जून ९४ च्या आजचा सुधारकमध्ये प्रसिद्ध झालेल्या माझ्या वरील विषयावरील लेखावर आक्षेप घेणारे श्री. न. ब. पाटील यांचे पत्र संपादकांनी माझ्या अवलोकनास पाठविले आहे. या पत्रातील सर्वच मजकूर अपेक्षित वळणावरच आहे. ज्यांची साक्षात्कारावर श्रद्धा आहे, त्यांच्यावर माझ्या विवेचनाचा काही परिणाम होईल अशी अपेक्षा मी केली नाही. कारण श्रद्धा ही मुळात पुराव्यावर आधारलेली नसते, त्यामुळे विरुद्ध पुराव्याने ती नष्ट होण्याचा संभव नसतो. श्री. पाटील यांच्या सात पानी पत्रात श्रीरामकृष्णांचे साक्षात्कारी समजले गेलेले वर्तन मिर्गीच्या व्याधिताचे होते हे त्यांच्याच आईबापांचे व डॉक्टरांचे निदान चूक होते असे दाखवणारी कोणतीच तथ्ये मांडली नाहीत. साक्षात्कारानन्तर श्रीरामकृष्णांची जातींच्या उच्चनीचतेबद्दलची भावना नष्ट झाली असे त्यांनी विधान केले आहे, पण या विधानाच्या पुष्ट्यर्थ काहीच उदाहरणे दिली नाहीत. कोणत्या तारखेनन्तर श्रीरामकृष्ण साक्षात्कारी झाले व कोणत्या तारखेपूर्वी ते नुसते साधक होते या तारखा सांगून त्या तारखेच्या नंतरचे व पूर्वीचे श्रीरामकृष्णांचे वर्तन यांची सविस्तर उदाहरणे देऊन श्री पाटील यांनी साक्षात्कारामुळे श्रीरामकृष्णांचे कोणते उन्नयन झाले याचा पुरावा द्यावा. तसेच तेविसाव्या वर्षी नऊ वर्षांच्या मुलीशी विवाह करण्यात पुढाकार घेऊनश्रीरामकृष्णांनी मनाची कोणती उच्चता दाखविली, हा विवाह करतेवेळी ते साधक होते की सिद्ध, सिद्ध असल्यास श्री. पाटील यांनी त्यांची सिद्धता कशी पारखली वगैरे गोष्टींचा त्यांनी ऊहापोह करावा. श्री. शारदादेवींच्या वैवाहिक जीवनात उदात्तता होती असा श्री. पाटील दावा करतात. या उदात्ततेची लक्षणे काय?शारदादेवींना चारचौघींसारख्या भावभावना नव्हत्या काय?नऊ वर्षांच्या मुलीवर एक मुलखावेगळे जीवन लादण्यात कोणती उदात्तता आहे?ती मुलगी चारचौघींसारखी वाढून वयात आली असती तर तिला आपले वैवाहिक जीवन श्री. पाटील म्हणतात त्या प्रकारे “ उदात्त व्हावे असे वाटले असते काय?चारचौघींचे विवाहजीवन उदात्त नसते काय?कालिदासादिकांनी वर्णन केलेला शृंगार व वात्सल्य या जीवनातील अत्यन्त उदात्त गोष्टी नाहीत काय? शृंगार व वात्सल्य यांना एखाद्या मुलीला पारखे करणे हा तिच्यावर अन्याय नाही काय?
श्री. पाटील ब्रह्मचर्याला उदात्त समजत असतील व त्यामुळे श्रीरामकृष्णांच्या विवाहित ब्रह्मचर्यात त्यांना उदात्ततेचे दर्शन होत असेल. मला ब्रह्मचर्यात काहीही उदात्त दिसत नाही. उलट पौष्टिक अन्न न खाणे, आरोग्यदायी जलाचे पान न करणे वगैरे वर्तनाप्रमाणेच ब्रह्मचर्य हे एक दूषणीय वर्तन आहे असे मी समजतो. हे लिहिणे श्री पाटील यांना विचित्र वाटत असेल तर त्यांनी माझ्या विवेकवाद या ग्रन्थातील “रसराज शृंगार” हा लेख वाचावा. त्यात मी ब्रह्मचर्य हे मूल्य नसून शृंगार हे मूल्य आहे या मुद्याचे सविस्तर विवेचन केले आहे.
श्री. पाटील यांनी साक्षात्कारासम्बन्धी नेहमीच मांडण्यात येणारा एक मुद्दा मांडला आहे. हा मुद्दा म्हणजे प्रत्यक्ष व अनुमान ही प्रमाणे विज्ञानाच्या विषयांचे ज्ञान करून घेण्यास उपयुक्त असली तरी ईश्वर, परलोक वगैरे अतीन्द्रिय सत्यांचे ज्ञान करून घेण्यास उपयोगी नाहीत. हा मुद्दा नेहमीच पुढे करण्यात येतो. त्यामुळे त्याचे थोडे विस्ताराने विवेचन केले पाहिजे.
