सुधारणेची चर्चा करायची तर मूल्ये कोणती मानायची हा प्रश्न मूलभूत महत्त्वाचा ठरतो. कारण आहे त्यापेक्षा अधिक चांगले करणे यालाच सुधारणा म्हणतात व चांगलेआणि वाईट हा मूल्यांचा विचार आहे.
सुधारणेच्या बाबतीत समता हे मूल्य असल्याचा वारंवार उद्घोष करण्यात येत असतो. असा उद्घोष करणार्यांमध्ये अर्थमीमांसा करून युक्तिवाद करण्याचा दावा करणारे लोकही अन्तर्भूत आहेत.
पण समता या शब्दाच्या अर्थाचे विश्लेषण केले तर समता हे मूल्य मानता येईल काय? समतेचा अर्थ असा होतो की सर्वांना सारखीच वागणूक दिली पाहिजे. म्हणजे चोर असो वा साव असो, दोघांनाही तुरुंगात पाठवले पाहिजे वा दोघांनाही सोडून दिले पाहिजे, सारी गणिते बरोबर असणार्या व सारी चूक असलेल्या उत्तरपत्रिकेला सारखेच अंक दिले पाहिजेत, दोघांनाही शून्य द्या वा दोघांनाही शेकडा शंभर द्या. ही समता झाली. अशा रीतीने होणारा व्यवहार समर्थनीय आहे असे समतावादी म्हणणार नाहीत. वस्तुतः त्यांना हे मान्य नसेल तर समतेचे समर्थन त्यांनी सोडून दिले पाहिजे.
समतावादी म्हणतील “ तुम्ही आमच्या म्हणण्याचा विपर्यास करीत आहात. आम्ही जेव्हा समतेची मागणी करतो तेव्हा ती समान संधीची मागणी असते. जीवनातील काम्य वस्तू मिळविण्याची सगळ्यांना समान संधी असली पाहिजे. या अर्थी समता हे मुल्य आहे हे कोणाला नाकबूल करता येणार नाही.”
पण समता या अर्थी देखील मूल्य होऊ शकत नाही. ज्याला वर्षानुवर्षे आटापीटा। करूनही बेरीज/बजाबाकी जमत नाही त्याला वे उच्च शिक्षण नशिबात नसून देखील ज्याने जगाला स्तिमित करतील असे गणिती शोध लावले त्या रामानुजनला गणित शिकण्याची सारखीच संधि असावी काय? आईने अंगाई गाताना सूर चूक म्हटला तरी जे बालक ऍहा करून आपली नापसन्ती व्यक्त करते व ज्याला वर्षानुवर्षे संगीत ऐकूनही षड्ज व गान्धार यातील फरक कानांना जाणवत नाही त्यांना संगीत शिकण्याची समान संधि असावी काय?
कोणताही समतावादी याचे होय असे उत्तर देणार नाही.
मग समतावाद्याला काय अभिप्रेत आहे? उत्तरपत्रिका तपासताना उत्तरपत्रिकेखेरीज इतर बाबींत समानता बाळगावी म्हणजे त्या बाबींचा विचार करू नये, गुन्हेगारीला दण्ड देताना गुन्ह्याशिवाय दुसर्या कशाचाही विचार करण्यात येऊ नये, म्हणजे त्या बाबी समान मानाव्या असेच त्यांना अभिप्रेत असणार. हीच गोष्ट सन्धीलाही लागू आहे. ज्या गोष्टीची सन्धी द्यायची आहे तिच्या व्यतिरिक्त इतर गोष्टी समान म्हणजे अप्रस्तुत मानाव्या असे हे तत्त्व आहे.
तेव्हा खरे मूल्य समता हे नाही. न्याय हे मूल्य आहे. अप्रस्तुत व अनावश्यक गोष्टी समान आहेत म्हणजे त्यात फरक असला तरी तो विचारात घ्यायचा नाही या अर्थी समानआहेत.
