मानवाला जे ज्ञान प्राप्त होते ते फक्त प्रत्यक्ष आणि अनुमान यांनी होते. या प्रमाणांच्या पलीकडे साक्षात्कार नावाचे एक प्रमाण आहे, त्याने होणारे ज्ञान प्रत्यक्ष व अनुमान यांनी होणार्या ज्ञानापेक्षा अधिक प्रमाण आहे, म्हणजे प्रत्यक्ष व अनुमान यांनी झालेले ज्ञान साक्षात्काराने झालेल्या ज्ञानाच्या विरुद्ध असेल तर प्रत्यक्ष आणि अनुमान यांनी झालेले ज्ञान खोटे मानावे; शिवाय साक्षात्काराने अशा काही विषयांचे ज्ञान होते की जे प्रत्यक्ष व अनुमान यांनी होऊच शकत नाही असे एक मत प्रचलित आहे. ईश्वर, परलोक वगैरेंचे ज्ञान साक्षात्काराने होते व म्हणून साक्षात्काराच्या विरुद्ध प्रत्यक्ष व अनुमान यांची साक्ष अप्रमाण आहे असे साक्षात्कारवाद्यांचे म्हणणे आहे.
विवेकवाद साक्षात्काराचे अस्तित्व मानीत नाही असे मी जेव्हा प्रतिपादन करतो, तेव्हा माझ्यावर नेहमी अनेक इतिहासप्रसिद्ध साक्षात्कारी पुरुषांची नावे फेकण्यात येतात. ‘साक्षात्कार झालेल्या एवढ्या महान व्यक्ति होऊन गेल्या असताना साक्षात्काराचे अस्तित्व तुम्ही कसे नाकारू शकता?’ असा प्रश्न बिनतोड म्हणून विचारण्यात येतो. या प्रश्नाचे उत्तर देताना माझी फार पंचाईत होते. कारण या सर्व व्यक्ति इतिहासप्रसिद्ध व लक्षावधी लोकांच्या श्रद्धेचे स्थान बनलेल्या आहेत. प्रश्न विचारणार्यांची त्यांच्यावर नितान्त श्रद्धा असते. अर्थात् या व्यक्तींच्या साक्षात्कारसामर्थ्याबद्दल विज्ञानपूत विवेचन केले तर या श्रद्धाळू व्यक्तींवर ते समजण्याच्या दृष्टीने परिणाम न होता त्यांचा द्वेष संपादन करण्यात मात्र त्या विवेचनाची फलश्रुति होते.
दुसरे असे की साक्षात्कारी म्हणून ज्यांची नावे सांगण्यात येतात त्या बहुतेक व्यक्ती शेकडो, किंबहुना हजारो, वर्षापूर्वी झालेल्या आहेत. त्यापैकी बहुतेकांच्या विषयी खात्रीलायक अशी कोणतीच माहिती उपलब्ध नाही. तेव्हा ते साक्षात्कारी होते की नाही याची विज्ञानपूत चर्चा कशी करणार? तुकारामासारखे जे काही पुरुष गेल्या तीनशे वर्षांच्या अवधीत झालेले आहेत त्यांच्याही जीवनाबद्दल आख्यायिकांशिवाय जवळजवळ काहीच उपलब्ध नाही. तुकाराम सदेह स्वर्गाला गेले अशी आख्यायिका आहे, तर त्यांचा खून झाला असेही काही संशोधक म्हणतात. तेव्हा साक्षात्काराची वैज्ञानिक चर्चा करायला तुकारामांसारखी नावे उपयुक्त नाहीत.
अशी चर्चा करायला आधुनिक काळातील पुरुषांचेच उदाहरण घेतले पाहिजे, पण अशा व्यक्तींच्या खाजगी जीवनाबद्दलदेखील पुरेपूर माहिती उपलब्ध असली पाहिजे, केवळ प्रकाशाच्या झोतात असलेल्या सार्वजनिक जीवनाची माहिती असून भागणार नाही.
