संपादक,
आजचा सुधारक,
स.न.वि.वि. जून ९४ च्या अंकांतील श्री. वऱ्हाडपांडे ह्यांचा लेख आणि जुलै ९४ च्या अंकांतील श्री. देशपांडे आणि मोहनी ह्यांचे लेख मला खूप आवडले. ना. सी. फडके ह्यांची भाषा सोपी होती. देशपांडे ह्यांची पण तशीच आहे. मोहनींनी त्यांच्या भाषेचा बोचरेपणा कमी का केला? त्यांनी बोचरे पणानेच लिहावे.
‘आज सर्व धर्माचा आढावा घेतला तर हिंदू धर्मच बरा आहे असे म्हणावेसे वाटते. मी वृद्ध आहे. मी मेल्यावर हिंदूधर्माप्रमाणे जाळणेच योग्य होय. लोकसंख्यावाढीमुळे मेल्यावर पुरावयाचे ठरविले तर कितीतरी जमीन पडीक राहील. तसेच विहिरीत प्रेत टाकणे पण अयोग्य होय. बौद्धधर्मीय चीनमध्ये आतां प्रेते जाळतात रूपा कुळकर्णीच्या माहितीसाठी सांगतो सर्व नवबौद्ध विवाहादि संस्कार हिंदू धर्माप्रमाणेच करतात.
मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केल्यावाचून हिंदूधर्मीयांत मूर्तीला देवपण येत नाही म्हणजे कोणती मूर्ती देव आहे ते आम्ही ठरवितो, राम-कृष्ण-शंकर. इतर हिंदूधर्मीय टीका करू शकतात. भारतात रावणाची व दुर्योधनाची सुद्धा मंदिरे आहेत. कांही मंदिरांचे पुजारी मुस्लिम आहेत तर काही दग्र्याचे ब्राह्मण आहेत. असे स्वातंत्र्य इतर देशांत नाही.
हिंदूधर्मीयांखेरीज इतर धर्माचे ग्रंथ धर्मसंस्थापकांच्या मृत्युनंतर अनेक वर्षानंतर लिहिले गेले आहेत. तेव्हा संस्थापकाने नेमके काय सांगितले ते सांगणे कठीण आहे. ते सर्व धर्म शिवसेना व आर. एस्. एस्. प्रमाणे एक चालकानुवर्तीत आहेत. त्यात शंकेला किंवा चर्चेला वाव नाही.
आगरकर म्हणतात, “हिंदूधर्मात अनेकव्यंगे आहेत. तरीही आपण स्वधर्मात राहून अज्ञानी लोकांच्या निंदेस अथवा छळास न भिता, युक्तिवाद करून, भांडून, दटावून इ. मार्गांनी त्यांना सत्य समजावून सांगितलेच पाहिजे.”
शेवटी असे की बहुसंख्य धर्ममार्तंड अतिसामान्य बुद्धीचेच असतात. उत्तुंगबुद्धिमत्ता असणारा धर्ममार्तंड झाल्याचे दिसत नाही. ह्या सर्व गोष्टी आणि ज्ञानेश्वर – तुकाराम इ. चे मूर्तिपूजेविरुद्धचे अभंग अंधश्रद्धानिर्मूलन कार्यकर्त्यांनी जनतेसमोर वारंवार ठेविले तरी आगरकरांच्या विचारांची ज्योत तेवत ठेवल्याचे श्रेय श्री. नरेन्द्र दाभोलकरांना मिळेल.
कळावे.
आपला
केशवराव जोशी
तत्त्वबोध
हायवे चेक नाक्याजवळ
नेरळ ४११०१ (जि. रायगड)
संपादक, आजचा सुधारक, नागपूर यांस स.न.
आपल्या ऑगस्ट ९४ च्या अंकातील चची’ या सदरात श्री. न. ब. पाटील, मुंबई यांचा ‘साक्षात्कार आणि विवेकवाद’ या शीर्षकाचा लेख प्रसिद्ध झाला आहे. डॉ. नी. र. वर्हाडपांडे यांच्या जून ९४ च्या अंकातील लेखाच्या संदर्भात तो असल्याने ते त्याला यथोचित उत्तरे देतीलच, पण आपल्या अंकाचा एक वर्गणीदार व नियमित वाचक या नात्याने मला श्री. पाटील यांच्या दोनच मुक्ष्यांबाबत त्यांच्याकडून खुलासा मिळाल्यास मी त्यांचा ऋणी होईन.
पृ. १४७ वर ते म्हणतात, “रूढ ज्ञानसाधने, म्हणजे प्रत्यक्ष आणि अनुमान ही, नेहमीच्या दृश्य व्यवहारात उपयुक्त ठरत असली तरी पलीकडील नित्य वस्तूच्या ज्ञानासाठी मनाची एकाग्रता, ध्यान, धारणा अशी थोडीशी वेगळी वाटणारी ज्ञानसाधने वापरायला हवीत.” यातील ‘पलीकडील नित्य वस्तू म्हणजे काय? ती ‘नित्य आहे, याचे प्रमाण काय?
