चर्चा : संदर्भ न पाहता लावलेले अर्थ

संपादक आजचा सुधारक यांस,
स.न.वि.वि.
“संदर्भ न पाहता लावले जाणारे अर्थ” हे, याच नावाने लिहिलेल्या (आजचा सुधारक, मे १९९४) के. रा. जोशी यांच्या लेखातील मजकुराचेच रास्त वर्णन असावे असे वाटते. ‘मनूची निंदा करण्यासाठी ज्या वचनाचा भरमसाठ आधार घेतला जातो. या प्रस्तावासह ‘न स्त्री स्वातंत्र्यमर्हति’ चा जोशी यांनी दिलेला अर्थ असा की “स्त्रियेला कुठल्याही अवस्थेत संरक्षणासाठी स्वातंत्र्याची (स्वतःवर निर्भर राहण्याची) पाळी येऊ नये.” श्री. जोशी यांच्या मते मनूने या श्लोकाद्वारे स्त्रियांना सामाजिक सुरक्षेचे कवच दिले असून, आजच्या परिस्थितीत (‘मनूला बुरसट मानणार्याो व स्वतःला प्रगत मानणार्याा समाजाच्या संदर्भात) ‘मनूच्या या उपाययोजनेची दखल घेण्यासारखी नाही काय हे प्रत्येकाने निर्मळ मनाने स्वतःशीच ठरवावे असा त्यांनी वाचकास कळकळीचा सल्ला दिला आहे.
‘स्वातंत्र्यास योग्य नसणे’ या सरळसोट वाक्यरचनेचा ‘स्वरक्षणासाठी स्वतःवर निर्भर राहण्याची पाळी न येणे’ असा तिरकस अर्थ जोशी यांनी लावला आहे.’अर्ह’ या शब्दाचा वा. शि. आपटे यांच्या शब्दकोशातील अर्थ “worthy of, entitled to, respectable”, असा असला तरी, संदर्भाने वेगळा अर्थ बर्यावच शब्दांचा होतो हे एकदम मान्य. मात्र तसा अर्थ काढण्यासाठी जोशी यांनी मनुस्मृतीच्या नवव्या अध्यायातील फक्त पहिल्या दोन श्लोकांचा आधार घेऊन एकदम ‘वरील संदर्भावरून काही गोष्टी स्पष्ट होतात असे सांगत मनूऐवजी स्वतःचेच स्पष्टीकरण मांडले आहे.
ज्या नवव्या अध्यायातील केवळ पहिल्या दोन श्लोकांच्या आधारे त्यांनी हा निष्कर्ष काढला आहे त्याच अध्यायातील लगेच येणारे व त्याच विषयावर असणारे आणखी काही श्लोक त्यांनी दिले असते तर ’निर्मळ मनाने ठरविण्यास’ वाचकांना फारच सोपे गेले असते व खुद्द जोशी यांचेच लेखन “संदर्भ न पाहता लावले जाणारे अर्थ” या सदरात घालणे भाग न पडते. मनूचे सर्वच स्त्रीद्वेष्टे श्लोक येथे देणे अनावश्यक आहे. पण या संदर्भातले खालील श्लोक पाहावेत.
“धनसंग्रह करणे, (धनाचा) विनियोग करणे, शरीर शुद्ध ठेवणे, पतिशुश्रूषा, गृहातील उपकरणांची देखरेख अशा कामांमध्ये स्त्रीला लावावे (म्हणजे ती कुमार्गी न लागता सुरक्षित राहील) (९-११). (पण) घरात कोंडून ठेवण्याने स्त्रिया सुरक्षित राहात नाहीत, तर धर्मज्ञानाने ज्या आपले आपण संरक्षण करतात त्याच सुरक्षित राहतात (९-१२). मद्यपान, दुर्जनसमागम, पतीपासून दूर राहणे, भटकणे, अवेळी झोपणे व परगृही राहणे हे सहा स्त्रीकडून व्यभिचार करविणारे दोष आहेत (म्हणून तीस त्यांपासून जपावे.) (९-१३). स्त्रिया सुंदर रूप किंवा वय याचा विचार न करता सुरूप असो वा कुरूप, केवळ पुरुष आहे एवढ्याच कारणाने त्याचा भोग घेतात (९-१४). पुरुषास पाहताच संभोगाभिलाषा होणे हा त्यांचा स्वभाव असल्यामुळे व स्वभावतःच त्या स्नेहशून्य असल्यामुळे रक्षण केले तरी त्या व्यभिचारमार्गे पतिविरुद्ध जातात (९-१५). हा त्यांचा जगाच्या आरंभापासूनचा निसर्गदत्त स्वभाव आहे असे जाणून