प्रा. दि. य. देशपांडे यांस,
स. न. वि. वि.
आपले दिनांक १२ एप्रिल, ९४ चे पत्र आणि त्यासोबतचे देवदत्त दाभोलकर यांचे पत्र मिळाले. प्रा. दाभोलकरांचे पत्र आजचा सुधारक या मासिकाच्या ताज्या अंकातही प्रकाशित झालेले आहे. आपल्या पत्रास ताबडतोब उत्तर पाठवू शकलो नाही याबद्दल क्षमस्व.
(१) “सुधारकाचे सर्व अंक उपलब्ध नाहीत हे सीतारामपंत देवधर यांचे म्हणणे खरे आहे.
(२) ३० मे १८९२ ते १८९५ पर्यन्तचे साप्ताहिक सुधारकाचे अंक दिल्लीत तीन मूर्ती या जवाहरलाल नेहरू यांच्या निवासस्थानी स्मृती ग्रंथालय आहे तेथे उपलब्ध आहेत. १८९२ पूर्वीचे सुधारकाचे अंक ठिकठिकाणी विखुरलेले आहेत. तेही संपूर्ण उपलब्ध नाहीत.
(३) १८९९ ते १९०३ पर्यन्तचे साप्ताहिक सुधारकाचे अंक पुण्यात फग्र्युसन महाविद्यालयाच्या ग्रंथालयात काही वर्षापूर्वी मी पाहिलेले होते.
(४) १४ ऑक्टोबर, १८९५ चा “सुधारकाचा अंक दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू ग्रंथालयात मिळण्याची शक्यता आहे. मी तो पाहिलेला नसल्यामुळे नक्की सांगू शकत नाही. दिल्लीत याबाबत चौकशी करावी.
कळावे, लोभ असावा.
आपलाय. दि. फडके
३, आनंदवन, साहित्य सहवास,बांद्रे (पूर्व), मुंबई-४०० ०५१
स.न.वि.वि.
एप्रिल ९४ च्या अंकातील पान ३ वरील संपादकीयाच्या शेवटल्या परिच्छेदात वाचकांना आजचा सुधारक च्या स्वरूपाबद्दल प्रामाणिक प्रतिक्रिया कळविण्याबद्दल ववाचनीयतेत सुधारणा हव्या असतील तर त्याबद्दल सूचना पाठविण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार प्रतिक्रिया व सूचना देत आहे.
(१) फेब्रुवारी ९४ च्या अंकातील पत्रव्यवहार या सदरात श्री. र. वि. खांडेकर यांनी केलेल्या बहुतांश सूचनांशी सहमत आहे.
(२) मासिकाचे ९० टक्के वर्गणीदार विद्वान या सदरात मोडणारे नसल्याने भाषाशैली त्यांना कळेल अशी सहज सुलभ असावी. मासिकाचा उपयोग विद्वत्तेचे प्रदर्शन करण्यासाठी कोणी करीत असल्यास त्यास पायबंद घालावा.
(३) निव्वळ स्वतःचा शहाणपणा व इतर सर्वांचे दोष किंवा मूर्खपणा दाखविण्याचा आव आणणार्याअ लेखांना भिडस्तपणापायी प्रसिद्धी देऊ नये. कारण असल्या लेखांत सुधारणेचे पाऊल पुढे पडण्याच्या दृष्टीने किंवा प्रबोधनपर काहीच नसते. लेखकाच्या अहंकाराचे प्रदर्शन मात्र असते!
(४) औचित्य भंग होऊ न देता संपादकीय धोरणाविरुद्ध, सभ्य भाषेत, वैचारिक लिखाण आल्यास त्याचे स्वागत व्हावे व त्यावर उलट सुलट चर्चाही घडवून आणावी. उदाहरणार्थ- फेब्रु. ९४ च्या अंकातील संपादकांचे आवाहनानुसार ‘स्त्री-मुक्ती चळवळ व भारतीय स्त्री या विषयावर एक लहानसे टिपण पाठविले होते. त्यात (१) पुरुपांपेक्षा स्त्रियांचे प्रबोधन करणे कठीण असते व (२) पुरुष हे स्त्रियांपेक्षा विवेकी असतात हे सोदाहरण प्रदिपादिले होते. ते टिपण प्रसिद्ध करून त्यावर चर्चा घडववून आणण्यास हरकत नसावी.
(५) मासिक हे नुसते चर्चेसाठी नसावे. प्रबोधनपर प्रचारासाठी प्रामुख्याने असावे. प्रबोधनपर प्रचाराची आज नितांत आवश्यकता आहे.
(६) लेखकांकडून लिखाण आल्यास त्याची पोहोच ताबडतोब द्यावी व निर्णय यथावकाश कळवावा. त्यासाठी लेखकांनी लिखाणासोबत पुरेशी टपाल तिकीटे पाठवावी अशी सूचना योग्य वाटल्यास पुढच्या अंकात द्यावी.
(७) प्रसिद्ध होणारे बरेचसे लिखाण वाचतांना वाचकांची दमछाक होते. असे होऊ नये.
(८) लेख वाचताना आपण देवळात बसलो आहोत व पुराणिकाचे पुराण ऐकतो आहोत असा आभास निर्माण करणारे लेख मासिकाची तुटपुंजी पृष्ठसंख्या विचारात घेऊन कटाक्षाने टाळावे.
(९) विशेषांकांचा उपक्रम स्वागतार्ह आहे. नीरक्षीर न्यायाने योग्य सूचना स्वीकाराल व अयोग्य सूचना अव्हेराल याची खात्रीआहे.
क. लो. अ. ही. वि.
आपला
ग. य. धारप