पुस्तकपरिचय -भारतीय मुसलमान : शोध आणि बोध

सेतुमाधवराव पगडी थोड्या दिवसांपूर्वी वारले. त्यांना आदरांजली म्हणून त्यांच्या एखाद्या ग्रंथाचा परिचय करून द्यावा असा विचार होता. पगडींची ग्रंथसंपदा मोठी. निवडीचाप्रश्न पडला. तो गेल्या निवडणूक निकालांनी सोडवला. आन्ध्र आणि कर्नाटकात काँग्रेसचा पार धुव्वा उडाला. विरोधकांच्या विजयामागे मुस्लिम मतांचा झुकाव किती महत्त्वाचा होता हे प्रणय रॉय आणि मित्रांनी केलेल्या विश्लेषणात टक्केवारीनिशी दाखवून दिले.
भारतीय मुसलमान हा भारतासमोरील अनेक प्रश्नांपैकी एक प्रश्न आहे. तो सोडविण्यासाठी आधी नीट समजून घेणे जरूर आहे. आम्ही वेगळे आहोत, आमचे प्रश्न वेगळे आहेत, तुम्ही आमच्याकडे लक्ष देत नाही, अशी मुस्लिम नेतृत्वाची भूमिका दिसते. एरवी त्यांच्या काही वागण्याचा अर्थ लागत नाही. नागपुरात नोव्हेंबरात सुमारे सव्वाशे गोवारी लाठीमाराच्या भीतीने चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडले. विरोधी पक्षांनी महाराष्ट्रभर बंद पाळला. मुंबईतल्या कडकडीत बंद मधले सगळेच विरोधकांशी सहमत असतील असे नाही. पण लोकभावनेचा मान त्यांनी राखला. मात्र मुस्लीम वस्त्यांत सर्व व्यवहार नित्याप्रमाणे सुरू होते. नंतर ६ डिसेंबरला अयोध्याकांड घडल्याला दोन वर्षे झाली. जनस्मरण अल्पजीवी असते. मुस्लिमांनी तो शोकदिन लक्षात येण्याइतपत संघटितपणे पाळला. मुस्लिमबहुल वस्त्यांमध्ये कडक हरताळ होता असे वृत्त आहे. या घडामोडी पाहता ‘भारतीय मुसलमान : शोध आणि बोध’ या पुस्तकाची निवड करावीशी वाटली.
जगात सुमारे ५० देशांत मुस्लिम बहुसंख्य आहेत. ही संख्या जगातील राष्ट्रांच्या एकतृतीयांश भरेल. (पृ. ६२)१ एकट्या मध्यपश्चिमेत १६ अरब राष्ट्रे आहेत. पूर्वीचा सोव्हिएट रशिया घेतला तर त्यात ८-१० मुस्लिमबहुल राज्ये असून त्यांची संख्या ३ कोटींवर आहे. चीनमध्येही ५ ते ६ कोटी मुसलमान आहेत. फ्रान्समध्ये ५ टक्के तर इंग्लंडमध्ये साडेचार टक्क्याहून जास्त मुस्लिमधर्मीय आहेत.
एक परमेश्वर, एक प्रेषित आणि एक ग्रंथ मानणारा मुस्लिम समाज अशा देशांतून कसा वागत असेल हे जाणणे भारतातील अल्पसंख्य मुस्लिमांचा प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने उपयुक्त आहे. भारतीय भाषांतून या विषयावर वाङ्मय फारसे उपलब्ध नाही. इंग्रजीतून आहे. चीन, सोव्हिएट रशिया यांतील अल्पसंख्यकांवर अनेक पुस्तके आहेत. त्यावरून असे दिसते की त्या त्या देशातील सामान्य कायदे हेच सर्वांना लागू आहेत. राज्यघटना आहेत त्यांचे उद्देश एकात्मतेकडे दिसतात. इंग्लंड-अमेरिकेत मुस्लिम वैयक्तिक कायदा नाही’ (पृ. ६६) असे पगडी म्हणतात.
