दिवाळीची आकर्षणे अनेक असतात. वयपरत्वे ती बदलतात. एक आकर्षण मात्र बहुतांश कायम आहे. दिवाळी अंकांचे. मात्र त्यातही आतला एक बदल आहेच. पूर्वी वेगळं साहित्य खुणावायचं, आता वेगळं. पूर्वी वेगळी अन् अनेक मासिकं घ्यावी वाटायची, आतात्यातली काही अस्ताला गेली; काही नाममात्र आहेत. काहींचा डौल मात्र तोच कायम आहे. वयपरत्वे अंगाने थोडी झटकली इतकेच. मौज, महाराष्ट्र टाइम्स, दीपावली हातात पडली की खरी दिवाळी सुरू होते. यंदाच्या दिवाळीत लक्षात राहाण्यासारखं पुष्कळ वाचलंय पण मनात घर करून बसलेल्या तीन लेखांविषयीची वाचकांना ओळख करून द्यायची आहे. ज्यांना आधीच ती झाली असेल त्यांना ती आठवणही सुखवील असे वाटते.
श्रेयनिर्देश आधीच करतो. दोन लेख अनिल अवचटांचे. नेहमीसारखे दीर्घ, पण वाचतच राहावे असे वाटणारे. अवचट एखाद्या लेखासाठी किती मेहनत घेत असतील?लेखन अति सहज शैलीत बोलत्या भाषेत असते. ते चटकन् होत असेल. पण माहिती?ती नुसती शोधपत्रकारिता म्हणणे अल्पोक्ती होईल. विषयाबद्दल त्यांना आस्था असते. कमालीची आत्मीयता अन् सत्याची ओढ असल्याशिवाय असे अपूर्व लेखन घडत नाही. सामाजिक काम करणारे प्रसिद्धीसाठी करत नाहीत, पण त्यांना प्रसिद्धी मिळाली पाहिजे. ती साजेशी उतरायची तर लेखकाला त्या कामात तितकीच गोडी पाहिजे. अवचटांजवळ ती आहे. म्हणून तर आपल्याला आतापर्यंत अनेक अलक्षित आणि दुर्लक्षित माणसे दिसली आहेत.
तिसरा लेख गौरी देशपांड्यांचा. लेखविषय झालेली व्यक्ती जितकी अफलातून तितकीच लेखिका. दोन पानी लेखात म.टा. ची सगळी रम्यता उतरली आहे. ज्यांनी तेवाचले ते भाग्यवान.
आपला पहिला कथानायक राहातो कर्नाटकातल्या धारवाड जिल्ह्यातल्या एका खेड्यात. तो जन्माने तिथलाच खरा, पण कर्माने त्रैलोक्यधाम अमेरिकेत राहून आलेला.‘क्षीणे पुण्ये मर्त्यलोके विशन्ति’ असे होऊन परतलेला नाही. तिथे दहा वर्षे मोठा बिझिनेस एक्झिक्यूटिव्ह, अमेरिकन बायको, अमेरिकन नागरिकत्व सगळे लाभलेला. ज्या समाजाच्या अपुर्या बळावर आपण इथपर्यंत पोचलो त्या समाजाचे ऋण फेडावे हा विचार पुष्कळ दिवस मनात घोळवलेला. तिथे पैसे जमवायचे, इकडच्या सामाजिक कामांना पाठवायचे असा क्रम चालूच होता. दरवर्षी सुटीत भारतात येऊन जास्तीत जास्त सामाजिक कार्ये स्वतः पाहायची असे चालले होते. शेवटी निश्चय केला की आपण स्वतः परतायचे. पूर्ण शक्ती लावून काम करायचे. सुदैवाने अमेरिकन पत्नीची साथ मिळाली. तिनेही अमेरिकन पीसकोअरमधे आफ्रिकेत काम केलेले. त्यामुळे निर्णय करणे सोपे झाले. आपली अमेरिकन बायको आणि दोन मुले यांना घेऊन बारा वर्षांपूर्वी एस्.आर्. हिरेमठ आपल्या जन्मभूमीत तुंगभद्रेच्या परिसरात दाखल झाले.
