधून काढले आहे की पुरुषांची कामवासना स्त्रियांच्या कामवासनेच्या पेक्षा प्रबल असते. स्पष्टच सांगायचे तर पुरुषांची कामवासना स्त्रियांच्या कामवासनेच्या चौपट प्रबल असते. हे जर खरे मानायचे असेल तर स्त्रीपुरुषांना आपण समान मानले पाहिजे हे म्हणणे टिकू शकत नाही असे त्यांचे म्हणणे आहे.
आता किन्से यांच्या पाहणीवर आपण कितपत विश्वास ठेवावा हा प्रश्न आहे. ‘Figures cant lie; but liars can figure’ हे वचन प्रसिद्ध आहे. किन्से यांची पाहणी या दोषापासून मुक्त आहे असे म्हटले तरी तिच्यात भाग घेतलेल्या स्त्रीपुरुषांनी दिलेली माहिती कितपत सत्य होती हा प्रश्न विचारात घ्यावा लागेल. विशेषतः स्त्रियांची प्रवृत्ती हजारो वर्षांच्या शिकवणुकीमुळे आपल्या कामजीवनाविषयी मौन बाळगण्याची असल्यामुळेत्यांनी दिलेली माहिती मुळात न्यूनतेकडे झुकलेली असेल हे संभवते. त्या दृष्टीने किन्से यांच्या पाहणीविषयी अन्य संशोधकांची मते काय आहेत हे कळले तर बरे होईल.
पण समजा की किन्से यांची पाहणी पूर्णपणे विश्वासार्ह आहे. तर त्यावरून काय सिद्ध होईल? स्त्रीपुरुषांना असमानतेने वागवावे हे? डॉ. वर्हाईडपांडे म्हणतात की कामवासनेच्या बाबतीत स्त्रीपुरुष समान आहेत असे अत्यंत विपर्यस्त मत विवाहित स्त्रीला ‘संभोगस्वातंत्र्य असावे असे प्रतिपादन करणार्यांअनी गृहीत धरले आहे. ते हे कशाच्या आधाराने म्हणतात हे कळायला मार्ग नाही. पुरुषाला ज्या प्रमाणात संभोगस्वातंत्र्य असते त्या प्रमाणात स्त्रीलाही असावे असे म्हणताना त्यांची कामवासना सारखीच प्रबल आहे असे स्त्रीमुक्तिवाद्यांनी गृहीत धरले आहे हा निष्कर्ष त्यांनी कशावरून काढला हे ते सांगतील तर बरे होईल. स्त्रीमुक्तिवाल्यांनी असे काही गृहीत धरलेले नाही. ते फक्त एवढेच म्हणत आहेत की प्रत्येक नागरिकाला घटनेने दिलेला आणि अतिशय न्याय्ये असलेला समान स्वातंत्र्याचा अधिकार जसा पुरुषाला आहे तसाच स्त्रीलाही असावा. हे म्हणण्याकरिता डॉ. वर्हााडपांडे सांगताहेत ते गृहीतक स्वीकारण्याची काही गरज नाही.