आता मुस्लिम राज्यांमध्ये असलेल्या अल्पसंख्यकांचे रक्षण तेथील सरकारे कशी करतात याचा अभ्यास होणे अवश्य आहे. सूदानमध्ये बिगरमुस्लिमांना शरियत कायदा लागू करण्याचा हट्ट पराकोटीला गेला आहे. ‘शरियत कायद्यात बिगरमुस्लिमांनानागरिकत्वाचे हक्क नाहीत म्हणून ते कायदे आम्हाला लागू करू नयेत’ अशी मागणी करणार्‍या महमूद नावाच्या ७३ वर्षीय नेत्याला फाशीची शिक्षा सुनावली गेली. त्यांची संघटना काफर (heretic) म्हणून घोषित करण्यात आली. शरियत कायदा बदलावा अशी मागणी करणाच्या चळवळी मुस्लिम राज्यांतही होत आहेत असा या घटनेचा अर्थ. नायजेरियात मुस्लिम वस्ती ३० टक्के आहे. उत्तर नायजेरियात तर ७५ टक्के आहे. नायजेरिया १९६० मध्ये स्वतंत्र झाला. संघराज्याची घटना तसेच घटक राज्यांच्या राज्यघटना बनल्या. शरियतवाद्यांना समाधान वाटण्यांसारख्या त्या नाहीत. तेथे ‘शरियत आणि शरियत न्यायालये नायजेरियन मुसलमानांसाठी अस्मितेचे आणि संघर्षाचे प्रतीक बनली आहेत.’ (पृ. ३१९). नायजेरियातील अनुभवापासून भारताने घेण्यासारखा बोध पगडींच्या मते असा : ‘ज्या परिस्थितीत भारतात शरियत सध्या आहे ती परिस्थिती तात्पुरती म्हणून नाइलाजाने चालू ठेवली तर ते समजण्यासारखे आहे. पण कोणत्याही स्थितीत शरियतची व्याप्ती वाढविणे हे योग्य होणार नाही.’ (पृ. ३२०)
पाकिस्तानात झिया उल हक प्रणीत घटना ही सुन्नी तत्त्वांवर आधारलेली असल्याने ती आपल्याला लागू करण्यात येऊ नये अशी चळवळ तेथील शियांनी चालविली आहे. तेथे शिया शेकडा १५ आहेत. एकंदर मुस्लिम समाजात शिया १० टक्के आहेत. इराण, येमेनमध्ये शिया शेकडा ८० आहेत. इराकमध्येही अरबवंशीय शिया शेकडा ५५ इतके आहेत. पगडींच्या मते इराण-इराक युद्धाचे एक प्रमुख कारण आक्रमक शिया पंथात शोधावे लागेल.
मुस्लिम राज्यांमधे केवळ पंथभेदांमुळेच संघर्ष आहेत असे नाही. वंश व भाषा यांचे संघर्षही खूप आहेत. इराणमध्ये अरबी व तुर्की भाषा बोलणार्‍या मुसलमानांत झगडे आहेत. खुर्द राष्ट्रवादी अल्पसंख्य तर – इराक, इराण किंवा तुर्कस्तानात कुठेही पचू शकले नाहीत. आफ्रिकेतील अरब विरुद्ध कृष्णवर्णी मुस्लिम हा संघर्ष वांशिक आणि भाषिकही आहे.
पगडींच्या प्रतिपादनाला विषयावरील गंभीर लिखाणाचा जसा आधार आहे तसाच त्यांनी वाचलेल्या सुमारे ४० आत्मचरित्रांचा आधार आहे. (पृ. २२६-२७) पाकिस्तानचे सेवानिवृत्त कंप्ट्रोलर अँड आडिटर जनरल मुश्ताक अहमद वझदी यांची एक खंत त्यांच्याच शब्दांत देण्यासारखी आहे. ‘हिंदुस्थानातील मुसलमान आपण एक राष्ट्र आहोत असा दावा करीत (स्वातंत्र्यपूर्वकाळात). त्यांची दोन राष्ट्रे झाली. एक पाकिस्तानातील मुसलमान व दुसरे हिंदुस्थानातील मुसलमान. आता तीन राष्ट्रे झाली, म्हणजे बांगलादेश….. (पुन्हा) . भीती आहे की या तीन राष्ट्रांची लवकरच सहा राष्ट्रे होतील.’२ (पृ. १००) (सिंध, बलुचिस्तान, इ.)
