पुस्तक-परिचय

मृत्यूनंतर
लेखक: शिवराम कारंत. अनुवादक: केशव महागावकर, नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया. चौथी आवृत्ती, मूल्य ११.५०

मृत्यूनंतर काय, ही महाजिज्ञासा आहे, नचिकेत्याची होती. माझीही आहे. तुमचीही असावी. मी तिच्यापोटी थोडेबहुत तत्त्वज्ञान पढलो. पण तत्त्वज्ञान हे बरेचसे पांडित्यपूर्ण अज्ञान आहे अशीच माझी समजूत झाली. निदान या असल्या महाप्रश्नांपुरती तरी. शाळकरी वयात वाटे-आपण संस्कृत शिकू, वेद-उपनिपदे वाचू. यम-नचिकेता संवाद मुळातून वाचू. थोडेसे संस्कृत शिकलो. भाष्यकारातें वाट पुसत ठेचाळण्याइतके. पण दुसरे एक अनर्थकारक ज्ञान झाले.ते असे की, शब्द आणि शब्दार्थ, वाक्ये आणि वाक्यार्थ सर्वांसाठी सारखेच नसतात. एकाच गीतेतून अद्वैत निघते, द्वैताचा पाठपुरावा सापडतो, भक्तिमार्गाला आधार मिळतो, कर्ममार्गाचा पुरस्कार करता येतो, संन्यासाचे समर्थन सहज होते, इत्यादि इत्यादि. जे गीतेचे तेच महावाक्यांचे, अवांतर वाक्यांचेही इंगित!

वाक्यांची भाषा बनते. वाक्ये आणि वाक्यार्थ यांची मीमांसा करण्यासाठी आख्खी तत्त्वज्ञाने उभी राहिली आहेत. पाश्चात्त्यांकडे हे विचारमंथन आजही चालू आहे. आमचे भारतीय पूर्वज या खात्यातही मागे नाहीत.

तत्त्वज्ञानाने निराशा केली तरी मनाच्या तळाशी ही मृत्यु-जिज्ञासा ठाण मांडून बसली आहे. कदाचित् अंत होईतो राहील.
आताशा तत्त्वज्ञानाचा नाद सुटला. मनाला दुसराच छंद लागला आहे. तर्काची शुष्क भापा सोडून अंतःकरणाची मृदू मवाळ भाषा बोलणाऱ्यांचे बोल ऐकण्याची. मनाच्या एका अशाच तृषार्त अवस्थेत गेल्या उन्हाळ्यात मुंबईला मुक्काम होता. दादरच्या सावरकर स्मारकात पुस्तक-प्रदर्शन भरले होते. पुस्तके न्याहाळताना एका नावाकडे लक्ष गेले : मृत्यूनंतर. पाऊल जागीच थबकले. पुस्तक घेतले पण वाचन लांबणीवर पडले. वस्तु हवी वाटते त्यावेळची ओढ ती हाती आल्यावर राहत नाही. पुस्तकांच्या बाबतीत तर नेहमी असे होते.

यथावकाश वाचले. पण पहिल्या वाचनात मनाला विशेष भिडले नाही. कारंतांची जरा जास्त माहिती मिळवली. ते कन्नडमधले दुसरे ज्ञानकोशकार केतकरच. मात्र अधिक यशवंत. त्यांनी कानडीत बालप्रपंच’ आणि ‘विज्ञानप्रपंच’ असे दोन ज्ञानकोश रचले. कितीतरी कादंबऱ्या, नाटके लिहिली. पद्मभूपण हा सन्मान मिळाला. साहित्य-अकादमीचा पुरस्कार लाभला.

कर्नाटकातील जानपद यक्षगानाकडे त्यांनी आधुनिक जगाचे लक्ष वेधले. त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार देखील लाभला आहे. ‘शरदः शतम्’चा टप्पा दृष्टिपथात असलेले ज्ञानी, वास्तववादी, मानवतावादी कादंबरीचे प्रणेते इ.इ.

