उद्गमन (२)
गेल्या लेखांकात आपण उद्गमनाची समस्या समजावून घेतली. ती समस्या अशी आहे की निसर्गाचे ज्ञान मिळविण्याचा एकमेव उपाय म्हणजे उद्गमन. परंतु ही क्रिया अवैध असल्यामुळे तिचे निष्कर्ष कधीही पूर्णपणे सिद्ध झाले असे म्हणता येत नाही. ते कमीअधिक प्रमाणात संभाव्य असू शकतात, पण पूर्णपणे निश्चित असू शकत नाहीत. म्हणून मग उद्गामी अनुमाने त्यातल्या त्यात विश्वासार्ह कशी होतील असा प्रश्न उपस्थित होतो. याचे उत्तर या लेखांकात द्यावयाचे आहे.
निसर्गातील प्रक्रम (Order in Nature)
निसर्गाची वाटचाल नियमबद्ध आहे, आणि प्रत्येक घटना कोणत्या तरी नियमानुसार घडते असे वैज्ञानिक मानतो. निसर्गात दर क्षणाला असंख्य घडामोडी होत असतात. त्यात प्रथमदर्शनी कसलाही प्रक्रम (order), व्यवस्था, नियमितपणा दिसत नाही. परंतु तरीही त्यात नियमांचे साम्राज्य आहे, प्रत्येक घटना घडण्याचा नियम आहे आणि त्या नियमानुसार ती घडते असे वैज्ञानिक गृहीत धरतो. त्याचा हा विश्वास अनाठायी नाही हे विज्ञानाच्या इतिहासात मोठ्या प्रमाणात सिद्ध झाले आहे.
नियमितता अनेक प्रकारची
निसर्गातील नियमितता अनेक प्रकारची आहे. सर्वांत साधी नियमितता म्हणजे अनेक धर्मांचे सतत एकत्र राहणे. उदा. साखरेत शुभ्रपणा, कठीणपणा, गोडी आणि पाण्यात विरघळणे हे धर्म सदैव असतात; आणि तसेच कोळश्यात काळेपणा, ठिसूळपणा आणि पेट घेण्याचा गुण हे धर्म असतात. या प्रकारच्या नियमिततेला साहचर्यात्मक नियमितता किंवा नियमित साहचर्य (uniformity of co-existence) असे नाव देता येईल. दुसऱ्याही एका प्रकारची नियमितता निसर्गात आढळते – आनुचर्यात्मक नियमितता किंवा नियमित आनुचर्य (uniformity of succession). उदा. ज्याला आपण कार्यकारण संबंध म्हणतो तो नियमित आनुचर्याचाच एक प्रकार आहे. उदा. आर्सेनिकच्या सेवनामुळे मृत्यू येतो, किंवा आर्सेनिकसेवन हे मृत्यूचे एक कारण आहे, असे आपण म्हणतो त्याचा अर्थ असा असतो की जेव्हा जेव्हा कोणी मनुष्य आर्सेनिक सेवन करतो तेव्हा तेव्हा तो मरतो. आर्सेनिक सेवन ही घटना घडल्यानंतर मृत्यू ही घटना न चुकता घडते हा या दोन घटनांमध्ये कारणसंबंध आहे असे म्हणण्याचा अर्थ आहे.
वरील दोन प्रकारच्या नियमांहून भिन्न प्रकारचेही नियम आहेत. दोन घटितांमधील (phenomena) संबंध साहचर्याचा किंवा आनुचर्याचा नसून त्यात एखादा गणितीय संबंध असेल. उदा. परावर्तनाचे (refraction) घटित. जेव्हा प्रकाश एका घनतेच्या माध्यमातून (उदा. हवा) – भिन्न म्हणजे कमी किंवा अधिक घनतेच्या माध्यमात (उदा. पाणी) प्रवेश करतो तेव्हा त्याची दिशा बदलते, आणि या बदलाचा नियम गणितीय आहे. हा नियम गुणांचे नियमित साहचर्य किंवा घटनांचे नियमित आनुचर्य या प्रकारचा नसून तो वेगळ्याच प्रकारचा गणितीय नियम आहे हे लक्षात येईल. याहून अधिक गुंतागुंतीचे नियमही आहेत. उदा. गुरुत्वाकर्षणाचा नियम. ह्या नियमाचे प्रतिपादन असे आहे की विश्वातील यच्चयावत् भौतिक पदार्थ परस्परांना आकर्षित करतात, आणि या आकर्षणाची मात्रा पदार्थांच्या वस्तुमानांच्या गुणाकाराच्या समप्रमाणात, तर त्यांच्या अंतरांच्या वर्गांच्या व्यस्त प्रमाणात असते.
