आजचा सुधारक ऑगस्ट १९९४ च्या अंकात मी एका प्रक्षोभक विषयाला हात घातला होता.
त्यात स्त्रीमुक्ती म्हणजे स्त्रीला मानाने वागविणे, तिच्या विवेकशक्तीचा आदर करणे, तिच्या कोणत्याही (यामध्ये योनिविषयक वर्तनही आले) वर्तनामधील औचित्यानौचित्याविषयी तिला स्वतन्त्रपणे निर्णय करता येतो असा विश्वास तिच्या स्वतःच्या व इतरांच्या ठिकाणी निर्माण करणे ह्या गोष्टींचा मी ओझरता उल्लेख केला होता. आज त्याचा थोडा विस्तार करावयाचा आहे.
स्त्रीमुक्तीविषयी आमच्या सगळ्यांच्या मनांत पुष्कळ गैरसमज आहेत. माझा मागचा लेख वाचून झाल्यावर मला पुष्कळ लोक भेटले. पत्रे फार थोडी आली. त्यांपैकी एका पत्राचा काही अंश मी पुढे उद्धृत करणार आहे. माझ्यापुढे मांडण्यात आलेले प्रश्न व मते साधारणपणे खालीलप्रमाणे होती.
समजा तुमच्या सूचना योग्य आहेत असे मानले तर –
जुनी घडी मोडल्यानंतर नवीन घडी बसेपर्यन्त गोंधळ होणार नाही काय?
नवीन घडीमध्ये किंवा व्यवस्थेमध्ये नव्या समस्या उद्भवणार नाहीत ह्याची हमी काय?
आजच ह्या सर्व चर्चेची गरज काय?
ही घडी मोडावयाला किती दिवस लागतील?
नवीन घडी बसवावयाला किती कालावधी लागेल?
हे सगळे घडवून आणण्याची पद्धत कोणती?
तुमचे म्हणणे मान्य केले तर आमचे एकजात सारे जुने आदर्श, जुन्या निष्ठा त्याज्य आहेत असे म्हटल्यासारखे आहे. ह्यामुळे कायद्याविषयी अनादर निर्माण होईल.
ह्याविषयी विचार करण्यासाठी आम्हाला आणखी वेळ द्या, वगैरे.
पण कोणीही मी मांडलेली बाजू अजिबात चूक आहे असे अजून म्हटलेले नाही. तसे कोणी म्हटले तर मला माझ्या मतांचा पुनर्विचार करावा लागेल, पण आज ‘मौनं संमतिलक्षणम्’ असे मी धरून चाललो आहे. स्त्रीमुक्तीविषयी मुळात जे कोणी संकोच करत बोलतात ते नवीन काही बोलत नाहीत. बोलणार्याअ महिला बहुधा मध्यमवर्गामधल्या आहेत. त्या स्वतःची पुरुपांशी बरोबरी करतात. काही पुरुप ते माझ्याशी सहमत आहेत असे खाजगीत सांगतात. त्यांना विवाहसंस्काराचे महत्त्व कमी करण्याची इच्छा आजवर तरी नव्हती.
विवाहसंस्काराचे महत्त्व कमी केल्याबरोबर कुटुंबसंस्थाच नष्ट होईल व ती तर आपल्या सर्व समाजाचा आधार आहे असे बहुतेक सगळ्यांना वाटते. निराळ्या प्रकारच्या समाजाच्या घडीची कल्पनाच आम्ही करू न शकल्यामुळे तशी घडी निर्माण होऊ शकत नाही. दुसरी गोष्ट अशी की आजची विवाह व कुटुंबविषयक घडी ही समाजाची उन्नत आणि प्रगत अशी अवस्था असून ती आपल्या समाजाला तो तावूनसुलाखून निघाल्यामुळे प्राप्त झालीआहे असा समज आहे. आदिवासींची रचना ही समाजाची रानटी अवस्था आहे; आम्हाला तिकडे परत जावयाचे नाही.’
