संपादक, आजचा सुधारक,
स. न. वि. वि.
श्री. के. रा. जोशींचा “संदर्भ न पाहता लावले जाणारे अर्थ” हा लेख संभ्रमात टाकणारा आहेच, शिवाय त्यांच्या प्रामाणिकपणाविषयी संशय निर्माण करणारा आहे. पहिल्या भागात त्यांनी केलेले “शौच” चे आंतर-बाह्य स्वच्छता हे भाषांतर मनुस्मृतीतीलआशौच” या शब्दापासून बरेच दूरचे आहे. आशौच ही धार्मिक (religious) क्रिया असून त्याचा शिवाशिवाशी (स्पर्शजन्य विटाळ) संबंध आहे. अभ्यासूंनी मनुस्मृतीतील पाचवा अध्याय वाचल्यास याचा बोध होतो. ‘अस्पृश्यता’ येथूनच उगम पावते.
त्यांच्या दुसर्या’ भागातील भाषांतरात व वि. वा. बापटांच्या भाषांतरात खूप अंतर आहे. ज्यास श्री. जोशी संरक्षण पुरवावे असे म्हणतात त्यास श्री. बापट वश करून घ्यावे हा शब्दप्रयोग वापरतात. श्री. बापटांनी दिलेला अर्थ याप्रमाणे आहे.पिता भ्राता इत्यादि स्त्रियांच्या आप्तांनी स्त्रियांस सर्वदा आपल्या अधीन ठेवावे. शास्त्राने ज्यांचा निषेध केला नाही अशा रूपरसादि सामान्य विषयांमध्येही त्या आसक्त होऊ लागल्यास त्यांस आपल्या वश करून घ्यावे (९/२). विवाहाच्या पूर्वी पित्याने रक्षण करावे, त्यानंतर पतीने त्यांचेसंरक्षण करावे व पतीच्या मागे पुत्रांनी रक्षण करावे. सारांश कोणतीही स्त्री स्वातंत्र्यास योग्य नाही (९/३).
या सोबत श्री. जोशींनी जे रक्षणासंबंधी विवेचन केले आहे ते योग्य दिसत नाही. एखाद्याच्या रक्षणाची जबाबदारी घेणे हा त्या व्यक्तीस कह्यात ठेवण्याचा मार्ग असतो. त्यात नेहमीच स्वातंत्र्याचा संकोच होतो. हे अगदी पंतप्रधान, राष्ट्रपती वा सलमान रश्दींच्या उदाहरणावरून सहज स्पष्ट होते. जेव्हा स्वखुषीने घेतलेल्या संरक्षणाची ही कथा तर लादलेल्या संरक्षणात काय होऊ शकते याची कल्पना केलेली बरी.
श्री. जोशी हे आपल्या संस्कृत-पांडित्याबद्दल प्रसिद्ध आहेत. तसेच सुधारकचे वस्तुनिष्ठ वाद घालणारे लेखक आहेत. त्यांच्याकडून म्हणूनच गफलतींची अपेक्षा नाही. म्हणूनच त्यांच्या हेतूची न येऊ ती शंका येते. ती दूर करण्यास त्यांनी संदर्भानुसार व शब्दशः भाषांतर करावे व आपण ते छापावे ही विनंती. त्यांनी यासाठी नवव्या अध्यायातील पहिल्या वीस श्लोकांचे भाषांतर केल्यास संदर्भ सोडल्याचा आरोप राहणार नाही.
- प्रमोद सहस्रबुद्धे