काही महिन्यांपूर्वी आजच्या सुधारकात निसर्ग आणि मानव या विषयावर एक चर्चा झाली. मथळ्यात स्थान नसूनही विज्ञानाला चर्चेत महत्त्वाचे स्थान होते. त्याच चर्चेचा भाग असावा असा एक नुकताच प्रकाशित झालेला लेख भाषांतररूपात सोबत दिला आहे.
लेखकाला विज्ञानात जाणवलेल्या काही विशिष्ट गुणधर्मांची यादी अशी :- (क) विज्ञान चंचल आहे. त्यात ठाम मते नसतात. (ख) विज्ञानातील प्रत्येक बदल आधीच्या जवळपास सर्व ज्ञानाला खोटे पाडू शकतो. (ग) विज्ञान स्वतःला सर्वज्ञ समजते, आणि म्हणून ते इतर श्रद्धा-प्रणालींबद्दल कमालीचे असहिष्णु असते. (घ) विज्ञानाकडे मानवी जीवनाचा अंतिम अर्थ किंवा अंतिम कारणे समजण्याची क्षमताच नाही.
तर अशा या विज्ञानाने उदारमतवादाला जन्म दिला.
विज्ञान असहिष्णु असले तरी उदारमतवाद मात्र नको तितका सहिष्णु आहे. या अतीव सहिष्णुतेमुळे उदारमतवादी समाजांच्या नव्या पिढ्या ज्ञान, मूल्ये, वगैरेंबद्दल बेपर्वा होत आहेत. स्वतःची संस्कृती “रक्षणीय” आहे असे त्यांना वाटत नाही. म्हणून विज्ञान व उदारमतवाद मरणासन्न झाले आहेत. हे मृत्यू घडल्यानंतर येईल तो खरा विज्ञानानंतरचा समाज. मात्र तो कसा असेल ते अॅपलयार्ड सांगत नाहीत.
हा लेख वाचताना जाणवले की ॲपलयार्ड विज्ञान म्हणून जे सांगतात, ते आपल्याला माहीत नाही. मला माहीत आहे ते विज्ञान निसर्गाच्या व्यवहारांकडे ज्ञानेंद्रियांनी “पाहाते”. जर काही व्यवहारांबद्दल एखादे तत्त्व किंवा सूत्र सुचलेच, तर त्या तत्त्वाला पूरक किंवा मारक असे प्रयोग करते. ज्ञानेंद्रियांना उपकरणांची मदत लागली, तर ती देते. असे अनेक प्रयोग, अनेक निरीक्षणे, यातून जी तत्त्वे खरी ठरतात, तीच मानणारे, ते माझ्या ओळखीचे विज्ञान.
अशी वैज्ञानिक तत्त्वे अनेक पातळ्यांवरची असू शकतात. यातले एक उदाहरण पाहा. स्प्रिगला वजने लटकवली, तर ती ताणली जाते. ताणले जाण्याचे अंतर आणि वजन यांचे काही ठरीव प्रमाण असते. एखाद्या स्प्रिंगवर अनेक प्रयोग करून आपण हे प्रमाण ठरवू शकतो. हे एक प्राथमिक प्रकारचे वैज्ञानिक तत्त्व आहे. विज्ञानाच्या इतर कोणत्याही धारणांमध्ये काहीही फरक पडला तरी हे तत्त्व बदलत नाही.
