[आमचे मित्र डॉ. र. वि. पंडित ह्यांनी स्त्रीपुरुष समता व स्त्रीमुक्ती संबंधी एक सर्वेक्षण opinion poll) करावे अशी सूचना केली आणि त्यांनीच त्यासाठी एका प्रश्नावलीचा मसुदा करून आमच्याकडे पाठविला आहे. तो सोबत देत आहोत. त्यामध्ये काहीफेबदल करावयाचा असल्यास तो आमच्या वाचकांनी सुचवावा आणि त्याला परिपूर्ण स्वरूप प्राप्त करून देण्यास साहाय्य करावे. त्याचप्रमाणे ते प्राप्त झाल्यानंतर प्रत्यक्ष सर्वेक्षण करण्यास साहाय्य करावे अशी आमची आपणांस विनन्ती आहे.]
(१) आपले नाव व वय (ऐच्छिक)
(२) आपले शिक्षण किती?
(३) घरातील सर्वाचे मिळून एकूण वार्षिक उत्पन्न
(४) नोकरी/व्यवसाय करीत असल्यास स्वतःचे वार्षिक उत्पन्न
(५) कुटुंबातील व्यक्तींची संख्या व प्रत्येकाचे शिक्षण
(६) घरामध्ये वाहन आहे काय?असल्यास किती व कोणती?
(७) घरामध्ये खोल्या किती?
(८) गेल्या वीस वर्षांत आपण कोणत्या गावात सर्वाधिक वास्तव्य केले आहे?किती काळ?
९) त्या गावाची अंदाजे लोकसंख्या?
(१०) आपली नोकरी/व्यवसाय काय?(घरकाम व कुटुंबसंगोपन हाही पूर्णकालीन व्यवसाय समजावा.)
(११) मुख्य व्यवसायाखेरीज आपणावर इतर काही जबाबदारी आहे काय?(नोकरी अथवा बाहेर काम करणार्या महिलेवर घरकाम व कुटुंबसंगोपन ही अतिरिक्त जबाबदारी मानण्यात यावी.)
(१२) आपल्या प्रमुख व्यवसायावर तसेच अतिरिक्त कार्यासाठी प्रत्येक दिवसाचे किती तास खर्च होतात?
(१३) आपल्या शिक्षणाचा, प्रशिक्षणाचा व नैपुण्याचा पुरेपूर उपयोग होतो असे आपणांस वाटते काय?आपले पूर्ण समाधान होण्यासाठी काय व्हावे अशी आपली इच्छा/अपेक्षा आहे?
(१४) जीवनात आपणास कोणत्या पुरुषाचा आधार आहे काय?अशा आधाराची आवश्यकता/उपयुक्तता आपणास वाटते काय?कारणे देऊन विस्ताराने लिहा.
(१५) घरात, समाजात, कार्यालयात आपण केवळ स्त्री आहोत म्हणून शारीरिक, आर्थिक, मानसिक त्रास सहन करावा लागतो व आपणावर अन्याय होतो असे आपणास वाटते काय?(विस्तारपूर्वक उत्तर द्यावे ही विनंती.)
(१६) स्त्री व पुरुष ह्यांच्यामध्ये केवळ निसर्गनिर्मित शरीररचनेचे आणि शारीर क्रियांचे भेद वगळता इतर कोणतीही तफावत नाही असे आपणास वाटते काय?कारणासहित उत्तर लिहा.
(१७) स्त्रियांना तरुणपणी, विवाहापूर्वी, विवाहानंतर, तसेच प्रौढावस्थेत व वृद्धपणी आचारविचारांचे पूर्ण स्वातंत्र्य असावे असे आपणास वाटते काय?ह्या स्वातंत्र्यावर समाज आणि कुटुंबव्यवस्था ह्यांचे काही नियंत्रण असावे असे वाटते काय?विचारपूर्वक विस्तृत उत्तर द्या.
(१८) स्त्रियांनी विवाह करणे अनिवार्य आहे असे आपणास वाटते काय?होय अथवा नाही ह्या दोनही पर्यायांविषयी विस्ताराने आपले मत लिहावे.
(१९) पतीची निवड, विवाहाची पद्धत ह्याबाबतीत फक्त आपली आणि आपला भावी पती ह्यांचीच मतेव इच्छा कार्यान्वित व्हाव्या असे आपणास वाटते काय?आपण तसा निर्भीडपणे आग्रह धरू शकता काय?ह्याविषयी इतर कौटुंबिक मंडळींच्या निर्णयास आपण महत्त्व देऊ इच्छिता काय?
(२०) विवाह न होऊ शकलेल्या, परित्यक्ता, घटस्फोटिता अशा महिलांना विवाहबाह्य लैंगिक वर्तन करण्याचे स्वातंत्र्य असावे काय?अशा वर्तनातून जन्म घेणार्या, अपत्यांना वाढविणार्या महिलांना समाजाने पुरेशा आदराने वागवावे असे वाटते काय?
(२१) विवाहित स्त्रियांना अपत्य हवे अथवा नको, किती हवी, केव्हा हवी ह्याबद्दल निर्णयकरण्याचे स्वातंत्र्य/अधिकार असावा काय?तसे स्वातंत्र्य नसल्यास अशा महिलेने काय करावे असे आपणास वाटते?(२२) कुटुंबाच्या सर्व मिळकतीत महिलेचा योग्य वाटा असावा व तसे कागदोपत्री नमूद करण्यात यावे असे आपणास वाटते काय?हल्ली काय परिस्थिती आहे?