तरीसुद्धा जर डॉ. वर्हाडपांडे म्हणतात तेवढा मोठा भेद स्त्रीपुरुषांच्या कामप्रेरणांत असेल तर पतिपत्नींच्या प्रत्यक्ष जीवनात काही तरी तडजोड करावी लागणार हे उघड आहे. त्या तडजोडीचे डॉ. वर्हातडपांड्यांना अभिप्रेत स्वरूप कसे आहे? ते म्हणतात ‘पतीची कामुक भूक आपल्यापेक्षा चौपट बहुल आणि तीव्र आहे हे लक्षात घेऊन पत्नीने स्वतःची तीव्र इच्छा नसतानाही पतिसुखार्थ संभोगात आनंद मानणे व त्यासाठी व्यभिचार टाळणे शिकले पाहिजे.’ परंतु दुसरीही एक तडजोड शक्य आहे हे त्यांना सुचलेले दिसत नाही. पत्नीची कामुक भूक आपल्या भुकेच्या चतुर्थांश इतकीच आहे हे लक्षात घेऊन पतीने पत्नीसुखार्थ संयम करण्यात आनंद मानणे आणि त्यासाठी व्यभिचार टाळणे शिकले पाहिजे, हा उपाय त्यांना सुचला नाही. यावरून स्त्रीस्वातंत्र्याची ते काय किंमत करतात हे दिसून येते. खरे सांगायचे म्हणजे वरील दोन्ही उपायांत तडजोड अशी नाहीच. खरी तडजोड अशी असू शकेल की पतीने आपली भूक थोडीबहुत आवरावी आणि पत्नीने नको असलेला संभोग थोड्या प्रमाणात सहन करावा. असे केल्यास कोणाच्याच स्वातंत्र्याला बाधा न पोचता इष्ट साध्य होईल.
स्त्रीने विवाहबाह्य संबंधाची मोकळीक घेण्याला डॉ. वर्हाअडपांड्यांचा मुख्य आक्षेप जुनाच आहे. तो म्हणजे पुरुषाला आपल्या पत्नीची मुले आपलीच आहेत ही खात्री हवी असते. ही इच्छा स्वाभाविक आहे हे मान्य करूनही त्याकरिता द्यावी लागणारी किंमत (स्त्रियांचे पारतंत्र्य) ही फारच मोठी आहे असे म्हणणे भाग आहे. त्यावर उपाय एकच आहे, आणि तो म्हणजे आपल्या स्वाभाविक इच्छेला आवर घालणे. हे वाटते तितके कठीण नाही. हजारो वर्षे स्त्रिया सावत्र मुले सहन करीत आल्या आहेत. ते पुरुषांनीही थोड्याफार प्रमाणात केलेतर ते फार अन्यायी होईल असे नाही. आता सावत्र मुले बोलून चालून आपली नाहीत हे माहीत असल्यामुळे त्यांच्या बाबतीत स्त्रीची फसवणूक होत नाही हे खरे आहे. परंतु आजकालच्या कुटुंबनियोजनाच्या दिवसांत पुरुषावर अन्य पुरुषांची मुले आपलीच समजण्याचा प्रसंग येण्याचा फारसा संभव नाही हेही लक्षात ठेवले पाहिजे. लग्न झाल्यावर चारदोन वर्षे तरी स्त्री परपुरुषाकडे आकृष्ट होईल हे संभवत नाही, आणि तोपर्यंत जी एक दोन मुले व्हायची असतील ती होऊन गेलेली असतील. त्यामुळे दुसर्याा पुरुषांची मुले आपल्या घरांत जन्मण्याचा धोका जवळपास शून्यप्राय असेल. आज संततिप्रतिबंधक साधने जवळजवळ शंभरटक्के खात्रीलायक झाली आहेत त्यामुळे वरील धोका अभावानेच आढळेल.
४.
स्त्रीला पुरुषाइतकेच सर्व बाबतींत स्वातंत्र्य असावे याचा अर्थ तिने ते स्वातंत्र्य घेतलेच पाहिजे, ते घेणे तिचे कर्तव्य आहे असा होत नाही हे लक्षात घेणे जरूर आहे. उदा. डॉ. वर्हाआडपांडे म्हणतात की स्त्रीपुरुषांत समता असावी याचा अर्थ स्त्रीपुरुषांनी सारखाच पोषाख करावा, इ. पण त्याचा अर्थ एवढाच होतो की आपण कसा पोषाख करावा हे ठरविण्याचे स्वातंत्र्य पुरुषाइतकेच स्त्रीलाही असावे. तीच गोष्ट स्त्रीला पुरुषाइतकेचं विवाहबाह्य संबंधाचे स्वातंत्र्य असावे या आग्रहाबद्दल. असा आग्रह धरण्याचा अर्थ प्रत्येक स्त्रीने विवाहबाह्य संबंध ठेवावेत असा होत नाही. फक्त तिला तशी मोकळीक असावी, म्हणजे एखाद्या स्त्रीने जर असा संबंध ठेवला तर ते दूषण मानले जाऊ नये-निदान पुरुषाचे मानले जाते त्याहून अधिक मानले जाऊ नये एवढाच त्याचा अर्थ आहे.