अनेक धातूंच्या, अनेक मापांच्या स्प्रिगांचा अभ्यास करून आपण पहिल्या तत्त्वापेक्षा सामान्य (general) अशी तत्त्वे ठरवू शकतो. ही तत्त्वे मूळच्या तत्त्वाहून जास्त ज्ञान देतात; पण मूळ तत्त्वाइतकीच हीसुद्धा “अचल” असतात. अशी जास्त जास्त सामान्य तत्त्वे ठरवताना अनेक संकल्पना घडवाव्या लागतात. पहिल्या तत्त्वाच्या वेळी “अंतर” आणि “वजन” या ज्ञानेंद्रियांना थेट जाणवणाऱ्या संकल्पना पुरल्या होत्या. पुढे मात्र “बल” (force) “लवचीकपणा” वगैरे ज्ञानेंद्रियांना फक्त परिणामांमधूनच जाणवणाऱ्या संकल्पना लागतील. अशा प्रत्येक संकल्पनेची व्यवहारवादी (operative) व्याख्या देणे ही विज्ञानात आवश्यक बाब आहे. अमुक परिणाम घडवते, ते “बल”, असा या व्याख्यांचा आकार असतो.
अशी व्यवहारी व्याख्या घेऊन येणारी संकल्पना “खरी” मानायची का? डोळ्यांना अंतर दिसते, पण स्प्रिंगच्या रेणूंना धरणारे बल कोणत्याच ज्ञानेंद्रियांना जाणवत नाही; तरी बल खरे मानायचे का? यावर एक शेरा पहा – “- If they continued to serve this way to produce other valid expectations, they could begin to become “real”, possibly as real as any other theoretical structure invented to describe nature.” (रिचर्ड फाईनमन येथे “कार्क’ या संकल्पनेबद्दल बोलत आहे.) थोडक्यात म्हणजे निसर्गाचे वर्णन करताना वापरल्या जाणाऱ्या अशा सैद्धांतिक रचना खऱ्या मानायच्या, ज्यांच्यामुळे उद्भवणाऱ्या अपेक्षा प्रयोगातून पूर्ण होतील. इथे जुन्या तत्त्वांना किंवा सैद्धांतिक रचनांना खोटे पाडणे गरजेचे वा महत्त्वाचे नाही. पण अशा सुचणाऱ्या रचना (म्हणजेच सुचणारी तत्त्वे) तितपतच खरी, जितपत त्या “सफळ” अपेक्षांना जन्म देतात. हा तात्पुरता, “तपासाधीन खरेपणा” विज्ञानात आहे. पण यात कोणाच्या मताचा प्रश्न नाही. सारा तपास कोठून तरी ज्ञानेंद्रियांच्या पातळीवर येऊन संपायला हवा. आणि अशी एखादी संकल्पना वा तत्त्व खरे ठरताना जुनी, कमी सामान्य, कमी व्याप्तीची संकल्पना सोडून द्यावी. लागली, तर त्याचे दुःख मानायचे कारण नाही. परंपरा मोडणे हा शहाण्यांचा अधिकारच असतो.
पण तपासाधीन, व्यवहारी, टेंटेटिव्ह भाव म्हणजे चंचलपणा नव्हे. नव्या, जास्त व्याप्तीच्या कल्पना घडवणे म्हणजे जुन्यावर हल्ला करणे नव्हे. ज्ञानेंद्रियांच्या पुराव्यालाच “सुप्रीम कोर्ट” मानणे हा सर्वज्ञपणाचा दावा नव्हे.
आता ही सारी वैज्ञानिक शिस्त – ज्ञानेंद्रिये, निरीक्षणे, प्रयोग, व्यवहारवादी व्याख्या, अपेक्षापूर्ती करणाऱ्या संकल्पना – न पाळता घडवलेल्या मतांचे काय ? निसर्ग व्यवहारात वैज्ञानिक शिस्तीने घडवलेल्या तत्त्वांपेक्षा यांचे स्थान डावेच. खरे तर त्यांना “मत” हेच स्थान. भारतीय दर्शनांची भाषा वापरायची, तर प्रत्यक्ष व अनुमान ही प्रमाणे आप्तवाक्य वा साक्षात्कारी मतांपेक्षा वरचीच. अनुमानेही पुनःपुन्हा तपासावीत, गरज पडल्यास बदलावीत, हे विज्ञानाचे “धोरण”.
