चारचौघी पाहिले त्यावेळी त्या नाटकाने बऱ्यापैकी वादळ उठविले होते. मिळून साऱ्याजणीने चर्चा घडवून आणली होती. उत्तरे शोधत असणाऱ्या या चौघी प्रश्नच जास्त उभे करतात असे वाटले. या चौघीतली आई एक सुविद्य शिक्षिका. तीन मुलींची अविवाहित माता. मुलींचे वडील आबा स्वतःचा स्वतंत्र संसार सांभाळून या तीन मुलींचे जन्मदाते होतात. त्यांच्या आईशी लग्न न करता.
बहिणींतली मोठी विद्या. नावाप्रमाणे शिकून एम्. ए., पीएच.डी झाली. कॉलेजात प्राध्यापक म्हणून यशस्वी झालेली. तिचा नवरा आशिस हा पत्रकार. त्याचे एका सहव्यावसायिकेबरोबर लफडे सुरू असल्याचे पाहून त्याच्याशी भांडून विद्या आईकडे माघारी आलेली. नवरा लहानग्या मुलीला देत नाही. व्यभिचारी आईचेच रक्त तिच्यात आहे असे विद्याला हिणवणारा. मुलीला ५ वर्षे आई, पण पुढे मात्र पालक पित्याचा अधिकार ह्या वर्तमान कायद्याला ती आव्हान देते. पण कोर्टात केस हरते. असा स्वतःच्या कर्तृत्वाचा आणि बुद्धीचा अभिमान बाळगणाऱ्या या विद्याला तिच्या आईने आणि बहिणींनी काय सल्ला द्यावा? तर नवऱ्याला आणखी एक चान्स दे. तिचे ठाम मत मात्र हे की नवऱ्याची चूक अक्षम्य आहे.
घटस्फोटाला सहजासहजी तयार होणारी विद्या आपल्या लहान बहिणीला काय सल्ला देते ते पाहा.
वैजू ही दुसरी बहीण. शेजारच्या गोऱ्या गोमट्या श्रीकान्तवर भाळून त्याच्याशी लग्न केलेली. श्रीकांत नोकरी चाकरीत कुठे न टिकणारा. कमाई न करता आनंदी दिसण्याचे कसब दाखवीत आपल्या काल्पनिक कर्तृत्वावर खूष असणारा. बायकोंच्या जिवावर गमजा करणारा. त्याचा राग येत असूनही त्याला चिकटून राहणारी वैजू. अपत्य असावं ही त्याच्या इच्छेला पुष्कळ दिवस दाद न देता वैजू नकळत गर्भवती होते. गर्भपाताची इच्छा असूनही आता नवऱ्यावर सूड उगवायचा म्हणून ती तो करीत नाही. डामडौल आवडणारी चंगळवादी वैजू.
विनी तिसरी. हुषार कॉलेज कन्या, मोठ्या दोघींचे संसार पाहिलेली. धाकटी असून भाबडेपणाने त्यांना सल्ला देत असते. तिला दोन मित्र. हुषार, शांत आणि बुद्धिवादी प्रकाश आणि वरवर खुशाल चेंडू दिसणारा सुरेन्द्र श्रीमंत. विनी दोघांवरही सारखीच लट्टू, तिला दोघांचीही सुखसोबत हवी असते. म्हणून आपण तिघे मिळून राहू हा तिचा प्रस्ताव. मोकळा सुरेन्द्र त्याला तयार. वेळी घरादारावर पाणी सोडायची तयारी असलेला. पण विचारी प्रकाश मात्र त्याला नाकबूल. विनीला आपल्या प्रस्तावात काहीच चूक दिसत नाही. सुरेन्द्राचे मत असे की स्वामित्वाच्या प्रेरणेपायी (possessive instinct) मनुष्य अशा समंजस सुखाच्या भागीदारीला पारखा होतो.
अशा या चारचौघी, मुक्तभोगी पंथातल्या. स्त्रीपुरुष संबंधातील मोकळेपणाचे नमुने. एका विवाहित परपुरुषाशी राजरोस संबंध ठेवून त्याच्यापासून झालेल्या तीन मुलींची अविवाहित आई मुलीने दोन नवरे करू नयेत असे का म्हणते? आईसारखीच सुविद्य मोठी बहीण. तीही विनीच्या दोघा मित्रांबरोबर एकत्र संसार उभा करायच्या कल्पनेला विरोध करते. तो का?
आईचा प्रश्न असा की अजून ५० वर्षांनी समाजाला जे रुचेल ते आज कसे करायचे? मग तिचे स्वतःचे वागणे कसे?
