साधना साप्ताहिकाच्या १ मे १९९४ रोजी प्रसिद्ध झालेल्या ना. ग. गोरे प्रथम स्मृतिदिन विशेषांकात डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी लिहिलेल्या लेखात एक मूलभूत प्रश्न उपस्थित केला आहे. ते म्हणतात की ‘आगरकरांचा अपवाद सोडला तर सर्व समाजसुधारकांनी धर्मसुधारणेची चळवळ चालविली ही त्यांची वैचारिक मर्यादा होती की प्रगल्भता? डॉ.आंबेडकर, गाडगेमहाराज यांच्यानंतरच्या जवळपासच्या गेल्या अर्धशतकात महाराष्ट्रात धर्मभावनेविषयी जनसामान्यांच्या मनाशी होणारा संवाद थांबला, कृतिकार्यक्रम तर दूरचराहिला, हे परिवर्तनवादी शक्तींच्या दृष्टीने इष्ट की अनिष्ट?… नानासाहेब व त्यांच्यानंतरच्या दोन पिढ्या, ज्या सर्वांच्यापासून आम्ही वैचारिक मार्गदर्शन घेतले, ते सर्वजण याबाबत निःसंदेह होते. आज चळवळीत असलेल्या अनेक तरुण कार्यकर्त्यांना हे। आकलन प्रश्नचिन्हांकित करावेसे वाटते… त्यांचे मत थोडक्यात असे की प्रतिगामी शक्तींचा पायाभूत आधार धर्मच आहे अशी मांडणी बहुतेक सर्व परिवर्तनवादी करत आले आहेत. स्वाभाविकच तर्काच्या आधारे धर्म निरर्थक ठरवून कोट्यवधि माणसांच्या मनातून त्याचे अस्तित्व पुसून काढण्याची वा किमान निरर्थक ठरविण्याची महत्त्वाकांक्षा बाळगली गेली. परंतु जनमानसाची धार्मिकता समजून घेण्यात अपुर्या् आकलनाने झालेली ही चूक होती काय?या भूमिकेमुळे पुरोगाम्यांनी धर्माकडे पाठ फिरवली, आणि लोकांनी स्वाभाविकपणे त्यांच्याकडे पाठ फिरविली…. कोणत्याही धर्माचा मूलभूत अस्सल आशय हा शोषण विरोधी आणि मानवतावादी असाच होता. ही खरी धार्मिकता पद्धतशीरपणेबाजूला सारून धर्मविधींचे पोकळ पालन, मूल्यविवेकाचा पूर्ण अभाव, अहंकारी हिंसक आक्रमकता – हे धर्मकल्पनेचे मुख्य लक्षण बनविण्याचा पद्धतशीर प्रयत्न चालू आहे. जनसमूहाच्या पातळीवर याचा मुकाबला कसा करावयाचा?खर्याम धार्मिकतेचे वेगळेपण मान्य करून, संवर्धन करून, की धर्म नाकारून?प्रश्न अंधश्रद्धानिर्मूलनाचा असो, जमातवादाच्या मुकाबल्याचा असो, की धर्मनिरपेक्ष राष्ट्रउभारणीचा असो, त्यासाठी धर्मभावनेचे सखोल चिंतन व त्या आधारे अधिक अर्थपूर्ण (केवळ व्यवहारी नव्हे) कृतिकार्यक्रम महत्त्वाचा ठरत नाही काय?’
नानासाहेबांचे धर्मविरोधी मार्गदर्शन ज्यांना प्रश्नचिन्हांकित करावेसे वाटते ती तरुण कार्यकर्ती मंडळी कोण आहेत हे मला माहीत नाही; परंतु त्यांच्या मनात असा किंतु निर्माण झाला आहे हे खरे असेल तर ती चिंताजनक गोष्ट आहे हे निश्चित. अंधश्रद्धेचे निर्मूलन करावयास निघालेल्या मनुष्यास धर्माचे निर्मूलन करावे लागणे क्रमप्राप्त आहे.अंधश्रद्धानिर्मूलनाचे ध्येयच सोडून द्यायचे असेल तर गोष्ट वेगळी.