डॉ. वहाडपांडे म्हणतात की कोणतीही संस्था तडजोडीवर आणि सहकार्यावरच चालते. समतेच्या तत्त्वावर चालू शकत नाही. कुटुंबसंस्था तडजोडीशिवाय आणि सहकार्याशिवाय चालू शकणार नाही हे त्यांचे म्हणणे मान्य करावयास हरकत नाही. परंतु तडजोड आणि सहकार्य समतेच्या तत्त्वात बसत नाहीत हे त्यांचे म्हणणे चुकीचे आहे. खरे म्हणजे तडजोड आणि सहकार्य ही दोन्ही समानस्वतंत्र व्यक्ती मध्येच संभवतात. जिथे दोन व्यक्तींत स्वामिसेवक संबंध असेल तिथे तडजोड आणि सहकार्य याची गरजच राहणार नाही. परंतु दोन समान व्यक्तींनी एखादी संस्था चालवायची म्हटली की त्यांना आपापल्या स्वातंत्र्याला थोडीबहुत मुरड घालावी लागणार. आता दोन समान स्वतंत्र व्यक्तीनी तडजोड करून आपल्या स्वातंत्र्याचा संकोच केल्यास त्यांनी समतेचे तत्त्व अव्हेरले असे होत नाही. डॉ. वर्हाोडपांडे म्हणतात की ‘दोघाचेही स्वातंत्र्य ही अशक्य कोटीतील गोष्ट आहे. परंतु अमर्याद स्वातंत्र्य समाजात कोणालाच असत नाही. स्वातंत्र्याला मर्यादा घालाव्याच लागतात. अशा मर्यादा घातल्याने प्रत्येकाच्या स्वातंत्र्याला संकोच होईल हे खरे. पण तो संकोच समान असेल तर समतेच्या तत्त्वाला बाधा येणार नाही.
डॉ. वर्हाकडपांडे म्हणतात तेव्हा कामजीवनाच्या बाबतीत जे निसर्गतःच असमानआहे त्या कामजीवनाची स्त्रीपुरुषांना समान संधी द्यावी अशी अपेक्षा जैविकीचे व मानसशास्त्राचे प्राथमिक अज्ञान दर्शविते. हे मत डॉ. वर्हाजडपांडे सिद्ध करू शकले नाहीत. त्यांना स्त्रीमुक्तिवादी एवढेच सांगू इच्छितो की जैविकी औणि मानसशास्त्र यांच्याबरोबरच नैतिक गोष्टींचेही भान त्यांनी असू द्यावे. तसे भान त्यांना असते तर जैविकी आणि मानसशास्त्र यांचे त्यांनी स्तोम माजविले नसते. परिस्थितीनुरूप बदलण्याची ताकद मानवी स्वभावात किती आहे हे स्त्रिया आणि दलित यांनी हजारो वर्षे सहन केलेल्या आपल्या ससेहोलपटीने पुरेपूर सिद्ध झाले आहे.
स्वप्नभूमी” ची सद्यःस्थिती
टाइम साप्ताहिकाच्या ६ फेब्रु. ९५ च्या अंकात “द स्टेट ऑफ द यूनियन” नावाने एक लेख आला आहे. जरी याला “लेख” म्हणावे लागते, तरी प्रत्यक्षात नकाशे, आकृत्या, आलेख, तक्ते वगैरेंच्या वापरातून अमेरिकेची सद्यःस्थिती दाखवायचा हा “मल्टि-मीडिया” प्रयत्न आहे. त्यातील काही गमतीदार (व विचार करायला लावणारा) भाग येथे देत आहोत.
