नागरी लिपी अनेक दृष्टींनी अतिशय समर्थ आणि सोयीची लिपी आहे यात संशय नाही. पण अन्य भाषांतील काही उच्चार मराठीत नसल्याने त्यांचे नागरीत बिनचूक लिप्यंतरकरता येत नाही, आणि लिप्यंतर चुकीचे झाल्याने मूळ उच्चारांहून वेगळे चुकीचे उच्चार मराठी भाषी लोकात रूढ होतात, एवढेच नव्हे तर मूळ उच्चार कसे होते याही बाबतीतआपण अज्ञ राहतो.
– १ –
संस्कृत व्याकरणानुसार वर्णाचे उच्चारणस्थानानुसार पाच वर्गात विभाजन केले जाते. कंठ्य, तालव्य, मूर्धन्य, दंत्य आणि ओष्ठ्य. मराठीत मात्र काही वर्ण दंत्यतालव्यही आहेत. उदा. च, छ, ज, झ ह्या वर्णाचा उच्चार मराठीत दोन तन्हांनी केला जातो. ‘चमचा’ या शब्दातील ‘च’ आणि ‘चेंडू’ तील ‘च’ हे भिन्न आहेत. ‘चेंडूतील ‘च’ शुद्ध तालव्य आहे, पण ‘चमच्या’तील ‘च’ दंत्यतालव्य आहे. तीच गोष्ट जहाज’ आणि ‘जल’ या शब्दांतील ‘ज’ची.‘जहाज’चे आद्याक्षर दंद्यतालव्य आहे, तर जला’चे आद्याक्षर शुद्धतालव्य आहे. आणि हीच गोष्ट ‘झाड’ आणि ‘झेंडा’ या शब्दांतील ‘झ’चीही आहे. आता केवळ मराठीचा विचार केला तर ही अक्षरे उच्चारानुसार वेगळी न लिहिल्याने आपले फारसे अडत नाही. कोणते वर्ण दंत्यतालव्य उच्चारायचे आणि कोणत्या वर्णाचा उच्चार तालव्य करावयाचा हे आपल्याला दीर्घ परिचयामुळे माहीत असते. पण जेव्हा एखाद्या परभाषेतील ‘ज’ दंततालव्य असतो तेव्हा तो नागरीत केवळ तालव्यच लिहिण्याची सोय असल्याने त्याचा उच्चार तालव्य केला जातो. उदा. ‘निजाम’ या उर्दू शब्दातील ‘ज’ दंत्यतालव्य आहे; पण तो आपण ‘जानकी तील ‘जा’ सारखा तालव्य उच्चारतो. इंग्रजीतील ‘z’ या अक्षरासंबंधाने तर मराठीत खूपच गोंधळ आहे. या अक्षराचे इंग्लिश नाव ‘जेड’ आहे, आणि त्यातील ‘ज दंततालव्य आहे. त्यात कोणी तरी त्या अक्षराचे नाव ‘झेड्’ असे उच्चारायला सुरवात केली आणि ते नाव मराठीत कायम झाले. याचा एक परिणाम असा झाला की मराठीतील ‘झ ने आरंभ होणार्यात आडनावांचे इंग्रजी लिप्यंतर सर्रास ‘Z’ ने करण्यात आले.‘झंडेवाले (तालव्य ‘झ) आणि ‘झाडगावकर (दंततालव्य) आपली नावे z’ ने आरंभ करून लिहू लागले. याच्या उलट ‘zebra’ आणि । ‘zone’ हे शब्द आपण ‘झेब्रा’ आणि ‘झोन’ असे लिहू आणि उच्चारू लागलो, आणि तसेच ‘Nizam’ हा शब्द ‘निझाम’ असा लिहू आणि उच्चारू लागलो.
