एन्.टी. रामाराव यांचे लग्न ही मोठीच खबर आहे. राष्ट्रीय आघाडी आणि तेलगू देसम् या राजकीय पक्षांचे अध्यक्ष, आंध्राचे माजी मुख्यमंत्री असे हे बडे प्रस्थ आणि मुख्य म्हणजे त्यांचे (जवळपास ‘अवघे पाऊणशे वयमानं’. असे असताना त्यांनी ३६ वर्षाच्या घटस्फोटिता लक्ष्मी शिवपार्वती या आपल्या चरित्र – लेखिकेशी दुसरे लग्न केले आहे. सदान्कदा भगवे कपडे परिधान करून स्वामी विवेकानंदांची मधून मधून आठवण द्यायला ते विसरत नसत. या प्रौढा- वृद्धविवाहाने त्यांची प्रतिमा आणि निवडणुकीच्या मोसमात मते खेचण्याचे सामर्थ्य यावर परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. आणि याची त्यांना जाणीव नसेल असे कोण म्हणेल ?
त्यांची पत्नी सहा वर्षापूर्वी वारली. दरम्यान पक्षाघाताच्या दोन आजारात या लक्ष्मीने केलेल्या सेवेमुळे आपण वाचलो असे ते म्हणतात. पाश्चात्यांकडे अशा विषमविवाहाची उदाहरणे अनेक आहेत. रसेलने आपल्या स्टेनोग्राफरशी केलेले लग्न प्रसिद्ध आहे. आपल्याकडे हे अपरूप आहे. अनेक मोठ्या पुढाऱ्यांनी तरुणपणी पत्नी वारली तरी पुन्हा लग्न केले नाही. १९३६ साली कमला नेहरू वारल्या त्यावेळी जवाहरलाल ४७ वर्षाचे होते. त्यांनी पुन्हा लग्न केले नाही. पण हे दाखले वर्तमानकाळात लागू करता येत नाहीत. स्वातंत्र्यपूर्व काळात सामान्य माणसावरदेखील आदर्शाचा जास्त पगडा होता. माणसातले धीरोदात्त गुण वर उफाळून येण्याची जणू स्पर्धा होती. ती एक विशेष परिस्थिती होती. एक प्रकारची आणिबाणीच. चीन-पाक युद्धे झाली तेव्हाही त्यागाचे, तेजस्वितेचे असेच दर्शन घडले. पण नेहमीच्या परिस्थितीत अशा उग्र तपस्वीपणाची अपेक्षा ठेवता येत नाही आणि तिची गरजही नाही.
जेरेमी बेंटम हा जे. एस्. मिलचा गुरू. ‘निसर्गाने माणसाला सुख आणि दुःख या दोन अधिपतींच्या आधीन केले आहे. त्याने दुःख टाळावे आणि सुख मिळवावें असा त्याचा पंथ. कर्तव्याचे भान आणि व्यक्तिस्वातंत्र्याचा मान राखून, कायद्याच्या चौकटीत आपल्या सुखासाठी धडपडण्याचा अधिकार प्रत्येकाला आहेच.
मुंबईला ‘महानगर’ या सायं दैनिकाचे संपादक आणि ‘आज दिनांक’ या दुसऱ्या सायं- दैनिकाचे कार्यालय यावर एकाच दिवशी शिवसैनिकांनी हल्ले केले. संपादकांना मारहाण केली. त्याचे तीव्र पडसाद देशभर उमटले. लोकशाहीत विचारांचा विरोध करायचा तो विचारांनीच. या सभ्य शासनपद्धतीत तीर, खंजीर, तरवार अशी शस्त्रे वर्ज्य; पण ‘अखबार’ हे अस्त्र मात्र राजमान्य आहे. शिवसेनेजवळही हे अस्त्र आहेच. तरी शिवसैनिक हातघाईवर आले. दमदाटीची भाषा बोलले. या प्रकाराचा देशातल्या एकापेक्षा एक अशा प्रतिष्ठित पत्रांनी आणि त्यांच्या ज्येष्ठ संपादकांनी निषेध केला. दादरच्या ‘सेनाभवन’ या कार्यालयासमोर त्यांनी दिवसभर शांततामय धरणे धरून आपला रोष प्रकट केला. हे फार चांगले झाले.
आपल्या देशात अनेक गोष्टींची वाण आहे. पण आपली लोकशाही हे भूषण आहे. कोणालाही विरोधी मत मांडायचा अधिकार आहे. वर्तमानपत्रे तो बजावतात. त्यावर पूर्वीही जेव्हा जेव्हा गदा आणण्याचा प्रयत्न झाला तेव्हा तेव्हा पत्रकारांनी तो एक होऊन हाणून पाडला आहे. मग ते विचारस्वातंत्र्याचे मारेकरी एखादे सरकार असो की एखादी सेना