(क) संस्कृती, किंवा खरे तर सुसंस्कृतपणा ही मोजता येणारी बाब नाही यावर दुमत नसावे. पण अशाच अमापनीय अशा बुद्धिमत्तेचे निर्देशांक मात्र सर्रास वापरात
आहेतच. टाइमने सुसंस्कृतपणाचे कांही निर्देशांक तपासले आहेत, ते असे :
१. देशाच्या बहुतांश क्षेत्रात दरवर्षी दरडोई पुस्तकांवरचा खर्च अद्वेचाळीस डॉलर्सहून कमी आहे. पण दाट लोकवस्तीच्या पूर्व व पश्चिम किनार्यााच्या क्षेत्रात (न्यूयॉर्क, कॅलिफोर्निया वगैरे) मात्र दर माणूस वर्षाला साठ डॉलर्सहून जास्त किमतीची पुस्तके घेतो. संपूर्ण देशाची सरासरी दिलेली नाही, पण ती पन्नास डॉलर्सवर असावी. या आकड्यांची तुलना भारतीयांच्या दरडोई वार्षिक उत्पन्नाशी करणे उद्बोधक आहे. हे उत्पन्न आहे फक्त दोनशे पंचवीस डॉलर्स. म्हणजे अमेरिकन माणसे भारतीय माणसांच्या उत्पन्नाच्या सुमारे बावीस टक्के खर्च पुस्तकांवर करतात!
एक वेगळीही गंमत आहे. ज्या राज्यांमधील वस्ती वाढते आहे, त्याच राज्यांमध्ये सर्वाधिक दरडोई खर्च पुस्तकांवर होतो. जेथे दरडोई खर्च कमी केला जातो, त्यातल्या बर्याधचशा क्षेत्रातील लोकसंख्या घटते आहे. यावरून कोणी असा निष्कर्ष मात्र काढू नये की भारतातला पुस्तकांवरचा खर्च कमी केल्याने लोकसंख्येचा प्रश्न सुटेल”!
२. जवळपास सर्वच घरांमध्ये दूरचित्रसंच आहेत, पंच्याऐंशी टक्के घरांमधून व्हीसीआर आहेत आणि वीस टक्के घरांमध्ये व्हीडीओ कॅमेरेही आहेत. दर घरातील दूरचित्रेपाहण्याचा वेळ वाढतो आहे, परंतु तो स्थिरावण्याच्या वाटेवर असावा. या संदर्भात हे आकडे पाहा . (वर्ष व“घरटी” दररोजचा वेळ)
१९५४ २६० मिनिटे
१९६४ ३३० मिनिटे
१९७४ ३७० मिनिटे
१९८४ ४२० मिनिटे
१९९४ ४४० मिनिटे
यातही मुले व तरुण रोज तीन तास टीव्ही पाहतात, तर “बाबा” चार तास आणि “आई” पावणेपाच तास! म्हणजे टीव्ही या माध्यमाने तरुण पिढी निष्क्रिय होत नाही, तर प्रौढांमध्ये मात्र “बशेपणा” जास्त आहे.
३. याउलट सहभागाला उद्युक्त करणाच्या कलाव्यवहारात लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्या तीस वर्षांत हौशी नाट्यसंस्था सातपट झाल्या, ऑपेरासंस्था सहापट झाल्या आणि नृत्यसंस्था तर चक्क तेरापट झाल्या!
याचाच परिणाम म्हणून “गेल्या वर्षात हे केले का?” या प्रश्नाला होकारार्थी उत्तर देणार्यांमच्या संख्या पाहा :
क्रीडास्पर्धा चित्रसंचावर पाहिली ८५%
आनंदासाठी कादंबरी वाचली ६२%
कविता वाचल्या ४६%
नाटक पाहिले ३९%
नृत्याचा कार्यक्रम पाहिला ३७%
कलासंग्रहालयाला भेट दिली ३६%
पॉर्नोग्राफी” वाचली १५%
“चावट” वाचणार्यां५च्या तिप्पट लोक कविता वाचतात हे आशादायक आहे.