या मुद्यावर नेहमी आंधळ्याचे उदाहरण देण्यात येते, ते श्री. पाटील यांनी दिले नाही हे जरा आश्चर्यच आहे.
प्रमाणे स्वतन्त्र नाहीत
“स्वविषयनियतानि प्रमाणानि श्रोत्रादिवत्”, प्रमाणे ही फक्त स्वतःच्या विशिष्ट विषयापुरतीच प्रमाण असतात, जसे डोळ्यांनी फक्त रूप दिसते, रूपाच्या बाबतीत डोळे प्रमाण. पण ध्वनीचे ज्ञान करून घ्यायचे असेल तर कानांचाच उपयोग केला पाहिजे. तेथे डोळ्यांचे प्रामाण्य चालत नाही, असे शंकराचार्य म्हणतात. म्हणजे प्रत्यक्ष व अनुमान ही फक्त लौकिक विषयाबद्दल प्रमाण आहेत. ईश्वर, परलोक इ. विषयांबद्दल साक्षात्कार, वेदवचने वगैरेंचेच प्रामाण्य मानले पाहिजे असे शंकराचार्य म्हणतात.
पण हे म्हणणे साफ खोटे आहे. पाण्यात बुडवलेली काठी वाकडी दिसते. पण सरळ असलेली काठी पाण्यात बुडवल्याने वाकडी व्हावी व बाहेर काढल्यावर पुनः सरळ व्हावी असा एखादा गुणधर्म पाण्यात असल्याचे इतर अनुभवावरून दिसत नाही. तेव्हा पाण्यात टाकलेली काठी खरोखर वाकडी होत नाही असे अनुमान होते. या अनुमानाचा पडताळा पाहण्यासाठी काठीवरून आपण हात फिरवितो व काठी पूर्वीसारखीच सरळ आहे असे स्पर्शाने ज्ञान करून घेतो. म्हणजे डोळ्यांनी दिसणारे ज्ञान देखील खरे की खोटे याचा पडताळा पाहण्यासाठी आपण अनुमान व स्पर्श यांचा उपयोग करतो. तेव्हा प्रमाणांचे क्षेत्र असे स्वतन्त्र कप्प्यांचे बनलेले नाही. प्रमाणांनी ज्या सत्याचे ज्ञान होते ते सत्य एकच असल्यामुळे सर्व इन्द्रियांना व अनुमानांना मिळून त्याचे जे ज्ञान होते ते सुसंगत असले पाहिजे अशी अपेक्षा असते. ते जेव्हा सुसंगत नसते तेव्हा कोणत्यातरी प्रमाणात दोष उत्पन्न झाला आहे अशी कल्पना आपण करतो. पाण्यात बुडविलेल्या काठीचे जे ज्ञान होते ते काठी व डोळे यांच्यामध्ये पाणी व हवा या दोन तहेच्या वस्तू माध्यम म्हणून आल्यामुळे. फक्त एकच माध्यम मध्ये असताना होण्यासारखे ते असू शकत नाही, म्हणजे एकच माध्यम मध्ये असेल तर डोळ्यांचे ज्ञान निर्दोष, अन्यथा नाही असा नियम करून आपण डोळे व स्पर्श यांना होणाया परस्परविरूद्ध ज्ञानांची संगति लावतो. निरनिराळ्या प्रमाणांनी होणार्या ज्ञानांची संगती लावण्याचे काम अनुमान करीत असते.
आंधळ्याला दिसू शकत नाही हे खरे. पण याचा अर्थ डोळस माणसाला जे ज्ञान होते ते खरे की खोटे हे आंधळा पडताळून पाहू शकत नाही असे नाही.“पुढे जाऊ नकोस पुढे भिंत आहे ” असे डोळसाने सांगितले व आंधळ्याला ते पडताळून पाहायचे असले तर पुढे जाऊन व भिंतीला स्पर्श करून आंधळा डोळसाचे ज्ञान पडताळून पाहू शकतो. तेव्हा साक्षात्काराचा विषय वेगळा असला तरी साक्षात्काराने झालेले ज्ञान प्रत्यक्ष व अनुमान यांनी पडताळून पाहता येणार नाही असे नाही. असा पडताळा करून घेण्याचा प्रयत्न केला की साक्षात्कार म्हणून म्हणविले जाणारे ज्ञान हे ज्ञान नसून एक भ्रम आहे असे सिद्ध होते.