इस्लामला राष्ट्रवाद मान्य नाही. राजेशाही मान्य नाही. असे असूनही सौदी अरेबिया, मोरक्को , जॉर्डन, आखाती राज्ये (UAE), कुवैत, कत्तार, बहरीन, ओमन इथे राजे आहेत. इतरत्र प्रायः हुकूमशहा आहेत. लोकशाहीचे थोडेफार सोपस्कार पाळले जातात ईजिप्त आणि मधून मधून पाकिस्तान, बांगला देश (पृ. ६५) इ. देशात.
एक पैगंबर (म्हणजे ईश्वराचा दूत) आणि दुसरे कुराण या दोन गोष्टी सर्व मुसलमानांना वंद्य. पण शियांचे थोडे वेगळे आहे. पैगंबरांची मुलगी फातिमा, जावई अलीआणि मुलीची मुले हसन-हुसेन, तसेच पुढील १० पिढ्यांतील पुरुष – ही सर्व विशेष अर्थाने शिया पंथीयांची पूजास्थाने बनली आहेत. पैगंबरानंतर त्यांचे वारस बनलेल्यांना खलिफा म्हणत. त्यांनी इस्लामी सत्ता दूरवर पसरवली. नवव्या शतकानंतर तुर्काची सत्ता वाढली. पण इ.स. १२५० मध्ये चंगीझखानाचा नातू हलाकूयाने बगदाद शहर काबीज करून खलिफांचा वंशच नष्ट केला. चंगीझखान मुसलमान नव्हता. खान हे आपल्या राव, रावसाहेब’ यांसारखे आदरार्थी उपनाम आहे. फार्सी साहित्यात चंगीझखानाला ‘कहरे इलाही (परमेश्वरी प्रकोप) म्हणतात. तो मंगोल होता. मात्र भारतातील मोगल तुर्क होते.
शिया आणि सुन्नी दोघेही सूफींना वेगळेच समजतात. भारतात इस्लाम शांततामय मार्गानी पसरला हे म्हणणे पगडींच्या मते अर्धसत्य आहे. (पृ. ४८) त्यातला सत्यांश सूफींना लागू पडतो.
भारताबाहेरचे मुसलमान भारतीय मुसलमानांना गोरपरस्त (थडग्यांचे पूजक) म्हणतात. अजमेरचा मुईनोद्दिन चिश्तीचा दर्गा पाहून व्याकुळ झालेला शिबली नेमानी३ म्हणतो ‘ये बुत (मूर्ती) कब टूटेगा?’ वहाबी तर अधिकच कडवे. ते भारतात सत्तेवर असते तर ताजमहालची काय गत झाली असती असा प्रश्न पगडी विचारतात. प्रख्यात धर्मशास्त्री सुलेमान नदवी यांच्या मते निजाम नष्ट झाला याची दोन कारणे. एक इस्लामचा प्रसार करणे हे मुस्लिम राजाचे कर्तव्य त्याने बजावले नाही, आणि दुसरे तो शिया पंथाकडे झुकला. याने त्याचे पतन झाले.