आदिवासींबद्दलचा जो समज आहे तो अगोदर तपासू आणि नवीन घडीचे चित्र मागाहून रचू. आमची आजची समाजमूल्ये (शाश्वतमूल्ये नव्हेत) ही आदिम जनतेच्यामध्येप्रचलित असलेल्या मूल्यांपेक्षा भिन्न आहेत ह्यात शंका नाही. आदिवासींची स्थिती ही आमची कालची स्थती-आहे असे आपण घटकाभर समजू या. तर कालच्या आणि आजच्या स्थितीत जो मुख्य फरक घडला आहे तो विषमतेचा आहे. जातिभेद निर्माण झाला आहे. जेथे जातिभेद नाही तेथे वर्गभेद आहे. म्हणजेच उच्चनीचभाव आता आमच्या मनामध्ये रुजला आहे. भौतिक संपन्नता वाढली आहे तरी देखील त्याचबरोबर मानवी दुःखाचे परिमाणही फार वाढले आहे. थोडक्यात म्हणजे स्त्रीशूद्रांच्या त्यागावर – ऐच्छिक नव्हे तर लादलेल्या त्यागावर म्हणजेच शोपणावर – सध्याच्या आमच्या तथाकथित प्रगतीचा इमला रचला गेला आहे. एके काळी अमेरिकेच्या वैभवाचा इमला तेथल्या गुलामगिरीच्या पायावर रचलेला होता, तसाच. म्हणून माझ्या मते समतेच्या संदर्भात आम्हाला आदिम समाजाचा अभ्यास व अनुकरण करणे आवश्यकच आहे.
अमेरिकेमधल्या कृष्णवर्णीयांची कालची गुलामगिरीतील आणि आपल्या मध्यमवर्गीय स्त्रियांची आजची परिस्थिती यांमध्ये फार साम्य आहे असे मला राहून राहून वाटते. कारण गुलामांच्या मनावर ठसविलेली स्वामिनिष्ठा आणि स्त्रियांच्या मनावर ठसविलेली पतिनिष्ठा ह्यांमध्ये मला फरक दिसत नाही. बंड करून बाहेर पडण्याचे धैर्य त्यांच्यात नसते, कारण त्यांची स्वातंत्र्याची इच्छाच पद्धतशीरपणे मारून टाकलेली असते. ती स्वातंत्र्याकांक्षा न्यायी आणि तटस्थ लोकांना आता पुनरुज्जीवित करावी लागणार आहे.
स्त्रियांचे लैंगिक स्वातंत्र्य त्यांच्या समग्र स्वातंत्र्याचे एक अंग आहे, त्याचा एक अंश आहे. आणि ते प्राप्त केल्याशिवाय परिपूर्ण स्त्रीमुक्ति होऊ शकत नाही असे माझे ठाम मत आहे, कारण लैंगिक स्वातंत्र्य हे त्यांच्या समग्र स्वातंत्र्याचे एक आवश्यक अंग आहे असे मी मानतो आणि तेवढ्यासाठीच माझ्या मागच्या लेखात मी त्यावर भर दिला आहे स्त्रीमुक्तीच्या ज्या इतर अंगांची चर्चा होऊन चुकली आहे व ज्यांच्याविषयी मतभेद नाही त्यांचा उल्लेख मी टाळला आहे, कारण त्यामध्ये वेळ घालविण्याची गरज मला वाटत नाही. तेवढ्यासाठी एकदम मी मुख्य मुद्द्याला हात घातला आहे.
डॉ. जया सागडे ह्या पुणे विद्यापीठात विधी विषयाच्या प्राध्यापिका आहेत. त्यांच्या पत्राच्या अनुपंगाने आता मी माझे मुद्दे पुढे मांडतो. पहिल्याने त्यांच्या पत्रातील एक परिच्छेद व त्यावर माझे उत्तर असा क्रम सोयीसाठी योजिला आहे.
(१) ‘स्त्रीमुक्ती म्हणजे दर्जातील समानता, ही व्याख्या अतिशय सोप्या शब्दांत केली आहे. पण अजाणता असेल, आपण सर्व संदर्भ विवाहांशी निगडितच दिले आहेत. दलित/सवर्ण स्त्री, उच्च/नीचवर्णीय स्त्री, सुशिक्षित/अशिक्षित स्त्री, गरीब/श्रीमन्त, ग्रामीण/शहरी स्त्री असे निकषहि लावता आले असते.’
– हे मान्यच आहे. पण ज्या बाबींचा उल्लेख मी आजवर वाचलेल्या लेखांत टाळला गेला आहे असे मला वाटले त्याच बाबीवर मी माझी मते मांडली आहेत.
