[‘दाऊदी बोहरा जमात आणि मानवी अधिकार’ या नावाच्या श्री. असगरअली इंजनिअर यांचा लेख मेनस्ट्रीम या नियतकालिकाच्या ५ मार्चच्या अंकात आला आहे. त्यावर ताहिर पूनावाला यांची पुढील प्रतिक्रिया मननीय आहे. त्यांच्या मते मानवी अधिकार या गोंडस नावाखाली सूक्ष्म धर्मनिष्ठेचा प्रसार होत आहे. आणि हे प्रथमच होत आहे असेही नाही.]
सय्यदना हे सर्वोच्च धर्मगुरु असून ते ‘दाई’ म्हणवले जातात. ही दाई-(दावत) संस्था सुमारे ८ शे वर्षांपूर्वी इमाम तय्यब यांनी स्थापन केली. धर्मसत्तेच्या द्वारे राजसत्ता हस्तगत करण्यासाठी सुरू असलेल्या संघर्षात प्रतिस्पर्ध्यांकडून जिवाला धोका उत्पन्न झाला असता इमामांना अज्ञातवासी होणे भाग पडले. अज्ञात ठिकाणी प्रयाण करण्यापूर्वी त्यांनी आपला मुखत्यार म्हणून दाईची नेमणूक केली. आपण परत येईतो इमामाचे अधिकार दाईंनी वापरावे, अशी तरतूद केली. पण इमाम कधीच परतलेच नाहीत. मात्र इमाम तय्यबांची वंशवेल आजतायागत अखंड आहे असा बोहरा जमातीचा विश्वास आहे.
मुळात पैगंबर महंमद यांचे जावई अली यांच्या मृत्यूनंतर इमामत ही संस्था उदयास आली. हेतू हा की अलींच्या पुत्र-पौत्रांना विनायास वारसाहक्काने त्या पदावर आरूढ होता यावे. आता गेल्या ८ शे वर्षांच्या कालावधीत कोणीही इमामपदी नसताना बोहराजमात मात्र इमामत या संस्थेला घट्ट चिकटून आहे.
बोहरा असे मानतात की अल्लापर्यंत पोहोचण्यासाठी असलेल्या आरोहण मार्गावरची पहिली पायरी म्हणजे दाई ही संस्था आहे. त्यांचा तर्क असा की दाई न मानणे म्हणजे इमाम न मानणे, आणि पर्यायाने अलीही न मानणे. त्याचे पर्यवसान महंमद पैगंबर न मानणे आणि अखेरीस अल्ला नाकारणे यात होते. जो असे करील तो काफीर आहे, पाखंडी आहे आणि त्याला मरणोत्तर नरकयातना भोगणे अटळ आहे.
१४ वर्षांपूर्वी नाथवानी कमिशनने आणि आता तेवटिया कमिशनने – या दोघांचीही सय्यदनांनी तुच्छतापूर्वक उपेक्षा केलेली – ह्या रूढ समजुतींची खोलात जाऊन तपासणी केलीच नाही. नाथवानींनी परिवर्तनवादी बोहच्यांच्या छळवादाची चौकशी आरंभिली तेव्हा हा छळवाद बोहरा धर्म-सम्प्रदायाला अनुसरून आहे असे मानले जात होते.
आता तेवटिया कमिशनने जी चौकशी केली तिला मानवी हक्कभंगाची चौकशी म्हटले तरी तक्रारी त्याच होत्या. मुद्देही तेच आहेत. सय्यदनांनी तिचीही तुच्छतेने उपेक्षाच केली.
असगर अलींच्या प्रस्तुत लेखात उपस्थित केलेले प्रश्न जवळजवळ तेच आहेत. साक्षीसाठी पुढे आलेले लोकही तेच आणि कमिशनचे निष्कर्ष शब्दशः तेच आहेत. नाथवानी समितीने केलेल्या टीकेतून सय्यदनांनी काहीच धडा घेतलेला नाही असे तेवटिया कमिशनचे म्हणणे! खरे तर ही अपेक्षा करणे मुळातच भाबडेपणाचे आहे.
पुणे या ऐतिहासिक नगरीत १९८३ साली चवथी ऑल वर्ल्ड दाऊदी बोहरा (सुधारणावादी) कॉन्फरन्स झाली. तिच्यात नानासाहेब गोरे, एस्. एम्. जोशी, बाबा आढाव, आणि डॉ. राम ताकवले यांच्यासारखे लोक सहभागी होते. असगर अली इंजीनीअर यांच्या नेतृत्वाखाली गेली दोन दशके सुधारणावादी चळवळ अखंडितपणे चालू आहे. सय्यदनांनी कॉन्फरन्सची दखल तर घेतलीच नाही उलट उद्दामपणे तिचा उपहास मात्र केला. इतउत्तर अशी द्वैवार्षिक परिषद भरवणे हा एक निरर्थक उपचार ठरला आहे. कोणत्याच मागणीची तड लावली न गेल्याने ते एक स्नेहसम्मेलन मात्र ठरले आहे.