१९५३ साली पाकिस्तानात पंथीय दंगली झाल्या. अहमदिया कादियानी या पंथाचे अनेक लोक मारले गेले. त्यांच्या मालमत्ता लुटल्या गेल्या. यूनोमधील पहिले पाकिस्तानीवकील पुढे आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे न्यायमूर्ती सर झाफरुल्लाखान हे अहमदिया होते. विध्वंसाची चौकशी करण्यासाठी सरकारने न्यायालयीन समिती नेमली. तिचे अध्यक्ष न्या.मू. महम्मद मुनीर होते. ते लोकशाहीचे खंदे पुरस्कर्ते. त्यांनी चौकशी करून सुमारे ९०० पानांचा अहवाल सादर केला आहे. न्या.मू. मुनीर साक्षीदार मुल्ला-मौलवींना विचारत, ‘सच्चा मुस्लिम कोणाला म्हणावे? उत्तर देताना त्यांची जी तारांबळ उडे आणि उंत्तरातून जो । वैचारिक गोंधळ दिसून येई त्याचे मोठे केविलवाणे चित्र त्यांनी आपल्या अहवालात रेखाटले आहे. पाकिस्तानात चाळीस लक्ष अहमदिया आहेत. पाकिस्तान सरकारने ते मुसलमान नाहीत असे जाहीर केले आहे. त्यामुळे सर झाफरुल्लाप्रमाणेच नोबेलपारितोषिकविजेते शास्त्रज्ञ अब्दुल सलाम हे बिगर-मुसलमान ठरले आहेत.अहमदियापंथीय मुसलमान जगभर पसरले असून त्यांची संख्या १ कोटीहून अधिक आहे. (पृ. ६३)
भारतीय मुसलमानांच्या समस्येचे एक कारण पगडींच्या मते त्यांच्या इतिहासाच्या विपरीत आकलनात आहे. भारतीय इतिहासाचे ब्रिटिश इतिहासकारांनी ३ खंड पाडलेआहेत. हिंदुयुग, मुस्लिमयुग आणि ब्रिटिशयुग. मुस्लिम कालखंड ते १७६१ (पानिपतची लढाई) पर्यंत आणतात. ही विभागणी मुस्लिम मनाला सुखावते आणि आम्ही भारतावर हजार वर्षे राज्य केले, अशा गफलतीत भले भले मुसलमान अडकतात. पगडींच्या मते वरील विभागणीत दोन फसगती आहेत. एक विभागसंकराची, पहिले दोन विभाग धर्माच्या आधारे केले. तिसरा विभाग प्रदेशाच्या आधाराने केला. एक तत्त्व पाळायचे तर तिसर्‍याला ख्रिस्ती युग म्हणायला हवे होते. ते जितके चूक तितकेच मुस्लिमयुग म्हणणे चूक. तुर्कीयुग म्हणणेच सयुक्तिक आहे. येथील मुसलमानांना तुर्कानी कधी आपले म्हटले नाही. दुसरी फसगत ही की ब्रिटिश कालखंड म्हणतात तो निर्भेळ ब्रिटिश नाही. तो ब्रिटिशांइतकाच मराठ्यांचा आहे. स्वातंत्र्यापूर्वी मुसलमानांची आणखी एक मागणी असे : इंग्रजांनी हिंदुस्थान आमच्याकडून घेतला तेव्हा त्यांनी तो सोडताना आमच्या हाती सोपवावा.
वस्तुस्थिती अशी आहे की १८व्या शतकात अर्ध्याअधिक भारतावर मराठ्यांचे वर्चस्व होते. दिल्लीला औरंगजेबाचा मोठा मुलगा शहाआलम बहादूरशहा हे नाव घेऊन गादीवर होता, पण मराठ्यांच्या मर्जीने. त्याने महादजी शिंद्यांपाशी व्यक्तवलेले पुढील मनोगत पाहता त्यावर वेगळ्या भाष्याची गरज नाही.
राजपाट त्यजके आये तुम्हारे बस ।।
अब ऐसी कीज्यो माधो की होवे तुमको जस ।।
(आम्ही सर्व काही सोडून तुमच्या आश्रयाला आलो. आता तुमच्या हाताला यश येईल असे करा. (पृ. २२))
आम्ही राज्य केले हे म्हणणे किती भ्रामक आहे! तुर्की मोगल राज्यकर्ते काय किंवा त्यांचे लहानमोठे सरदार दरकदार काय यांनी भारतीय मुस्लिमांना कधीही बरोबरीचे मानले नाही. औरंगजेब एवढा इस्लामचा सेवक पण तो एतद्देशीय मुस्लिम अधिकार्‍यांना, ‘आम्ही तुरानी (तुर्क), तुम्ही हिंदुस्थानी अशा शब्दांनी हिणवी. राज्यकारभारातील बहुसंख्य अधिकारी – मुल्की असो, लष्करी असो- हे थेट मध्यआशिया किंवा इराणमधून आलेलेकिंवा अफगफ्ण पठाण असत. अल्पसंख्य असूनही आपण अजिंक्य आहोत या अहंभावनेने ते पछाडलेले असत. त्यामुळे येथील मुसलमानांनी आम्ही राज्य केले असे म्हणणे म्हणजे फिरत्या चाकावर बसलेल्या माशीने आपण चाक फिरवले असे म्हणण्यासारखे आहे.
