सातार्याच्या विचारवेध संमेलनात प्रा. रेग्यांनी केलेल्या अध्यक्षीय भाषणातील काही भागाचा हा सारांश. रेग्यांच्या अतीतवादी धर्म आणि नीतीमीमांसेचा प्रतिवाद याच अंकात प्रा. दि. य. देशपांड्यांनी केला आहे. तो वाचताना शीघ्र संदर्भ म्हणून हा आढावा उपयोगी पडावा.
विसाव्या शतकातील धर्मचिंतनाकडे वळण्यापूर्वी रेग्यांनी त्याची प्रदीर्घ तत्त्वज्ञानात्मक पार्श्वभूमी कथन केली आहे. तिचा आलेख येथे आहे. पण व्याख्यानाच्या उत्तरार्धातील भारतीय-हिंदू विचाराचा ऊहापोह या सारांशात नाही. तद्वत विसाव्या शतकातील तीन प्रभावी विचारसरणी – मार्क्सवादी, मनोविश्लेषणवादी आणि अस्तित्ववादी – व धर्म यांच्या संबंधाची चर्चाही येथे गाळली आहे.
धार्मिक अनुभव व आचरण यांचा गाभा
इंद्रियांना प्रतीत होणार्या जगापलीकडे अतीत तत्त्व आहे. हे विश्वातील सर्वोच्च नियामक तत्त्व आहे. माणसाची प्रकृती साकल्याने विचारात घेतली तर तिच्यातही हे तत्त्व आहे. त्याचा विश्वातील तत्त्वाशी योग्य संबंध जोडण्याची खोल प्रेरणा माणसात असते. असा संबंध जोडण्यात माणसाचे परमश्रेय – साफल्य असते. ते साधू पाहाणारे आचरण म्हणजे धार्मिक आचरण. हेअतीत तत्त्व एका बाजूने अदृश्य, अगम्य असले तरी दुसर्या बाजूने संनिध असते. भोवतालच्या जगाचीप्रतीती देणारा अनुभव हा लौकिक आणि अतीताची प्रतीती देणारा अनुभव धार्मिक, अलौकिक,आध्यात्मिक, अशी अनुभवाची विभागणी धार्मिक दार्शनिक करतात. धार्मिक अनुभव म्हणजे श्रद्धा.
श्रद्धाआणि विवेकवाद यांच्या संघर्षात धर्मश्रद्धेला माघार घ्यावी लागली. कारण चोख पुरावा आणि तर्क यांचे पाठबळ विज्ञानाजवळ होते. विज्ञान हे विवेकवादाचेच अपत्य आहे. विवेकवादी आग्रह असा की जे जे आहे ते समग्र अस्तित्व विवेकाला गम्य आहे.
प्लेटोचे तत्त्वज्ञान एक धार्मिक दर्शन आहे. तो ज्ञानशक्तीची दोन रूपे मानतो. एकाने इंद्रियगोचर सृष्टीचे ज्ञान व दुसर्याने अतीत तत्त्वाचे ज्ञान होते. ज्ञानशक्तीचे हे दुसरे रूप म्हणजे विवेक. तत्त्वज्ञानाला वाहून घेणे ही जशी ज्ञानसाधना आहे, तशी आध्यात्मिक, धार्मिक साधनाही आहे असे प्लेटो समजतो.
वरील पहिल्या प्रकारचे ज्ञान म्हणजे विज्ञान. १८ व्या शतकात आधुनिक विज्ञानाचे एक सर्वमान्य मॉडेल स्थिर झाले. प्लेटोप्रणीत विवेकशक्तीची संकल्पना नाकारली गेली. वैज्ञानिक ज्ञान हेच प्रमाण ज्ञान अशी मान्यता त्याला लाभली. प्रबोधनाच्या (Enlightenment) अध्वर्यूंनी विवेकवादाला जे आक्रमक रूप दिले तोच आधुनिक विवेकवाद. आता पारंपरिक धर्मश्रद्धेची जागा या विवेकवादी तत्त्वांनी घेतली. उपयुक्ततावादाची कसोटी पारंपरिक नीतीला लावली गेली. मात्र १९ व्या शतकात मिल्नेक समन्वयात्मक भूमिका घेतली. परंपरेतील मानवी हिताला पोषक तेवढे ठेवावे आणि नवीन तत्त्वांची व मूल्यांची भर त्यात घालावी अशी नैतिक सहमतीची भूमिका, मिल्नेे विवेकवाद्यांतर्फे मांडली.
आता एक प्रश्न उभा राहिला. वैज्ञानिक विचारपद्धतीने ज्ञानाचा अखंड विस्तार शक्य आहे. आणि या पद्धतीत अतीत तत्त्वाला स्थान नाही. मग विश्वात आणि माणसात अतीत तत्त्व नाही असेच निष्पन्न होत नाही का?
या प्रश्नाला दोन उत्तरे दिली गेली. एक असे की, अतीत तत्त्व असेल, आहेच, पण ते माणसाला अज्ञेय आहे. त्याच्या संबंधात माणसाला कोणताही व्यवहार करता येत नाही. ही स्पेन्सरची भूमिका. दुसरी कडवी भूमिका अशी की, अतीत असे तत्त्व नाहीच. विश्वात नाही, माणसात नाही.
पारंपरिक ख्रिस्ती श्रद्धा अशी की, ईश्वराने स्वतःची प्रतिमा म्हणून माणूस घडवला. त्याला अमर असा आत्मा दिला. म्हणून विश्वात त्याचे अनन्यसाधारण स्थान आहे. आधुनिक विवेकवादी दृष्टी अशी की, माणूस इतर प्राण्यांसारखाच एक प्राणी आहे, आणि समाजशास्त्र, मानसशास्त्र इ. विद्याशाखांद्वारे त्याच्या धार्मिक समजुतींचा उलगडा करता येतो.
