दिवाकर मोहनी (आ. सु. ऑगस्ट १९९३) व श्रीनिवास दीक्षित (आ. सु. जानेवारी १९९४) यांमधील चर्चेच्या संदर्भात पुढील माहिती उपयुक्त ठरेल.
१) कुपोषण
कुटुंबातल्या कुटुंबात अन्नाचे जे वाटप होते त्यात स्त्रीला पुरुषापेक्षा कमी हिस्सा मिळतो याबद्दल काही माहिती उपलब्ध आहे. मैत्रेयी कृष्ण राज यांनी दिल्लीतील सफदरजंग इस्पितळातून घेतलेली आकडेवारी पुढे दिली आहे. हीत सर्व वयांच्या स्त्रीपुरुषांचा समावेश आहे.
पोषणाची पातळी पुरुष (टक्के) स्त्रिया (टक्के)
तीव्र कुपोषण २८.५७ ७१.४३
मध्यम कुपोषण ४३.०७ ५६.९३
सौम्य कुपोषण ५६.४० ४३.६०
योग्य पोषण ६१.२० ३०.३०
तीव्र व मध्यम कुपोषणाचा असर पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त आहे असे या सारणीवरून दिसते. तीव्र कुपोषणासंबंधीचा टक्केवारीतला फरक विशेष लक्ष वेधून घेणारा आहे.
१ ते ५ वर्षांची मुले घेतली तर त्यांच्यातही तीव्र कुपोषित मुलींची टक्केवारी बरीच अधिक आहे असे श्रीमती कृष्ण राज सांगतात.
एका नमुना पाहणीचा निष्कर्ष म्हणून श्रीमती राज यांनी पुढील माहिती दिली आहे.’ मुलगा झाला की पुढचे मूल लगेच व्हावे अशीआचआईबापांना वाटत नाही. मात्र मुलगी झाली की मुलग्याच्या आशेने पुढचे बाळंतपण लवकर येते. याचा परिणाम असा की मुलीला आईचे दूध कमी मिळते.
अमर्त्य सेन यांनी पश्चिम बंगालमधील दोन गावांच्या पाहणीवरून असा निष्कर्ष नोंदला आहे की १९७८ चे नद्यांचे मोठे पूर ओसरून गेल्यानंतरच्या दुःस्थितीच्या काळात मुलांपेक्षा मुलींचे कुपोषणाचे प्रमाण खूपच अधिक दिसून आले. एकूणच निकृष्ट आर्थिक परिस्थितीत पोषणाच्या संदर्भातली स्त्रीपुरुषविषमता अधिक वाढते असे दिसते.
(१. Krishna Raj, Maithreyi, Women and Development : The Indian Experience, Shubhada Saraswat, Pune, 1988, p. 109 २. तत्रैवp.110)
आजारीपणा
आजारांचे प्रमाण पुरुषांपेक्षा स्त्रियांत अधिक असते असेही सेन यांच्या निदर्शनास आले. कलकत्ता महानगर विकास प्राधिकरणाने १९७७-७८ साली केलेल्या पाहणीवरून ही गोष्ट लक्षात आली. कलकत्त्यातील झोपडपट्ट्यांमध्येही हीच परिस्थिती दिसून आली.
प्रत्येक वयोगटात आजारी पुरुषांपेक्षा आजारी स्त्रियांचे प्रमाण जास्त असते असेही प्रा. सेन यांनी कलकत्त्याच्या उपरोक्त पाहणीच्या आधारे दाखविले आहे. हीच गोष्ट कलकत्त्यातल्या झोपडपट्ट्यांनाही लागू आहे.
कुमुदिनी दांडेकर यांनी १९५७ साली ६ खेडेगावांत केलेल्या अभ्यासाचा संदर्भ देऊन कृष्ण राज यांनी असे सांगितले आहे की १५ वर्षांखालील मुलांमध्ये आजारी मुलांची संख्या ५१३ होती तर मुलींची संख्या ७३०.
जागतिक बँकेच्या एका अभ्यासाप्रमाणे भारतातल्या ६० टक्के स्त्रियांना रक्तक्षयाची [अनीमिया ] बाधा असते आणि आजारातून उद्भवलेल्या कामावरील गैरहजेरीचे प्रमाणही त्यांच्यात जास्त असते.