गूढानुभूति व साक्षात्कार यात मानसशास्त्राने बरेच संशोधन केले आहे. त्यात हमखास असे आढळून आले आहे की साक्षात्काराचा दावा सांगणाच्या बहुतेक व्यक्ती कोणत्यातरी रुग्णतेला बळी पडलेल्या असतात. रामकृष्ण परमहंसांच्या मिर्गीप्रमाणेच फेपन्याचे झटके, भूतबाधा म्हणजे पझेशन, छिन्नव्यक्तित्व म्हणजे स्किझोफ्रेनिया, स्वयंगण्ड म्हणजे पॅरानोइया वगैरे अनेक प्रकारच्या मनोव्याधींमध्ये भास होतात. लहानपणापासून देवलसी वातावरणांचे संस्कार झाले असतील तर हे भास देवाचे वा परलोकाचे होतात. ते भास असतात, सत्यज्ञान नसते, याचा पडताळा आपल्याला पाहता येतो. असा पडताळा पाहण्यासाठी ती व्याधि आपल्याला झाली पाहिजे अशी आवश्यकता नसते.
गूढानुभूति व वेड
साक्षात्काराच्या बाबतीत मात्र “तुम्हाला जोपर्यन्त साक्षात्कार होत नाही तोपर्यन्त साक्षात्कार खोटा असे म्हणण्याचा तुम्हाला अधिकार नाही” असा युक्तिवाद नेहमी करण्यात येतो. असा युक्तिवाद करणे म्हणजे स्किझोफ्रनियाच्या व्याधिताला होणारे भास हे भास आहेत हे कळण्यासाठी डॉक्टरला स्वतःलाच स्किझोफ्रेनिया झाला पाहिजे असे म्हणण्यासारखे आहे.
साक्षात्काराचे समर्थक याबाबतीत विल्यम जेम्सचा युक्तिवाद नेहमी प्रतिपक्षावर फेकीत असतात. विल्यम जेम्स म्हणतोः “ साक्षात्कार व गूढानुभूति या नेहमी कोणत्या तरी रुग्णतेशी सम्बन्धित असतात एवढ्यावरूनच या अनुभूति हे भास आहेत असे सिद्ध होत नाही. ९८० अंश शारीरिक तपमान हे १०४° वा १०५° अंश शारीरिक तपमानापेक्षा सत्याचे ज्ञान होण्यास अधिक पोषक असते असे का मानावे?”
हा विल्यम जेम्सचा प्रश्न फारच विचित्र आहे. ९८० अंशापेक्षा शरीराचे तपमान एकदोन अंशाने जरी वाढले तरी ते कोणत्या तरी व्याधीचे लक्षण असते या नियमाला एकही अपवाद नाही असे निरीक्षणाअन्ती दिसून आले आहे. त्यातून १०४° वा १०५° च्या जवळपास हे तपमान गेले तर मेंदूला इजा होण्याचा सम्भव असतो. ही इजा डिलीरियम म्हणजे उन्मनस्कतेच्या स्वरूपात पुष्कळ वेळा व्यक्त होते. या उन्मनस्कतेत केलेली बडबड ही गूढानुभूतीची अभिव्यक्ती आहे असा पुष्कळांचा ग्रह असतो. डिलीरियमच्याही पुढे जाऊन अति तापाने मेन्दूला कायमची इजा होऊन माणसाचे पुढील जीवन अर्धवटाच्या अवस्थेत वा चक्क वेडात परिणत झालेले आढळून येते. या वेडालाच आत्मानुभूती असे गोंडस नाव दिल्याने वेड ही श्रेष्ठ प्रकारची अनुभूती ठरत नाही. अति तपमान हे शरीराच्या व मनाच्या क्षमतेला सर्व प्रकारे मारक असते; असा निरपवाद अनुभव आहे. तेव्हा “अति तापाच्या अवस्थेत अतीन्द्रिय सत्यांचे ज्ञान होणे अशक्य का असावे?” हा जेम्सचा प्रश्न निरर्थकआहे.
श्री. पाटील यांच्या पत्रानंतर माझ्या लेखावर श्री. दाभोलकर यांचे अधिक लांब पत्र आले. त्यातील ” एखाद्या गोष्टीचा सत्यतेचा अनुभव आला नाही म्हणजे ती गोष्ट असत्य ठरत नाही” या विधानाला वर उत्तर आलेच आहे. फक्त सत्यतेचा अनुभव याचा अर्थ पडताळा – व्हेरिफिकेशन – असा केला पाहिजे.
श्री. दाभोलकरांच्या पत्राला सविस्तर उत्तर देण्याची जरूर नाही, कारण माझा मुख्य मुद्दा म्हणजे श्रीरामकृष्ण व विवेकानन्द यांना आलेले अनुभव हे साक्षात्कार नसून भास होते हा त्यांनाही मान्य आहे. त्यांचे खालील वाक्य पहा :
“श्रीरामकृष्ण आणि विवेकानन्द ही व्यक्तिमत्त्वे गाढ मोहनिद्रेत जाण्यास सक्षम होती हे मलाही मान्य आहे. गाढ मोहनिद्रेत देवीचे भास होणे शक्य आहे. (हे प्रयोग मी स्वतः केले आहेत).”
