मे १९९४ च्या ‘आजचा सुधारक’च्या अंकात श्री. के. रा. जोशी यांचा संदर्भ न पाहता लावले जाणारे अर्थ’ हा किंचित लेख प्रसिद्ध केला आहे. कदाचित जोशी यांनी मनू किंवा भृगू यांचे आडनाव जोशीच होतेअसा संदर्भ लावला तरी आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.
‘धारणाद्धर्म इत्याहुः’ या वचनाच्या संदर्भात जोशींना असेच म्हणायचे आहे की जे आचरण समाजधारणेची क्रिया करीत असेल तोच धर्म होय. असा धर्म याचा अर्थ होतो. पुढे जोशी म्हणतात ‘धारणाद्धर्म इत्याहुः’ ही धर्मसंस्थापक श्रीकृष्णांनी दिलेली व्याख्या लक्षात घेतली की धर्मचर्चा–सर्व समाजाला व्यापून असणार्याइ धर्मासंबंधीची चर्चा – ही प्राधान्याने ऐहिक सुस्थितीविषयी विचार करते हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट जाणवते.
जोशी यांनी जाताजाता धर्मसंस्थापक ही कृष्णाला पदवी बहाल केली आहे. ही पदवी देण्याचा संदर्भ कदाचित हाच असेल ‘परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. काही विशिष्ट परिस्थितीत धर्म स्थापण्याकरिता युगायुगातून मी जन्म घेतो असे कृष्ण म्हणतो. तेव्हा जोशी संदर्भ देऊन सांगू शकतील काकी कोणता धर्म मोडकळीस आला होता त्याची कृष्णाने संस्थापना केली किंवा कोणत्या नव्या धर्माची स्थापना केली?कृष्णानेच हे काम केले होते अगर करावयाचे होते तर मग मनूच्या किंवा भृगूच्या स्मृतीची जरूरीच काय होती?बामणीपणा सांभाळण्याचा आटापिटा करणार्याम लोकांकडून याचे उत्तर हेच येईल की ‘मनू किंवा भृगू हे कृष्णाचे अवतार होते. प्रश्न हा नाही.
जोशी पुढे लिहितात, ‘अहिंसा, सत्य, अस्तेय, शौच आणि इंद्रियनिग्रह या पाच गोष्टी म्हणजे संक्षेपाने सांगितलेला सार्ववार्णिक समाजव्यापी धर्म होय.’ (हा मनूने सांगितलेला धर्म आहे.)
आणि जोशीसुद्धा ‘सार्ववार्षिकसमाजव्यापी धर्म असा शब्दप्रयोग ‘चातुर्वर्ण्ये ऽब्रवीत् मनुः याच्याकरिता करतात. ‘चातुर्वर्ण्येचा अर्थ जोशी चातुर्वार्णिक असा न करता सार्ववार्णिक असा का करतात हे कुणाच्याही लक्षात येण्यासारखे आहे. जोशी यांच्या अंतर्यामी मनूबद्दल कितीही आदर वसत असला तरी त्यांना याची स्पष्ट कल्पना आहे की आजच्या जागृत समाजात मनूच्या चातुर्वर्यधर्माचा उच्चारसुद्धा किळसवाणा ठरला आहे.
वरील पाच गोष्टी महत्त्वाच्या असल्या तरी मानवतेविना समाजधारणा होणे शक्य नाही. वरील पाच गोष्टींनी मानवता सिद्ध होते असे जर जोशींना वाटत असेल तर ‘अब्राह्मणाला दिलेल्या दानाचे दानाइतकेच फळ मिळते. ब्राह्मणबुवाला म्हणजे ब्राह्मण जातीत जन्माला येऊनही ज्ञानसाधना न करता स्वतःला ब्राह्मण म्हणवून घेणार्याम माणसाला दान दिल्यास दानाच्या दुप्पट फळ मिळते. (८५)
‘अशा रीतीने ब्राह्मण जरी सर्व प्रकारची अनिष्ट कर्मे करीत असले, तरी त्यांची सर्व प्रकारे पूजा करावी. ब्राह्मण हे सर्वश्रेष्ठ दैवत होय. (९-३१९) ।
‘धर्मशास्त्राचे नियम उपलब्ध नसतील तर काय करावे असे वाटत असेल तर शिष्ट ब्राह्मण सांगतील तो धर्म होय असे निःसंशय समजावे.'(१२-१०८) यातील मानवता सांगावी.
जोशींच्या ‘धारणात् धर्म इत्याहुः’ वरील मनूच्या विचारावर वरील श्लोक वाचल्यानंतर जास्त भाष्य करण्याची गरज आहे असे वाटत नाही.
‘न स्त्री स्वातंत्र्यमर्हति’ यावर जोशीनी संदर्भ देऊन मनूच्या या विचारासंबंधात वेगळा अर्थ काढण्याचा उगाच अट्टाहास केला आहे. स्त्रीसंबंधात मनूची वचने खूप आहेत. ती सारी वचने एकत्र करून जोशींनी मनू हा स्त्रीबद्दल उदारमतवादी होता हे ससंदर्भ सिद्ध करून दाखवावे असे त्यांना माझे सांगणे आहे. स्वतःचे संरक्षण स्वतःच करण्याची वेळ स्त्रीवर इतरांनी येऊ देऊ नये’ असा अर्थ ‘न स्त्री स्वातंत्र्यमर्हति’ याच्यातून काढण्याचा प्रयत्न जोशींनी केला आहे. तो निखालस चुकीचा आहे. ‘अर्हति या शब्दाने जो अर्थ विशद होतो तो पुसला जाणे शक्य नाही. स्त्रीसंबंधीची मनूची वचने पाहिली तर मनूने अर्हति हाच शब्द जाणूनबुजून वापरला आहे यात काही संशय राहत नाही.
मनूने भयाण अशा चुका करून ठेवल्या आहेत. त्या खेळकर वृत्तीने मान्य करायलासुद्धा मोठे धारिष्ट लागते. ते धैर्य जोशींमध्ये असावे अशी अपेक्षा करणे वाया जाईल असे वाटत नाही.
अशा प्रकारचे लेख प्रकाशित करून आजचा सुधारक’सुधारक ठरू शकेल काय याचा संपादकांनी जरूर विचार करावा.