एकाग्रता, ध्यान, धारणा यांच्या वापराने ही वस्तू सापडते एवढे निश्चितार्थी विधान श्री. पाटील ज्याअर्थी करतात, त्याअर्थी त्यांच्याजवळ त्याचा तपशील काय? की, दुसऱ्यां च्या अनुभवाद्वारेच ते एवढं निश्चित् विधान करत आहेत?
पृ. १४९ वर ते म्हणतात, “विवेकवाद्यांनी जनसामान्यांचा बुद्धिभेद करू नये. अध्यात्मज्ञान ही एक स्वतंत्र ज्ञानशाखा आहे. हिची शास्त्रसंमत ज्ञानसाधने वेगळी आहेत. त्यांच्या आधाराने हे ज्ञान आत्मगत करता येते.”
यातील पहिल्या वाक्यावरून आठवले की स्वा. सावरकर यांच्यावरही असा आक्षेप घेण्यात आला होता. आणि त्यांनी त्यांच्या परखड भाषेत उत्तर दिले होते, “मी बुद्धिभेद करत नसून दुर्बुद्धिभेद करत आहे!”
ज्यांची मते आपल्याला पटत नाहीत, त्यांच्याबाबत जनसामान्यांना वेठीस धरून, त्यांनी बुद्धिभेद करू नये असे म्हणणे सोपे असते. तो बुद्धिभेद कसा होतो, हे सांगणे अवघड असते! थोडक्यात न पटणारी मते प्रतिपादन करणार्यां चा निपटारा स्वस्तात करता येतो!
आत्मज्ञानाबद्दल एवढ्या आत्मविश्वासाने लिहू शकणार्यात श्री. पाटील यांच्याकडून अधिक ठोस व प्रमाण विधानांची अपेक्षा करणे अयुक्त होईल काय?
आपला नम्र,
य. ज. महाबळ
द्वारा – श. य. महाबळ,
साईकृपा, पालिवाल बंगला,
यशवंतनगर (विस्तारित), नांदेड – ४३१ ६०२
संपादक,
आजचा सुधारक यांस
‘अंधश्रद्धा निमूर्लन व धर्म या दि. य. देशपांड्यांच्या लेखाने (जुलै ९४) आमच्या कल्पना अधिक स्पष्ट झाल्या त्याबद्दल त्यांना शतशः धन्यवाद.
देव व धर्म या कल्पनांची पकड मानवी मनावर बालपापासून खोलवर रुजत आलेली असते. ती सहजासहजी केवळ तर्क आणि विवेक ही हत्यारे वापरून लगेच दूर होईल असे नाही. कारण माणूस हा केवळ बुद्धिप्रधान नाही तर भावनाप्रधानही आहे. त्यामुळे धर्माची चिकित्सा केल्यावर निघालेले निष्कर्ष (धर्माचे वैयर्थ) व ईश्वराचे थोतांड सांगितल्याने श्रद्धाळू (अंध) लोकांच्या मनावर एक जबरदस्त आघात बसतो. श्रद्धाळू लोक सांगणार्यांाचे निष्कर्ष समजून न घेताच सांगणार्यां च्याबद्दलच आपल्या मनामध्ये एक प्रकारची अढी निर्माण करून घेतात. त्यामुळे बाकीच्या उघड, घातक स्वरूपाच्या, शोषण करणाया। अंधश्रद्धादेखील असे लोक समजून घेत नाहीत. परंतु जनसामान्यांच्या भावनांची कदर करायची म्हणून धार्मिकांच्या श्रद्धांबद्दल बोलूच नये असे नाही. देव व धर्माबद्दलचे निष्कर्ष लिखाणातून, जाहीर भाषणातून सांगण्याऐवजी व्यक्तिगत पातळीवर संवाद साधून, चर्चेतून, आचरणातून सांगितले तर त्यांना ते समजू शकते. एखादा नवखा मनुष्य नास्तिक लोकांच्या अधिक संपर्कात आल्यावर इतर अंधश्रद्धांच्या बद्दल विचार करता करताच देव व धर्म या गोष्टीविषयी देखील विचार करू लागतो, चिकित्सा करू लागतो. त्याच्या मनामध्ये बालपणापासून दृढ असलेल्या या कल्पनांविरुद्ध बंड सुरू होते व हळूहळू या ही श्रद्धा गळून पडतात. अर्थात काही व्यक्तींनी तार्किक युक्तिवाद समजल्यानंतर बदलायचे नाही असे ठरवलेले असते, त्यांना बदलणे अवघड आहे.
देव व धर्म मानणान्यांचा उपहास करू नये किंवा त्यांना हास्यास्पद ठरवू नये. लोकांनी स्वतःहून चिकित्सा करणे महत्त्वाचे आहे आणि ही चिकित्सा लोकांच्या मनामध्ये सुरू करण्याची प्रक्रिया कृतिशील संवादाने होऊ शकते.
टी. बी. खिलारे
२३/७, शिंदेनगर, बावधन, पुणे ४११०२१