(२) पुरुषप्रधानतेच्या चौकटीत अडकलेल्या समाजाला एकापेक्षा अधिकांवर एकाच वेळेस स्त्रीने केलेले प्रेम चालू शकेल?
– आपल्या सद्भाग्याने आपला पूर्ण समाज पुरुपप्रधानतेच्या चौकटीत अडकलेला नाही. आपला तथाकथित, सुसंस्कृत समाज पुरुषप्रधान आहे. परंतु त्यांतही निर्मत्सर पुरुषांची संख्या फार कमी नसावी. हा मत्सर संस्कारांमुळे वाढतो किंवा कमी होतो. मत्सर किंवा असूया ही ज्याअर्थी सर्वत्र व सारख्या प्रमाणांत आढळत नाहीत त्याअर्थी ती सहजप्रेरणा नाही. म्हणून ही पुरुषप्रधानतेची चौकट मोडू शकेल असा आमचा विश्वास आहे. प्रस्तुत लेख ही चौकट मोडणार्याम चळवळीची सुरुवात करण्यासाठीच लिहिला आहे आणि जोवर ती चौकट पूर्णपणे मोडत नाही तोवर ज्यांना त्यामागचा विचार पटला आहे तेवढ्यांनीच तो प्रयोग करावयाला हरकत नाही असे मला वाटते. यद्यपि शुद्धं लोकविरुद्धं नाचरणीयम हा विचार आजच्या सुधारकाला मान्य नाही.
(३) ‘मला प्रामाणिकपणे वाटते की समाजाला स्वास्थ्य व स्थैर्य कुटुंब ह्या संस्थेनेच दिलेले आहे. फक्त ज्या तहेची कुटुंबव्यवस्था आपण आजवर बघत आलो आहोत त्याला माझा विरोध आहे. कुटुंबाच्या संदर्भात ‘स्त्रीमुक्तीचा विचार करावयाचा झाला तर फक्त घरकामात पुरुषांचा सहभाग एवढाच तो मर्यादित असणार नाही, तर पतिपत्नींमध्ये आणि ठराविक वयानंतर मुलांमध्येही असणारे सामंजस्य, एकमेकांविषयी असणारा आदर, प्रत्येकाच्या भूमिकांचे महत्त्व ह्यांचा साकल्याने केलेला विचार होय. ही व्याख्या सर्वंकष आहे असा दावा नाही.’
– कुटुंबसंस्थेची जागा इतर कोणतीच संस्था घेऊ शकत नाही. म्हणून आम्हाला कुटुंब अधिक भक्कम आणि त्याचबरोबर व्यापक करावयाचे आहे. आज ज्यांना उच्छृखल मानले जाते अशा स्त्रीपुरुषांना तर कुटुंबात सामावून घेतले जावेच, पण कुटुंब स्त्रीपुरुषांच्या एकाच जोडप्यापुरते सीमित ठेवण्याची गरज नाही, ते लवचीक असावे ह्या माझ्या मताची अधिक चर्चा होणे व त्याविषयी आपल्या समाजाचे धोरण निश्चित ठरणे आवश्यक आहे असेही मला वाटते. आजवर आपल्या समाजात असे असे चालत आले म्हणून पुढेही ते तसेच चालू ठेवले पाहिजे हे मला मान्य नाही. समाजातील स्त्रीपुरुषांच्या विषम गुणोत्तरावर मार्ग शोधणे व मतिमंदादि अपंगांच्या कामप्रेरणेला समाजमान्य वाट मिळणे हे प्रश्न जसे मला महत्त्वाचे वाटतात तसेच स्त्रियांच्या वाट्याला त्यांच्या निरनिराळ्या वैवाहिक दज्र्यामुळे (status) येणारी दुःखे दूर व्हावीत ह्यालाही माझ्या मते अत्यन्त महत्त्व आहे. मुख्य म्हणजे स्त्रियांच्या वाट्याला येणारा वैधव्याचा डाग कसा पुसून टाकता येईल ते पाहावयाचे आहे. अकाल वैधव्यामुळे तरुण स्त्रिया उन्मळून पडतात ते आपल्या समाजाला पाहवते कसे असा मला प्रश्न पडतो. हे त्या स्त्रियांचे दुःख ईश्वरनिर्मित नाही तर पूर्णपणे मानवनिर्मित व त्यामुळे कृत्रिम आहे अशी इतर काही समाजांच्या चालीरीतींचे अध्ययन केल्यानंतर माझीखात्री झाली आहे. विवाहबंधन जितके घट्ट, तितका वैधव्याचा धक्का मोठा व ते जितके सैल तितका तो धक्का लहान! स्त्रियांच्या बहुपतिकत्वामुळे तो धक्का नष्टच होतो, कोणीच निराधार होत नाही. ह्या गोष्टीकडे आपण सारे दुर्लक्ष का करतो हेही मला समजत नाही. बरे एकच देव असतो आणि त्याच्या इच्छेप्रमाणे जग चालले असते, त्याच्या ठिकाणी कर्तुमकर्तुम् शक्ती असती तर पहिल्यापासूनच जगामध्ये एकपतिपत्नीकत्वचआढळले नसते काय?