विज्ञानाच्या शिस्तीत ज्या गोष्टींबद्दल काही ठरवणेच अशक्य, तेथे विज्ञान खांदे उडवून गप्प बसते. (खरे तर “विज्ञान” अशा व्यक्तीच्या रूपात पाहणे अवैज्ञानिक आणि तर्कदुष्टच-असे समजा की अपलयार्डचा मान राखायला त्याची भाषा वापरली !) “अंतिम” अर्थ, “अंतिम” कारणे, हे या जातीचे प्रश्न. “अंतिम” सोडाच, मधल्या काही पायऱ्या तरी कुठे सुटल्या आहेत ? मानवी जीवन मानवांना महत्त्वाचे वाटते, हे योग्यच. पण सर्व निसर्गव्यवहार घडतात त्यात मानवी जीवनाला काही विशिष्ट स्थान आहे, हे कशावरून? मानवी जीवन, त्याचा अर्थ, त्याची कारणे, यांच्या व्यवहारी व्याख्या, ज्या अखेर प्रत्यक्ष प्रमाणापर्यंत जाऊ शकतील, अशा आहेतच कुठे? आणि या प्रमाणांशी सांधे न जुळणाऱ्या प्रणाली वैज्ञानिक नाहीत, येवढेच. त्या चूक आहेत, बरोबर आहेत, असे काहीही विज्ञान सुचवीत नाही.
आता अशा प्रणालींना विज्ञानाने त्यांच्या मतांना मुजरा करून हवा असेल, आणि म्हणून ते अॅपलयार्डसारख्या विचारवंतांकरवी “विज्ञान” नावाचे बुजगावणे उभे करून त्याला हरवू इच्छीत असतील, तर हा स्वतःला फसवायचा मार्ग त्यांना मोकळा आहेच.
अॅपलयार्ड यांनी विज्ञानाबाबतच्या विवेचनामध्ये अनेक घोडचुका केल्या आहेत. इतक्या की इतर विवेचनही “संशयास्पद” ठरावे. त्याची भूमिका उघडपणे विज्ञानविरोधी पूर्वग्रहाने ग्रस्त आहे. त्यांना विज्ञानाची ॲटम-बाँबसारखी “दुष्ट उत्पादने” दिसतात, पण वैद्यकशास्त्रातील, शेतीतील, इतर अनेकानेक क्षेत्रातील सुष्ट उत्पादने दिसत नाहीत. त्यांना पर्यावरणवादाने विज्ञानाच्या सद्गुणांना शंकास्पद ठरवल्याचे जाणवते. पण त्यांना ज्या इस्लामादी धर्माचे कौतुक वाटते त्यांनी लोकसंख्या स्फोटाला दिलेली चूक दिसत नाही. त्यांना अमेरिकन मुले स्वतःच्या संस्कृतीचे संरक्षण करायला सरसावत नाहीत हे जाणवते. आपल्या काही नागरिकांना जरा त्रास झाल्यावर ग्रेनाडासारख्या “सूक्ष्म” देशावर तुटून पडणारी अमेरिकन राज्यसत्ता दिसत नाही…
अत्यंत झापडबंद नजर आहे ही. असल्या अनर्थकारी पूर्वग्रहांखाली वावरणाऱ्या “विचारवंताला” टाइम्स ऑफ इंडियासारख्या राष्ट्रीय पातळीवरच्या दैनिकाने तब्बल अर्धे पान द्यावे हे आश्चर्यच.
पण त्या लेखातल्या “आध्यात्मिकता”, “अधर्म”, “सद्गुण” वगैरे शब्दांच्या सढळ प्रयोगाने कोणी सभ्य उदारमतवादी गांगरून स्वतःला कमी लेखू लागेल, ही भीती आहेच. एवीतेवी वैज्ञानिक वृत्तीत अॅपलयार्डना असहिष्णुता दिसतेच आहे. मग होऊन जाऊ द्या हे “लेखी” दांत-नखे काढून गुरगुरणे !
१९३ मश्रूवाला मार्ग, शिवाजीनगर, नागपूर ४४० ०१०