धर्माचा पाया श्रद्धा आहे हे खुद्द धार्मिकच मान्य करतात. फक्त त्यांचे म्हणणे असे असते की ती श्रद्धा अंधश्रद्धा नव्हे, डोळस श्रद्धा असते. पण हे म्हणणे अनाकलनीय आहे.श्रद्धा म्हणजे ज्या गोष्टीच्या सत्यत्वाचा कसलाही पुरावा नाही तिच्या सत्यत्वावरील अढळ विश्वास. धर्मावरील श्रद्धा याच जातीची आहे. ईश्वर, पापपुण्य, स्वर्गनरक, परलोक, पुनर्जन्म, इत्यादि कोणत्याही गोष्टीचा कसलाही पुरावा उपलब्ध नाही. या सर्व गोष्टींची साधक प्रमाणे देण्याचे असंख्य प्रयत्न मी-मी म्हणणार्यां कडून आजवर केले गेले आहेत. परंतु त्यांपैकी एकही अंशतः देखील निर्णायक नाही हे असंख्य वेळा दाखवून झाले आहे. ज्याचा पुरावा असेल त्यावरच आणि तो ज्या प्रमाणात असेल त्या प्रमाणातच विश्वास ठेवावा हे जर विवेकवादाचे पहिले तत्त्व असेल तर धर्माच्या वरील अंगावरील विश्वास विवेकविरोधी आहे हे मान्य करण्यावाचून गत्यंतर नाही. अंधाहून अंध श्रद्धेचाच तो प्रकारहोईल.
इथे असा प्रश्न उपस्थित होण्याचा संभव आहे की श्रद्धेत असा काय दोष आहे की ज्यामुळे आपण तिचा सर्वथा त्याग करावा?त्याचे उत्तर असे आहे की एखाद्या गोष्टीचा श्रद्धेने सत्य म्हणून स्वीकार करणे ही गोष्ट अत्यंत असमंजस आहे. एखादे विधान तू का सत्य मानतोस? याला ‘माझी त्यावर श्रद्धा आहे हे उत्तर पूर्णपणे गैरलागू आहे. मनुष्याजवळ आपल्या मतांची चिकित्सा करण्याचे एक साधन आहे, आणि ते वापरण्याची शक्तीही आहे. ते साधन न वापरता अचिकित्सकपणे मते बनविणे आणि त्यांना श्रद्धेचा आधार देणे ही गोष्ट माणसाला शोभणारी नाही. ज्यांची बुद्धी अप्रगल्भ आहे असे आदिवासी मानव, बालके इत्यादींनी आपले विश्वास न तपासता स्वीकारले तर त्यांना दोष देता येत नाही, कारण त्यांच्याजवळ त्यांचा विवेक करण्याची शक्तीच नसते, किंवा असलीच तर अगदीच प्रारंभिक स्वरूपाची असते. परंतु ज्यांची बुद्धी पुरेशी प्रगल्भ झाली आहे त्यांनी अप्रगल्भ बुद्धीच्या माणसासारखे वागणे ही लाजिरवाणी गोष्ट आहे.
डॉ. दाभोलकरांच्या युक्तिवादातील प्रमुख मुद्दे पुढील आहेत :
(१) जनमानसाच्या धार्मिकतेचे पुरोगाम्यांकडून अपुरे आकलन झाले, आणि त्यामुळे त्यांनी धर्माकडे पाठ फिरविली.
(२) कोणत्याही धर्माचा मूलभूत अस्सल आशय शोषणविरोधी आणि मानवतावादीच होता. परंतु या खर्याठ धार्मिकतेकडे दुर्लक्ष करून धर्मविधींचे पोकळ पालन, मूल्यविवेकाचा पूर्ण अभाव, अहंकारी हिंसक आक्रमकता हे धार्मिकतेचे मुख्य लक्षण बनविले गेले.
(३) धर्मभावनेचे सखोल चिंतन आणि त्याआधारे अधिक अर्थपूर्ण कार्यक्रम स्वीकारणे हे अधिक महत्त्वाचे आहे.
या मुद्द्यांचा आता आपण क्रमाने विचार करू.