वरील अटी ज्यांच्या बाबतीत काही प्रमाणात पुर्या होतात अशी एक व्यक्ती आहे. ती म्हणजे रामकृष्ण परमहंस. रामकृष्ण परमहंस आधुनिक काळात झाल्यामुळे त्यांच्या चरित्राबद्दल पुष्कळ वाङ्मय उपलब्ध आहे. शिवाय साक्षात्काराच्या बाबतीत जी नावे माझ्यावर फेकण्यात येतात त्यांतले हे नाव आहे. तेव्हा रामकृष्णांबद्दलच्या उपलब्ध माहितीवरून साक्षात्काराचे अस्तित्व सिद्ध होते काय याचा विचार करणे उद्बोधक होईल.
हा विचार उद्बोधक होण्यासाठी रामकृष्णांध्या भक्तांनी आपल्या श्रद्धा थोडा वेळ बाजूला ठेवणे आवश्यक आहे. विषय समजून घेण्याची इच्छा नसताना केवळ मला चूप बसविण्यासाठी जे लोक रामकृष्णांचे नाव घेत असतील त्यांना हा लेख वाचून फायदा होणार नाही, उलट माझ्याबद्दल द्वेषभावच उत्पन्न होईल. तेव्हा आपली श्रद्धा थोडा वेळ बाजूला ठेवणे ज्यांना शक्य होणार नाही त्यांनी हा लेख वाचू नये. कुणाच्या भावना दुखविणे हा माझा उद्देश नसून सत्यावर प्रकाश टाकणे हा उद्देश आहे. तो सफल व्हायचा असेल तर वाचकांचे सहकार्य आवश्यक आहे.
कलाकार रामकृष्ण
रामकृष्ण परमहंसांच्या जीवनातील आपल्या प्रश्नाशी निकटचा संबंध असलेल्या घटना अश्या. रामकृष्ण परमहंसांना लहानपणापासून संगीत, अभिनय इत्यादि कलांचा नाद होता. पण ज्याला शालेय शिक्षण म्हणतात त्याबद्दल त्यांना मनस्वी अप्रीती होती. ते जवळ जवळ अशिक्षितच होते असे म्हटले तरी चालेल. ‘मला केवळ पोट भरण्याची विद्या नक्को, ईश्वरप्राप्ती करून देईल असे ज्ञान पाहिजे’ असे ते म्हणत. ईश्वरप्राप्तीसाठी रात्रीबेरात्री एखाद्या निर्जन ठिकाणी जाऊन ध्यानस्थ बसणे, कालीच्या मूर्तीसमोर बसून दर्शनासाठी व्याकुळ होणे यांत त्यांचा पुष्कळ काळ जाई. एकदा काली दर्शन देत नाही म्हणून वैतागाने ते स्वतःचा शिरच्छेद करून घेण्यास प्रवृत्त झाले. पुढे त्यांना कालीचे दर्शन झाले व समोर काली दिसते आहे अशा थाटात तासन्तास वागणे त्यांनी सुरू केले.
या आध्यात्मिक कृत्याबरोबरच त्यांचे संगीत/ अभिनयादि क्षेत्रातील नैपुण्यही पुष्कळ वेळा प्रकट झाले. कुठे नाटक बसत असताना एखादे पात्र आजारी पडले तर त्याचे काम त्यांनी पत्करावे, सारेच नाटक दिग्दर्शित करावे. त्यांना सार्याच पात्रांच्या नकला अनायासाने पाठ होत. एकदा शिवरात्रीच्या दिवशी करावयाच्या एका नाट्यप्रसंगात शिवाची भूमिका करणारा मुलगा आजारी पडल्यामुळे रामकृष्णांनी ते काम पत्करले. शिवाची वेशभूषा करून रंगभूमीवर आल्याबरोबर रामकृष्णांना ‘भावसमाधि’ लागली. त्यांच्यात काहीच हालचाल नाही असे पाहून लोक रंगमंचाव्र गेले व पाहतात तो रामकृष्ण शुद्धीवर नाहीत. (शुद्धीत नसलेला माणूस उभा राहू शकतो काय हा येथे प्रश्न उद्भवतो). त्यांना उचलून घरी नेण्यात आले. घरी नेल्यावरही त्यांची ‘भावसमाधि’ उतरायला बराच वेळ लागला. या प्रसंगापूर्वी एकदा शेतात फिरत असता आकाशात उडणार्या बलाकांची माला पाहून त्यांना अशीच ‘भावसमाधि’ लागली होती.
