उत्तमतेच्या समर्थनार्थ

पुढील लेख एका अमेरिकन लेखकाने अमेरिकेतील शिक्षणाविषयी लिहिलेला आहे. परंतु तो भारतातील शिक्षणविषयक परिस्थितीलाही तितकाच लागू आहे हे वाचकांच्या लक्षात येईल.
संपादक
‘Tinic’ साप्ताहिकाच्या २९ ऑगस्ट १९९४ च्या अंकात एका पुस्तकाचा काही भाग प्रसिद्ध झाला आहे. पुस्तकाचे नाव आहे In Defense of Elitism आणि लेखकआहे William A. Henry III. हेन्री ‘टाईम’ मध्ये रंगभूमीबद्दल नियमित समीक्षात्मक लिखाण करीत असत. हे त्यांचे पुस्तक अमेरिकन समाजाबद्दल आहे आणि त्यांच्या अकाली निधनानंतर ते नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले आहे. पुस्तकाची आणि लेखकाच्या वैचारिक दृष्टिकोणाची प्राथमिक ओळख करून देताना म्हटले आहे, “माणसाच्या ज्या बौद्धिक गुणांना हेन्री महत्त्वाचे मानत त्यांच्या संध्या होत असलेल्या कोंडीचा ते निषेध करतात. कोणते हे गुण?नेतृत्वाचा आणि स्थानाचा आदर करून त्यांची प्रतिष्ठा सांभाळणे; नैपुण्याचा, विशेषतः दीर्घ परिश्रमाने आणि काटेकोर अभ्यासाने मिळविलेल्या नैपुण्याचा, बहुमान करणे; इतिहास, तत्त्वज्ञान, संस्कृती हे आपल्याला मिळालेले मौल्यवान वारसेआहेत हे जाणून त्यांचा सन्मान करणे; विवेकवाद आणि वैज्ञानिक अन्वेषण (investigation) ह्या गोष्टींशी बांधिलकी राखणे; वस्तुनिष्ठ प्रमाणांना आधारभूत मानणे; आणि मुख्य म्हणजे एखादी कल्पना, एखादा सहभाग किंवा एखादे संपादित ज्ञान हे दुसन्यापेक्षाअधिक चांगले आहे हे निग्रहाने, न डगमगता सांगण्याची तयारी असणे.” ही बौद्धिक वैशिष्ट्ये असलेल्या व्यक्तींना हेन्री ‘एलीट (elite) – समाजातील ‘उत्तमजन’ मानतात. समतावाद (egalitarianism) आणि उत्तमजनवाद (elitism) ह्यांच्या झगड्यामध्ये ही बौद्धिक वैशिष्ट्ये असलेल्या उत्तमजनवादाची पिछेहाट होत आहे असे हेन्री ह्यांचे म्हणणे आहे. टाइम मध्ये उद्धृत केलेल्या पुस्तकातील प्रकरणात उत्तमजनवादाच्या विरोधात असलेल्या शक्तींच्या प्रभावामुळे उच्च शिक्षणाचा कसा हास झाला आहे ह्याबद्दलची लेखकाची मते वाचायला मिळतात. त्यांतील काही महत्त्वाचे मुद्दे असे –
(१) महायुद्धानंतर अमेरिकेमध्ये झालेले महत्त्वाचे सामाजिक बदल मोठ्या प्रमाणात समतावादावर आधारलेले होते, पण उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात ज्या दुराग्रहाने समतावाद आणला गेला तेवढा इतर कुठल्याच क्षेत्रात तो आला नाही. पन्नास वर्षांपूर्वी शालान्त परीक्षेचे प्रमाणपत्र हा शैक्षणिक कारकीर्दीतला महत्त्वाचा व बर्या च जणांच्या बाबतीत शेवटचा टप्पा असे. अगदी थोड्या व्यक्ती महाविद्यालयीन शिक्षणाकडे वळत असत. आता मात्र महाविद्यालयीन शिक्षण ही सर्वांच्या आयुष्यातील एक ओघाने घडणारी घटना झालीआहे. ते शैक्षणिक प्रतिष्ठेचे अथवा विशेष नैपुण्याचे चिन्ह मानले जात नाही.
सध्या अमेरिकेत शालान्त परीक्षा झालेल्यांपैकी ६३ टक्के मुले उच्च शिक्षण घेतात. त्यांपैकी बरेचजण कुठलातरी डिप्लोमा मिळवतातआणि जवळजवळ ३० टक्के मुले पदवीधर होतात. समतावादी दृष्टिकोनातून पाहिले तर अमेरिकेची जवळपास २५ टक्के लोकसंख्या एका अर्थाने ‘उत्तमजनवादी’ आहे..