(२३) आपण ज्या कुटुंबात राहता तेथील पुरुष अर्थात् पति, पिता, बंधू किंवा पुत्र- ह्यांनी सर्व कामांत व जबाबदारीत आपापला वाटा उचलावा असे आपणास वाटते काय?हल्ली काय परिस्थिती आहे?ह्याबाबतीत आपण काय प्रयत्न करता?
(२४) स्त्रियांना खरोखर पुरुषांच्या बरोबरीचे स्थान मिळण्यासाठी समाजातील व कुटुंबातील प्रत्येक घटकाने काय करावे असे आपणास वाटते?
(२५) स्त्रीमुक्ती ह्या संकल्पनेविषयी आपणास काय वाटते?त्यामुळे स्त्री अधिक सुखी होईल काय?सार्थ स्त्रीमुक्ति भारतात शक्य आहे काय?
(२६) स्त्रियांनी शृंगार करणे, सौंदर्यप्रसाधने वापरणे, दागिने घालणे, फॅशनद्वारे शरीराच्या स्त्रीवैशिष्ट्यांना उठाव देणे व ह्या सर्वांद्वारे पुरुषांच्या दृष्टीने स्वतःला आकर्षक करणे हे स्त्रियांच्या मानसिक गुलामीचे निदर्शक आहे व या गोष्टींचा महिलांनी त्याग करावा असे आपणास वाटते काय?
(२७) आजच्या विभक्त कुटुंबापासून आपणाला समाधान आहे काय?आजच्या स्त्रीच्या बर्याच समस्या छोट्या कुटुंबामुळे निर्माण झाल्या नाहीत काय?
(२८) रक्ताचे नातेवाईक नसलेल्यांचे एकत्र कुटुंब शक्य आहे काय?तशी कुटुंबे व्यवहार्य आहेत काय?तशी कुटुंबे इष्ट असल्यास ती अस्तित्वात आणण्यासाठी काय करावे लागेल?।
(२९) आपल्या देशात स्त्रीपुरुषांचे प्रमाण (गुणोत्तर) सध्या विषम आहे. ते १००० पुरुषांस ९३२ स्त्रिया असे आहे व ते अधिकाधिक विषम होत आहे. अशा परिस्थितीत निर्माण होणार्या) समस्यांवर आपण कोणते उपाय सुचविता?
(३०) तुम्ही कमावत्या असाल तर समान कामासाठी तुम्हाला पुरुषाएवढे वेतन/मेहनताना/मजुरी मिळते काय?की तुम्हाला तुम्ही स्त्री म्हणून डावे-उजवे केले जाते?
(३१) आर्थिक व्यवहारांत, उदा. बँकेचे कर्ज मिळविणे, हप्तेवारीने वस्तूची, घराची, फ्लॅटची खरेदी करणे वगैरे बाबतींत तुम्ही स्त्री म्हणून (विशेषतः तुम्ही विधवा, परित्यक्ता वा कुमारी असल्यास) तुमच्या बाबतीत भेदभाव होतो काय?
(३२) सार्वजनिक जीवनात तुम्हाला पुरुषांकडून त्रास होतो काय?उदा. टोमणे मारणे, गलिच्छ भाषा, धक्के मारणे वगैरे.
(३३) तुमच्या कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून, सहकार्यांकडून तुमच्याकडे वाईट नजरेने पाहिले जाते काय?तुमच्याशी शारीरिक, मानसिक दुर्व्यवहार होतो काय?
(३४) नोकरी मिळविण्यात तसेच पदोन्नतीसाठी समान अर्हताप्राप्त पुरुषाहून तुम्हाला मागे सारले जाते काय?
(३५) एखाद्या स्त्रीस, विशेषतः तरुण मुलीस फसविणारे, तिच्या भाबडेपणाचा अथवा अगतिकतेचा फायदा घेणारे कोणी पुरुष आढळले तर तुम्ही त्या स्त्रीला सावध करण्याचा, वाचविण्याचा मनापासून प्रयत्न करता काय?
(३६) एखाद्या स्त्रीविरुद्ध वा स्त्रियांविरुद्ध एखादी घटना घडली आणि तिचा निषेध करण्यासाठी एखादी सामुदायिक कृती (मोर्चा, धरणे, कायदेशीर उपाय) करण्याचे एखाद्या समूहाने ठरविले तर तुम्ही त्यात सहभागी होता काय?की अशा कृतीपासून तुम्ही अलिप्त राहू इच्छिता?आपल्या निर्णयाचे तुम्ही कसे समर्थन कराल?
(३७) केवळ सधवा स्त्रीने करावे अशा धार्मिक विधींचे पालन आपण करता काय?उदा. हळदीकुंकू, मंगळागौर, वटपौर्णिमा इ. इ.
(३८) विधुर पुरुष कडोसरीला सुपारी लावून सर्व धार्मिक विधी पार पाडू शकतो ह्या घटनेचा आपण कधी गंभीरपणे विचार केला आहे काय?
(३९) पतिनिधनामुळे स्त्रीच्या सामाजिक, धार्मिक दर्जात होणारा बदल आपणास मान्य आहे काय?विधवा स्त्री आपल्या अपत्यांच्या विवाहादि मंगलप्रसंगी धार्मिक विधी पार पाडू शकते असे आपणास वाटते काय?
(४०) विवाहानंतर स्त्रीने आपले नाव, आडनाव बदलावयाला हवे असे आपले मत आहे काय?
(४१) स्त्री म्हणून जर सर्व स्त्रिया समान असतील तर त्यांच्या नावांच्या आधी कुमारी, सौभाग्यवती, श्रीमती इत्यादि शब्दांचा वापर कशासाठी?
(४२) घरकामात स्त्रीबरोबर पुरुषानेही आपला वाटा उचलायलाच हवा असे आपणास वाटते काय?