इकडे आले खरे, पण नेमकं काय करावं त्याची योजना तयार नव्हती. राहण्यासाठी मेडलरी हे खेडे निवडले होते. ते मेंढपाळांचे गाव होते. तिथे घोंगड्या बनत. हिरेमठांनी परिस्थितीला अनुरूप तंत्रज्ञान विकसित केले. इंडिया डेव्हलपमेंट सोसायटी या त्यांच्यासंस्थेने लोकरीचे सूत काढण्यासाठी एक वेगवान चरखा घडवला. त्यासाठी सायकलच्या चाकाचा उपयोग केला. मेंढपाळांच्या शिबिरात गुरांचे डॉक्टर बोलावून रोगराईला बळी पडणारया मेंढ्यो वाचवल्या. आता मेडलरीच्या आठवडी बाजारात गावात बनलेली घोंगडी दीड तासात खलास होते. आसमंतातल्या शे-पाऊणशे गावांमध्ये तिथल्या गरजा पाहून सोसायट्या काढून पूरक उद्योग सुरू केले. आता ते काम श्यामला हिरेमठ सांभाळतात. कारण एस्.आर्. अधिक मोठे आव्हान पेलत आहेत.
एस्.आर. ची ही लढाई म्हणजे खरोखरी दिये की और तुफान की लढाई आहे. एका बाजूला उद्योगसम्राट बिरलाशेठ आणि त्यांचे अंकित राज्यसरकार यांचे सामर्थ्यआणि दुसरीकडे अशिक्षित दुबळी ग्रामीण प्रजा आणि तिचा हा नेता.
लढाईला कारण झाले बिरलांचे दोन कारखाने. तुंगभद्रेच्या काठी उभारलेल्या या दोन कारखान्यांनी आसमंतात इतके काही प्रदूषण केले की त्याला सुमार नाही. कारखान्यांनी वापरलेले पाणी परत नदीत सोडतात. त्यावर पुरेशी शुद्धीकरण-प्रक्रिया करत नाहीत. त्यामुळे दूषित पाण्याने मासे मरून पाण्यावर तरंगताना दिसतात. पाणी इतके दूषित झालेले की कोळ्यांची जाळी कुजतात. वीस-पंचेवीस मैल तुंगभद्रेच्या काठावर हाहाःकार माजला. घरादारातून भांडी काळवंडली. लोकांना कधी न पाहिलेले, न ऐकलेले त्वचेचे रोग होऊ लागले. प्रदूषणाचा जोर एवढा होता की सिमेंट काँक्रीटचे विजेचे खांब झिजून वाकू लागले. कारखान्याकडे तक्रारी झाल्या. व्यवस्थापक दर्शनी शुद्धीकरण-यंत्रणेकडे बोट दाखवतात. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे गार्हापणे नेले ते शेठजींच्या इशार्यांवर चालणारे सरकारी खाते. खुद्द सरकार शेठजींच्या बाजूने. निजलिंगप्पा मुख्यमंत्री असताना औद्योगीकरणाशिवाय तरणोपाय नाही या सूत्राने प्रभावित होऊन सरकारने अनेक सोयी सवलतींची लालूच दाखवून कारखाने आमंत्रित केलेले. तेव्हाची आश्वासने सरकारला फार महागात पडली. जनतेच्या जिवावर उलटली. गावाशेजारची गायराने, जंगले वापरायला लोकांना बंदी झाली. कारखान्यांना लागणारे लाकूड देणारे वृक्ष तिथे उभे राहू लागले. लोकांचा रोजगार, गुरांचा चारा यावर संकट आले. हिरेमठांनी या प्रकरणी लक्ष घातले. आश्वासने सरकारने दिली होती खरी पण त्यासाठी काही कायदेशीर संरक्षक तरतुदी होत्या. सरकार स्वतःच त्या पाळीनासे झाले. प्रदूषण नियंत्रक मंडळ, जंगल खाते आणि महसूल खाते यांच्याकडे खेटे घालणे वाया जाऊ लागले. सचिव आणि मंत्री हतबल झाल्यासारखे बोलू वागू लागले. शेवटी सुप्रीम कोर्टापर्यंत धाव घ्यावी लागली. वकील, कागदपत्रांच्या नकला, पुढे पुढे जाणाच्या तारखा अशी कायदेशीर लढाई एकीकडे तर मेळावे, मोर्चे, धरणे अशी लोकजागृतीची आघाडी दुसरीकडे, खेडवळ. परंपराग्रस्त अशिक्षित महिलांचे हिरेमठांनी असे काही मेळावे घेतले की सरकारची कुंभकर्णी झोप उडावी. एस्. आर. ची चळवळ, तिचे अहिंसक सर्वसमावेशक सामर्थ्य हा जगभरच्या पर्यावरणवाद्यांचा कौतुकाचाविषय झाला. खुद्द अवचटांना हिरेमठांच्या कामाची माहिती अमेरिकेतल्या त्यांच्या मित्रांनी दिली. तुम्हा आम्हासाठी ते काम अवचटांनी केले. सुप्रीम कोर्ट निर्णय देते पण अंमलबजावणी सरकार करते. तिथे कुचराई झाली तर पुन्हा सुप्रीम कोर्टाकडे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट म्हणून गार्हायणे न्यायचे. पुन्हा कागदोपत्री पुरावे सादर करावे लागतात. त्यासाठी खुद्द सरकारात, सरकारी अधिकार्यांत तुमच्या कामाबद्दल सहानुभूती असणारे कोणी निघावे लागतात. वर्तमानपत्रांनी तुमचा आक्रोश त्यांच्या कानी पोचवलेला असेल तर त्यांच्यातली सत्प्रवृत्ती जागी होते. ते मदत करतात असा हिरेमठांचा अनुभव आहे. त्याच्या बळावर तर ते गेली बारा वर्षे ही विषम लढाई लढत आहेत.