उद्गमनाचे नमुने
उद्गमनाचे स्थूलमानाने दोन नमुने आहेत. (१) सरल गणनेद्वारा उद्गमन (Induction by Simple Enumeration), आणि (२) औपन्यासिक-निगामी (hypothetico-deductive) उद्गमन. सरलगणना म्हणजे एखाद्या प्रकारच्या अनेक वस्तूंचे केवळ निरीक्षण. अशा निरीक्षणातून अनेकदा नियम सुचतात. उदा. सर्व कावळे काळे असतात हा नियम कावळ्यांच्या केवळ निरीक्षणाने सुचला असला पाहिजे. आपण पाहिलेले सर्व कावळे काळे होते, आणि आपण काळ्याहून अन्य रंगाचा एकही कावळा पाहिला नाही, यावरून सर्व कावळे काळे आहेत हे उद्गमन सुचणे स्वाभाविक आहे. हे झाले सरल गणनेद्वारा उद्गमन. या रीतीचे पूर्ण नाव आहे – विरुद्ध उदाहरणांचा अभाव असताना सरल गणनेद्वारा उद्गमन (Induction by Simple Enumeration in the Absence of Contrary Instances).
परंतु साहचर्याच्या नियमांच्या बाबतीत सरल गणनेने कार्यभाग साधला तरी आनुचर्याच्या नियमांच्या बाबतीत, तसेच गणितीय नियमांच्या बाबतीत केवळ गणनेने भागत नाही. त्याकरिता उपन्यासाची (hypothesis) गरज भासते. या रीतीला औपन्यासिक निगामी रीत असे नाव आहे. तिचे स्वरूप आता थोडक्यात समजावून घेऊ. उपन्यास (hypothesis) म्हणजे काय ? न उपन्यास किंवा hypothesis म्हणजे एखाद्या प्रश्नाच्या उत्तरासंबंधी केलेलाअंदाज. अनेक प्रश्नांचे उत्तर चटकन देता येत नाही. उदा. एखाद्या व्यक्तीचा खून झालेला असल्यास ‘खुनी कोण?’ हा प्रश्न पोलिस अधिकाऱ्यापुढे असतो, आणि त्याला त्याचे उत्तर शोधायचे असते. त्याचा एक उपाय म्हणजे संभाव्य खुनी कोण असावा याचा अंदाज बांधणे. परंतु केवळ अंदाज बांधून थांबता येत नाही; कारण अंदाज चुकीचा असू शकतो. म्हणून त्या अंदाजाचे परीक्षण करावे लागते. प्रश्नाचे उत्तर म्हणून परीक्षेकरिता आणि परीक्षाकालापुरता स्वीकारलेला अंदाज म्हणजे hypothesis. त्याला आपण उपन्यास हे नाव देऊ. (सध्या मराठीत रूढ असलेला ‘अभ्युपगम हा शब्द बोजड तर आहेच, पण त्याचा मूळ संस्कृत अर्थ वेगळा आहे.) निसर्गातील कारणनियम आणि अन्य अधिक जटिल नियम शोधून काढण्याकरिता उपन्यासाचा वापर का करावा लागतो ते पुढील विवेचनावरून स्पष्ट होईल.
