प्रत्येक देशामध्ये इतिहासात व वर्तमानकाळात अन्याय्य घटना घडलेल्या असतात. तसेच सर्वच धर्मात व धर्मग्रंथांत असहिष्णू व अन्यायी विधाने असतात. (ह्या नियमाला बौद्धधर्म अपवाद असावा.) ह्या घटना अथवा विधाने मान्य करण्याऐवजी त्या घटना तशी घडल्याच नाहीत” किंवा “घडले ते योग्यच होते” किंवा “अन्यायकारक विधानांचा अर्थच वेगळा आहे” अशा धर्तीचे समर्थन काही देशाभिमानी व धर्माभिमानी करतात. डॉ.के. रा. जोशी यांच्या लेखातले मनुस्मृतीच्या स्त्रियांबद्दलच्या भूमिकेचे समर्थन मला याच धर्तीचे वाटले. (हा लेख वाचून जोशी यांच्या मते समाजातील शूद्रांच्या स्थानाबद्दल मनुस्मृतीत काय विधाने आहेत हे समजून घेण्याचे मला कुतूहल वाटू लागले आहे.)
“सतीची चाल विधवांच्या संरक्षणासाठी होती”, “गुलाम म्हणून आफ्रिकन माणसांना अमेरिकेत त्यांच्या हितासाठीच आणले (त्यांचा रानटीपणा नष्ट करण्यासाठी)” असे म्हणणारी माणसे मला भेटली आहेत. “जर्मनीत दुसर्यात महायुद्धात ज्यू लोकांची सामुदायिक हत्या झालीच नाही” असे म्हणणारे निओनाझी आहेतच. तसेच “ज्यूंच्या हत्येला ज्यूच जबाबदार होते” किंवा “बलात्कार झालेल्या स्त्रीची वागणूकच बलात्काराला कारणीभूत होती” असेही बोलले जाते.
शेवटी अन्याय सहन करणारी माणसे आणि अन्याय करणारा माणूस (अथवा समूह) हे दोन्ही घटक घडलेल्या अन्यायाचे बळीच(victims) ठरतात. उदा. ब्राह्मणांचे समाजातले (एका काळचे) उच्च स्थान व त्यामुळे समाजात पसरलेला ब्राह्मणद्वेष, अथवा आत्ता बुरुंडीत चाललेले हुटू, टुत्सी हत्याप्रकरण व युद्ध.
समाजात शांतता निर्माण होण्यासाठी व ती टिकून राहण्यासाठी इतिहासात झालेल्या (धार्मिक अथवा शासकीय) अन्यायांची जखम भरून येणे महत्त्वाचे आहे. देशांना तसेच समाजांनाही माणसासारखीच सदसद्विवेक बुद्धी (conscience) असते. “अन्याय झाला आहे” हे अन्याय करणार्या् व ज्यांच्यावर अन्याय झाला त्या समूहांनी (किंवा त्यांच्या वंशजानी) मान्य करणे, हे समाजाला झालेली जखम भरून येण्यासाठी महत्त्वाचे आहे. जखम बरी होण्याच्या दृष्टीने टाकलेले ते पहिले पाऊल आहे. (पुढचे पाऊल जाहीर क्षमा मागणे हे आहे.)