१. जनमानसाच्या धार्मिकतेचे पुरोगाम्यांचे आकलन अपुरे झाले हे खरे असेल तर ते एवढ्याच अर्थाने की धर्मभावनेची पकड मानवी मनावर किती खोल रुजलेली आणि किती पक्की असते हे त्यांनी पुरेसे ओळखले नाही. बुद्धिमंतांचीही श्रद्धा डळमळीत करणे जिथे दुरापास्त असते तिथे सामान्य लोकांची दृढमूल श्रद्धा जवळपास अचल असल्यास आश्चर्य नाही. त्यामुळे धर्मभावनेचे उच्चाटन ही अशक्यप्राय गोष्ट आहे, हे त्यांच्या लक्षातआले नाही. पण याचा अर्थ एवढाच होतो की पुरोगाम्यांना आपल्या उद्दिष्टांच्या दुष्करतेची पुरेशी स्पष्ट कल्पना नव्हती. आपले काम किती प्रचंड आहे, आणि ते पिढ्यानुपिढ्या पुरणारे आहे याची जाणीव नसल्यामुळे, आपल्या प्रयत्नांना फारसे यश येत नाही हे पाहून ते नाउमेद झाले असावेत. हे काम दहापाच तर राहोच, पण शेदोनशे वर्षातही पुरे होणारे नाही ही खूणगाठ बांधून त्यांना कंबर कसावी लागेल.
२. डॉ. दाभोलकर म्हणतात की खरी धार्मिकता किंवा धर्माचा अस्सल आशय याकडे पुरोगाम्यांचे दुर्लक्ष होते, आणि धर्मविधींचे पोकळ पालन म्हणजे धर्म असे ते समजतात. हे अनर्थकारक आहे असे त्यांचे म्हणणे आहे. तेव्हा धर्माचा अस्सल आशय काय आहे याचा थोडा शोध घेऊ.
सर्व धर्माचा अस्सल आशय एकच आहे असे डॉ. दाभोलकर म्हणतात. आता सर्व धर्मात समान काही तरी आहे हे निःसंशय, एरव्ही आपण त्या सर्वांना धर्म म्हणालो नसतो. पण हे म्हणणे खरे असले तरी ते पूर्णपणे खरे नाही. सर्व धर्मात समान अशा काही गोष्टी असल्या तरी प्रत्येक धर्म अन्य सर्व धर्माहून वेगळाही असतो, आणि धर्मसंस्थापक आणि धर्मानुयायी यांच्या दृष्टीने अन्य सर्व धर्माहून वेगळा असलेला धर्मच महत्त्वाचा असतो. सर्वधर्मसमभाव मानणारे महात्मा गांधीसुद्धा आपल्याला हिंदू धर्माची मातब्बरी अन्य सर्व धर्माहून अधिक वाटत असल्याचे म्हणतात. (‘… the Hindu religion which I certainly prize above all other religions’,All Men are Brothers, 2.2). जगात धर्म अनेक आहेत. केवळ धर्म – म्हणजे जो हिंदू नाही, मुस्लिम नाही, बौद्ध नाही, ख्रिस्ती नाही, फक्त धर्म आहे असा – नाही. ज्याप्रमाणे जगात अनेक पशू आहेत, पण ‘पशू’ नावाची एक वस्तू नाही. जगात गाय आहे, म्हैस आहे, घोडा आहे, इ.; पण जो यांपैकी काहीही नाहीआणि फक्त पशू आहे असे काही नाही. आणि तसेच गाय म्हणजे म्हैस नव्हे, आणि घोडा म्हणजे गाढव नव्हे. आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की जगात धर्म (अनेकवचनी – religions) आहेत, पण धर्म (एकवचनी-religion) – शुद्ध धर्म नाही. त्यामुळे कोणताही धार्मिक घेतला की तो हिंदू तरी असतो, किंवा मुसलमान तरी असतो, किंवा अन्य शेकडो धर्मापैकी कोणत्या तरी एका धर्माचा अनुयायी असतो, केवळ धार्मिक, शुद्ध, निर्विशेष धार्मिक कोणीही नसतो. कोणत्याही धर्माचे सार त्याच्या वैशिष्ट्यांत, अन्य सर्व धर्माहून वेगळे असण्यात आहे. आणि त्यामुळे सर्व धर्मात जे साम्य सखोल चिंतनाने जाणवते त्याचे कोणत्याही धर्माच्या दृष्टीने काही महत्त्व नाही. जो पैगंबर मानत नाही, कुराणावर ज्याची श्रद्धा नाही, शरियाप्रणीत विधिनिषेध पाळीत नाही तो मुसलमान नाही. आणि त्याचप्रमाणे जो वेद, उपनिषदे, गीता, रामायण, महाभारत मानीत नाही तो हिंदू नाही. म्हणून सर्व धर्माचे सखोल चिंतन करून त्यांचे समान सार हुडकून काढल्यावर तो उद्योग निरुपयोगीआहे हे आपल्या ध्यानात येते.
