लग्न ही सर्वसामान्य प्रत्यही घडणारी गोष्ट आहे. मग ही खरेदीविक्रीची पद्धत अजून का नाही बंद पडत? विशेषतः शाळा कॉलेजांतून जाणाऱ्या मुलींना ‘पाहण्याची’ काय आवश्यकता आहे? आम्ही पडदानशीन थोड्याच आहोत? शाळेत जाता-येता मुलगी अव्यंग आहे की नाही हे सहज अजमावता येईल. घरी येऊन तरी चहापोहे झोडून मुलीला चारदोन मामुली प्रश्न विचारण्यापलीकडे वरपक्ष काय करतो? मुलीचे शील व स्वभाव एका दृष्टिक्षेपात ओळखण्याची कुवत वरपक्ष झाल्याने अंगात येते थोडीच! मग वधूपरीक्षेचा अर्थ तरी काय? पाहून मुलगी केल्यावरही ‘तिला अंधारात उभी केली होती’, ‘ती जरा पाठमोरी बसली होती’ वगैरेसारखी क्षुल्लक कारणे सांगून मुलीला वाईट ठरविण्याचा प्रयत्न नाही का लोक करीत! शिवाय पाहायच्या पद्धतीने सौंदर्याची किंमत अवास्तव वाढली आहे. विवाहयोग्य वयात साऱ्याच मुली आपलेपणात येतात. काहींचे सौंदर्य स्थायी असते, तर काहींना, बहुतेक मुलींना मातृपदाशी टक्कर घ्यावी लागते. ह्या संकटातून सहीसलामत बाहेर पडावयास शरीर सकस लागते. संसाराचा गाडा सुरळीत चालावयास वधूवरांचा स्वभाव देवघेवीचा असावा लागतो. पण लग्नाचा सौदा सौंदर्य व संपत्ती यांच्या बळावर ठरतो. ह्यापेक्षा कुलशीलसंपत्र वडील मंडळींनी पसंत केलेली वधू हुंड्यावाचून पत्करणे काय जास्त वाईट आहे? मुलामुलींना आपली निवड करू द्या, नाही तर कोणतीही अव्यंग वधू पत्करा.