संपादक
आजचा सुधारक ह्यांस,
आपल्या मार्च ९४ च्या अंकांतील प्रा. प्र. ब. कुळकर्णी ह्यांनी लिहिलेला ‘गोमंतकातील रथोत्सव’ हा लेख वाचून एक-दोन गोष्टी सहज लक्षात आल्या.
(१) मराठी माणसे (व-हाडातली काय, पश्चिम महाराष्ट्रातील काय) मराठीसाहित्याभिमुख झाली आहेत किंवा होत आहेत हा कुळकर्ण्यांचा आशावादी विश्वास फार मोहवणारा आहे ह्यात शंका नाही. वर्हामडाचे मला काही सांगता यायचे नाही, पण पश्चिम महाराष्ट्रात तरी मराठीची दुर्दशा लक्षात घेतली तर पन्नास-साठ शेवाळकरांनी कुळकर्णी म्हणतात तसे कार्य पन्नाससाठ वर्षे केले तर कदाचित थोडी धुगधुगी निर्माण होईल. एरवी राष्ट्रवाद्यांमुळे हिंदी व आंतरराष्ट्रीयवाद्यांमुळे इंग्रजी ह्या दोन भाषांचाच विकास व्हायचा हे स्वच्छ दिसते.
मजेची गोष्ट अशी की कुळकर्यांचा आशावादी विश्वास आणि खुद्द शेवाळकरांची याच विषयाबाबतची खंत समोरासमोरच्या पानावरच (३६८ व ३६९) होती! तथापि प्रा. कुळकर्णी मराठी साहित्यासंबंधी विदर्भापुरते का होईना एवढे आशावादी झाले ह्याचे श्रेय शेवाळकरांना द्यायला हवे. महाराष्ट्राचा कुठलाही भाग, आडवा उभा, साहित्याभिमुख झाला आहे ह्या अप्रूपावर एकदम विश्वास बसणे आजकालच्या जमान्यात कठीण हे तुम्हीही कबूल कराल. कालाचा दोष दुसरे काय?
(२) ‘पात्र शब्दाची उपपत्ती अभिनवभारतीतली आहे.’पात्रं तर्हि किम् । आस्वादनोपायम् ।।’ अशी नाट्यशास्त्रांतील ‘पात्र’ शब्दाची उकल तिथे करण्यात आली आहे. सारांश ही उकल ‘संस्कृत साहित्यशास्त्र’ इतक्या सर्वसाधारणहिशेबात न बसविता अभिनवगुप्ताच्या खात्यावर जमा करायला हवी अशी माझी समजूत आहे.
गोविंद पुरुषोत्तम देशपांडे
११५ उत्तराखंड जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, नवी दिल्ली ११००६७
श्री. संपादक,
आजचा सुधारक, नागपूर
यांस स.न.वि.वि.
एप्रिल ९४ च्या आजचा सुधारक मध्ये प्रा. प्र.ब. कुळकर्णी यांनी सातारच्या धर्मविषयक विचारवेध संमेलनाचा आढावा घेतला आहे. मी स्वतः ह्यासंमेलनाला गेलो होतो. प्रा. कुळकर्णी यांच्या विश्लेषणाशी मी जवळजवळ १०० टक्के सहमत आहे.
हे संमेलन विचारविनिमयाच्या दृष्टीने केवळ एकतर्फी झाले. अनेक वक्त्यांनी पुरेशी तयारी केली नव्हती असेही दिसून आले. कित्येकांनी राजकीय व्यासपीठावर द्यावीत तशी भाषणे दिली व चुकीची विधानेही केली.
डॉ. य. दि. फडके यांनी भा.ज.प.ला ‘धर्म’ शब्दाचा कोणता अर्थ अभिप्रेत आहे ह्याची चिकित्सा न करताच धर्म म्हणजे religion असे समजून जी टीका केली ती त्यांना शोभण्यासारखी नव्हती. चाणक्याच्या अर्थशास्त्रात ‘राष्ट्र’ म्हणजे जमीन महसूल होय असे चुकीचे विधानही त्यांनी केले. निरनिराळी उत्पन्ने कोणत्या शीर्षकांखाली जमा करावीत हे सांगतांना जमीन महसूल व इतर काही उत्पन्ने ‘राष्ट्र’ ह्या शीर्षकाखाली जमा करावीत असे चाणक्याने म्हटले आहे. राष्ट्र म्हणजे जमीन महसूल नव्हे. संघाच्या राष्ट्रीय नेत्यांच्या यादीत पारश्यालाही स्थान नाही असेही चुकीचे विधान त्यांनी केले. संघाच्या एकात्मता स्तोत्रांत जी राष्ट्रपुरुषांची यादी आहे तिच्या दादाभाई नौरोजी यांचा उल्लेख आहे व रसखान ह्या मुस्लिमाचाही उल्लेख आहे.
प्रा. कुळकर्णी यांच्या आढाव्यात श्री. राजन अन्वर यांचे तोंडी जे विधान घातले आहे ते बरोबर नाही असे मला वाटते. हिंदूंनी जर दंगे फिसाद केले तर त्यामुळे मुस्लिम समाज बिथरेल व त्यांच्यात सुधारणा घडवून आणणे कठीण जाईल असे आम्हाला वाटत असे, परंतु ६ डिसेंबरनंतर मुस्लिम समाज सुधारणेला अधिक अनुकूल झाला आहे अशा स्वरूपाचे विधान श्री. अन्वर यांनी केले होते.
एकंदरीत हे विचारवेध संमेलन विचारवेधाऐवजी विचारवध करणारे व विकारव्याधी जडलेले संमेलन झाले असे खेदाने म्हणावे लागेल.
आपला
श्री. गो. काशीकर