हिरेमठांच्या ठायी आपल्याला गांधी दिसू लागतात. गांधीजी त्यांना प्रेरणा देणारे आहेतच; पण समग्र गांधी त्यांना अनुकरणीय नाहीत. गांधीजींचे कुटुंबप्रमुख म्हणून वागणे त्यांना आक्षेपार्ह वाटते. पत्नीशी आणि मुलांशी गांधी हुकूमशहा होते. गांधींचे राजकारणही त्यांना तितके निर्मळ वाटत नाही. सुभाषचंद्रांचा त्यांनी केलेला दुस्वास समर्थनीय नाही असे त्यांचे म्हणणे.
हिरेमठांच्या ‘समाज परिवर्तन समुदाय’ या संस्थेकडे आता कार्यकर्त्यांची फौज उभी राहात आहे. जातीपातीच्या, स्त्रीपुरुष-भेदाच्या, हिंदु-मुस्लिम धर्माच्या मर्यादा ओलांडून केवळ लोकाश्रयावर ते चळवळ चालवत आहे. सुरुवातीपासूनच त्यांनी या चळवळीसाठी परदेशी संस्थांकडून पैसे घ्यायचे नाहीत असा पण केला आहे. हिरेमठांना आजचा सुधारक्चाआणि त्याच्या वाचक वर्गाचा प्रणाम.
गौरी देशपांडे ज्या म्हातार्याच्या प्रेमात पडल्या त्याचे नाव आहे मिस्टर जी. जी हे काल्पनिक नाव नाही, खरे आहे. ए. डी. गोरवाला हे ‘ओपिनियन नावाचे एक चिमुकले साप्ताहिक चालवीत. सगळे मिळून त्याचे २००० वर्गणीदार असत. वर्गणी फक्त दोन रुपये वार्षिक, ओपिनियनमध्ये आपल्या पहिल्या काही कविता छापल्यामुळे आपण कोणीतरी आहोत असे वाटणार्या गौरीबाई कधीतरी त्यांच्या सहकारी बनल्या. लेखक म्हणून आपण त्यांच्याशी बरोबरीने वागू लागलो यापेक्षा ते आपल्याशी बरोबरीने वागतात याने थक्क झालेल्या. आईवडिलांच्या नावावर न ओळखता स्वतःच्या गुणांवरून ते ओळखतात याचे अप्रूप. खूपच जवळीक वाढली. आता मिस्टर गोरवाला असे संबोधण्यात परकेपणा वाटू लागला म्हणून एक दिवस तक्रार केली की ‘अप्पा’, ‘अण्णा’ असे जवळिकीचे काही संबोधन इंग्रजीत नाही. यावर ते गमतीने म्हणतातः ‘आता जे म्हणतेस तेच जरा आपुलकीने म्हण, मी समजून घेईन. त्यावर मार्ग निघून संबोधन झाले ‘मिस्टर जी.