‘अळिद मेले’ (मृत्यूनंतर) ही कादंबरी त्यांनी १९६० मध्ये लिहिली तेव्हा त्यांचे वय ५८ वर्षांचे होते. एक विचारवंत कलावंताच्या भूमिकेतून मृत्यूचे तत्त्वज्ञान सांगत आहे. त्यात अर्थातच जीवनाचेही तत्त्वज्ञान आलेच. दुसऱ्या वाचनात मात्र रमत गेलो.

‘मृत्यूनंतर’ नावाच्या या कादंबरीत मानवाच्या जीवनात शिल्लक काय राहते हे शोधून पाहण्याचा प्रयत्न” अशी त्यांची भूमिका आहे. त्यांचा पुढचा प्रश्न आहे, ‘जीवनाचे प्रयोजन काय? जगावे कसे?’

कादंबरीचे नायक यशवंत हे जीवनाचे एक सत्यशोधक आहेत-ही कादंबरी तशी एक मित्रकथा आहे. (आणि लेखकाची आत्मकथाही, वैचारिक!) ‘श्रद्धेने, प्रामाणिकपणे सर्व गोष्टींचे निरीक्षण करून जे उमगले आहे ते मितसत्य असे समजून जगणाऱ्या यशवंतरावांची (पृ. ७). त्यांची रोजनिशी हा थोडक्या शब्दात लिहिलेला आत्मसंवाद आहे. मृत्यूपूर्वी लेखकाला लिहिलेल्या पत्रात, ‘माझ्या निधनानंतर आपण ते (लिखाण) वाचावे’ अशी अपेक्षा आहे. त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न धर्माचा पाया हालवल्यासारखे आहेत. “आपले पूर्वज अशा काही ऋषिमुनींनी जीव आणि जगताच्या बाबतीत– ‘हे कसे? हे सत्य, हीच चरमवाणी’ असे लिहून ठेवले आहे. यांना तुम्ही वाटल्यास वेद उपनिषद म्हणा. अथवा तपश्चर्येने समजून घेतलेल्या गोष्टी म्हणा किंवा स्वतः देवांनीच हे सर्व कानात सांगितले असे म्हणा. मला मात्र एक संशय आहे. हे विश्व, ही चराचर सृष्टी यांच्या बाबतीत अल्पस्वल्प वाचनाने मी काही ज्ञान मिळविले आहे. जीवनाने या यात्रेला केव्हा आरंभ केला, ही जीवनयात्रा कुठे चालली आहे, प्रवासाला आरंभ केल्यावर बऱ्याच काळापर्यंत वाटेतील स्टेशनावर गाडीत चढणाऱ्या उतारूप्रमाणे माणूस नावाचा प्राणी आत प्रवेश करून काही वेळ बसून उतरूनही जातो; पण जीवनाचा प्रवास तर अजून पुढेच जात असतो. त्याचे ध्येय काय हे अजून कोणालाच समजले नाही. पुढची वाट न मोजता येण्याइतकी लांबसडक असते. अशा स्थितीत एखाद्याने ‘मी याचे रहस्य जाणतो किंवा अमुकच सत्य आहे’ असे जर तारस्वराने सांगितले तर ते हास्यास्पद होणार नाही का?”
हे लेखन करणारा प्रतिप्ठेसाठी कसे लिहील? ते तर मृत्यूनंतर वाचावे अशी त्याची इच्छा आहे ! जीवनातील अतृप्तीमुळे कासवासारखे हातपाय आत ओढून एकलकोंडे जीवन ते जगत असावेत का? मग लेखकाने त्यांना ‘यशवंत’ हे नाव कसे दिले?