या चारचौघींना कुटुंबसंस्था मोडीत काढायची आहे? कुटुंबसंस्था आपल्या स्थिर समाजाचा मजबूत पाया आहे. मनाला येईल तसे मी वागेन. समाजाच्या विघटनाची मला पर्वा नाही हा विचार अहंकेंद्री आहे. स्वकर्तृत्वाचा तो दंभ आहे. एकीकडे नवऱ्याचे लफडे सहन न करणाऱ्या बुद्धिवादी विद्येचे कौतुक करायचे आणि दुसरीकडे आईचा दोपदरी संसार स्तुत्य समजायचा. लग्न एकाशी पण प्रीती दोघांवर अशी लपवाछपवी विनीला नको. हा तिचा मुक्तभोगीपणा स्तुत्य की निंद्य?विद्याचा नवरा वर्तमानपत्राच्या कामासाठी रात्रभर मैत्रिणीबरोबर असतो. दोन तरुण स्त्री-पुरुष रात्र रात्र एकत्र घालवून फक्त मित्रभावना बाळगतात, पण त्यांच्यात शरीरसंबंध येत नाहीत हे समाजाला पटत नाही.
सिनेनियतकालिकांमधील गावगप्पा (गॉसिप) लोक चवीने का वाचतात? लिहिणाऱ्या लेखकाला आणि वाचणाऱ्या वाचकालाही हे खरे नाही हे माहीत असते. चारचौघी हे नाटक तसेच समजायचे का?
बुद्धिवादी विद्याने जर आशिस्ला म्हटले की, तुला गीता आवडली, नो प्रॉब्लेम, पण असंच मला कोणी आवडला तर तू रागावू नकोस. तर त्याला ते चालेल का? विनीने दोघांशी एकत्र संसार करावा, पण शरीरसुखासाठी सर्वजण मोकळे आहेत असे म्हणायचे काय? तसे नसेल तर शरीरसुख त्या तिघांचे एकत्र राहाणे यशस्वी होऊ देणार नाही. हे तिला समजू नये काय? आबांपासून आईने सर्व सुख चोरून मिळविले. त्यांना त्यांच्या संसारापासून न तोडता, आबांची पत्नी जुन्या वळणाची. नवऱ्याला अंगवस्त्रासकट सांभाळणारी. या दोघीत कोण सुशिक्षित कोण अनाडी? तत्त्वासाठी नवरा व लहान मुलगी सोडणारी विदुषी विद्या. तिने विनीला विरोध का करावा?
विनी आणि आई. एक स्त्री आणि दोन पुरुष, एक पुरुष आणि दोन स्त्रिया असे त्रांगडे. आपले चुकते असे ना विनीला वाटत ना आईला. आम्ही मुक्तभोगी. समाजाची आम्हाला काय पर्वा? या मतांच्या! इंग्रजी सिनेमात आपण असे संसार पाहातो. संसार उभे करतात ते मोडण्यासाठीच जणू. अजून ५० वर्षांनी समाज याला मान्यता देईल हे आईचे म्हणणे. त्याला वजन द्यायचे तर तिने विद्याला खिलाडूपणे आशिसूची चूक (?) स्वीकारायला सांगावे, विनीला एकाचवेळी दोन नवरे करू द्यावेत. बायकोला मूल होत नाही म्हणून दुसरी करणे किंवा दुसऱ्या स्त्रीचा गर्भाशय उसना घेणे हे मान्य करायचे तर नवऱ्याच्या दोषामुळे पत्नीने दुसऱ्या पुरुषाचे वीर्य स्वीकारणे हे मान्य करावे लागेल. याला समाजाची तयारी आहे का हा खरा प्रश्न आहे. मनुष्य प्राणी आहे म्हणून त्याने जनावराप्रमाणे वागायचे का? नवरा आवडत नाही किंवा कर्तृत्वशून्य आहे या कारणांसाठी आपल्या समाजात घटस्फोट मिळत नाही म्हणून दुःख करायचे आणि त्याच षंढ नवऱ्याचा गर्भ वाढवून त्याला जन्म देऊन त्याचा सूड घेईन असे म्हणायचे हे अनाकलनीय आहे. की हे सगळे गॉसिप?
पाश्चात्यांचा मुक्तपणा आपल्या देशात आहे, पण तो आदिवासी समाजात. परगावी वर्षानुवर्षे असलेल्या नवऱ्याला पाठीमागे मुले होणे ही रचना ज्यांनी मान्य केली असे लोक आहेत. आम्ही त्या दशेतून वर उठून सुसंस्कृत झालो असे समजतो. विवाहसंस्था, कुटुंबसंस्था या प्रगत समाजातल्या गोष्टी आहेत. त्यांच्या आधारे स्थिर समाज निर्माण झाला. पण आता बुद्धिवाद आणि व्यक्तिस्वातंत्र्य या नावाखाली परत त्या दशेकडे आम्ही ‘जाऊ पाहात आहोत की काय?
सरस्वती, रामदासपेठ, अकोला ४४४००१