आता आपण सुधारणेच्या क्षेत्रात महत्त्वाच्या असलेल्या स्त्रीपुरुषसमतेच्या मागणीकडे वळू. स्त्रीपुरुषात समता असावी म्हणजे काय? स्त्रीपुरुषांनी सारखाच पोषाख करावा, त्यांची जीवनातली क्षेत्रे सारखीच असावी, मुलाला जन्म देणे पुरुषाला निसर्गानेच अशक्य केले आहे, पण जन्म दिल्यावर प्रारंभीची काही वर्षे देखील मुलांचे पालनपोषण करणे हे पुरुषापेक्षा स्त्रीचे अधिक मोठे कर्तव्य आहे असे मानण्यात येऊ नये, कारण पुरुषही बाजारातले दूध आणून मुलाला पाजू शकतो व इतर सर्व पालनपोषणाची कामे करू शकतो.
या बाबतीतले ठोस संशोधन
मुलाला स्तनपान करविले नाही तर आईचे दूध आटविता येते. तेव्हा स्तनपान हे स्त्रीचे खास काम समजण्यात येऊ नये. तसेच अपत्यसंगोपनाप्रमाणेच गृहपालन हे स्त्रीचे खास काम समजण्यात येऊ नये. दोघांनीही घराबाहेरच काम करावे व घरकाम कोणते, कोणी व केव्हा करावे हे परस्परसंमतीने ठरवावे. सैन्य, आरक्षी दल वगैरे सर्वच व्यवसाय स्त्रियांना खुले असावेत म्हणजे आताप्रमाणे स्त्रीपोलिसांनी फक्त स्त्रियांची धरपकड करावी, स्त्रीसैनिकांनी फक्त स्त्रियांच्या पूरक दलाचे काम करावे असे नसून जे जे काम पुरुष करतो ते ते सर्व करावे.
अलीकडे काही स्त्रियांच्या सभेत “पुरुषाला बहुपत्नीकत्वाचा अधिकार होता तसा स्त्रियांनाही असावा” वगैरे “स्त्रीमुक्ति” या नावाखाली मागण्या ऐकल्या. या सर्वांत कितपत सुबुद्धता आहे याचा विचार करू.
हा विचार करताना स्त्रीमुक्तीपासूनच सुरुवात करू. स्त्रियांना लैंगिक स्वातंत्र्य असावे असे एका सभेत ऐकले. स्त्रीला विवाहबाह्य संबंधाचा अधिकार असावा असे म्हटल्याबरोबर पुरुषालाही तो अधिकार बहाल केला जातो ही साधी गोष्ट हा अधिकार मागणार्यांच्या लक्षात आली नाही. एखाद्या स्त्रीने विवाहबाह्य संबंध ठेवला म्हणजे तिच्याबरोबर संबंध ठेवणाच्या निदान एका तरी पुरुषाने विवाहबाह्य संबंध ठेवला असे
ओघानेच आले आणि यात नवीन काहीच नाही. असे स्वातंत्र्य उपभोगणारे स्त्रीपुरुष समाजात नेहमीच राहिले आहेत, पण ते अपवादभूत आहेत. या अपवादाचा नियम केला तर काय होईल याचा थोडा विचार करू.
माझ्या पाहण्यात असे आले आहे की वरीलसारख्या प्रश्नावर मतप्रदर्शन करणाच्या बहुतेक स्त्रीपुरुषांचा यासंबंधीच्या मानसशास्त्रीय, समाजशास्त्रीय व ऐतिहासिक संशोधनाचा काडीचाही अभ्यास नसतो. असे अत्यंत अज्ञतेचे लिखाण आजच्या सुधारकात प्रसिद्ध झालेले आहे असे खेदाने म्हणावे लागते.