सय्यदना आणि त्यांचे चेले यांच्या सहकार्याअभावी पूर्वोक्त दोन्ही कमिशनांनी बोहरा जमातीच्या खर्या दुखण्यांकडे लक्षच पुरविले नाही. त्यांनी सर्वात आधी एक प्रश्नावली बनवून तक्रारकर्त्यांच्या निष्ठांचा तपास घ्यायला हवा होता. तसे झाले असते तर ते अगदी वेगळ्या निष्कर्षाप्रत येते असे मानायला जागा आहे.
बोहरा परिवर्तनवादी चळवळ खर्या अर्थी ‘परिवर्तनवादी’ नाहीच मुळी. ‘परिवर्तनवादी’ हे नाव फसवे आहे. त्याने अचिकित्सक बोहरेतर समाजाची सहानुभूती त्यांना लाभते. त्या लेखात म्हटले तशी ही चळवळ २० वर्षे जुनी नसून विसाव्या शतकातील पहिल्या दशकात सुरू झालेली आहे. शिवाय ही चळवळ परिवर्तनाची नसून केवळ विरोधाची आहे. तिचा विरोध (सांप्रदायिक) सिद्धान्त, विश्वास, निष्ठा, भोळ्यासमजुती, श्रद्धा आणि दाईसंस्था ह्यांना नाही. या कशाकशाला धक्का न लावता तिची अपेक्षा मात्र अशी की सय्यदना (दाई) चे आपल्या पूर्वसूरींसारखे परोपकारी साधुवृत्तीच्या धर्मगुंरूमध्ये परिवर्तन व्हावे. चळवळकर्त्यांच्या मनाचा ठाव घेतला तर त्यांना सय्यदनांच्याच कळपात अवमानित न होता शिरायचे आहे. त्या बाजूच्या अनुयायांशी सोयरीक जुळवून घ्यायची आहे.
मुस्लिम सत्यशोधक समाजाचे अध्वर्यु हमीद दलवाई एकदा जे म्हणाले होते ते संस्मरणीय आहे. धर्माचे नाव घेऊन सामाजिक सुधारणांचे समर्थन करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे धर्मग्रंथाचा अर्थ लावण्याचा अधिकार परंपरेने सांगणार्यांचे हात बळकट करणे आहे. म्हणून सुधारणावादी चळवळींचे नाव घेऊन येणारा पुनरुज्जीवनवाद आणि प्रबोधन यात फरक केला पाहिजे. आपल्याला विवेक आणि ज्ञान यांच्या पायावर प्रबोधन पुढे न्यायचे आहे.
मिसाक ही निष्ठेची शपथ किती निरर्थक अन कालबाह्य. तरी या संस्काराचे केवढे स्तोम! पारश्यांमधील नवज्योत किंवा हिंदूंमधील मौंजीबंधनासारखा हा विधी. बालके या वेळी हर्षभरित होतात, कारण तेव्हा ती सगळ्यांच्या आकर्षणाचे केंद्र असतात, अन् सर्वांकडून वाहवा आणि भेटवस्तूंचा वर्षाव सुरू असतो. शिवाय चमचमीत पदार्थाच्या मेजवान्या झडत असतात.
पण हा संस्कार एकशः करण्याऐवजी समूहशः केला असता त्या समारंभाच्या अंताबरोबरच त्याच्या प्रयोजनाचा अंत होतो.
जकात आकारणीद्वारे दाईला कल्पनातीत धनाढ्य बनविले आहे. हा कर धर्माज्ञा समजून दिला जातो, आणि बोहरा लोक तो खुशीने – मात्र प्रमाणिकपणे नव्हे – देतात. काळानुरूप भ्रष्ट असलेल्या शासनाकडून या प्रथेला आळा घातला जाईल किंवा तिचे उचित नियमन होईल अशी आशा धरणे म्हणजे गगनकुसुमाची मागणी करणे आहे.
सरतेशेवटी या परिवर्तनवादी चळवळीचा प्रवक्ता सय्यदनांना गैरइस्लामी (unIslamic) म्हणतो तेव्हा त्याची मोजपट्टी इस्लामीच राहाते आणि ती कुराण अन् हादीस यांच्या कक्षेतच घुटमळते हे उघड आहे.
या संदर्भात महबूब उल् हकचे शब्द आठवावेत. तुम्ही आपल्याला “पुरोगामी दृष्टीचे मुस्लिम’ म्हणवता. पण ही वदतोव्याघाती संकल्पना आहे. आणि तीमधून तुमच्या विचारांतील व्याघात प्रतिबिंबित होतो. मुस्लिम पुरोगामी दृष्टी असूच शकत नाही. कारण ती दृष्टी कुराणाने अवरुद्ध केली आहे. आणि तो जेव्हा हा अवरोध झुगारून पलीकडे पाहू लागतो तेव्हा तो मुस्लिम राहिलेलाच नसतो. केवळ ताकद अन् हिंमत यांच्या अभावी तसे कबूल करण्याचा हिय्या त्याला होत नसतो.’
ताहिर पूनावाला
(अनुवाद – प्र. ब. कुळकर्णी) ८८३, बुधवारपेठ, पुणे-४११००२