भारतातील फारशी आणि उर्दू साहित्यातही भारतीय वातावरणाचे चित्रण अभावानेच होई. भारतातील नद्या, पुष्करणी, आंबराया, मोर, कोकिळा, चकोर, कमळे इत्यादि संकेत उर्दू काव्यात आढळत नाहीत. युसूफ-जुलेखा, लैला-मजनू, शीरी-फरहाद, बुल्बुल, इराणी मदिरा आणि मदिराक्षी हेच संकेत उर्दू काव्यात आढळून येतात. शिबलीसारखे थोर इतिहासकार उमर, मामून अशा खलिफांची चरित्रे लिहू लागले. कादंबरीकार आपली कथानके अरबकालीन मध्यपूर्वेच्या घटनांनी सजवू लागले. (पृ. २२). डॉ. अख्तरहुसेन रायपुरी यांचा जन्म १९१२ चा. ते मध्यप्रदेशातील रायपूरचे म्हणून स्वतःला रायपुरी म्हणवतात. त्यांचे शालेय शिक्षण हिंदीतून झाले. कलकत्त्याला उच्च शिक्षण घेत असताना हिंदी वृत्तपत्रांतून लेखन करून हिंदी साहित्यिक म्हणून नावारूपाला आले. संस्कृतचा कसून अभ्यास करून ते संस्कृतची साहित्यालंकार ही परीक्षा उत्तीर्ण झाले. पॅरिसच्या सारबोन विद्यापीठातून त्यांनी डॉक्टरेट घेतली. विषय होता ‘संस्कृत साहित्यातून प्राचीन भारतीय संस्कृतीचे घडणारे दर्शन’. भारत सरकारच्या शिक्षण खात्यात ते वरिष्ठ हुद्यावर होते. फाळणीनंतर त्यांनी पाकिस्तानची निवड केली. तेथून ते यूनोत गेले. युनेस्कोतर्फे इराण, सोमालिया इ. ठिकाणी १७ वर्षे कामगिरी करून ते कराचीला स्थायिक झाले आहेत.
डॉ. रायपुरींनी ‘गर्देराह (रस्त्यातली धूळ) या नावाचे आपले आत्मचरित्र लिहिले आहे. जगातील मुसलमान समाजाविषयी, विशेषतः पाकिस्तानच्या निमित्ताने दिसून येणार्‍या मुस्लिम अभिजनांविषयी त्यांनी मोठे परखड विचार मांडले आहेत. ते मुस्लिमांच्या सांस्कृतिक वारशासंबंधी म्हणतात, ‘हिंदुस्थानच्या मुसलमानांना धर्म मिळाला तो अरबांच्याकडून, राज्य करण्याचे शिक्षण मिळाले ते तुर्काकडून आणि संस्कृती मिळाली इराणकडून. आमच्या लहानपणापर्यंत (जन्म १९१२) हिंदुस्थानच्या मुसलमान घराण्यातून इराणचा उल्लेख अशाप्रकारे होई की, जणू काही इराण हाच आपला देश. शरीराचे पालनपोषण हिंदुस्तानात होई, पण मेंदूला खुराक मिळे तो इराणकडून; आणि आत्मा भटके तो अरबांच्यात.’ (पृ. १३२)४
डॉ. रायपुरी लोकशाहीवादी आहेत. पैगंबरानंतर ४ खलिफा सोडले तर पुढील मुसलमान बादशहा आपल्याला ‘परमेश्वराची सावली’ (जिल्लुला) म्हणवीत. मुस्लिमांना सत्तांतराचे नियम कधीच करता आले नाहीत. परिणाम असा झाला की, ‘आम्हामुसलमानांच्या राजकीय जाणिवेत घटना (दस्तुर) आणि कायदा यातील फरक समजण्याची शक्तीच नाही… विशेषतः मुसलमान राज्यांतून हुकूमशाही परंपरा अतिशय दृढमूल झाली आहे. कोणीही सत्ताधारी आपली सत्ता सरळपणे देत नाहीत….. अनियंत्रित सत्ताधारी धर्माचे चुकीचे अर्थ लावून आपल्या हिताची जपणूक करण्यात गुंतलेले आहेत.’ (पृ. १३३). पाकिस्तान निर्मितीनंतर इस्लामची मूल्ये, संस्कृती ह्यांवर भाष्ये करायला सरसावले ते सरंजामदार, भांडवलदार, जहागीरदार आणि प्रांतीय पुढारी. त्यांच्या हितसंबंधांना विरोध करणारा तो इस्लामचा शत्रू ठरला!