कांटची भूमिका
श्रद्धेपुढे उभ्या ठाकलेल्या तात्त्विक आव्हानाला कांटने (१७२४-१८०४) उत्तर दिले. या उत्तराने विश्वात मनुष्याचे एक ज्ञाता, कर्ता आणि भोक्ता म्हणून जे स्थान आहे त्याचे सर्वात चांगले दिग्दर्शन होते.
कांटचे उत्तर असे. विश्वात इंद्रियगम्य वस्तू आहेत. घटना आहेत. त्यांची व्यवस्था आहे. इंद्रियजन्य ज्ञान स्थलकालविशिष्ट असते. घटना कार्यकारण नियमाने निबद्ध असतात. या इंद्रियविषय असलेल्या विश्वात अतीत असे अस्तित्व नाही. पण नैतिक कर्ता म्हणून माणसाचे विश्व वेगळे आहे. त्याची भूमिका वेगळी आहे. या जगात तो स्वायत्त आहे. तो कर्तव्याची संकल्पना (अवांतर कारण नसणार्या, निष्कारण धर्माची करू शकतो. माझ्या गरजा, प्रेरणा काहीही असोत कर्तव्याचरण सर्वथा योग्यच असते. माणसाची ही कर्तव्यबुद्धीच त्याच्या स्वायत्ततेची गमक आहे. नीतिमत्तेचा निकष, नीतीचे मूल्य ही निसर्गात निरीक्षणाने गवसणारी गोष्ट नाही. नैतिक जग हे एका अर्थाने लौकिक जगाचा भाग आहे. पण दुसर्या अर्थाने नाही. खोलीत भिंतीवर चित्र आहे. पण त्यातील चित्रित वस्तू खोलीतील वस्तू नसतात. तसे नैतिक जग लौकिक जगाचा भाग असतनाही.
माणूस असा एकाच वेळी दोन जगात वावरतो. सौंदर्यास्वादक आणि सौंदर्यनिर्माता हेही माणसाचे आणखी एक वेगळे तिसरे रूप आहे. आणि त्या रूपाचा अविष्कार ज्यात होतो ते तिसरे जग आहे.
नैतिक कर्ता हे अतीत असे तत्त्व आहे. ते जसे माणसात आहे तसे विश्वात असणार. विश्वातील हे अतीत तत्त्व माणसाच्याच प्रकृतीतील अतीत तत्त्वाची प्रतिमा आहे अशीआधुनिक श्रद्धा आहे. मात्र हे ज्ञान नव्हे हे कांटला मान्य आहे.
एखादे कृत्य माझे कर्तव्य आहे याचा अर्थ त्याद्वारे माझ्या आणि इतरांच्या अधिकात अधिक इच्छांचे समाधान होईल असा करता येत नाही. ‘कर्तव्याचा अर्थ अशा व्याख्येत पकडला जात नाही. दुर्बल, असहाय माणसाचीही माणूस म्हणून प्रतिष्ठा ओळखणे आणि जपणे हा विचार वेगळा आहे. आभाळ कोसळो पण न्याय केलाच पाहिजे, ह्या भूमिकेत न्यायाचे निरपेक्ष प्रामाण्य जाहीर होते. नैतिक संकल्पना अशा एका वैशिष्ट्यपूर्ण व्यवहाराला आकार देतात. ह्याचे आणखी प्रमाण देता येत नाही. ही गोष्ट स्वीकारावी किंवा न स्वीकारावीएवढेच.
माणसाचे नैतिक कर्ता, सौंदर्यास्वादक व निर्माता हे रूप दृश्य निसर्गाच्या चौकटीत सामावत नाही असे कांटचे मत आहे. नैतिक आचरणाची संकल्पना करणे, तसे वागणे, स्वनिर्मित मूल्यांचा अधिकार स्वीकारणे हे सारे स्वायत्त आहे. या प्रकारच्या नैतिक व्यवहाराला जे प्रामाण्य आहे त्यावरून मनुष्याच्या स्वायत्त रूपाचा प्रत्यय येतो. पण तो प्रत्यय नैतिक व्यवहाराचे गृहीतकृत्य या मार्गाने येणारा प्रत्यय आहे. ही गोष्ट श्रद्धेने स्वीकार्य आहे. तिला बाह्य प्रमाण नाही.
एक भूमिका अशी की, उपर्युक्त अतीत आणि आगत या दोन तत्त्वांचा समन्वय साधता आला तर माणूस समग्र विश्वाचे प्रतीक – एक लघुविश्व ठरेल. आणि विश्वरूपाचे हे आकलन एकात्म असेल, भले ते श्रद्धेने स्वीकारलेले असो. या भूमिकेवर कांटचे म्हणणे असे की, असे समन्वयाचे तत्त्व इतउत्तर उपलब्ध नाही. मानवी प्रकृतीची एकसंधता आधुनिक विज्ञानानंतर आणि आधुनिक विवेकवादानंतर हरपली. आपल्या प्रकृतीची साक्षात् प्रत्ययाला येणारी ही अंगे, नैतिक सौंदर्यनिष्ठ आणि धार्मिक ही – आधुनिक विवेकवादाचा आश्रय घेतल्यावर आपल्याला नाकारावी लागतील.अप्रामाणिकपणे जगावे लागेल. मग विश्वातील अतीत तत्त्वाचे ज्ञान करून घेण्याची हाव न धरता, स्वतःतील अतीत तत्त्वाशी निष्ठा पाळणे हा आता जगण्याचा प्रामाणिक मार्ग आहे.