लेखकाचा यशवंतरावांशी परिचय गाडीच्या प्रवासातच होतो. स्नेह वाढतो. आपल्या जीवनाचे जणू प्रप्तीक असा ऐक्यभाव उत्पन्न होतो. एकाकीपणाचा उबग येतो तेव्हा, ‘तुमच्याजवळ माझ्या जीवनाचा इतिहास सविस्तर सांगून टाकावा’ असे वाटण्याइतके मैत्र वाढते. जीवननाट्यातले आपले काम संपले, आता ‘आपले रंगसाहित्य वाटेल तिथं फेकण्यापेक्षा पुढे ते पात्र वठविणाऱ्यासाठी मिळणं सुलभ व्हावं असं करणं हेच त्या नटाचं कर्तव्य नव्हे का?’ हा मनातला भाव, या लेखनामागचा.
शेवटच्या दुखण्याची तार येताच लेखक मुंबईला यशवंतरावांच्या भेटीला जातात. पण त्या आधीच त्यांचा अंत झालेला असतो. त्यांच्या बिहाडी काही कागदपत्रे, पत्रव्यवहार, हिशेबाची वही आणि ट्रंकेतली पुस्तके एवढे सामान मिळते. त्यांनी काढलेली काही चित्रेही त्यात आहेत. पुस्तके धर्म, दर्शन, समजुती या विषयांवरची होती. तिकडे लेखकाच्या घरी पंधरा हजार रुपयांचा ड्राफ्ट, रोजनिशी आणि मृत्युपत्र म्हणता येईल असे एक पत्र येऊन पडलेले असते. ते पत्र वाचून भावविव्हळ झालेला लेखक रोजनिशीत दडलेले आठवणीचे मोती एक एक करून तपासून जीवनाचा अर्थ त्यांनी कशाप्रकारे लावला याचा शोध घ्यायचे ठरवतो. ‘त्यांची आठवणच माझ्यासाठी एक प्रेरणा ठरेल. त्यांच्यापासून मला, माझ्यापासून पुढच्यांना’ असे त्याला वाटते (पृ. २४). आठवणीसंबंधी लेखकाचे चिंतन मौलिक आहे. ‘मृत्यूनंतर मानवाच्या जीवनात केवळ आठवणीच शिल्लक राहतात… जीवन संपल्यानंतर इतरांच्या मनावर उमटवलेले जे प्रभाव असतात तेच मोजमापाची वस्तू ठरतात.’ (भूमिका) ‘आठवणींच्या भांडारात शिल्लक राहणाऱ्या मित्रांची संख्या एक किंवा दोनच; फारच झाले तर दहा किंवा बारा. पुढचा प्रपंच वेगळा.’ (पृ.१) ‘खरा भाग्यवान तोच ज्याच्या मृत्यूच्या आठवणीने आठदहा मित्र तरी हळहळ व्यक्त करतील.’ (पृ.१). फार काय, अशा आठवणींनाच ते पुनर्जन्म म्हणतात. ते म्हणतात, “ ‘व्यक्ती’ हे चिन्ह मिटणं किंवा टिकणं त्याच्या चरित्रावर अवलंबून असतं. ते…आपल्या स्मृतींना चेतवून आपल्या जीवनात दृढमूल होऊन जिवंत राहिले, वाढले, पुढे सरकत गेले तर त्यालाच पुनर्जन्म म्हणावे.” (पृ.१५)