पुरुषांनी घरकामात मदत करणे म्हणजे नवीन प्रकारचे आचरण स्वीकारणेच होय. त्यासाठी आपल्या सगळ्यांच्या मनाची तयारी करण्याला प्रारंभ झालेला आहे. दोन पावले पुढे जाऊन दुसर्यास पुरुपाच्या मुलांना आपले मानण्यासाठीही आतापासूनच आपल्या मनांची तयारी का करू नये असा माझा साधा प्रश्न आहे. उच्चवर्णीय विधवांच्या वा घटस्फोटितांच्या मुलांना त्यांच्याशी लग्न करणार्याध पुरुपांनी स्वीकारण्यास आरंभ केला आहे. म्हणजे स्त्रीने एकानंतर दुसर्याय पुरुषाशी विवाह करण्यात काही वावगे नाही हे सर्वांना पटू लागले आहे. ही गोष्ट पटविण्यासाठी आमच्या पूर्वसूरींनी लेख, कथा, कादंबर्याा, नाटके लिहिली. आता ह्या तर्हेनचे कुटुंब अंगवळणी पडण्यासाठी सुद्धा तसेच काही व आणखी काही करावे लागेल. एक चुकले तर दुसरे काही करून पाहावे लागेल असे मला वाटते. त्यापैकी लेख लिहिण्याचे काम मी सुरू केले आहे.
आपला परस्परांविपयीच्या सामंजस्याच्या, आदराच्या गरजेचा मुद्दा मान्यच आहे. तोच पुढे नेऊन मी स्त्रीच्या स्वतःच्या यौन आचरणाचाही आपण आदर केला पाहिजे असे म्हणत आहे.
(४) ‘आपल्या मांडणीमध्ये आजची एकपतिपत्नीकत्वावर आधारित कुटुंबसंस्था आपणाला मान्य नाही असे आपणाला सुचवावयाचे असेल तर तो विचार मला पटत नाही. टोळ्या करून राहणार्याथ मानवाच्या उत्क्रान्तीतील ही पायरीही योग्य नव्हे. अथवा सर्वांवर किंवा अनेकांवर सारखेच प्रेम करून त्या पद्धतीची कुटुंबव्यवस्था हे दुसरे टोक वाटते. मानवी स्वभावाचा विचार करता असे आढळते की मनुष्य कदाचित् एकाच पतिपत्नीपासून झालेल्या सर्व मुलांनाही समान वागणूक देऊ शकत नाही, तर आपण सुचविलेल्या कुटुंबात तशी वागणूक मिळेल हे व्यवहारात अशक्य वाटते.