डॉ. दाभोलकर म्हणतात की सर्वच धर्माचा अस्सल आशय शोषणविरोधी आणि मानवतावादी असतो. हे ते कोणत्या आधाराने म्हणतात हे कळायला मार्ग नाही. वास्तविक धर्म आणि शोषणविरोध यांचा कसलाही संबंध नाही. उदा. हिंदुधर्माच्या कोणत्या ग्रंथांतत्यांना शोषणविरोध दिसला?वेदांत?उपनिषदांत?की मनुस्मृतीत?आणि मानवतावाद ही कल्पना तर त्या शब्दाप्रमाणे अगदीच नवी आहे, आणि तिचा धर्माशी कसलाही संबंध नाही. येशूने सर्व रंजल्यागांजल्यांना स्वर्गाचे राज्य देऊ केले, पण त्याकरिता ख्रिस्ती झाले पाहिजे अशी अट होती. अन्य लोकांना निरंतर नरकातून सुटका नाही.
डॉ. दाभोलकरांचे म्हणणे वाच्यार्थाने घेणे कदाचित् बरोबर नसेल. तसे न करता जरा सैल अर्थ केला तर त्यात सत्यांश आहे असे म्हणता येईल. तो सत्यांश म्हणजे धर्मात नीतीचा अंतर्भाव असतो, आणि ही नीती बर्याकच प्रमाणात सर्व धर्मात समान असते. उदा. खरे बोलावे, हिंसा करू नये, शेजाच्यावर प्रेम करावे, इत्यादि गोष्टी सर्व धर्मांना मान्य असतात. पण शुद्ध नैतिक गोष्टी आणि धार्मिक गोष्टी यांची धर्मत इतकी सरमिसळ झालेली असते की नैतिक काय आणि धार्मिक काय याचा निर्णय करणे कठीण होते. बहुधा प्रारंभी नीती आणि धर्म एकत्रच होते. नैतिक कल्पनाचा उगम कदाचित् धार्मिक जीवनातच झाला असेल. पण असे असले तरी धार्मिक प्रेरणा वेगळी आणि नैतिक प्रेरणा वेगळी. त्या प्रेरणा जरी आरंभी एकत्र असल्या तरी जेव्हा शुद्ध नैतिक प्रेरणेची कल्पना स्पष्ट झाली तेव्हा ती स्वतंत्र प्रेरणा असून तिला धार्मिक प्रेरणेची गरज नाही हे दिसून आले. वैचारिक स्पष्टता आणि व्यावहारिक सफलता या दोन्ही दृष्टींनी नैतिक प्रेरणेचे स्वातंत्र्य लक्षात ठेवणे श्रेयस्कर आहे. या दृष्टीने पाहता सर्व धर्माचे नैतिक शिकवण स्थूलमानाने एकच असते. एवढ्यावरून सर्व धर्माचा अस्सल आशय एकच असतो असे म्हणणे दिशाभूल करणारे आहे. खरी धार्मिकता म्हणजे धर्मविधींचे पालन, मूल्यविवेकाचा अभाव, आणि हिंसक आक्रमकता, निदान परधर्माच्या आक्रमणाविरुद्ध सदैव जागरूकता – ह्यातच सामावलेली आहे.
सर्वधर्मसमभाव किंवा सर्व धर्म सारखेच चांगले आहेत असे म्हणणार्या् लोकांची धार्मिकता खूपच पातळ झालेली असते. एरवी आपला धर्म अन्य धर्मापेक्षा श्रेष्ठ नाही असे ते म्हणते ना. सर्वधर्मसमभाववादी मनुष्य एका अर्थाने निधार्मिकच झालेला असतो; कारण त्याच्या मते सर्व धर्म समान असल्यामुळे कोणत्याच धर्माचा (म्हणजे धर्मविधींचा) अधिकार त्याला मान्य नसतो.