समजा आपल्याला एखाद्या घटनेचे कारण शोधून काढायचे आहे. कोणत्याही घटनेचे कारण म्हणजे तिच्या आधी नियमपूर्वक घडणारी घटना हे आपण पाहिले आहे. कारणसंबंध हा आनुचर्यात्मक संबंध आहे, म्हणजे त्यात कारण आधी आणि कार्य नंतर घडते. तसेच कारणसंबंध हा नियमित संबंध आहे; म्हणजे एका कारणाचे कार्य एकच असते. कारणसंबंध आनुचर्यात्मक संबंध असल्यामुळे तो दोन घटनांमधील संबंध आहे हे उघड आहे, कारण घटनाच फक्त आधी आणि नंतर असू शकतात. आता कोणत्याही घटनेचे कारण शोधण्यातील अडचण अशी आहे की एक घटना दुसरी घटना घडविताना, निर्माण करताना, दिसत नाही. एक घटना आधी आणि दुसरी नंतर घडते हे आपल्याला दिसू शकते, परंतु एका घटनेमुळे दुसरी घटना घडते ही गोष्ट निरीक्षणाला सापडणारी गोष्ट नाही. त्यामुळे कोणत्याही घटनेचे कारण तिच्या पूर्वगामी (म्हणजे तिच्या आधी घडलेल्या) घटनांमध्ये असले पाहिजे असे जरी आपण निश्चितपणे म्हणू शकलो, तरी कोणती पूर्वगामी घटना कारण आहे ते केवळ निरीक्षणाने आपण सांगू शकत नाही. कोणत्याही क्षणी असंख्य घटना घडत असतात. त्यापैकी संशोधनविषय घटनेच्या निकटवर्ती घटना घेतल्या तरी त्याही असंख्य असतात. या सर्व घटनांची कारणे त्यांच्या पूर्वक्षणी घडणाऱ्या घटना असतात. म्हणून कोणती घटना कोणत्या घटनेचे कारण आहे हे सांगणे अशक्य असते. अशा परिस्थितीत उपन्यासाचा उपयोग होतो. संशोधनविषय घटनेच्या आधी घडणाऱ्या असंख्य घटनांपैकी काही थोड्या घटनांची संभाव्य कारण म्हणून (उपन्यास म्हणून) निवड केली जाते, आणि नंतर त्यांचे परीक्षण केले जाते. या परीक्षणाला verification’ असे नाव असून आपण त्याला ‘सत्यापन’ हे नाव देऊ. कारणिक उपन्यासाचे परीक्षण करायचे म्हणजे त्याने कारणसंबंधाच्या अटींचे पालन होते काय हे पाहायचे. कारणसंबंध एक-एक संबंध (one-one relation) आहे, म्हणजे एका कारणाचे कारण एकच, आणि एका कार्याचे कारणही एकच अशी स्थिती आहे. हे स्वरूप लक्षात घेता एखादी घटना संशोधनविषय घटनेचे कारण आहे या उपन्यासाचे परीक्षण करायचे म्हणजे त्या घटनेच्या विविध उदाहरणांत जिथे ती उपस्थित असेल तिथे उपन्यस्त घटना (म्हणजे कारण म्हणून परीक्षणार्थ स्वीकारलेली घटना) उपस्थित असली पाहिजे, आणि तसेच जिथे उपन्यस्त घटना हजर असेल तिथे संशोधनविषय घटनाही हजर असली पाहिजे. संशोधनविषय घटना हजर असताना उपन्यस्त घटना हजर नसेल, किंवा उपन्यस्त घटना हजर असताना जर संशोधनविषय घटना हजर नसेल, तर उपन्यास खरा नाही असे मानावे लागेल. समजा आपण संशोधनविषय घटनेचे संभाव्य कारण म्हणून अ, ब व क या तीन घटनांची (उपन्यासांची) निवड केली, आणि परीक्षणात आपल्याला असे आढळले की अहजर असताना संशोधनविषय घटना एका उदाहरणात हजर नाही, आणि दुसऱ्या एका उदाहरणात संशोधनविषय घटना हजर असताना ब गैरहजर आहे, तर अ आणि ब या दोन्ही उपन्यासांचे खंडन झाले असे मानले जाईल. जर क या घटनेने कारणसंबंधाच्या सर्व अटी पुऱ्या केल्या तर क ही घचे कारण असे मानले जाईल.
उपन्यासाच्या रीतीच्या प्रमुख पायऱ्या पुढीलप्रमाणे आहेत:
१. उपन्यास बनविणे.
२. तो खरा समजून, तो तसा असेल तर त्याचे काय परिणाम प्रत्यक्ष घडून येतील याची निगमने करणे.
३. या अनुमित परिणामांबरहुकूम वस्तुस्थिती आहे का याचा शोध घेणे.
४. अनुमित परिणाम जर वास्तवात उपस्थित नसतील, तर उपन्यासाचा असत्य म्हणून त्याग करणे.
५. परीक्षणाच्या साह्याने एक एक करून उपन्यासांचा असत्य म्हणून त्याग केल्यावर जर एकच उपन्यास उरला आणि त्याने कारणसंबंधाच्या सर्व अटी पूर्ण केल्या, तर त्याचा सत्य म्हणून स्वीकार करणे. परीक्षेत एकाहून अधिक उपन्यास उतरले, म्हणजे एकाहून अधिक उपन्यास शिल्लक राहिले, तर संशोधनाचे कार्य पुरे झाले नाही असे मानावे लागेल, आणि एक सोडून अन्य उपन्यासांचे खंडन करावे लागेल.