यशवंतांचा जन्म उत्तर कानडा जिल्हयात एका सधन कुटुंबात झाला. कोवळ्या वयात वडिलांच्या संपत्तीचा वारसा आला त्यावेळी स्तुतीच्या जलाशयात हत्तीप्रमाणे मी डुंबत असे अशी कबुली पुढे त्यांनी दिली आहे. कर्णाच्या ऐटीत संपत्ती उधळली. कर्जाचा बोजा असह्य झाला तेव्हा जन्मगाव सोडले. आता स्तुती करणारे चोर आहेत, कोणावरही तसूभर विश्वास ठेवू नये, इतके दुसऱ्या टोकाला गेले. कुमठ्याला सासऱ्यांच्या शेजारी बिहाड केले. चार वर्षे खपून नोकरी केली. धंद्यातली खुबी आत्मसात केल्यावर भागीदारीत व्यापार केला. सासऱ्याचे कर्ज फेडले. वडिलार्जित धन घालवले त्यापेक्षा अधिक मिळवले. संपत्तीपरते सीमित यश मिळाले. पण संसारात सुख मिळाले नाही. धडा घेतला की, ‘पैसा आहे त्या ठिकाणी मोह आहे, दुराशा आहे, मत्सर आहे, कटुता आहे. त्यामुळेच माझी बायकामुले माझ्या वैऱ्याप्रमाणे वागली. आपण लोभी झालो खरे. पण हे जीवनात कटु अनुभव आल्यामुळेच नाही का?’ असा विचार करुन त्यांनी संसार या अध्यायाचा शेवट करायचे ठरवले. वडिलार्जित संपत्तीत थोडी भर घालून ती बायकामुलांसाठी ठेवली. मुंबईचा रस्ता धरला.

मुंबई हे जननिबिड अरण्यच. वानप्रस्थ म्हणजे तरी काय? अनामिक, अनपेक्ष, अलिप्त असे जीवनच ना? या तृतीयाश्रमात पुणे-मुंबई प्रवासात लेखक त्यांना भेटले. गाडीच्या परिचारकांबद्दल अब्बा जनगळे!’ (बापरे, काय ही माणसं!) या कानडी उद्गारातून मातृभाषेची ओळख पटली. जवळीक वाढली-ती पुढे जन्मजिवलग होण्यापर्यंत ! सगळा मिळून पाचसहा वर्षांचा
काळ. दहाबारा वेळा भेटी झालेल्या. शेवटच्या एक दोन वर्षांत थोडासा पत्रव्यवहार. बस्स!

यशवंतराव मुंबईहून तीनचार जणांना आर्थिक मदत करीत. पुढेही दरमहा त्यांना मरेपर्यंत २५ रु. पाठवत असावे अशी इच्छा शेवटल्या पत्रात होती. कागदपत्रातील काही मागण्यांवर पात्र’, ‘अपात्र’ असे शेरे होते. रोजनिशीतल्या नोंदी ही पत्रे पाहून, त्यांची जन्मभूमी, कर्मभूमी, हे सगेसोयरे यांच्याबद्दल उत्सुकता वाढली. म्हणून लेखक त्यांचा मागोवा घेत निघतात.
यशवंतांचं जन्मगाव स्वादी जवळचं बेनकनहळ्ळी. बेनकन’ हे ‘विनायक’ चं कानडी रूप. हळ्ळी म्हणजे गाव. एका गणपति-मंदिराभोवती कधी काळी शेपन्नास ब्राह्मणांची घरे वसली होती. आता वाताहत होऊन त्यातली दहादेखील राहिली नाहीत. यशवंतांची जन्मदात्री शैशवातच वारलेली. पार्वत्यम्मा ना नात्याची ना गोत्याची. आश्रित विधवा. तिने त्यांना वाढवले. यशवंत तिला दरमहा पंचवीस रुपये पाठवीत. त्यातले पाचच तिच्यापर्यंत पोचत. वीस पोस्टमन आणि भाऊबंदकीतला साक्षीदार शंभूभट गट्ट करीत. यशवंतांच्या मृत्यूनंतर पाठवलेल्या पैशातून म्हातारीला त्यांनी तेही देणे बंद केले. शंभू भट्ट हेगड्याचे वडील शंकर हेगडे आणि यशवंत खरे तर चुलतभाऊ. पण क्षुल्लक कारणाने वाडवडिलांमध्ये आलेले वितुष्ट पुढील पिढ्या आंधळेपणाने चालवत होत्या, पार्वत्यम्माच्या भेटीत यशवंतांच्या मृत्यूची बातमी लपवणे शक्य नसते. मित्राच्या स्मरणानं लेखकाच्या डोळ्यांना अधूंनी धार लागते. त्यावर ती म्हातारीच सांत्वन करते की, ‘मेलेल्या माणसाबद्दल दुःख मानू नये…. माझ्या आठवणीतला यशवंत मरणार आहे का?’ म्हातारीचा असा विश्वास की, विनायकाला धरून राहिले नाहीत म्हणून ब्राह्मणांची घरे उजाड झाली. ती म्हणते ‘आम्ही नावाचे ब्राह्मण. ब्राह्मण्य कुणाला माहीत आहे? अरे देवालाच सोडलं तर ब्राह्मण्य असलं काय नि नसलं काय?’ (पृ.७९)
‘पण देव आहे का?
या लेखकाच्या प्रश्नावर ती म्हणते, ‘यशवंत शंभर वेळा हेच म्हणायचा. त्या बिचाऱ्याला कष्टही तसेच झाले होते रे. म्हणून देवावरचा त्याचा विश्वासच उडून गेला होता.’ तिची विचारसरणी अशी की, ‘देवावर विश्वास ठेवायचा म्हणजे त्याच्याकडून आपली चाकरी करवून घेणं असा त्याचा अर्थ नाही. मला अमुकच दे-दिल्यास चांगला नाहीतर वाईट असं म्हणणं योग्य नाही.’ (पृ. ७९) विनायक तिच्या दृष्टीने मूल्यांचे प्रतीक आहे. ती म्हणते, ‘तू, मी आपण सगळे एका क्षणासाठी येतो आणि जातो… संतती पुढंपुढं जाणारी. मी, तू जरी नाहीसे झालो तरी आपण ज्यावर विश्वास ठेवला, मानलं, ते मात्र शिल्लक राहतं. विनायक हा आपण मानलेला देव?’ (पृ. ८०)