कामवासनेच्या बाबतीत स्त्रीपुरुष समान आहेत असे अत्यंत विपर्यस्त मत विवाहित स्त्रीला देखील सम्भोगस्वातंत्र्य असावे असे प्रतिपादन करणार्यांनी गृहीत धरले आहे. किन्से यांनी ८००० स्त्रिया व १२००० पुरुष यांच्या कामजीवनाची जी पाहणी केली ती जिभेवर येईल ते ठोकून देणार्या वरील लेखकांच्या कानावर देखील गेलेली दिसत नाही. वरील पाहणीत कामव्यवहाराचे आत्मरति म्हणजे कामचिन्तन, स्वमैथुन हे प्रकार, विषमकाम म्हणजे स्त्रीपुरुषरति, समकाम म्हणजे ज्याला इंग्रजीत होमोसेक्शुअॅलिटि म्हणतात ती व पशुरति या सगळ्यांचा विचार करता स्त्रियांच्या कामव्यापाराचे बाहुल्य पुरुषांच्या चतुर्थांश आहे असे दिसून आले.
केवळ बाहुल्यच कमी आहे असे नाही तर स्त्रीच्या कामवासनेची तीव्रता देखील पुरुषांच्या वासनेपेक्षा अत्यंत सौम्य असल्याचे आढळून आले आहे. दुसर्या कामात व्यस्त असताना वा कामोपभोग करण्यास लागणाच्या वातावरणात थोडेसे जरी न्यून आढळण्यासारखे असल्यास स्त्रीची वासना दुबळी वा नाहीशी होऊ शकते, पुरुषाची नाहीशी होण्यास यापेक्षा पुष्कळच प्रबळ कारणे लागतात.
नुकतीच वर्तमानपत्रात चीनमध्ये झालेली एक पाहणी प्रसिद्ध झाली होती. कम्युनिस्ट विचारसरणीने शिथिल केलेल्या विवाहबन्धनामुळे चीनमध्ये विवाहितांचा व्यभिचार वाढू लागला आहे.
मग संततीचे काय?
अर्थात तो स्त्रियांप्रमाणे पुरुषातही वाढू लागला आहे हे सांगणे नकोच. स्त्रीमुक्तीबरोबर पुरुषमुक्ति आपोआप आलीच. पण याचा परिणाम काय झाला? ज्या स्त्रिया मुक्त झाल्या त्या आपल्या पतीला हातही लावू देत नाहीत. एकाच वेळी दोन पुरुषांशी संबंध ठेवणे त्यांना जमत नाही. वेश्या एकाच वेळेस अनेकांशी संबंध ठेवू शकतात कारण त्या संबंधात भावना गुंतलेल्या नसतात. तो केवळ धंदा असतो व कर्तव्य म्हणून कामव्यापार केला जातो. साधारण स्त्रीला भावना गुंतलेल्या असताना फक्त एकाच पुरुषाशी संबंध ठेवणे जमते.
पण पुरुषाचे या उलट आहे. पुरुष जेव्हा अन्य स्त्रीशी संबंध ठेवतो तेव्हा घरी आल्याबरोबर तो त्या अन्य स्त्रीला विसरतो व वर्षानुवर्षे परस्त्रीशी सम्बन्ध असतानाही त्याच्या घरच्या वागणुकीवरून आपल्या नवर्याचे काही लफडे आहे याची पत्नीला शंकाही येत नाही. हे तिला नवर्याच्या वागण्यावरून न कळता अन्य मार्गाने कळत असते. तेव्हा पुरुष हा शरीराने व भावनेने देखील बहुपत्नीक असू शकतो, सर्वसाधारण स्त्री अशी राहू शकत नाही, तिचे मन परपुरुषात गुंतले असेल तर पतीला अन्य काही मार्गाचा अवलंब न करता ही गोष्ट तिच्या वागण्यावरूनच समजू शकते.