या सर्व गोंधळातून बाहेर पडण्याचा एक सोपा मार्ग आहे. हिंदी नागरीमध्ये ‘ज’ याअक्षराच्या खाली ज्याला ‘नुक्ता’ म्हणतात ते टिंब घालून (‘ज़’ असे) दंत्यतालव्य ‘ज’ लिहिला जातो. हा मार्ग इतका सोपा आहे की त्याचा आपण ताबडतोब स्वीकार करणे शक्य व अवश्यही आहे. तो केल्यास ‘जहाज’ हा शब्द ‘जहाज़ आणि ‘निजाम’ हा शब्द ‘निज़ाम असा लिहून कार्यभाग साधता येईल. आणि तसेच ‘z’ हे इंग्रजी अक्षर ‘जे’ आहे असे बिनचूकपणे दाखविता येऊन अनेक पार चुकीच्या उच्चारापासून आपण आपला बचाव करूशकू.
– २ –
आणखी एक छोटीशी परंतु महत्त्वाची सुधारणा. met’ आणि ‘mate’ तसेच tell’ आणि ‘tale’ हे शब्द भिन्न आहेतच, पण त्यांचे उच्चारही भिन्न आहेत. पण मराठीतआपण तो भेद दाखवू शकत नाही, आणि म्हणून आपली मुले त्या दोन्ही शब्दांचा एकसारखाच उच्चार शिकतात आणि ते उच्चार जन्मभर कायम राहतात. मराठीत ‘ए’ हा स्वर केवळ दीर्घ आहे, पण इंग्रजीत ‘एहस्व आणि दीर्घ दोन्ही आहे. ‘tell’ आणि ‘met’ मधील ‘एव्हस्व आहे, तर tale’ आणि ‘mate’ मधील ‘ए’ दीर्घ आहे. पण हे नागरीत दाखवायचे कसे? आमचे एक शिक्षक याकरिता एक साधा उपाय वापरीत असत. -हस्व‘ए ही मात्रा ते उलटी, म्हणजे ‘4’अशी लिहीत. या युक्तीचा उपयोग करून आपण ‘met’ आणि ‘mate’ चे उच्चार ‘मॅट’ आणि ‘मेट्’, आणि ‘tell’ आणि tale’ यांचे उच्चार ‘टल्’ आणि ‘टेल्’ असे दाखवू शकतो. या छोट्याशा बदलाने मोठी सोय होणार आहे.
– ३ –
आपण नागरीत दाखविता न येणारा आणखी एक उच्चार आहे. तो आहे जर्मन भाषेतीलः जर्मन लिपीत a, 0 आणि ॥ या स्वरांचे उच्चार दोन तन्हांनी होतात, एक साधा आणि दुसरा ज्याला modified’ म्हणतात तो. हा उच्चार दाखविण्याकरिता त्या स्वरांच्या डोक्यावर” अशी दोन टिंबे काढली जातात. या चिन्हाला umlaut (ऊमलाउट) म्हणतात. जर्मन लिपीतील विशेषनामांचे लिप्यंतर करताना या umlaut चे काय करायचे असा प्रश्न उद्भवतो. इंग्लिशमध्ये modified स्वराच्या नंतर ‘e’ हे अंक्षर घालून umlaut चे काम भागविले जाते. उदा. ‘Godel’ हे जर्मन नाव’Goedel’ असे लिहून, आणि ‘Miller हे नाव ‘Mueller’ असे लिहून काम भागते. पण मराठीत काय करायचे? अलीकडे विज्ञानाची आणि तत्त्वज्ञानाची पुस्तके मराठीत लिहिली जातात, आणि त्यांत पुष्कळदा जर्मन विशेषनामे नागरी लिपीत लिहावी लागतात. म्हणून ही अडचण उद्भवते. मला वाटते आपणही modified o’ आणि ‘u’ च्या शिरावर दोन टिंबे लिहून किंवा छापून कार्यभाग साधू शकतो. पुढीलप्रमाणे ‘गोडेल’, ‘मुंलर’.
वरील उणीवांपैकी शेवटची कितपत निकडीची समजता येईल याविषयी मतभेद शक्य आहेत. परंतु पहिल्या दोन मात्र अतिशय त्रासदायक आहेत, आणि त्या लवकर दूर केल्या पाहिजेत. सुदैवाने त्या दूर करण्याचे उपाय इतके सोपे आहेत की ते ताबडतोब अमलात आणण्यास कसलीही आडकाठी असू नये.