रामकृष्णांना स्त्रियांची कामे करणे फार आवडे. स्त्रीवेषात ते कुणालाही पुरुष म्हणून ओळखता येत नसत. निरनिराळ्या प्रकारचे अभिनय करणे, नाट्यपूर्ण रीतीने कथा सांगणे यावरून ते स्त्रियांत बरेच प्रिय होते. त्यांच्या खेड्यात एक स्त्रियांच्या पडदानशीनपणाविषयी अतिशय दक्ष असलेले एक गृहस्थ होते ते रामकृष्णांना आपल्या घरी येऊ देत नसत. तेव्हा रामकृष्णांनी त्यांची खोड मोडण्याचे ठरविले. त्यांनी एका कोष्टिणीचा पोषाख केला व त्या गृहस्थाकडे जाऊन विनवणी करू लागले की ‘प्रवास करताकरता माझे सोबती कुठे तरी भटकले व त्यांची माझी चुकामूक झाली. आता माझ्याजवळ खायप्यायला काही नाही व विश्रान्तीची गरज आहे. तेव्हा एखादी रात्र मला तुमच्या घरी काढू द्यावी.’ त्या गृहस्थांना संशय आला नाही व ज्या रामकृष्णांना ते आपल्या घरीदेखील येऊ देत नसत त्यांना खुशाल आपल्या अन्तःपुरात निजायला जागा दिली. अन्तःपुरातील स्त्रियांनादेखील रामकृष्ण ओळखू आले नाहीत. त्यांच्यात ते फार प्रिय झाले व आपला निवास त्यांनी त्यांच्या सांगण्यावरून आणखी वाढवून घेतला. इतक्यात मुलगा कुठे गेला म्हणून रामकृष्णांचे वडील त्यांना शोधत त्या गृहस्थांकडे आले तेव्हा त्या गृहस्थांनी सांगितले “अहो तुमच्या मुलाला मी कधीच घरी येऊ देत नाही. तेव्हा तो इथे कसा असेल?” हे ऐकताच रामकृष्णांनी आतून ‘हा मी इथे आहे म्हणून हाक दिली, तेव्हा ते पडदाप्रेमी गृहस्थ फारच खजील झाले.
रामकृष्णांना नाट्याप्रमाणेच चित्रकला व मूर्तिकला यांचा देखील नाद होता. स्वतः मूर्ति करण्यात व चित्रे काढण्यात ते तासन्तास तल्लीन होत.
पुढे रामकृष्णांच्या वडील भावाने कलकत्त्यास एक संस्कृत पाठशाळा काढली. तेथे शिकवण्याव्यतिरिक्त इतर कामे करण्यास त्यांनी रामकृष्णांना बोलाविले. पण लवकरच पाठशाळा चालेनाशी झाली.
रामकृष्ण आणि विवेकानन्द
पाठशाळा चालेनाशी झाल्यावर रामकृष्णांच्या भावाने रासमणी नावाच्या एका कोळी जातीच्या राणीने बांधलेल्या कालीच्या मंदिरात पुजाण्याचे काम स्वीकारले व काही दिवसानंतर रामकृष्णांना तेच काम स्वीकारण्यास सांगितले. रामकृष्ण ते काम स्वीकारण्यास अत्यंत नाखूष होते, कारण कोळी ही हलकी जात समजली जात होती व कोळ्याची नोकरी करणे अर्थातच अप्रतिष्ठेची बाब होती. देवीला प्रार्थना करतानादेखील बरेच दिवस रामकृष्ण आई, हे काय माझ्या नशिबी कोळ्याचे अन्न खाणे तू लिहिलेस?” म्हणून देवीजवळ हळहळ व्यक्त करीत असत. एकदा राणी देवळात देवीच्या दर्शनास आली. रामकृष्णांशी नमस्कार चमत्कार झाल्यानंतर जवळ त्यांचा जावई तिचा कारभार पाहत होता, त्याला तिने मालमत्तेबद्दल चाललेल्या एका खटल्याबद्दल विचारले. ते ऐकून रामकृष्ण एकदम संतापले व राणीला म्हणाले “हे काय देवीच्या मंदिरात देखील तुम्हाला सांसारिक गोष्टी सुचतात?” केवळ असे म्हणूनच ते थांबले नाहीत तर त्यांनी राणीच्या मुस्कटात भडकावून दिली.