पुष्कळ वेळा हे समजत नाही याचे कारण स्त्रीला पतिसहवास आवडेनासा झाला आहे याचे व्यभिचार हेच एकमात्र कारण नसते. मन विचलित करणार्या अनेक गोष्टी असूशकतात, त्या सर्व पतीला सांगण्यासारख्या असतातच असे नाही. पत्नीला आपला सहवास आवडत नाही याचे कारण व्यभिचाराशिवाय अन्य काही असण्याचा सम्भव मोठा असल्यामुळे पतीला एकदमच पत्नीच्या व्याभिचाराचे अनुमान करता येत नाही.
स्त्रीपुरुषांच्या वासनेतला दुसरा फरक हा आहे की स्त्रीच्या वासनेला एक प्रकारची समयबद्धता आहे, तशी पुरुषाच्या वासनेला नाही. रजोदर्शनाच्या दिवसांत स्त्री संभोगासाठी उपलब्ध नसते. पुरुषाच्या शरीरात असा कोणताच कालखण्ड नाही. स्त्रीची कामवासना रजोदर्शन सुरू होण्याच्या लगेच आधी व लगेच नंतर जागृत असते. पुरुषाला असा काहीच काळ लागत नाही, त्याची वासना सदैव जागृतच असते. तेव्हा कामजीवनाच्या बाबतीत जे निसर्गतःच असमान आहे त्या स्त्रीपुरुषांना कामजीवनाची सारखीच संधि असावी ही अपेक्षा जैविकीचे व मानसशास्त्राचे प्राथमिक अज्ञान दर्शविते.
कामजीवनाचा संतति हाच एकमात्र उद्देश असावा असे एक मत प्रचलित आहे वा । होते. आजच्या संततिनियमनाच्या काळात हे मत मान्य असणारे कोणी उरले असतील असे वाटत नाही. पण एकमात्र नसला तरी विवाहाचा संतति हा एक प्रधान उद्देश आहे यात संशय नाही. वात्सल्यभावना हीही कामभावनेसारखीच नैसर्गिक आहे. विवाहित स्त्रीला संभोगस्वातंत्र्य असावे असे प्रतिपादन करणारे लोक पुरुषाची वात्सल्यभावना अजीबात विसरतात. कामजीवनाच्या बाबतीत पुरुषापेक्षा स्त्रीवर जास्त बंधने असण्याचे कारण प्रमुखतः पुरुषाला आपण ज्याला आपले मूल समजतो ते आपलेच आहे ही विश्वस्तता हवी असते हे आहे. परपुरुषाशी रमताना स्त्रीने संततिनियमन करावे असे रसेलने यावर सुचविले आहे. यात हे गृहीत धरण्यात आले आहे की विजेचा दिवा लावणाच्या खटक्याप्रमाणे संततिनियमनाचे उपाय हुकमी आहेत. शिवाय स्त्रीला संभोगस्वातंत्र्य जर तुम्ही देता तर वाटेल त्या पुरुषापासून संतति मिळविण्याचा तिचा अधिकार तुम्ही कोणत्या आधारावर रोखता? पुरुषाचे पितृत्व निर्वेध राहावे हे कारण स्त्रीमुक्तिवादी देऊ शकणार नाहीत कारण त्यात पुरुषाच्या हितासाठी स्त्रीवर बंधने घालणे समर्थनीय आहे हे गृहीत धरले आहे. हे गृहीत धरायचे तर पुरुष हा कुटुंबाचा प्रमुख या तत्त्वातून उद्भवणारी इतर बंधनेही का नकोत?
बेजबाबदार व अभ्यासशून्य
जगात साधारणपणे जितक्या स्त्रिया आहेत तितकेच पुरुष आहेत. गुणसूत्रांच्या गणिताप्रमाणे असे होणे अपरिहार्य आहे. वेळीच तपासणी करून विशिष्ट लिंगाच्या गर्भाचे पातन केल्याशिवाय ही सांख्यिकीय परिस्थिती बदलणे शक्य नाही. असे पातन करावे असे म्हणणारे आजच्या सुधारकाच्या वाचकात कोणी असतील असे वाटत नाही. तेव्हा एका पुरुषास एक स्त्री व एका स्त्रीस एक पुरुष हीच व्यवस्था सार्वत्रिक होऊ शकते. या व्यवस्थेत बिघाड आणण्याचा प्रयत्नकरणे हा समाजद्रोह आहे.