भारतीयांचे एक राष्ट्र निर्माण करण्याच्या कामात मुसलमानांनी भाग घेतला नाही याची जाणीव डॉ. रायपुरींना आहे. त्यांची मीमांसा अशी : ‘अठराव्या शतकात भारतातील मुसलमानांची सत्ता नाहीशी झाली… सत्ताहीनतेमुळे त्यांच्यात देवतनी (स्वदेशाबद्दल उदासीनता) आणि फरारी (पलायनवाद) ह्या प्रवृत्ती बळावल्या… त्यांनी राष्ट्रीय भावना आणि देशभक्ती या भावनांकडून तोंड फिरविले.’ (पृ. १३३). पण त्यांचा हा निष्कर्ष पगडींना मान्य नाही. भारतातून फुटून निघण्यासाठी जे सोयीचे वाटले तेच आता पाकिस्तानच्या मुळावर आले आहे असे त्यांना वाटते. (पृ. १३५). जगातील सगळे मुसलमान एक आहेत. त्यांच्या बंधुभावनेवर जगातल्या देश किंवा राष्ट्राच्या मर्यादा पडू शकत नाहीत हा पॅनइस्लामिझमचा विचार राष्ट्रवादाच्या आड येतो. आमची धार्मिक समजूत हिंदुस्थान हा आमचा देश आहे असे जर मानू देत नाही तर ‘पाकिस्तान हा एकच आमचा देश आहे, असे तरी आम्ही का मानावे? ही ती देवतनी प्रवृत्ती आहे. (पृ. १३५) डॉ. रायपुरींचा राग आहे, पाकिस्तानला स्वतःचा देश न मानणार्‍या, पाकिस्तान सोडून पळून जाणार्‍या देवतनी पाकिस्तानी विचारवंतांवर, डॉ. मुहंमद इक्बाल (१८७८-१९३८) हे महान कवी, तत्त्वज्ञ, ऑक्सफर्ड आणि म्युनिक येथून डॉक्टरेट घेतलेले प्रभावशाली व्यक्तिमत्व. त्यांनी आपल्या लेखनातून सतत पुरस्कार केला की, ‘स्वदेशप्रेम, देशभक्ती, राष्ट्रवाद या गोष्टी इस्लामच्या चौकटीत बसत नाहीत. आमचा धर्म राष्ट्रवाद सांगत नाही. (पृ. १३५) पाकिस्तानात विजय डॉ. इक्बालचा झालेला दिसतो.