रामकृष्ण मला देवीचे दर्शन होते असे म्हणत व आपल्या शिष्यांनाही आपण तिचे दर्शन करवून देऊ शकतो असा त्यांना विश्वास होता. त्यांच्या शिष्यांपैकी विवेकानन्द हे जगत्प्रसिद्ध झाले. ते पूर्वाश्रमी नास्तिक होते. रामकृष्णांना ते भेटले तेव्हा ते अत्यंत आर्थिक विवंचनेत होते. रामकृष्णांनी त्यांच्या तोंडचे भजन ऐकले होते व त्यांच्या संगीतावर ते लुब्ध झाले व त्यांना त्यांनी भेटीस बोलावले. विवेकानंद हे आपले पुरुष प्रियकर व आपण स्त्री अशी भावना रामकृष्णांच्या मनात उद्भूत होत असे. पूर्वीदेखील कृष्णाची राधारूपाने उपासना करणे हा एक रामकृष्णांचा छंद होता. त्यांना राधारूपात “भावसमाधि” लागली की स्त्रियांचे मासिक धर्म देखील होत असा त्यांना अनुभव येई.
रामकृष्णांना विवेकानंद भेटले तेव्हा आपण रामकृष्णात विलीन होत आहोत असा त्यांना अनुभव आला. ‘मला असला काही अनुभव नको, माझी आर्थिक विवंचना दूर करण्याची तुमच्या देवीला विनंती करा’ असे विवेकानंद म्हणाले तेव्हा रामकृष्णांनी त्यांना सांगितले की ‘मी तुलाच देवीचे दर्शन होईल अशी व्यवस्था करतो. तूच तिला धन मागून घे.’ या वचनानुसार रामकृष्णांच्या अनुग्रहाने विवेकानंदांना देवीचे दर्शन झाले, पण देवीला धन मागणे ते विसरून गेले. उलट त्यांनी भक्ति, ज्ञान, वगैरेंची मागणी केली.
रामकृष्णांनी हिंदुधर्माबरोबरच इतर साच्या धर्माची साधना केली. इस्लामी धर्माची साधना करताना त्यांनी गोमांस वगैरे देखील खाल्ले व इस्लामी उपासनेप्रमाणे नमाज वगैरे पढण्याचा क्रम ठेवला. त्यांना पैगंबराचे दर्शन झाले. याच प्रकारे ख्रिस्ती धर्माची उपासना केली असता त्यांना ख्रिस्ताचे दर्शन झाले.
आयुष्याच्या शेवटच्या काळात रामकृष्णांना घशाचा कर्करोग म्हणजे कॅन्सर झाला. त्यांना अन्नदेखील खाता येईना. तेव्हा त्यांचे शिष्य म्हणाले, ‘आपल्या देवीला विनंती करून चार घास खाता येतील असा अनुग्रह मागून घ्या ना.’ त्यावर रामकृष्णांनी ‘भाव-समाधी’त देवीची भेट घेऊन तिला चार घास खाण्याची शक्ती देण्याची विनंती केली. त्यावर देवी म्हणाली, ‘सर्व मानवांची तोंडे ही तुझीच तोंडे आहेत. या तोंडाच्या रूपाने तू खातच नाहीस काय?’ शेवटी कर्करोगानेच रामकृष्णांचा मृत्यू झाला.
रामकृष्णांच्या जीवनाचा वरील वृत्तान्त रामकृष्णमठ, नागपूर यांनी प्रकाशित केलेल्या श्रीरामकृष्णलीलाप्रसंग या ग्रंथावर आधारलेला आहे. शिवाय रामकृष्णमठातील प्रवचनांचा त्याला आधार आहे.