मुक्त संभोग हा पशूचा आचार आहे, मानवाचा नव्हे हे दाखविणारे आणखी एक जैविक तथ्य म्हणजे लैंगिक रोग फक्त मानवाला होतात, पशूना होत नाहीत असे वाचनात आले आहे. हे खरे नाही असेही एका ठिकाणी ऐकले, पण जैविकीचे ‘हे अधिकृत मत असल्याचे मला माहीत नाही. सम्भोगाने संक्रांत होणारे रोग फक्त मानवालाच होतात यावरून मानवाची घडण मुक्त संभोगासाठी नाही हे सिद्ध होते. मुक्त संभोगाचे पुरस्कर्ते लैंगिक रोगाच्या साथीला आमंत्रण देत आहेत.
कोणताही समाज वा संस्था तडजोडीवर व सहकार्यावर चालत असते. समतेच्या तत्त्वावर कोणतीच संस्था चालू शकत नाही. कुटुंबसंस्था चांगली चालायची असेल तर स्त्रीपुरुषांना तडजोड व सहकार्यच करावे लागेल, दोघांचेही स्वातंत्र्य ही अशक्य कोटीतली गोष्ट आहे. पतीची कामुक भूक आपल्यापेक्षा चौपट बहुल व तीव्र आहे हे लक्षात घेऊन पत्नीने स्वतःची इच्छा तीव्र नसतानाही पतिसुखार्थ संभोगात आनंद मानणे व त्यासाठी व्यभिचार टाळणे शिकले पाहिजे. तसेच पतीने काही शारीरिक भेद सोडल्यास स्त्रीपुरुषात काहीच अंतर नाही, बुद्धिमत्तेत तर नाहीच नाही, तेव्हा साच्याच स्त्रियांना चूल व मूल हे जीवनाचे सारसर्वस्व वाटू शकणार नाही हे लक्षात ठेवून पत्नीला घराच्या बाहेरील व्यवसायाचे स्वातंत्र्य दिले पाहिजे. पतीने पत्नीची अपत्ये आपलीच आहेत याबद्दल आश्वस्त असावे म्हणून कामजीवनाच्या बाबतीत पत्नीने पतिनिष्ठ राहिले पाहिजे, तसेच पतीने कामजीवनाच्या बाबतीत बाहेरच्या आकर्षणांचा मोह टाळला पाहिजे. समाजमान्य बहुपत्नीकत्व असल्याशिवाय हे बाहेरचे आकर्षण समाधानकारक होणे अशक्य आहे. मुले लहान असताना अपत्यसंगोपन स्त्रीने करावे हेच निसर्गाला धरून आहे, काल्पनिक समतेच्या नादी लागून स्त्रीने त्याचा अव्हेर करू नये. आईचे दूध हाच मुलाचा सर्वोत्तम आहार आहे असे आयुर्विज्ञान सांगते, त्याप्रमाणे स्तनपान हे अपत्याशी वात्सल्याचे नाते जोडणारे एक महान साधन आहे असे मानसशास्त्र सांगते. जास्तीत जास्त लोकांच्या जास्तीत जास्त इच्छा तृप्त करणारा समाज निर्माण करायचा असेल तर स्वैराचाराने तो निर्माण होणार नाही. एकनिष्ठा हीच असा समाज निर्माण करण्याची गुरुकिल्ली आहे. तेव्हा आजच्या सुधारकाने अभ्यासशून्य, बेजबाबदार व पुरोगामी हा छाप आपल्यावर लागावा या एकमात्र उद्देशाने लिहिलेले लिखाण प्रसिद्ध केल्याने तो आपल्या समाजप्रबोधनाच्या कर्तव्यात कसूर करीतआहे असे म्हणण्यास जागा होते.