३. धार्मिकतेचे सखोल चिंतन करून पुरोगाम्यांनी अधिक अर्थपूर्ण कार्यक्रम स्वीकारला पाहिजे, असे डॉ. दाभोलकर म्हणतात. धार्मिकतेचे सखोल चिंतन करून त्यांना त्यात काय सापडते ते मला माहीत नाही. पण मला मात्र धार्मिकता म्हणजे श्रद्धेनेघातलेला धुमाकूळ याहून वेगळे तत्त्व सापडत नाही. डॉ. दाभोलकर अंधश्रद्धानिर्मूलनाचे कार्य करतात, आणि ते कार्य केले पाहिजे यासंबंधी ते निःशंक असावेत असा माझा तर्क आहे. आता जनसामान्यांच्या अंधश्रद्धेवर हल्ला करताना ते जी साधने वापरणार ती तर्क आणि विवेक हीच असणार. मरीआईला बोकड बळी देणे, खंडोबाला मुरळी सोडणे या प्रथा अंधश्रद्धेवर आधारलेल्या आहेत, आणि म्हणून या गोष्टी आपण टाकून दिल्या पाहिजेत असे ते त्या प्रथा पाळणार्यांशना सांगणार. पण ज्या प्रकारचे युक्तिवाद ते अंधश्रद्धांविरुद्ध करतात, ते नेमके तेच युक्तिवाद प्रगल्भ धर्मश्रद्धेविरुद्धही लागू होतात. मरीआईला बोकडदिला नाही तर ती रागावते आणि आपल्यावर काही अरिष्ट येते हे खोटे आहे, कारण त्याचा कसलाही पुरावा नाही, उलट त्याच्याविरुद्ध भरपूर पुरावा आहे हेच ते भक्तांना सांगत असणार. मग हेच युक्तिवाद धार्मिकांच्या अस्सल श्रद्धांविरुद्धही लागू होतात हे त्यांना का सांगायचे नाही? ईश्वराच्या अस्तित्वाचा कसलाही पुरावा नाही हे आपण त्यांना सांगणार का नाही?पुनर्जन्म, स्वर्ग-नरक इत्यादि गोष्टी पूर्णपणे काल्पनिक असून त्यांना कसलेही प्रमाण नाही हे त्यांना का सांगायचे नाही. जनसामान्यांच्या धार्मिक भावनांची कदर करायची म्हणजे त्यांना सर्व प्रकारच्या निराधार, काल्पनिक गोष्टी सत्य मानू द्यायच्या? त्यांना धर्मगुरूंच्या जोखडाखाली राहू द्यायचे?सामान्य मनुष्य अज्ञ किंवा अडाणी असेल, आणि त्याच्या ठिकाणी तात्त्वज्ञानिक युक्तिवाद समजण्याची ताकद नसेल. पण धर्म मानणारे सर्वच अडाणीआणि अशिक्षित नसतात. आपल्या सुशिक्षित समाजातील ९०% (किंवा त्याहूनही अधिक) लोक धार्मिक आहेत. त्यांनाही धर्माचे वैयर्थ्य सांगायचे नाही काय?आणि अशिक्षित माणसाच्या मनावरही धर्माचा पगडा बिंबवण्यासही युक्तिवाद केले जातातच. उदा. ‘सर्व मनुष्य एकाच परमेश्वराची लेकरे आहेत’, किंवा ‘आत्मा आणि परमात्मा एकच आहेत’, ’जे पिंडी ते ब्रह्मांडी’ ही वाक्ये आपण त्यांना ऐकवीत नाही काय?ती जर त्यांना कळतात, तर त्यांच्यावरील टीकाही त्यांना कळेल. धर्मपरीक्षेतील सर्वच युक्तिवाद गहन असतात असे नाही.
ज्या तरुण कार्यकर्त्यांना नानासाहेबांचे मार्गदर्शन प्रश्नचिन्हांकित करावेसे वाटते, त्यांनी शांतपणे आत्मपरीक्षण करावे. माझी अशी समजूत आहे की त्यांचा विवेकवादच कमी पडतो आहे. लहानपणी आपल्या सर्वांवरच धार्मिक संस्कार झालेले असतात. त्यांतून आपल्याला आपली सुटका करून घ्यावी लागते. पण ही सुटका कदाचित अपुरी झाली असेल, आणि मूळची आस्तिक वृत्ती पुन्हा डोके वर काढत असेल. तसे होता कामा नये. मुख्य मुद्दा कार्यकर्त्यांची बुद्धिनिष्ठा किंवा विवेकनिष्ठा कितपत पक्की आहे हा आहे. ती डळमळीत होऊ देणे अनर्थकारक होईल. लोक त्यांच्याकडे प्रथम पाठ फिरवितील हे अपेक्षितच आहे. विवेकनिष्ठा ही गोष्ट कठीण आहे, लोकांचे तिचे आकलन आंशिकच राहणार. पण तेआपल्याकडे पाठ फिरवितात म्हणून कार्यकत्र्यांनी धर्माला शरण जावे हा त्यावर उपाय खासच नाही.