(ख) पण कला, क्रीडा वगैरेंचा आस्वाद घ्यायला आरोग्य उत्तम हवे. सरासरी भारतीय माणसाला साठेक वर्षे (६०.४) जगायची अपेक्षा असते, तर सरासरी अमेरिकन शहात्तर वर्षांची अपेक्षा ठेवतो. याची किंमत जबर आहे. गेल्या बारातेरा वर्षांत आरोग्यावरचा खर्च दीडपट झाला आहे. परंतु याची काळजी मात्र कमी लोकांना वाटते, कारण तीसेक वर्षांपूर्वी या खर्चाचा अर्धा भाग स्वतः करावा लागायचा आणि पाव भाग विम्यातून निभायचा. उरलेला पाव भाग सरकार पेलत असे. आज पावच भाग रोग्यावर आहे, आणि उरलेला खर्च विमाआणि सरकार यांच्यात समप्रमाणात विभागला जातो.
थोडक्यात म्हणजे आरोग्याचा खाजगी खर्च पाऊण झाला आहे, तर सरकारी खर्च दुपटीहून वाढला आहे.
पण परिणाम स्पष्ट आहेत. हृदयविकार व अर्धागांचे झटके येणान्यांचे प्रमाण घटलेआहे. फुप्फुसांचा कर्करोग वाढला आहे, पण धूम्रपान करणान्यांचे प्रमाण तीस वर्षांत अर्धे झाले आहे. आजही हे प्रमाण वीस टक्के आहे, पण आता हे व्यसन अमेरिकेत नामशेष होण्याच्या वाटेवर आहे.
एड्स मात्र त्र्याण्णव साली अडतीस हजारांवर माणसे मारून गेला. दहा वर्षांपूर्वी हा रोगच नव्हता.
मृत्यूच्या कारणांमध्ये एड्सचा नंबर आठ्वा आहे. नवव्या आणि दहाव्या नंबरावर आहेत आत्महत्या (एकतीस हजार) आणि खून (पंचवीस हजार)!
(ग) शिक्षणाबद्दलची आकडेवारी अमेरिकच्या भौतिक प्रगतीच्या कारणांवर प्रकाश टाकते.
(१)दर शिक्षकामागे विद्याथ्र्यांचे प्रमाण १९७४ साली एकवीस एवढे असे. १९८८ मध्ये ते सतरा इतके खाली उतरले. आजही ते साडेसतरा आहे. म्हणजे साठ ते सव्वाशे मुलांचे “वर्ग” संभवत नाहीत!
(२)शैक्षणिक पातळी आणि मिळकत यांच्या प्रमाणात जरा गमती आहेत. शालान्त परीक्षाही न दिलेल्यांची वार्षिक मिळकत नऊ हजार डॉलर्सजवळ आहे. शालान्त परीक्षा, पदवी, दुसरी पदवी, व्यावसायिक पदवी येथपर्यंत वाढत मिळकत सत्तावन हजार डॉलर्सपर्यंत वाढते. आचार्यपदानंतर मात्र ही मिळकत सत्तेचाळीस हजारांइतकी उतरते? (एक भारतीय सर्वेक्षण आय्. आय. टी. च्या विद्याथ्र्यांबाबत केले होते. त्यातही असलीच एक गंमत होती. मूळ तांत्रिक पदवी किंवा सोबत व्यवस्थापनाची पदवी घेणार्यांरच्या मिळकती “मास्टर्ज” च्या मिळकतींहून जास्त होत्या. म्हणजे भारतात “मास्टर” होणे किंवा अमेरिकेतआचार्यपद मिळवणे, यात आर्थिक तोटा सहन करावा लागतो.)