औषधोपचार
जास्त कुपोषण, जास्त आजारीपण, मात्र अपुरे उपचार अशी स्त्रियांची स्थिती आहे. मुंबईच्या दोन इस्पितळांतील आकडेवारीच्या आधारे सेन यांनी दाखविले आहे की प्रौढ पुरुषांना प्रौढ स्त्रियांपेक्षा अधिक चांगले उपचार मिळतात. लहान मुलांच्या बाबतीतही हीच कथा आहे; एवढेच नव्हे तर लहान लहान मुलींची स्थिती प्रौढ स्त्रियांपेक्षा अधिक वाईट आहे.
3. Sen Amartya, Commodities and Capabilities Oxford University Press, Delhi, 1987, pp. 56-57.
4 Sen, Amartya K., “Family and Food : Sex Bias in Poverty,” in Srinivasan and Bardhan (Ed.), Poverty and Unemployment in India, pp. 459, 461, 463.
5. Sen, Commodities…, उपरोक्त, p.65-69.
६ Krishna Raj, उपरोक्त, p. III.
७World Bank, Gender and Poverty in India, Summary Report, p. 36.
८ Sen, Commodities…, उपरोक्त, p. 64.
प्रौढ स्त्रियांपेक्षा लहान मुलींची स्थिती वाईट असावी हे समजण्यासारखे आहे. त्या तक्रार करू शकत नाहीत! देवो (की मनुष्यो ?) दुर्बलघातकः।
या सगळ्याचा परिणाम म्हणून स्त्रियांमधील मृत्युप्रमाण अधिक असावे यात आश्चर्य नाही.
भारतात दर हजार पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण १९०१ सालापासून सारखे कमी होत गेले आहे. या संदर्भात दोन गोष्टी विशेष रीतीने लक्षात ठेवाव्यात. एक, बहुतेक देशांतील लोकसंख्येत स्त्रियांचे प्रमाण पुरुषांपेक्षा अधिक असते. भारत हा अपवादात्मक देशांपैकी एक, दोन, येथे जसजसा आर्थिक विकास होत आहे तसतसे स्त्रियांचे प्रमाण कमी होत आहे. खरे म्हणजे आर्थिक स्थिती सुधारत असताना जीवनावश्यक गरजांच्या बाबतीतला स्त्रियांविषयीचा भेदभाव कमी व्हायला हवा !
या सर्वच संदर्भात आणखी काही गोष्टी लक्षात घेणे जरूर आहे. (१) स्त्रियांमध्ये शिक्षणाचे प्रमाण कमी असल्याने आरोग्यविषयक ज्ञानही त्यांना कमी असते. (२) बहुतेक अभ्यास असे दाखवतात की पुरुषांपेक्षा स्त्रियांना शारीरिक कष्ट अधिक पडतात. (३) भारतातल्या स्त्रियांना बाळंतपणे फार – सरासरी आठ. (४) अलीकडच्या काळात स्त्रियांवरच्या हिंस्र हल्ल्यांचे प्रमाण वाढलेले दिसतेः एकट्या दिल्ली शहरात दरसाल हुंडाबळींची ८०० हून अधिक प्रकरणे घडतात. कृष्ण राज यांनी कारकल यांच्या निबंधाचा आधार घेऊन सांगितले आहे की १८ ते ३० वयाच्या स्त्रियांमध्ये अनैसर्गिक कारणांमुळे घडून येणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त आहे.१० १९८९ एप्रिलमध्ये लोकसभेत दिल्या गेलेल्या माहितीप्रमाणे ११९८६-८८ या काळात हुंडाबळींची संख्या ६५ टक्क्यांनी वाढली. (हुंडाविरोधी कायद्यात दोन वेळा -१९८४ व १९८६- कडक दुरुस्त्या होऊनही !) केवळ दिल्लीत ती ४७ टक्क्यांनी वाढली. (५) प्रा. दीक्षित म्हणतात की मागास जातीत मुलींना हुंडा मिळतो; ही परिस्थिती आता वेगाने बदलत आहे असे निरीक्षणावरून दिसून येते.
एकूण ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते (खेटरैः) स हि भारतः ।
४ प्रसाद, शिलाविहार कॉलनी,
निजामयिक पौड रस्ता, पुणे-४११०३८
(हा लेख स. ह. देशपांडे, हरविंदर बेदी, मिलिंद बोकील, रोहिणी काशीकर, अनुराधा गोरे व नीता बोकील यांनी National Commission on Rural Labour यांच्यासाठी तयार केलेल्या Rural Female Labour 1990 या अहवालाच्या आधारे तयार केला आहे.)
९ Krishna Raj, उपरोक्त, p. 117.
१० तत्रैव.
११ Times of India, Bombay, June 12, 1989.