मनुस्मृतीवर टीका करणारी मंडळी मनुद्वेषाच्या विकृतीने पछाडलेली असल्यामुळे, मनूवर “सकारण व अकारण मनूला झोडपण्याचे पुरोगामी व्रत आचरीत असतात, असा आरोप श्री. जोशी यांनी केलेला आहे. या टीकाकारांना स्वतःला ग्रंथ समजण्याची क्षमता नसते असेही विधान ते करतात. (त्यांच्या लेखांतील शेवटचा परिच्छेद पाहावा.) मनूला “सकारण झोडपले तर त्याचा राग श्री जोशी यांना का यावा ते समजत नाही.“अकारण” झोडपले तर त्यांना राग यावा हे समजण्यासारखे आहे. मनूला अकारण झोडपण्यात येते असे श्री जोशी यांचे मत त्यांच्यासारख्या परंपराप्रिय लोकांचे आहे. परंपराप्रिय नसलेल्या लोकांना तसे वाटत नाही, आणि हेच वादाचे मूळ आहे. ग्रंथाचा अर्थ आपल्यालाच काय तो कुळतो इतरांना तो अर्थ समजून घेण्याची इच्छा नाही, किंवा तशी त्यांची पात्रता नाही अशी आढ्यतापूर्ण विधाने खरे तर कोणी करू नयेत, परंतु श्री. जोशी यांनी तशी विधाने त्यांच्या लेखांत केलीआहेत.
हिंदुसमाजात एकजिनसीपणा आणू इच्छिणार्यांधच्या दृष्टीने मनुस्मृतीतील कित्येक वचने हानिकारक आहेत ही गोष्ट सिद्ध करीत बसण्याची आवश्यकता नाही. डॉ. आंबेडकरांना मनुस्मृती जाळून टाकण्याची इच्छा व्हावी यातच सर्व काही आले. ज्या सनातनी लोकांना या कृतीचा राग आला त्यांनी त्यात मनुस्मृतीबद्दल गौरवाने लिहिण्यात पुढाकार घेतला आहे. सनातनी वृत्तीच्या ब्राह्मणसमाजाला सामाजिक दूरदृष्टी तर नाहीच, परंतु स्वहितसुद्धा कळत नाही, हे अनेक उदाहरणे देऊन दाखवता येईल. मनूला अकारण झोडपण्यात येत आहे हा सनातनी लोकांचा कांगावा त्यांनाच हानिकारक ठरणार आहे. पण तूर्त तो मुद्दा बाजूला ठेवून मनूचा स्त्री-विषयक दृष्टिकोण हा जो मुद्दा श्री जोशी यांनी त्यांच्या लेखात घेतला आहे, त्या मुद्द्यासंबंधी लिहितो.
मनूच्या त्या अतिचर्चित श्लोकात काय सांगितले आहे?त्या काळची वस्तुस्थिती प्रथम मनूने सांगितली हे ती अशी :- बालपणी स्त्रीचे रक्षण तिचा बाप करतो, तरुणपणी नवरा करतो आणि वृद्धापकाळात मुलगा करतो. ही झाली वस्तुस्थिती. तिचा निष्कर्ष (?) मनूने काय काढला आहे तर म्हणे स्वतंत्रपणे राहण्याची स्त्रीची लायकीच नाही! समजा, त्याने जर असा निष्कर्ष काढला असता की, (स्त्रीच्या निसर्गनिर्मित देहरचनेतील वैगुण्यामुळे) स्त्रीला पुरुषाच्या संरक्षणाची सतत गरज आहे, तर तो निष्कर्ष वस्तुस्थितीला धरून झाला असता. तसे करण्याऐवजी मनूने (अनवधानाने?) आपला खरा स्त्री-विषयक दृष्टिकोन उघड केला आहे, आणि आता मनूची कोणीही कितीही वकिली केली तरी मनु इथे घसरला आहे’ हे विधान खोडून काढता येणार नाही.
स्वतंत्रपणे राहण्याची स्त्रीची पात्रता नाही, असे म्हणणे, आणि स्त्रीला संरक्षणाची गरज असते असे म्हणणे यात काही फरक आहे की नाही?दोन्ही विधानांचा इत्यर्थ एकचआहे, असे ज्यांना हटवादीपणाने म्हणत रहायचे असेल त्यांनी तसे म्हणावे; परंतु मनूने । ‘अर्हति’ हा जो शब्द योजला आहे तो का योजला आहे ते पाहायला पाहिजे. ९ व्या अध्यायातच मनूने म्हटले आहे की विधात्याने स्त्री ही स्वभावतःच व्यभिचारी प्रवृत्तीची अशी निर्माण केली आहे. तिला वाममार्गापासून दूर ठेवण्यासाठी पुरुषांनी सतत दक्ष राहणे हे ओघाने आलेच पिता, पति आणि पुत्र यांनी मिळून स्त्रीचे रक्षण हे असे करायचे आहे! आपल्या आईने केलेल्या व्यभिचाराचे प्रायश्चित्त मुलाने घ्यावे असेही मनू सांगतो.
आपल्याजवळची एखादी अति-उपयोगी, अति नाजूक आणि शोभादायक वस्तु कशी सतत जपावी त्या संबंधीच्या मौलिक सूचना, श्री जोशी सांगतात त्याप्रमाणे, मनूने वेळोवेळी केलेल्या आहेत हे अगदी खरे. ही अशी वस्तु जर निर्जीव किंवा भावनाशून्य असेल तर ती आपण होऊन दुसर्याम मालकाकडे जाण्याची अभिलाषा ठेवणार नाही, पण ती जर एक हाडामांसाची स्त्री असेल तर तिच्यावर डोळ्यात तेल घालून पाळत ठेवायला हवी, हे मनूने (अनवधानाने) सांगून टाकले आहे!
पुरुषी मनोवृत्तीला कदाचित यात काही वावगे वाटणार नाही, परंतु स्त्रियांना या विधानाचा राग आला तर त्यांचे काय चुकले?
मनुस्मृतीचा आधार आज जीवनांत कोणी घेत नाही, घेऊ शकत नाही असे श्री जोशी स्वतःच म्हणतात, तर मग ते मनूची वकिली करण्यासाठी स्वतःची बुद्धी आणि वेळ का खर्च करीत आहेत?मनूच्या टीकाकारांना उत्तर देण्याच्या मिषाने मनूबद्दल गौरवाने लिहिण्याने ते काय साधणार आहेत?
मनुस्मृती हा ग्रंथ आता म्युझियममध्ये ठेवून देण्याच्या लायकीचा ग्रंथ आहे. तो आता जाळायला नको. आणि उघडून पाहायलाही नको. डायनोसॉरचे पुनरुज्जीवन करणे आणि मनुस्मृतीची पालखीतून मिरवणूक काढणे दोन्ही सारखेच घातक आहे.