मिर्गीच्या व्याधीमुळे होणारे भास
आता वरील चरित्रावरून साक्षात्काराचे अस्तित्व कसे काय सिद्ध होते हे पाहू. रामकृष्णांना बलाका पाहून जी ‘भावसमाधी’ लागली तो मिर्गीचा झटका होता असे त्यांचेच आईबाप मानीत व त्यांनी रामकृष्णांना उपचारासाठी डॉक्टरकडेदेखील नेले होते. डॉक्टरही या मताशी सहमत होते. मिर्गीला इंग्रजीत ‘एपिलेप्सी’ म्हणतात. या एपिलेप्सीच्या झटक्यामध्ये कधी कधी व्याधिताला पूर्वसूचना मिळत असते. ती विशिष्ट वासाच्या वा प्रकाशाच्या स्वरूपाची असू शकते. तसेच या झटक्यात कधीकधी भास होतात. रणांगणावरून परत आलेला एक शिपाई मिर्गीचा झटका येऊन समोरील मुलालाच झोडपू लागला. त्या मुलाला इतरांनी वाचविले. झटका उतरल्यावर तो शिपाई आपण नुसतेच युद्धभूमीवरून परतून आलो आहोत. या युद्धात आपण चारही बाजूंनी घेरणाच्या शत्रुसैन्याला चांगले पाणी पाजले असे सांगू लागला. रामकृष्णांनी रासमणी राणीला मारलेली थप्पड अशीच मिर्गीच्या झटक्यात मारली हे स्पष्ट आहे. रामकृष्ण परमहंसांना होणारे देवीचे दर्शन व ‘भावानुभूति’ हा मिर्गीचाच प्रकार होता.
ज्यांना जागेपणी भास होतात अशा लोकांच्या व्यक्तित्वात एक विशेष हा असतो की ते उत्कट प्रमाणात सूचन म्हणजे सजेश्चनला (suggestion) बळी पडणारे असतात. मनुष्य जेव्हा पूर्णपणे विश्रब्ध अवस्थेत, कोणताही ताण नसलेल्या निद्रापूर्व अवस्थेत असतो तेव्हा त्याला ‘तुझ्यासमोर परी उभी आहे ती तुझी सेवा करीत आहे वगैरे सूचन केले तर त्याला खरोखरीच परी दिसू लागते. या अवस्थेला मोहनिद्रा म्हणतात. सूचन दुसर्या एखाद्या प्रतिष्ठासंपन्न व्यक्तीने केले तर जशी मोहनिद्रा लागते त्याचप्रमाणे स्वतःच स्वतःला सूचन केल्यानेदेखील मोहनिद्रा लागते. मनावर देवीबद्दलच्या श्रद्धांचे संस्कार दृढ असले की अशा मोहनिद्रेत देवीचे दर्शन होणे ही गोष्ट काही दुर्घट नाही.
रामकृष्ण परमहंस हे उत्तम नट, गायक व चित्रकारदेखील होते. नटाला व चित्रकाराला कल्पनेच्या जगात स्वतःचे व्यक्तित्व विसरून रममाण होण्याची शक्ती असते. त्यातून कल्पनेचा विषय धार्मिक श्रद्धेचाही विषय असेल तर सर्वसाधारण नटाला नाटक व वास्तव यांच्यातील भेदाची जी सतत जाणीव असते ती श्रद्धाळू मनातून नाहीशी व्हायला वेळ लागत नाही.