पुरुषाने प्रयत्नपूर्वक त्यांचे संरक्षण करावे (९-१६). झोप, बसून राहणे, दागिन्यांची हौस, काम, क्रोध, सरळपणा नसणे, परहिंसा व निंद्य आचार हे (अव)गुण मनूने त्यांना सुरुवातीपासून दिलेले आहेत (९-१७). स्त्रियांस धर्माधिकार नसल्यामुळे व पापाचा नाश करणारा (वैदिक) मंत्र त्यांस जपण्याचा अधिकार नसल्याने पाप झाले तरी त्या असत्याप्रमाणे अशुभ व असमर्थ राहतात ही स्थिती आहे (म्हणून त्यांचे पापापासून रक्षण करावे) (९-१८). (व्यभिचारशीलत्व हा स्त्रीस्वभावच आहे) अशा अनेक श्रुती वेदांमध्ये आढळतात त्यातील एक आता ऐका (९-१९). मातेचा मानसिक व्यभिचार ओळखून कुणी एक पुत्र म्हणतो, ‘जी माझी माता मन, वाणी, शरीर यायोगे परपुरुषवासनेने दूपित झाली तिचे रज माझा पिता शुद्ध करो’ (९-२०). जशा जशा पुरुषाशी स्त्रीचा संयोग होतो तशी तशी ती स्त्री चांगली किंवा वाईट बनते, जशी समुद्राशी संयुक्त झालेली गोडी नदी खारी बनते तशी (९-२२)
वरीलप्रमाणे ही श्लोकांची यादी आणखीही लांबवणे शक्य आहे. पण तो मोह आवरतो. मुद्दा हो राहतो की श्री. जोशी यांनी हे वाचलेच नसेल हे शक्य आहे काय? जर वाचले असेल तर आणखी कुठला वकिली अर्थ या श्लोकांना लावून त्यांनी मनूचे श्रेष्ठत्व आमच्या गळी उतरवायचे ठरविले आहे?
तसा नवव्या अध्यायापूर्वी पाचव्या अध्यायात (५.१४७, १४८, १४९) आधीच एकदा न स्त्री स्वातंत्र्यमर्हति हा मुद्दाअधिक स्पष्टपणे आलेला आहे. तेथे मनू म्हणतो,
बालया वा युवत्या वा वृद्धया वापि योषिता ।
न स्वातंत्र्येण कर्तव्यं किंचित्कार्य गृहेष्वपि ।।
बाल्ये पितुर्वशे तिष्ठेत्पाणिग्राहस्य यौवने ।
पुत्राणां भर्तरि प्रेते न भजेत्स्त्री स्वतंत्रताम् ।।
पित्रा भर्त्रा सुतैर्वापि नेच्छेद्विरहमात्मनः ।
एषां हि विरहेण स्त्री गर्ह्ये कुर्यादुभे कुले ।।
या श्लोकांचे भाषांतर वि. वा. बापटांनी असे केले आहेः “बाल्यावस्थेतील मुलीने, तरुण स्त्रीने, किंवा वृद्धेनेही एखादे लहानसे कार्यही स्वतंत्रपणे करू नये. बाल्यावस्थेत पित्याच्या अधीन होऊन रहावे, तरुणपणी पतीच्या आज्ञेत रहावे व म्हातारपणी मुलाच्या संमतीने चालावे, पण कधीही स्त्रीने स्वतंत्र होऊ नये. पिता, पती किंवा पुत्र यांस सोडून राहण्याची इच्छा स्त्रीने कधीही करू नये कारण अशी स्त्री दुष्ट झाल्यास आपल्या दोन्ही कुलांस निंद्य करते.
मनुस्मृती मला या कारणासाठी आवडते की येथे एक घाव दोन तुकडे असा प्रकार आहे. मनूला जे योग्य वाटले ते त्याने स्पष्ट लिहिले व शक्यतो कुठे दुमताला जागा ठेवली नाही. ’चातुर्वर्ण्य गुणाधारित की जन्माधारित’, आणि गुण या जन्मीचा की गेल्या जन्मीचा, वगैरेसारखी गीतेबाबत करता येते तशी मखलाशी मनुस्मृतीबाबत करता येत नाही.‘वर्ण हा जन्मावरच आधारित आहे, दुसर्या कशावर नाही’ असे मनू ठणकावून सांगतो. पण असे असूनही जोशींसारख्यांचा वकिली कावा असतोच; जो मनूला मान्य नसलेले अर्थ त्यांच्या गळी स्वतःची (विसाव्या शतकात) सोय करण्यासाठी उतरवीत असतो व आम्हा वाचकांना गंडवत असतो.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.