पार्वत्यम्माची इच्छा बेनकय्याच्या देवळाचा जीर्णोद्धार व्हावा ही. स्वतः यशवंत जिवंत असते तर त्यांनीही पुरवली असती असा विचार करून लेखक तशी व्यवस्था करून गावी परत येतात. आपल्या विचाराहून भिन्न विचारांचा आदर करायची यशवंतांची वृत्ती त्यांच्या आणखी एका स्नेहबंधातून दिसते. त्याची हकीकत अशीः मुंबईला कंटाळा आला की यशवंत महिना दोन महिने महाबळेश्वर, खंडाळा येथे घालवत. चित्रे काढत. महाबळेश्वरला घर हुडकीत असता विष्णुपंत घाटे त्यांना भेटले. त्यांच्या झोपडीवजा घराचा अर्धा भाग त्यांना पसंत पडला. विष्णुपंत संस्कृत पंडित. ‘मला जे समजलं आहे ते इतर, न समजणाऱ्यांसाठी, संस्कृत न येणाऱ्या आपल्या मराठी लोकांसाठी मराठीत लिहून काढावे या विचाराने आपलेधर्मशास्त्र’ हा ग्रंथ लिहायला घेतलेला. त्यांच्याशी यशवंत नेहमी बोलत बसत. दोघे दोन ध्रुव. पण ग्रंथ लिहायला प्रोत्साहन देत. म्हणत, ‘माझी मान्यता, माझा विश्वास माझ्यापुरता. तुमचा तुम्हाला. कदाचित तुमचंच सत्य असेल. माझं सत्य नसेल! कदाचित दोघांची चूक होत असेल… आपल्या विचारसरणीत सत्य व मिथ्या यांचं मिश्रणही असेल… प्रत्येकाने स्वतःला दिसलेल्या प्रकाशात चालणंच योग्य… आपण द्यायचं ऋण म्हणजे हेच. हेच खरं, तेच खरं म्हणत दुसऱ्याचा गळा दाबून वाणीवर बंधन घालणं सामाजिक गुन्हा ठरेल.’ विष्णुपंतांना दरमहा पंचवीस रुपये जात. लेखकांनी त्यांची भेट घेतली तेव्हा अधिक बोलणे झाले. यशवंतांची मते स्पष्टपणे तुम्हाला कळली का?’ या प्रश्नावर ते म्हणाले ‘शंकराचार्यांना द्वैतवाद्यांनी नास्तिक म्हटल्याप्रमाणे मीही काहीतरी नाव ठेवू शकेन, पण ते तसे नव्हतेच. व्यक्तीच्या जीवनाला ते मानीत असत.