विवेकानंद रामकृष्णांना भेटले तेव्हा अत्यंत विवंचनेत होते. अशा विवंचनेच्या अवस्थेत माणसाची सूचनीयता वाढते. रामकृष्णांच्या प्रभावाने विवेकानंदांना आलेले अनुभव हे मोहनिद्रेच्या स्वरूपाचे होते. याचे प्रमाण हे की त्या अनुभवांच्या सत्यतेचा पडताळा येत नव्हता. विवेकानंदांनी देवीला आपली विपन्नावस्था दूर करण्यास सांगितले असता ती विपन्नावस्था दूर झाली असती तर त्या देवीदर्शनापासून काही खरे व प्रत्यक्ष दिसणारे परिणाम होतात असे दिसून आले असते. पण विवेकानंद देवीला धन मागण्यास विसरून जात असत. म्हणजे ज्या परिणामांचा पडताळा पाहता येईल असे कोणतेही परिणाम विवेकानंदांची देवी घडवून आणू शकत नव्हती. हेच खुद्द रामकृष्णांच्या अनुभवांनाही लागू आहे. रामकृष्णांनी कर्करोगाने पीडलेल्या घशामुळे अन्न खाता येत नाही म्हणून देवीकडे तक्रार केली, तेव्हा देवीने त्यांना अन्न खाता येईल असा कोणताही इतरांना पडताळून पाहता येईल असा चमत्कार केला नाही. उलट ‘तू इतरांच्या तोंडाने खालैंच नाहीस काय?’ असा टाळाटाळीचा प्रश्न केला.
रामकृष्णांनी इस्लाम व ख्रिस्ती धर्म यांची साधना करून त्या त्या धर्मात सांगितलेले निःश्रेयस प्राप्त केले असे सांगण्यात येते. पण रामकृष्णांची इतर धर्माची साधना त्या धर्माच्या अनुयायांना पटण्यासारखी नाही.
रामकृष्प्पांना इस्लामची साधना केल्याने पैगंबराचे दर्शन झाले व ख्रिस्ती साधना केल्याने ख्रिस्ताचे दर्शन झाले असे सांगण्यात येते. पण इस्लामच्या सांगण्याप्रमाणे उपासना केल्याने पैगंबराचे दर्शन होते असे इस्लाम सांगत नाही. पैगंबराचे दर्शन करवून घेणे हे इस्लामचे ध्येय नाही व ख्रिस्ताचे दर्शन हे ख्रिस्ताच्या अनुयायांचे अंतिम साध्य नाही. कयामतच्या दिवशी स्वर्गप्राप्ति करून घेणे हे या दोन्ही धर्माचे ध्येय आहे. तेव्हा रामकृष्णांची इतर धर्माची उपासना ही त्या त्या धर्माच्या तत्त्वाप्रमाणे नसून हिंदुधर्माच्या समजुतीप्रमाणे राम व कृष्ण यांच्या ऐवजी पैगम्बर व ख्रिस्त यांचे नाव गोवून केलेली उपासना होती.
स्त्रीस्वरूपातील रामकृष्ण
रामकृष्ण परमहंसांच्या साक्षात्कारात त्यांचा स्त्रीभाव हा एक महत्त्वाचा विशेष आहे. याला मानसशास्त्रात ट्रॅन्सव्हेस्टिझम्’ म्हणजे पुरुषाला स्त्रीवेशाबद्दल असलेला हव्यास हे। नाव आहे. याला आपण स्त्रीवेशित्व असे नाव देऊ. स्त्रीवेशात हा मुलगा फारच गोजिरवाणा दिसतो म्हणून ज्या मुलांचे लहानपणी विशेषतः स्त्रियांनी कौतुक केलेले असते त्यांच्यात स्त्रीवेश धारण केल्याने कामजागृति व कामशांति होऊन स्त्रीवेशाची आवड निर्माण होते. रामकृष्णांना या वेशात मासिक धर्म होत असे हा त्यांच्या इतर भासांपैकीच एक भास आहे.
साक्षात्कारामुळे नैतिक उन्नयन व्हावे अशी अपेक्षा आहे. पण रामकृष्णांना साक्षात्काराचा असा काही उपयोग झाल्याचे दिसत नाही. त्यांच्या जातींच्या उच्चनीचतेबद्दलच्या भावना कायम होत्या. तसेच तेविसाव्या वर्षी स्वतःच पुढाकार घेऊन सहा वर्षांच्या मुलीशी लग्न करणे व नंतर तिला संसारसुख न देता जन्मभर विवाहित ब्रह्मचर्यात ठेवणे हे त्यांचे कृत्य भूषणास्पद म्हणून सांगण्यासारखे नाही.
नी. र. वर्हाडपाण्डे
३८ हिंदुस्थान कॉलनी अमरावती रोड, नागपूर – ४४० ०१०