इंग्लंड, फ्रान्स, जपान ह्यासारख्या प्रगत राष्ट्रांमध्ये हे उच्च शिक्षितांचे प्रमाण १० ते १५ टक्के आहे – कोणत्या संस्थेत, कोणत्या विद्यापीठात शिक्षण घेतले ह्यालाही ते देश वजन देतात. शालेय शिक्षणातील प्रगतीवरच उच्च शिक्षण घेण्याची क्षमता जोखली जाते.
(२) अशा तर्हेचने विद्यापीठीय शिक्षणाची दारे सर्वांना खुली केल्यामुळे अमेरिकेतील जनतेवर फार मोठा आर्थिक बोजा तर पडलाच आहे, पण ज्यांच्या काल्पनिक मदतीसाठी ही शैक्षणिक सुधारणा केली आहे त्यांना तिच्यापासून मिळणारे फायदेही अनिश्चित आहेत. प्रेसिडेंट क्लिटनच्या मते ही मानवी भांडवलात केलेली गुंतवणूक आहे. तसे जर असेल तर त्यापासून मिळणाच्या फायद्याची शहानिशा करणे वाजवी ठरेल. कारण अमेरिकेत उच्च शिक्षणावर दरवर्षी १५० अब्ज डॉलर्स खर्च केले जातात. बहुजनांना उच्च शिक्षण सुलभतेने उपलब्ध करून देणारी ही अमेरिकन पद्धत नुसतीच चुकीची आहे असे नाही तर ती फार मोठी फसवणूक आहे.
(३)लोक महाविद्यालयीन शिक्षण का घेतात?बहुसंख्य लोक पैसे कमावण्यासाठी घेतात. सर्व प्रसार माध्यमांतून शिक्षण आणि वाढीव कमाई ह्यांच्यातले संबंध अधोरेखित केले जातात. पण हे समीकरण वाटते तेवढे सोपे नाही. सरासरीचा विचार केला तरमहाविद्यालयीन शिक्षण घेतलेली माणसे ते न घेतलेल्या माणसांपेक्षा जास्त कमावतात. सर्वसामान्यपणे चार वर्षांचा अभ्यासक्रम पार पाडून पदवी मिळवलेला माणूस फक्त शालेय शिक्षण घेतलेल्या माणसापेक्षा दीडपट जास्त कमावतो. पण हा पदवीचा पराक्रम नसून त्यात इतर गोष्टीही अंगभूत आहेत. महाविद्यालयीन पदवीधर यशस्वी ठरतात कारण महाविद्यालये यशस्वी उमेदवारांनाच खेचून घेतात. पुरेशी बुद्धि आणि जिद्द असलेली ही माणसे कुठल्याही काळात कुठल्याही परिस्थितीत प्रगती करतील अशीच असतात – त्यांना औपचारिक शिफारसपत्रांची गरज नसते.
(४) महत्त्वाचा आणि कठीण प्रश्न असा आहे की ज्या सामान्य बुद्धीच्या माणसांनी गेल्या दोन पिढ्या महाविद्यालयांत गर्दी केली आहे त्यांची ह्या शिक्षणामुळे एरवी झाली असती त्याच्यापेक्षा जास्त प्रगती झाली आहे का?तशी ती झाली असती तर ती शिक्षणामुळे झाली आहे का नोकरीकरता आवश्यक असलेले ‘महाविद्यालयीन पदवी हे शिफारसपत्र मिळाल्याने झाली आहे?अमेरिकेच्या श्रमविभागाने (Labour Department) प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार २० टक्के पदवीधर अशा क्षेत्रात कामे करतात ज्यासाठी पदवीचीआवश्यकता नाही. अशा व्यक्तींकरता पदवी हे त्याच्या पात्रतेचे प्रमाणपत्र नसून एक अर्थहीन शिफारसपत्र आहे. जे असणे आवश्यक आहे पण ज्याचा उपयोग नाही.