मेक्सिको या देशातील अॅझटेक लोकांवर स्पॅनिश लोकांनी भयानक अन्याय केले. स्पॅनिश सत्ता संपुष्टात आल्यावर मेक्सिकोत स्पॅनिश लोकांचे वंशज, मिश्र संतती वअॅझटेक लोकांचे वंशज अशी प्रजा राहिली. हे तिन्ही समूह अपराधीपणाची भावना व द्वेष (guilt and hatred) यांनी पछाडलेले होते. (स्पॅनिश, त्यांच्या पूर्वजांनी अन्याय केले म्हणून, अॅझटेक लोक, आपल्या पूर्वजांवर अन्याय झाले म्हणून, तर मिश्र संतती आपला जन्म स्पॅनिश लोकांनी अॅझटेक लोकांवर केलेल्या बलात्कारातून झाला म्हणून.) शेवटी त्या सर्वांनीच ठरवले की आपण सर्व एका देशाचे नागरिक आहोत. त्यांनी इतिहास घडला तसा शिकवायला सुरवात केली. आपल्या देशात त्यांनी भिंती-भिंतीवरून आपल्या इतिहासाची चित्रे रंगवली. त्यांच्या राष्ट्रीय जखमा भरून याव्यात म्हणून त्यांनी हा मार्ग स्वीकारला. असेच हिंदुधर्मीयांना (एवढेच नव्हे तर भारतीयांना) झालेल्या जखमा भरून येण्यासाठी सत्याला सामोरे जाऊन अन्याय करणार्यांुच्या वंशजांनी अन्याय झाले (अथवा होत आहेत) हे कबूल करणे महत्त्वाचे आहे. अशा कबुलीत पश्चात्ताप अभिप्रेत आहे. अन्याय सहन करणारे अथवा त्यांचे वंशज मग सुडाची पेटती भावना व द्वेष विसरून (हळूहळू) क्षमा करण्यास मुक्त होतील; व जखमा भरून येण्यास सुरुवात होईल. (अन्याय अर्थात् थांबायला हवेत.)
मनुस्मृतीसारख्या ग्रंथातल्या अन्यायी विचारांची कबुली बुद्धिजीवी वर्गाने द्यायला हवी. हा वर्ग समाजात मूलभूत सुधारणा घडवून आणत असतो.मनुस्मृतीतले विचार मनुस्मृतीच्या काळातील (इ.स. १०० ते ५००) धर्मापेक्षा फारसे वेगळे नाहीत. स्त्रियांना कमी प्रतीच्या मानण्याची प्रथा व गुलामी (थोडे अपवाद सोडून) जगात प्रचलित होती. त्याकाळची माणसे फार अन्यायी व दुष्ट होती असे नाही. व्यक्ती, कुटुंब व समाज आपली रचना जगणे (survival) शक्य व्हावे ह्या दृष्टीने करतो. स्त्रियांचे समाजातील दुय्यम स्थान आणि गुलामी (slavery) (माझ्या मते भारतातले शूद्र हे गुलाम अथवा स्लेव्हच होते.) त्या काळच्या बहुतेक समाजांना आवश्यक वाटली होती. त्या समाजांना व मनुस्मृतीला विसाव्या शतकातल्या न्याय-अन्यायांच्या व मानवी हक्कांच्या कल्पनेच्या मापट्याने तोलणे अयोग्य आहे.
पण म्हणून त्या काळी मनूने सांगितलेले नियम “आजच्या समाजाला लागू पडतात” हे म्हणणे अन्यायी आहे. किंवा अनेक शतके ह्या मनुस्मृतीतल्या तत्त्वांचे पालन केल्यामुळे समाजाच्याही घटकांवर अन्याय झालेले असतानाही मनुस्मृतीत “अन्यायी विधानेच नाहीत असे म्हणणेही एक प्रकारचा अन्यायच आहे.
मनुस्मृती (देवळे, ग्रंथ इ.) आपला आनुवंशिक ठेवा आहे (heritage आहे). आईवडिलांना, आजीआजोबांना जसे आपण गुणदोषांसह स्वीकारतो व पूज्यही मानतो तसाच आपला इतिहास व धर्म सत्य स्वरूपात आपण स्वीकारायला हवा व पूज्यही मानायला हवा.
भावी शांततेसाठी व एकीसाठी भूतकाळी निर्माण झालेले भेदाभेद व अन्याय यांचे मात्र आपल्याला नव्या भारतातून निर्मूलन करायला हवे. (आईवडिलांचे दोष आपण अंगीकारत नाही. मग इतिहासातल्या व धर्मातल्या अन्यायी रूढी पाळायच्या?)
श्री. जोशी ह्यांच्या लेखाला मी डिनायल (denial) म्हणते. अशा समर्थनाने लेखकाच्या सदसद्विवेकंबुद्धीवर तात्पुरती मलमपट्टी झाली तरी हिंदुधर्मीयांच्या व हिंदू स्त्रियांच्या जखमा चिघळतच राहतात.