वरील लेखाच्या शेवटी जी भाकिते दिली आहेत त्यातील ‘इलस्ट्रेटेड वीकली’ च्या २० मे ८४ च्या अंकात ज्यांची भाकिते दिली आहेत त्यांची नावे अशी- फलज्योतिषी बेजन दारूवाला व तांत्रिक प्रवीण तलाठी ह्यांची भाकिते समोरासमोर दिली आहेत. त्यांतील काही परस्पर-विरोधी आहेत. आणखी लक्षात घेण्याजोगी गोष्ट म्हणजे हा मुलाखत-वजा लेख थिल्लर व पोरकट विधानांनी— दोघांच्याही – भरगच्च भरलेला आहे. प्रवीण तलाठीची काही भरमसाठ वक्तव्ये. त्यातले एक असे- “मी आणखी एक हवन केले आणि चरणसिंगाला पंतप्रधान केले.” आणखी एक नमुना पहा. “आपल्या देशातील परदेशांच्या राष्ट्रविघातक कारवायांचा नायनाट करण्यासाठी तंत्रविद्येचा उपयोग केला पाहिजे.” आणि देशातले काही प्रमुख राजकीय पुढारी अशा भंकस लोकांच्या कच्छपी लागतात! जिज्ञासूंनी हा संपूर्ण मुलाखत-वजा लेख मुळातून वाचायला हवा.
सुधारणांच्या बाबतीत कसलीही तडजोड न करून आगरकरांच्या सुधारणावादाच्याही पुढे पाऊल टाकणारे
‘अडवतील जर देव तरी । झगडू त्यांच्याशी निकरी । हार न जाऊ रतीभरी । असे ठणकावून सांगणारे बंडखोर आणि ईर्षायुक्त व्यक्तिमत्त्व असलेले, ‘देवदानवा नरें निर्मिले । हे मत लोकां कळवू द्या’ अशा निःसंदिग्ध भाषेत ईश्वराच्या उत्पत्तीची प्रक्रिया सांगणारे आणि आपल्या प्राणाने तुतारी फुंकण्याची घोषणा करून ‘जुने जाऊ द्या मरणालागुनि | जाळुनि किंवा पुरुनी टाका’ असा क्रांतिकारी संदेश शंभर वर्षांपूर्वी आपल्या ‘तुतारी’तून देणारे केशवसुत जर आज हयात असते तर ‘काय म्हणावे या स्थितिला’ असा प्रश्न त्यांना खचितच पडला असता.
र. वि. खांडेकर श्रीधाम, रहाटे कॉलनी नेहरू मार्ग, नागपूर- २२