मिस्टर जी इ.स. १९०० मध्ये जन्मलेले. विशीबाविशीत आयु. सी.एस्. झाले. अन् पन्नाशीत राजीनामा देऊन मोकळे झाले. कारण स्वतंत्र भारताच्या निर्मात्यांपैकी एक,भारताचे पहिले पंतप्रधान पं. नेहरू यांच्याशी मतभेद! पुढे साठसाली सद्यःस्थितीवर खरमरीत भाष्य क्यारे .‘ओपिनियन’ हे इंग्रजी साप्ताहिक काढून सरकारच्या विरोधात २५ वर्षे त्यांनी चालवले. आज इंग्रजीत नावारूपाला आलेले अनेक इंडोअँग्लिअन कवि-लेखक याच ओपिनियनने पुढे आणले. उदारमतवादी अन् सहिष्णु म्हणून नावाजलेल्या पित्याला ज्यांनी सोडले नाही ते इंदिरे सारख्या अनुदार अन् उद्दाम राज्यकर्तीला कसे सोडतील?आणीबाणीत सरकारने एक्स्प्रेसच्या गोएनका आदींबरोबर ओपिनियनच्या गोरवालांवरही खटला भरला तेव्हाची गोष्ट. त्यांचे वकील होते प्रख्यात कायदेपंडित सोली सोराबजी. आजही तो किस्सा सांगताना त्यांना हसू आवरत नाही, मग प्रत्यक्षात कोर्टात काय झाले असेल असे गौरीबाई म्हणतात. प्रत्यक्षात घडले ते सोराबजींच्या शब्दांत असे : ‘दोन्ही बाजूंच्या वकिलांचे युक्तिवाद संपले अन् आम्ही निर्णयाची वाट पाहात उत्कंठेने बसलो होतो, तेव्हा हळूच मला एकीकडे बोलावून गोरवाला म्हणाले, ‘सोली, एरवी तुरुंगात जायला माझी हरकत नाही. पण आता भारतीय पद्धतीच्या संडासावर मला बसता येत नाही. मग काय करायचं?यावर आपण त्यांना बहादुरीने, ‘प्राण पणाला लावून झगडेन पण तुमच्यावर ती पाळी येऊ देणार नाही’ असे म्हणालो खरे, पण इकडे निकाल ऐकतो आपल्याला घाम फुटला होताअन् तिकडे गोरवाला त्याला हसत होते.
गौरीबाई लिहितात त्यावेळी पंचाहत्तरी उलटून त्यांना विकलांगता आलेली होती.
एखादा कमालीचा साधा, निःसंग आणि व्यक्तिशः निकांचन मनुष्य किती लोभस अन् रसिक असू शकतो याचे उदाहरण म्हणून मिस्टर जींची आणखी एक आठवण सांगण्यासारखी आहे. पुढे दृष्टी गेल्यावर रेडिओ हेच एकमेव करमणुकीचे साधन उरले. बी.बी.सी. वर त्यांच्या आवडीचे पाश्चात्य संगीत लागे. त्यावेळच्या निवेदकांचे ऋण फेडण्यासाठी आपल्या मृत्युपत्रात त्यांच्याकरता एक छानशी मदिरेची बाटली घेण्यासाठी त्यांनी पैसे ठेवले.
मनावर केव्हाही वैफल्य, निराशा यांचे सावट आले तर म.टा. मधला हा दोनपानी लेख कामी येतो.
अनिल अवचटांना किती छंद आहेत कोण जाणे! पण ते बासरीचा छंद त्या सर्वात आवडीचा समजतात. तो कसा लागला, पुढे कसा जोपासला हे त्यांनी मोठ्या रसाळपणे सांगितलं आहे दीपावलीच्या दिवाळी अंकात, आपली गुरुपरंपरा त्यांनी पन्नालाल घोषांपर्यंत तपशिलाने नेली (अन् ताणली तर तानसेनापर्यंत जाते असेही म्हटले). पन्नाबाबू त्यांच्या हयातीतच आख्यायिका बनून गेलेले. भारतीय गुरपरंपरा आणि शिष्यपरंपरेचे अनोखे दर्शन अवचटांनी अनुभवान्ती घडवले आहे.
अवचटांचे गुरू गिंडे. त्यांचे गुरू हरिपाद चौधरी आणि हरिपाद बाबूंचे गुरू पन्नालाल घोष, गिंड्यांनी फी विचारली तर हरिपादबाबू म्हणाले, ‘काही द्याचं नाही, घ्यायचं तेवढं शिकून घे. वर म्हणाले मी ज्या शिष्याची आयुष्यभर वाट पाहात होतो तो भेटला याचे समाधान आहे. हरिपादबाबू म्हणाले, पन्नालालना ‘बसंत’ मधे चांगलं नाव मिळालं होतं पण फिल्म लाइनमधे ते रमले नाहीत. आयुष्यातल्या एका घटनेने ते पार बदलून गेले. संगीत हेच त्यांचे जीवन झालं.