– मी सुचविलेले कुटुंब ज्यांना मानवेल त्यांनी स्वीकारावयाचे आहे. ज्यांना मानवणार नाही त्यांनी आपल्या आयुष्यक्रमात फरक करण्याची गरज नाही. सगळ्यांना आपल्याला हवे ते स्वीकारण्याचे स्वातंत्र्य आहे. माझी अडचण इतकीच आहे की मला आपल्या गतानुगतिक कुटुंबरचनेमध्ये दुःख फार दिसते. ते बहुधा स्त्रियांच्या वाट्याला अधिक प्रमाणात येते. ते दुःख परिहार्य आहे अशी माझी खात्री झाली आहे. कारण ज्यांचीकुटुंबरचना आमच्यापेक्षा वेगळी आहे. तेथे ते दुःख अत्यल्प आहे. आणि ह्या प्रकारची कुटुंबरचना फक्त रानटी टोळ्यांमध्येच आहे हा आपला गैरसमज आहे. असे अनेक नागरित समाज आहेत की ज्यांच्यामध्ये निराळ्या प्रकारची कुटुंबरचना समाजमान्य आहे. इतकेच नव्हे तर जेथे अशा संबंधांना समाजमान्यता नाही तेथेही हे प्रकार चोरून लपून सुरू आहेत. नागरित माणूस हा फार दांभिक आहे. जितके नागरण अधिक तितका दंभ अधिक.
आपण दाखविलेल्या अडचणी आमच्या मनावर आज जे संस्कार झालेले आहेत त्यांच्यामुळे उद्भवतात. आम्हाला मुळात आमचे संस्कारच दूर हटवावयाचे आहेत. मनाची पाटी पुसून टाकून कोरी करावयाची आहे. पाटीवर जुना मजकूर लिहिलेला असेपर्यन्त नवीन लिहिणे शक्य नाही हे मान्यच आहे. आपण म्हणता, जुने पुसले जाणार नाही; नवे लिहिता येत नाही. मला वाटते की जुने पुसता येईल. सगळ्यांनी मिळून ठरविले तर लवकर पुसता येईल. जुने पुसणे योग्य आहे हे एकदा निश्चित ठरले पाहिजे इतकेच. विधवांच्या पुनर्विवाहाच्या संदर्भात आम्ही ते करून दाखविले आहे. त्याबाबतीत जर घडू शकते तर येथेही घडेल.
(५) ‘विवाह, घटस्फोट, परित्यक्ता ह्यांच्या संदर्भात मांडलेल्या मुद्द्यांविषयी आपणाला कायद्याच्या सार्याआच प्रक्रिया जाचक वाटत असल्याचे जाणवते. ज्याप्रकारे कायद्याची अंमलबजावणी होत आहे, किंवा काही प्रमाणात न्यायालयीन प्रक्रिया चालत आहे त्यावरून स्वाभाविकच अशी प्रतिक्रिया होऊ शकते. पण म्हणून कोर्टातून घटस्फोट होण्याच्या अगोदरच कोणी दुसन्या नवर्या्बरोबर राहू लागणे म्हणजे माझ्या दृष्टीने कायद्याला डावलणे आहे. आणि कायद्याच्या राज्याच्या (rule of law च्या) संकल्पनेत न बसणारे आहे.’
– कायदे अत्यन्त थोड़े असावे, त्यांचे स्वरूप राजाने वा राज्यकर्त्यांनी प्रजेवर लादलेले नियम असे असू नये, तर जनतेने स्वेच्छेने स्वीकारलेले नियम असे असावे व अशा सर्व कायद्यांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी अशी गरज आहे. आजचे कायदे हे प्रजेच्या पिळवणुकीचे साधन म्हणून वापरले जातात. हे सारे बदलावयाचे असेल तर आपल्यान्यायप्रक्रियेत आणि लोकशिक्षणात आमूलाग्र फरक करावा लागेल. तो अगदी वेगळा विषय आहे. पण माझ्या कल्पनेप्रमाणे स्त्रीमुक्ती व्हावयाची असेल तर सगळेच विवाहविषयक कायदे बदलावे लागतील. स्त्रियांना अन्यायकारक होणार नाहीत अशा कायद्यांचे स्वरूप कसे राहील ते सर्वांच्या चर्चेतून ठरेल. आपल्याला कायद्याला बगल द्यावयाची नाही.
(६) ‘वारसा हक्काच्या संदर्भात सर्व जगातील कायदेपद्धती रक्ताचे नाते आणि विवाहबंधन ह्यावरच आधारित आहेत. तेव्हा आपण सुचविलेल्या बदलाप्रमाणेवारसा हक्काचे नियमन अशक्य होईल. मृत्युपत्र किंवा हस्तान्तरण ह्याच पद्धती राहतील.’
– ह्या कायद्यांचा माझा अभ्यास नाही. मला इतकेच वाटते की जेथे इच्छा आहे तेथे मार्ग सापडेल. कायद्यांमधील पुरुषप्रधानता घालवून ‘सर्वं स्त्रीपुरुषसमता त्यांमध्ये प्रतिबिंबित करता येईल.