(३) शिक्षणाच्या बाबतीत गेल्या कित्येक वर्षांत स्त्रिया मुसंडी मारताहेत. वीस वर्षापूर्वी बॅचलर व मास्टर पदव्या घेणान्यांमध्ये चाळीस-पंचेचाळीस टक्के स्त्रिया असायच्या. आज हे प्रमाण पुरुषांचे आहे. म्हणजे मास्टर – पदापर्यंतचा विचार करता आज खरेखुरे “रोल रिव्हर्सल’ झाले आहे!
पण याहून जास्त बदल आचार्यपदाच्या स्तरावर झाला आहे. पूर्वी अठरा टक्के आचार्य असत, आज दुपटीहून जास्त, अडतीस टक्के असतात.
(४) लोकांना कोणते अभ्यासक्रम आकर्षित करतात यातही गेल्या बारा-पंधरा वर्षांत बरेच बदल झाले आहेत.
सर्वांत आकर्षण वाढले आहे संगणकशास्त्राचे. हा विषय शिकणार्यांाची संख्या साडेबारापट झाली आहे. “लिबरल आर्ट स्”, ज्यांना आपण मानव्यशास्त्रे म्हणतो, त्यांचे विद्यार्थी साडेचार पट झाले आहेत. व्यवस्थापन शिकणारे अडीचपट झाले आहेत. मानसशास्त्र, यांत्रिकी, “दृश्य” कला सान्यांना दीडपट गिर्हापइके आहेत.
ही वाढ झाली आहे ती इतर काही शास्त्रांचा भाव उतरल्यामुळे. खरा मार खाल्लाआहे शिक्षणक्षेत्राने. त्यात रस घेणान्यांची संख्या चाळीस टक्क्यांनी घटली आहे. समाजशास्त्र, इतिहास, गणित, सान्यांनी दहावीस टक्के मार खाल्ला आहे.
परक्या भाषा शिकणारे तीसेक टक्के घटले आहेत, पण इंग्रजी भाषा आजही तेवढेच विद्यार्थी धरून आहे!
(घ) शिक्षण एवढे वाढत, बदलत असताना गुन्हेगारीचे काय होत आहे? तुरुंगवासी पंचवीस वर्षांत थेट साडेचार पट झाले आहेत. हिंसक गुन्हे साठ टक्क्यांनी वाढले आहेत. एकूण गुन्हेगारीतले बदल तसे नगण्य आहेत.
पण पंधराच वर्षांत किशोर-तरुण वयाच्या मुलांच्या टोळीयुद्धात मरणाच्यांची संख्या सहापट झाली आहे, आणि खुनासाठी पकडल्या गेलेल्यांचे सरासरी वय बत्तिसावरून सत्ताविसाइतके “कोवळे” झाले आहे. वाढते शिक्षण, सुधारते शिक्षण आणि जास्त तरुण गुन्हेगारी यातून एका दुभंग व्यक्तिमत्त्वाचा समाज दिसतो. विभाजन रेषा कुठे आहे हेही पाहण्यासारखे आहे. संख्येने दहापट असलेल्या गौरवर्णीयांइतकेच खून, किंबहुना जास्तच खून आठ-दहा टक्के कृष्णवर्णीयांमध्ये होतात.
पण यातही सुबत्ता दिसते, सत्तर टक्के खून बंदुक्न पिस्तुलांनी होतात!
(ङ) वरकरणी पाहता आकडेवारीने तोलायला सर्वात सोप्या बाबी आर्थिक असाव्या असे वाटते. पण त्या आकडेवारीचे अर्थ उमजायला अर्थशास्त्राची ओळख हवी. त्याऐवजी काही साध्या प्रश्नोत्तरांमधून लोकांचा “मूड” किंवा भाव जास्त प्रकर्षाने जाणवतो. जसे
(१)घरात मोठे आजारपण उद्भवले तर त्याचा खर्च तुम्हाला कितपत झेपेल, असा प्रश्न विचारला. “सहज’ असे म्हणणार्यांकचे प्रमाण गेल्या चार वर्षांत ३६ चे ४० झाले, प्रयत्नाने” असे म्हणणारे ही थोडे वाढले. “झेपणार नाही”म्हणणारे मात्र १९ टक्क्यांवरून १४ टक्क्यांना उतरले.