भारतीय मुसलमानात निर्माण झालेला, आंतरराष्ट्रीय कीर्तीचा क्रान्तिकारी असा एकमेव धर्मशास्त्रज्ञ म्हणजे मौलाना अबुल्कलाम आझाद. त्यांनी असा विचार मांडला की, ‘मुसलमान समाज इतरांहून वेगळा आहे अशी भूमिका काही विशिष्ट ऐतिहासिक कारणांतून निर्माण झाली आहे. तो इस्लामचा अटळ सिद्धान्त नव्हे. ते दीन आणि शरा यांतील भेद दाखवतात. ‘शरा म्हणजे धर्माचार आणि रूढी. या देशकालपरत्वे भिन्न असू शकतात… शरांत काही दोष आढळून आल्यास दीन (परमेश्वरावर विश्वास) च्या भूमिकेतून त्याची सतत छाननी करण्यात आली पाहिजे… हिंदूंच्याबरोबर मैत्री आणि सहकार्य यांतूनच उम्माहलवाहिदा’ असे एक भारतीय राष्ट्र निर्माण होऊ शकेल आणि ही गोष्ट इस्लामच्याविरुद्ध नाही. मदिन्याच्या बिगरमुस्लिम समाजाशी करार करताना पैगंबराने उम्माहलवाहिदा (एकराष्ट्र) हाच शब्द वापरला होता. (पृ. २४)
पगडी म्हणतात : मुस्लिम समाजाचे अंतरंग समजून घेण्यासाठी आत्मचरित्रांचे मोल फार आहे. ‘एखादे मनोगत, एखादी घटना, एखादे वाक्यही सामाजिक प्रश्नांवर कितीतरी विदारक प्रकाश टाकूशकतात’ हे नमूद करून पगडींनी वाचलेल्या २६ उर्दू आणि १४ इंग्रजी आत्मचरित्रांची नावे दिली आहेत. पाकिस्तानात उर्दूचे स्थान समजण्याच्या दृष्टीने एक आत्मचरित्र फार बोलके आहे. श्री. सोमानंद हे लाहोरचे निवासी. फाळणीमुळे ते भारतात आले. पण वडील लाहोर सोडेनात. त्यांच्या एका घनिष्ठ मुस्लिम मित्राशी त्यांनी भारततल्या घराची अदलाबदल केली, आणि मित्राला दिलेल्या आपल्याच घरात एका खोलीत निर्विघ्नपणे ते एकटे राहू लागले. वडिलांना भेटण्यासाठी सोमानंद दरवर्षी लाहोरला जात. हा क्रम १९६५ पर्यंत १६-१७ वर्षे चालला. त्यांनी ‘बातें लाहोर की’ हा ग्रंथ १९८१ मध्ये प्रसिद्ध केला. उर्दूवर मुसलमानांची भाषा म्हणून शिक्कामोर्तब झाले ते मुस्लिम लीगच्या प्रभावामुळे. पाकिस्तानात पंजाबी लोक शे. ६८ आहेत, सिंधी शे. १०, पुश्तु बोलणारे पठाण शे. ८ आणि बलुची शे. ५ आहेत. खरोखरी उर्दू मातृभाषा असणारे लोक शेकडा १० आहेत आणि तेही भारतातून गेलेले मुसलमानच. (पृ. १४३), त्यांनीच उर्दू लादली. प्रसिद्ध साहित्यिक, प्रशासक घरी कधी उर्दू बोलत नसत. यात फैज़ अहमद फैज यांसारखे मातबर लेखक आणि पत्रकार (पाकिस्तान टाइम्सचे संपादक) येतात. पंजाबी, सिंधी, बलुची, पुश्तु ह्यांच्यात आणि उर्दूत एक भिंत निर्माण झाली. पाकिस्तानी कम्युनिस्ट पक्षाने पंजाबी भाषेला उचलून धरले. सामान्यांची भूमिका हीच की, उर्दू ही ड्रॉइंगरूमची भाषा आहे. आता तर लोक बोलू लागले आहेत की उर्दू एक भारतीय भाषा आहे, तिचा पाकिस्तानशी काय संबंध? (पृ. १४४), हे मत सोमानंद या हिंदू लेखकाचे आहे म्हणून झिडकारण्यासारखे नाही. सलिदा अबीद हुसेन ह्या दिल्लीच्या प्रसिद्ध विदुषी, कथाकार आणि कादंबरीकार. त्यांचे पती सुप्रसिद्ध साहित्यिक आणि प्राध्यापक अबीद हुसेन. हे दाम्पत्य अनेकवेळा पाकिस्तानला जाऊन आले आहे. सलिदा हुसेन म्हणतात, ‘बोलायचे झाल्यास उर्दू ही पाकिस्तानची राष्ट्रभाषा खरी, पण पाकिस्तानच्या लोकांना त्या भाषेत रस नाही. असलाच तर आकस आहे. चीड म्हटली तरी चालेल.’ (पृ. १४७)
लीगच्या प्रभावामुळे (आणि काँग्रेसच्या धोरणामुळे) उर्दूचा अभ्यास गुजरात, कोकण, पंजाब, काश्मीर अशा बिगरउर्दूभाषी मुसलमान समाजात पसरला. सर रजाली हे भारताचे दक्षिण आफ्रिकेतील हायकमिश्नर होते. त्यांचे आत्मचरित्र ‘आमालन्हामा (कर्मकहाणी) या नावाने प्रसिद्ध आहे. ते म्हणतात, ‘खुदा भला करे कांग्रेस का कि उसकी वजहसे उर्दू सारे मुल्क में फैल गयी।’ (पृ. २२९) बंगलोरची उर्दू बुलेटिनची कथा याच जातीची होती काय?