ते मित्र, नातलग, कोणाकोणाकडे जात नसत. मैफिलींनाही नाही. शिष्यांशीही फारसे बोलत नसत. शिकवणं म्हणजे त्यांच्याबरोबर वाजवायला बसणं. त्यांची दिनचर्या म्हणजे अखंड साधना होती. सकाळी उशीरा – नऊच्या सुमारास उठत. साडेनऊ- दहाला रियाझाला बसत तो एक वाजेपर्यंत. मग आंघोळ. एक तास ध्यान. तीन साडेतीनला जेवण. संध्याकाळी सहापर्यंत झोप. सात साडेसातला परत वाजवायला बसत. ही शिष्यांची वेळ. रात्री साडेअकरापर्यंत शिकवणे. शिष्य गेल्यावर नंतर स्वतःसाठी एक दीडपर्यंत स्वाध्याय. नंतर तासभर ध्यान, जेवण आणि सकाळी चारच्या सुमारास झोपत.
पन्नाबाबूंनी बासरीवर प्रयोग करकरून कुठलाही राग सहजतेनं वाजवता यावा असे ते वाद्य केले. आता ताना, पलटे, मींडकाम करता येईल असं ते प्रगल्भ वाद्य बनलं आहे. त्यांची भली मोठी बासरी हे त्या काळी नावीन्य होते. मैफिलीच्या ठिकाणी ते आले की ती बासरी पाहून आधी लोक टाळ्यांचा कडकडाट करीत. मग मैफिलीत त्यांनी नुसता ‘सा’ लावला की त्या धीरगंभीर आवाजाने वातावरण भरून आणि भारून जाई. लोक उठून उभे राहात.
लोकप्रियतेचा त्यांच्या स्वभावावर काही परिणाम झाला नाही. एकदा मैफिल ठरली. तीन महिन्यानंतरची तारीख होती. आमंत्रक उठून गेले तोच पन्नाबाबूंनी जवळ बसलेल्या कर्नाड या शिष्याबरोबर बोलून राग ठरवला. पूरिया-धनाश्री ठरला. कर्नाड सांगतः। मग तीन महिने त्यांनी तो राग अगदी पिसून काढला. वास्तविक रोज आठदहा तासांची प्रैक्टिस असणारा हा माणूस. पण हयगय नाही. व्ही. जी. कर्नाड त्यांच्याजवळ शिकले. पन्नाबाबूंनी त्यांच्याकडून एक पैसाही फी घेतली नाही. माणसाला गुरू भेटण्यासाठी फार धडपडावे लागते. विशेषतः अध्यात्म, कला या क्षेत्रात हे आपण ऐकतो. पण चांगला गुरूही चांगल्या शिष्याच्या भेटीसाठी तळमळत असतो. कणाकणाने अन् क्षणाक्षणाने जमवलेले हे धन चांगल्या हाती पडावे याची आस त्यांना लागून राहिलेली असते.
पत्राबाबूंनी छोट्या आयुष्यात संगीतात घातलेली भर अमोल आहे. ते टिकून आहेत ते त्यांच्या शिष्यरंपरेत.
हिरेमठ, मिस्टर जी अन् पत्राबाबू. काय साम्य आहे या तिघांत?कशात आहे त्यांचे मोठेपण? यशात?मिस्टर जींना काय यश मिळाले?
यश हे मोठेपणाचे मोजमाप नाही की मोठेपणाचे गमक नाही.
सुमारे तीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. चवदा वर्षांची भूदानयात्रा संपवून विनोबा नागपूरला आले होते तेव्हाची ही आठवण आहे! भूदान चळवळीला किती यश आले, किती नाही असा मुद्दा वर्तमानपत्रात असे. त्यावेळच्या पटवर्धन ग्राऊंडवर (हल्लीचे यशवंत स्टेडियम) सभा होती. विनोबा म्हणाले : तुम्हा नागपूरकरांना तरी असा प्रश्न पडायला नको. तुम्ही एका चौकात महात्मा गांधींचा पुतळा उभारला आहे अन् पुढच्याच चौकात झाशीच्या राणीचा. गांधीजी स्वातंत्र्यलढ्यात यशस्वी झालेले सेनानी आहेत तर झाशीची राणी लढाई हारलेली आहे. यश अपयश या गौण गोष्टी आहेत. कामाच्या मोठेपणाने माणूस मोठा होतो. यशापयशाने नाही. हिरेमठांमुळे किती सामाजिक प्रश्न सुटतील कोणास ठाऊक, पण त्यांची समाजऋणाची जाण मोठी गोष्ट आहे. गोरवालांची सत्यनिष्ठा मोठी गोष्ट आहे. पन्नाबाबूंची साधना मोठी गोष्ट आहे. सफलता नाही.
ध्यास मोठेपणाचा नाही, मोठ्या कामाचा असला की पुरे.