(५) उच्च शिक्षणाच्या क्षेत्रातील ह्या परिस्थितीमुळे अमेरिकन समाजाची जी मोठी फसवणूक होते आहे ती अशी की सर्वांनाच आपण सरासरीपेक्षा वरच्या पातळीवरचे आहोत असे वाटते. सर्वांना उच्च शिक्षण उपलब्ध करून देण्याचे स्वप्न पाहताना त्यात अनुस्यूत असलेल्या एका गोष्टीचा फारसा विचार केला गेला नाही – ती गोष्ट म्हणजे सर्वांनी असे शिक्षण घेतल्यावर सर्वच व्यवस्थापकीय अधिकारी होतील, सर्वच व्यावसायिक होतील. संपूर्ण समानतावादाचे साध्य हस्तगत करण्यासाठी सगळ्यात उत्तमजनवादी असे विद्याव्यासंगाचे – (scholarship) साधन वापरण्याचा अट्टाहास केला. टोळीचे सर्वच सदस्य टोळीप्रमुख करण्याचे स्वप्न पाहिले. वरवर पाहता हे स्वप्न प्रत्यक्षात उतरल्यासारखे वाटेल. पन्नास वर्षांपूर्वी बरेच व्यवसाय शारीरिक कष्टाचे असत. आजकाल अधिकांश कामे ही कार्यालयीन स्वरूपाची असतात. पण वेतनात मात्र म्हणण्यासारखा बदल नाही. बर्यािच भ्रमनिरास झालेल्या पदवीधरांना हे जाणवलेले आहे की चांगले कपडे आणि चांगले शिक्षण ह्यामुळे आपला रांगेतला क्रम बदललेला नाही. व्यवस्थापनाच्या मधल्या स्तरावर ह्या सगळ्यांची गर्दी झाली आहे आणि अलिकडे काही वर्षे अमेरिकेमध्ये ह्या स्तराचीच कपात पद्धतशीरपणे होत आहे.
(६) तरीही महाविद्यालयांचे, व्यवस्थापकांचे आणि व्यावसायिकांचे हे नको असलेले पीक काढणे सुरूच आहे. एखाद्या विशिष्ट व्यवसायाला काही काळ प्रचंड मागणी असते आणि त्याची गरजेपेक्षा जास्त पैदास केली जाते. उदा. एंजिनिअर्स, बिझनेस अॅडमिनिस्ट्रेटर्स, कम्प्यूटर प्रोग्रॅमर्स वगैरे. त्या क्षेत्रात गती नसलेले कितीतरी विद्यार्थीप्रचंड पैसा आणि वेळ खर्चुन शेवटी स्वतःचा भ्रमनिरास करून घेतात. त्यांना यशाची संधी न देणे अमेरिकन समाजाला क्रूपणाचे वाटते. पण त्यांना भ्रमातं ठेवणे अधिक क्रूपणाचे आहे ह्याकडे कोणी लक्ष देत नाही. उलट प्रे. क्लिटन आग्रहाने प्रतिपादन करतात की शालेय पातळीवर व्यावसायिक शिक्षण आणि विद्याव्यासंग (academic training) यांचा मोठ्या प्रमाणावर संयोग व्हावा ज्यामुळे व्यावसायिक शिक्षण घेणार्यां ना महाविद्यालयात प्रवेश मिळवणे सोपे जाईल. वास्तविक अमेरिकेला त्यांच्या संयोगाची नाही तर सक्त विभाजनाची गरज आहे.
(७) एवढ्या प्रचंड संख्येने उच्च शिक्षण घेणाच्या ह्या विद्यार्थ्यांमध्ये स्वतःचा बौद्धिक विकास करण्याची अथवा विद्याव्यासंग करण्याची इच्छा दिसून आली असती तर उच्च शिक्षणावर होत असलेल्या ह्या प्रचंड खर्चाचे जरा तरी समर्थन करता आले असते. अशा शिक्षणामुळे विकसित झालेल्याआत्मनिरीक्षणातून एक समृद्ध आणि प्रगल्भ असा समाज निर्माण होऊ शकला असता. पण बौद्धिक अथवा आत्मिक क्षितिजे विकसित व्हावी असा प्रयत्न विद्यार्थ्यांमध्ये दिसत नाही. ह्या तीन प्रवृत्ती पाहा :(अ) विद्यार्थी अशा अभ्यासक्रमांची मागणी करतात जे त्यांची अस्मिता जोपासतात अथवा प्रतिबिंबित करतात. २००० वर्षांपूर्वीच्या ग्रीक नाटककारांचा अभ्यास करून त्यांतील आजही ताज्या वाटणाच्या चिरंतन कल्पनांनी आणि भावनांनी भारावून जाण्यापेक्षा ते समकालीन, समलिंगी अथवा समवंशी लेखकाचा अभ्यास करणे पसंत करतात. (ब) दुसरी प्रवृत्ती पहिल्यातच अंतर्भूतआहे. अभ्यासक्रमांची आखणी प्राध्यापकांना काय शिकवायची इच्छा आहे ह्यापेक्षा विद्यार्थ्यांना काय शिकायचे आहे ह्यानुसार केली जाते. आजकाल महाविद्यालयांना विद्यार्थ्यांना हवे ते अभ्यासक्रम देऊ करून आकर्षित करावे लागते. उदा. संचारमाध्यमांचा अभ्यासक्रम (Media Studies).