सेतुमाधवरावांचा हा ग्रंथ ३२० पृष्ठांचा आहे. पुस्तकाच्या नावावरून आतील सर्व लिखाण एकाच विषयाला धरून असेल अशी अपेक्षा ठेवली तर ती चूक ठरते. त्यांनी वेळोवेळी लिहिलेल्या ३६ लेखांचा हा संग्रह दिसतो. पुस्तकाची ही दुसरी आवृत्ती डिसेंबर १९९२ ची आहे. पण पहिली आवृत्ती कधीची, तिचा प्रकाशक कोण याचा कोठे उल्लेख नाही. लेखकाचे प्रास्ताविक नाही. ‘देवयानीच्या माहेरी : इराणात’, ‘इब्ने इन्शाची बगदादची रात्रं, ‘अहमद आणि सूर्यपंडित’, ‘गुरुचरित्रातील विवेकी बादशहा कोण?’ अशी काही प्रकरणांची नावे वाचून त्याचा पुस्तकाच्या मुख्य विषयाशी संबंध असलाच तर बादरायणच दिसतो. मात्र लेखन सर्व वाचनीय, अथपासून इतिपर्यंत.
पुस्तकात अतिशय मौलिक माहिती खच्चून भरली आहे. पण ती निवडून काढावी लागते अलिबाबाच्या अस्ताव्यस्त खजिन्यातून काढावी तशी. पुस्तकाला सूची नाही. एका एका संदर्भासाठी वेळ फार मोडतो. मुळात पुस्तक एका विषयाला धरून सलग लिहिलेले नसल्याने पुनरुक्ती आढळते. शैली गोष्टीवेल्हाळ, अन् भाषा चटकदार असल्यामुळे लेखनाची वाचनीयता कमी होत नाही. पण वाक्यरचना सैल आणि मुद्राराक्षसाच्या लीला यांमुळे पुष्कळदा गोंधळ उडतो. अगदी पहिल्या पानापासून. पण सेतुमाधवरावांचा अधिकार असामान्य, उर्दू, फार्सी, अरबी भाषाप्रभुत्व, अखंड विद्याव्यासंग, मुसलमानी राजवटीत (हैद्राबाद) सेवेचा प्रदीर्घ अनुभव आणि सहानुभूतिपूर्ण उदार दृष्टिकोन – इतके गुण एकवटलेल्या या विद्वानाच्या स्मृतीला आमचे अभिवादन.
तळटीप
१. अन्यथा निर्देश नसेल तेथे कंसातील संख्या भारतीय मुसलमान : शोध आणि बोध ले. सेतुमाधवराव पगडी या ग्रंथातील पृष्ठसंख्या समजावी. (परचुरे प्रकाशन मंदिर, गिरगाव, मुंबई ४, आवृत्ती दुसरी, डिसेंबर ९२.)
२. श्री मुश्ताक अहमद वझदी यांच्या आत्मचरित्राचे नाव ‘हंगामोमे जिंदगी’ (संघर्षमय जीवन) हे आहे. सोमानंद नावाच्या उर्दू लेखकाच्या बातें लाहोर की’ (१९८१) या ग्रंथातून वरील उतारा पगडींनी घेतला आहे.
३. शिबली नेमानी – अरबी आणि फारसी भाषांचा महान पंडित. मुहम्मद पैगंबराचे चरित्र लिहिणारा थोर लेखक आणि मुसलमानांच्या उत्कर्ष काळातील कालखंडावर एकाहून एक सरस इतिहासग्रंथ लिहिणारा संशोधक.
४. गर्देराह या डॉ. रायपुरींच्या आत्मचरित्रातील, पृ. २१३ वर

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.