प्रा. दीक्षितांनी ‘विज्ञानाला उद्गामी विज्ञान म्हणतात’ या माझ्या वाक्यातील एका अडचणीवर बोट ठेवले आहे. ते वाक्य विश्लेषकही आहे आणि संश्लेषकही आहे असे म्हणावे लागेल ही ती अडचण. प्रा. दीक्षितांचे म्हणणे मला स्थूलपणे मान्य आहे. माझ्या नीतिशास्त्राचे प्रश्न या पुस्तकात त्यांना अभिप्रेत असलेला भेद मी केला आहे. परंतु खरे म्हणजे खुद्द इंग्रजीत (आणि मला वाटते जर्मन भाषेतही) ‘Science’ या शब्दाचा उपयोग अजून बराच शिथिल आहे. उदा. द्वाकच्या तर्कशास्त्रावरील एका पुस्तकाचे नाव ‘Introduc- tion to Logic and the Methodology of Deductive Sciences’ असे आहे. आणि तसेच ‘शास्त्र’ या शब्दाचा संस्कृत वाङ्मयातील उपयोगही पुष्कळच शिथिल आहे. ‘शास्त्र’ या शब्दाने एक प्रकारचे औपपत्तिक ज्ञान (theoretical knowledge) हा अर्थ नेहमीच व्यक्त होतो असे नव्हे. उदा. ‘धर्मशास्त्र’, ‘पाकंशास्त्र’, ‘कामशास्त्र’ या शास्त्रांत ‘theoretical knowledge’ किती आहे हा प्रश्न आहे. अशा स्थितीत जो प्रयोग इंग्रजीत साधु आहे तो मराठीतही साधु मानावयास हरकत नसावी. विशेषतः मूळ इंग्रजी विचाराचा अनुवाद करताना तरी नसावी असे मला वाटले. अजूनही वाटते.
दि. य. देशपांडे