श्री. संपादक, आजचा सुधारक, यांना स.न. वि मुस्लिम समाजाचे मन वळवण्यासाठी म. गांधींनी अनुसरलेला मार्गच आजही आवश्यक आहे अशी श्री. पळशीकरांची श्रद्धा आहे. ऑगस्ट १९९३ अंक, पृष्ठ १३७ वर त्यांनी काहीशा डौलाने प्रश्न विचारला आहे की, “सनातन धर्माच्या कोणत्या तत्त्वानुसार मुस्लिम समाजाचे मन वळवण्याचे कोणते प्रयत्न झाले, त्या प्रयत्नांना अपयश का आले, व अपयशाची जबाबदारी सर्वस्वी मुस्लिम समाजावर कशी ?” या त्यांच्या प्रश्नाचे उत्तर मी देत नाही, पण एक अवतरण देतो. नोव्हेंबर – डिसेंबर १९९२ अंक, पृष्ठ २६९, शेवटचा परिच्छेद यात श्री. दि. य. देशपांडे म्हणतात कीं, “(गांधींनी) विशेषतः हिंदू आणि मुसलमान यांच्यात बंधुभाव निर्माण करण्याची जेवढी धडपड केली तितकी आजपर्यंत कोणी केली नाही, आणि पुढेही भविष्यांत कदाचित कोणी करणार नाही. पण त्यांना यश किती आले ? जवळजवळ शून्य !” यावर श्री पळशीकर लिहितात (एप्रिल मे १९९३, पृष्ठ ३४) “गांधीना अपयश आले पण त्यांचा मार्ग योग्यच आहे, he was acting before his time असे म्हणणेही तर्कसंगत ठरते.” हिंदु-मुस्लिमसंबंधात जी ग्यानबाची मेख आहे तिच्याकडे श्री. पळशीकर सोयिस्करपणे डोळेझाक करतात. ती मेख ही की, मुस्लिम नेत्यांना हिंदू समाजाशी फटकून वागणेच योग्य वाटते. त्यांच्या धर्मगुरूंची शिकवण अशी आहे की, ‘मूर्तिपूजक काफरांच्या समाजापासून सच्च्या इस्लामधर्मीयांनी स्वतःला दूर राखावे. धर्माज्ञेप्रमाणे काफरांनी एकतर इस्लाम स्वीकारावा किंवा नष्ट व्हावे.’ अशा शिकवणुकीपुढे कोणी काय बोलावे ? पण असा प्रश्न केला की श्री. पळशीकरांच्या छातीत धडकी भरते. असले प्रश्न विचारण्यामुळे मुस्लिम समाजात संतप्त प्रतिक्रिया उठतील असे त्यांना वाटते. (पहा, एप्रिल १९९२, पृष्ठ २५, दुसरा परिच्छेद)
जर उपमेच्या सहाय्याने थोडक्यात आपले म्हणणे मांडता येत असेल तर मी एक उपमा श्री. पळशीकरांना देतो, त्याबद्दल त्यांनी मला क्षमा करावी. ती उपमा म्हणजे वाळूत डोके खूपसून बसणाऱ्या शहामृगाची.
— मा. श्री. रिसबूड २ वासवी २१०१ सदाशिव, पुणे- ३०