(२)देशाच्या अर्थव्यवस्थेची काळजी वाटते का, असा प्रश्न होता. पंचेचाळीस टक्क्यांना बरीच काळजी वाटते तर चक्क अकरा टक्क्यांना मुळीच वाटत नाही!
(३)हाच प्रश्न खर्चाची तोंडमिळवणी करण्याच्या काळजीबाबत विचारला. तीस टक्क्यांना बरीच काळजी वाटते. तर अडतीस टक्क्यांना मुळीच काळजी वाटत नाही. हाच (बहुधा!) अडतीस टक्केवर्ग इतरही प्रश्नोत्तरांमध्ये भेटतो. यांना भविष्याकरता बचत करायची काळजी फार कमी वाटते. यांना मुलांचा कॉलेजखर्च झेपायची काळजी वाटतच नाही, वगैरे.आणि या काळजी घटण्यात अनेक घटक आहेत.
गेल्या तीस वर्षांत खरी क्रयशक्ती दर कुटुंबामागे चाळीसेक हजार डॉलर्सवर स्थिर आहे. भाववाढीचा दर गेली पंधरा वर्षे तीनचारच टक्क्यांवर आहे. एकच पालक असलेली कुटुंबे (म्हणजे अर्थातच लहान कुटुंबे) गेल्या पंचवीस वर्षांत तेरा टक्क्यांवरून तीस टक्क्यांवर गेली आहेत. दर कुटुंबामागची क्रयशक्ती कमी माणसांमध्ये विभागली जाते आहे.
या सार्या चा एकोत्तरी सारांश काढायचाही एक प्रयत्न आहे. “एकूण देशाचे, तुमचे,कसे काय चालले आहे?” या प्रश्नाला जवळपास पंचावन टक्के लोक “बरे” असे उत्तर देतात. हे प्रमाण चौयाऐंशी व एक्क्याणव साली पंचाहत्तर इतके वाढले होते, तर ऐंशी साली विसावर उतरले होते..
• * * *
बर्या*च सामाजिक प्रश्नांत रस असणार्यां्ना आकडेवारीचा कंटाळा असतो. सरासरी काढण्यातले धोके ज्यांना प्रश्न विचारायचे त्यांची प्रातिनिधिकता, त्यांचा सच्चेपणा, वगैरे अनेक कारणे या कंटाळ्याच्या समर्थनासाठी दिली जातात. ती काहीशी खरीही असतात. परंतु याहून नेमके साधन आज नाही हेही खरेच. आकडेवारी हा सामाजिक प्रश्न सोडवू पाहणान्याचा कच्चा माल (डेटा) असतो. त्याचा कंटाळा केल्याने “हवेशीर” तत्त्वचर्चा फार प्रमाणात केली जाते. याबाबतची एक घटना अशी –
यूनोने स्वतःची शांतिसेना ठेवावी काय या विषयावर नागपूर विद्यापीठाने १९६१ साली एक वादविवादस्पर्धा घेतली होती. दोन भारतीय व दोन अमेरिकन कॉलेजकुमार यात भाग घेत होते. युनोचे उच्च हेतू, देशाचे सार्वभौमत्व, आंतरराष्ट्रीय न्याय वगैरे मुद्द्यांवर भारतीयांची भाषणे बेतलेली होती. अमेरिकनांपैकी एकाने मात्र अशा शांतिसेनेची संख्या काय असावी व हा आकार पोसायचा खर्च किती येईल, याची आकडेवारी दिली. उत्तर असे होते की शांतिसेनेचा खर्च परवडण्यातलाच नाही. उच्च हेतूंचा अर्थातच बोया वाजला!