रामकृष्णांना झालेले देवीचे दर्शन हा साक्षात्कार नसून भास होता हे कबूल केल्यावर दाभोलकरांचे बाकीचे पत्र हा तपशिलाचा वाद ठरतो.
रामकृष्णांना होणारे भास दरवेळी निरनिराळे असत, एपिलेप्सीप्रमाणे एकच दृश्यफीत पुनःपुनः पाहिल्यासारखे नसत असे दाभोलकरांचे एक कथन आहे. मी रामकृष्णांच्या अनुभवाची उपपत्ति फक्त एपिलेप्सी म्हणजे मिर्गीच्या आधारे लावलेली नाही. मिर्गीव्यतिरिक्त रामकृष्णांच्या व्यक्तित्वाचे आणखी दोन पैलू होते. ते म्हणजे । संसूच्यता (सजेस्टिबिलिटी suggestibility) व कलाप्रवता. कलाप्रवणतेमुळे कल्पनेच्या जगात वावरण्याचे त्यांचे सामर्थ्य मनस्वी होते. याच्या भरीला लहानपणापासून झालेले “आध्यात्मिक” संस्कार.
पुरुषाचा मासिक धर्म?
रामकृष्णांनी राणी रासमणीवर केलेला “ आघात ” प्रोव्होकेशनखाली – क्रोधापनाखाली- झाला म्हणून “ इक्टल व्हायलन्स’ या मिर्गीच्या प्रकारात मोडत नाही असे दाभोलकरांचे म्हणणे. पण हे “प्रोव्होकेशन” कोणते होते?तर राणी रासमणीने मालमत्तेच्या खटल्याबद्दल आपल्या दिवाणजींना विचारले. याला प्रोव्होकेशन म्हणायचे तर कोणतेही वर्तन हे “प्रोव्होकेशन” ठरू शकेल.
भासाचे सर्व प्रकार संसूच्यतेमुळे,- सजेश्चनमुळेच होतात असे मी म्हटलेले नाही. सर्वांना परिचित असलेले स्वप्न हा भासाचा प्रकार सजेश्चनमुळे झालेला नसतो. तेव्हा सर्वच भास सजेश्चनमुळे होतात असे मनोव्याधींशी मुळीच परिचित नसलेला सामान्य माणूसदेखील म्हणणार नाही. माझ्या विधानाचा संदर्भ मुद्दाम साधना करून प्राप्त केलेले वा गुरुकृपेने झालेले भास हा आहे. हे भास संसूच्यतेमुळे झालेले असतात असे म्हणण्यास काय हरकत आहे?
मोहनिद्रा व समाधि या अवस्था एकच आहेत असे मी म्हटलेले नाही. डॉ. आनन्द यांनी मेन्दूचे विद्युल्लेख घेऊन या अवस्था भिन्न आहेत असे दाखविले आहे. पण समाधीत जे ज्ञान होते असे समाधी लावणारे सांगतात ते त्यांच्या पूर्वश्रद्धांवर अवलंबून असते. उदाहरणार्थ वेदान्ती श्रीहर्षाला समाधीत ब्रह्माचा साक्षात्कार होत होता तर सगुणभक्तिवादी रामकृष्णांना समाधीत देवी दिसत होती. खुद्द समाधीच्या अवस्थेचा या भासांशी सम्बन्ध नाही.
सर्वसाधारण माणसाची मोहनिद्रा उतरल्यावर आपल्याला आलेला अनुभव हा भास होता हे त्याला कळते, पण रामकृष्णांना समाधी उतरल्यावरदेखील तो भास वाटत नव्हता त्याअर्थी तो भास नव्हता असे दाभोलकरांचे म्हणणे. पण भास दृढ श्रद्धेतून मिळालेल्या संसूचनाने झालेला असेल तर मोहनिद्रा उतरल्यावरही तो भास होता असे श्रद्धालूंना वाटत नाही.
“रामकृष्णांना स्त्रीवेशात कामजागृति व कामशान्ति होत होती” असा उल्लेख रामकृष्णलीलाप्रसंगात” सापडण्याचा सम्भव नाही कारण रामकृष्ण आपल्या अनुभवांना कामानुभव समजत नव्हते. पण आपल्याला मासिक धर्म होतो आहे हा रामकृष्णांचा भास कामशान्तीला मासिक स्राव समजण्याने उत्पन्न झाला असला पाहिजे. श्री. दाभोलकरांना या भासाची दुसरी काही उपपत्ति सांगता येत असेल तर त्यांनी सांगावी.