(क) पण विद्यार्थ्यांच्या अरेरावीपेक्षा आणि शिक्षकांच्या लाचारीपेक्षा जास्त महत्त्वाची आणि सूचक अशी प्रवृत्ती म्हणजे कामाच्या प्रमाणात आणि दजीत झालेली प्रचंड घट. समतावादी वातावरणामुळे सामान्यबुद्धीच्या विद्यार्थ्यांची महाविद्यालयात झालेली गर्दी शिक्षणाचा दर्जा सर्वांना झेपेल अशा खालच्या पातळीवर नेते. १९४० साली वॉशिंग्टनच्या ट्रिनिटि कॉलेजमध्ये इंग्रजी प्रमुख विषय घेऊन शिकणार्यांाना लॅटिन, अँग्लो सॅक्सन, मध्ययुगीन फ्रेंच शिकावेच लागे. शेक्सपिअरवरच्या अभ्यासक्रमात त्याची सर्व ३७ नाटके वाचावीच लागत. सध्याच्या ‘लाडावलेल्या शैक्षणिक वातावरणात शेक्सपिअर अर्ध्या सत्रात आणि चार नाटकांमध्ये उरकला जातो.
प्रकरणाच्या शेवटी लेखकाने त्याला योग्य वाटणार्याल आणि शक्य असलेल्या माफक दुरुस्त्या सुचवलेल्या आहेत. पाच वर्षांच्या कालावधीमध्ये उच्च शिक्षण घेणार्याआविद्यार्थ्यांची संख्या ६० टक्क्यांवरून ३३ टक्क्यांवर आणावी. त्या करिता अनेक शिक्षणसंस्था बंद कराव्या लागतील म्हणून त्यांच्याऐवजी व्यावसायिक शिक्षण देणाच्या शाळा सुरू कराव्यात. कोणत्या शिक्षणसंस्था बंद करावयाच्या हे ठरवण्याकरता दोन मापदंडवापरावेत. (१) संस्थेतील विद्यार्थ्यांची बौद्धिक पातळी तपासून पाहावी. त्याकरता एखादी Graduate Record Examination सारखी प्रमाण-परीक्षा घेण्यात यावी. ज्या संस्थेतील विद्यार्थी बर्यातच प्रमाणात अनुत्तीर्ण होतील त्या बंद कराव्यात.(२) समाजातील कोणत्या घटकांकरता संस्था काम करते आहे याचा तपास करावा. प्रतिकूल परिस्थितीतील विद्यार्थ्यांचे मोठे प्रमाण जर त्या संस्थेत असेल – हे वांशिकतेपेक्षा कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीवर ठरवले जावे – तर त्या संस्थेचा करदात्यांच्या पैशांवर जास्त हक्क आहे असे मानावे आणि त्यांना मदत करावी. चांगल्या आर्थिक परिस्थितीतील मुलांकरता असलेली एखादी संस्था बौद्धिक कसोटीवर उतरत नसेल तर ती बंद करावी.
जास्त साक्षरतेकरता आणि बौद्धिक शिस्तीच्या आग्रहाकरता लिहिले जात असलेले हे पुस्तक कमी शिक्षणाची मागणी करीत आहे ही गोष्ट अनेक वाचकांना विसंगत वाटेल. महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी खूप शिकत नसतील पण थोडेफार शिक्षण तर घेतातच आणि काहीच न शिकण्यापेक्षा थोडेफार शिकणे चांगलेच असेही मत काही वाचक मांडू शकतील. त्यांचे बरोबरही असेल. पण ह्या ‘थोड्याफार शिक्षणासाठी केवढी किंमत मोजायची?१५० अब्ज डॉलर्स ही फार मोठी रक्कम आहे. बौद्धिक वारसा नसलेल्या किंवा आळशी माणसांवर ती खर्च करत राहणे परवडण्यासारखे नाही. तसे करत राहण्याने त्यांना त्यांच्या भविष्याची आणि जबाबदारीची जाणीव कधीच होणार नाही. सर्वसामान्यांना महाविद्यालयीन पातळीवर उचलण्याच्या धडपडीत महाविद्यालये मात्र सर्वसामान्यांच्या पातळीवर ओढली गेली आहेत.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.