(७) समान नागरी कायद्याचा प्रश्न इतक्या सहजतेने सोडविला जाऊ शकेल असे वाटत नाही. एकतर समान नागरी कायद्यात कायद्याचे महत्त्वाचे स्थान आहेच. स्वतः स्त्रीने आणि समाजातील सर्व स्त्रीपुरुषांनी स्वीकारलेल्या स्त्रीच्या दुय्यम स्थानामुळेच आज एक कायदा आणण्यात अडचण येत आहे. तेव्हा स्त्री ही एक स्वतन्त्र व्यक्ती आहे, माणूसच आहे, तिला स्वतःचा विचार आहे, बुद्धि आहे; तिलाही स्वातंत्र्य हवे आहे, अधिकार हवे आहेत हा विचार समाजात रुजेल तेव्हाच इष्ट बदल घडून येतील. अन्यथा आपण सुचविलेल्या मार्गामुळे आपल्याला अपेक्षित नसतानाही स्वैराचारी समाजच निर्माण होईल.’
– ह्या आपल्या मुद्याचे मी दोन भाग करतो. पहिला कायदेविषयक. त्याबद्दल मी सहाव्या मुद्द्याविषयी लिहिताना जे म्हटले आहे तेच मला येथेही म्हणावयाचे आहे. पुढे स्त्रीच्या स्वतन्त्र व्यक्तिमत्त्वाविषयी आपण लिहिले आहे ते सारे मान्यच आहे. फक्त स्त्रीला इतर सर्व बाबतींत विवेक करता येतो, फक्त स्वतःच्या यौन वर्तनाच्या बाबतीत करता येत नाही असे मला वाटत नाही. ज्या वर्तनाचे परिणाम पुरुषाला भोगावेच लागत नाहीत, फक्त स्त्रीला भोगावे लागतात, ते वर्तन ठरविण्याचे स्वातंत्र्य तिला असू नये असे म्हणण्यामधला तर्क माझ्या लक्षात येत नाही. तो आपण जरा जास्त स्पष्ट करावा म्हणजे मला त्याचा पुन्हा विचार करता येईल.
(८) जळगाव प्रकरणात राजकारण आणि लैंगिकतेचे व्यापारीकरणच जास्त दिसते. आज बदल होऊ घातलेल्या आर्थिक धोरणातून आपण सुचविलेल्या उपायांमुळे जळगावसारखे भविष्यात कधीच घडणार नाही असे म्हणणे पूर्णतया निराधार आहे असे मला वाटते.
– माझा रोख जळगाव प्रकरणामधल्या blackmailing वर आहे. ह्या blackmailing ला फक्त आर्थिक बाजू नाही. तरुणींना मुळीच नको असलेले वर्तन आजच्या प्रचलित ‘नीतिकल्पनांच्या दडपणामुळे अगतिकता येऊन त्यांना पुनः पुनः करावे लागते अशी त्याला एक बाजू आहे. त्यांच्या चारित्र्यावर जर कोणीच शिंतोडे उडवू शकला नाही तर blackmailing चा प्रश्न येतो कोठे?
(९) ‘स्त्री भयमुक्त होण्यासाठी ती सर्वार्थाने सक्षम, सशक्त, सजग होणे जरूरीचे आहे. स्वातंत्र्याबरोबर येणारी जबाबदारीही समजून घेऊन वागणारी स्त्री तयारहोणे आवश्यक आहे. त्यासाठी जशा स्त्रिया बदलण्याची गरज आहे तशीच पुरुष बदलण्याचीही. ते कोणत्या मार्गांनी करता येईल ह्याचा विचार व्हावा.
– मान्य. आणि हा विचार करण्यात आपलाही हातभार लागावा, आपण सर्वांनी तो लावावा अशी नम्र विनंती.
मराठीचे निवृत्त प्राध्यापक श्री. म. ना. लोही ह्यांचेही एक सविस्तर पत्र आलेले आहे. पुढे आणखी काही प्रतिक्रिया आल्यास ते त्यांच्यासोबत घेईन. त्यांच्या काही प्रश्नांची उत्तरे वर आली असतील.