व्यक्तिगत आत्म्याला मानीत नसत. त्यामुळं त्यांना परमात्म्याचा प्रश्न मुख्य वाटत नाही. भक्ती, मोक्ष या बाबतीतही त्यांचा विश्वास नव्हता. मी एकदा त्यांना विचारलं, ‘मग देवच नाही म्हणता का?’ त्यांनी उत्तर दिलं.. ‘तुम्ही पाहिला आहे का?’ वेद, प्रत्येक धर्म यांचा दाखला त्यांना पुरला नाही. ते म्हणाले ‘देवासंबंधी काही न सांगणारे ही धर्म आहेत. असे धर्म स्वतःला माहीत नसलेले सांगण्याच्या भानगडीत पडत नाहीत. पण ‘सनातन धर्मच श्रेष्ठ आहे’ या घाट्यांच्या मतावर ते म्हणाले, ‘मानणाऱ्याला तो पूर्ण श्रेष्ठ.’ घरी परत आल्यावर लेखक सगळा हिशेब मांडतात. त्यांना वाटते ‘यशवंतांसाठी आणखी एक विनायकाचं देऊळ बांधावंच ! ते म्हणाले विष्णुपंतांच्या ग्रंथाचं प्रकाशन. त्यासाठी तीन हजार रुपये दिले, यशवंतांच्या नावाने. त्यांनीच रोजनिशीत लिहिले होते, ‘जगण्याच्या हिशेबाने मी मिळविल्यापेक्षा दिलेले कमी तर झाले नाही ना… पैशापुरतीच ही गोष्ट मर्यादित नाही तर मानवी जीवनाचाच हा हिशेब आहे. माणूस समाजाच्या ऋणाचा भार घेऊन आला आहे. त्या ऋणातच तो वाढतो. पुढे मरताना स्वतः मिळविल्यापेक्षा अधिक ऋण तो देऊ शकत असेल तरच त्याच्या जन्माचे सार्थक.

यशवंताच्या आयुष्यात तीन स्त्रिया आल्या. पाणिग्रहण करून कमलम्मा. पण तिच्या हातातून निसटून माझ्या मित्रांनी (यशवंतांनी) आत्महत्या केली असती तरी आश्चर्य वाटले नसते असे लेखकाला वाटते. यशवंत रोजनिशीत लिहितात, “दांपत्य-जीवनाचा विचार मनात येताच मला स्त्रीपुरुषांचं जीवन मल्लिकालता व आम्रवृक्षासारखं वाटतं. ती… ‘तूच माझा आधार’ असा विश्वास निर्माण करते व त्या वृक्षाला नुसती पानेच नव्हे तर फुलेही देते. बाह्यतः हा स्नेह किती सुंदर दिसतो-किती अन्योन्याश्रित वाटतो. जलजा (पत्नी) ने माझा आश्रय असाच घेतला नाही का? बहकालपर्यंत तिचा भार मीच उचलला आहे, ती माझ्यासाठीच जगते असा विश्वास वाटला होता… पण आपल्या स्वतःच्या सुखासाठीच जगली हेच खरं ना? दांपत्य जीवनसुद्धा एक प्रकारचा स्वार्थच नव्हे का? “दांपत्यजीवन म्हणजे अन्योन्य संबंध असं म्हणतात. तसं माझ्या पाहण्यातही आलं आहे. मग माझ्या जीवनात तसं का घडलं नाही, हेच कळत नाही !” (पृ.४८) तिचा मुलगा सीताराम आईच्याच वळणावर गेला. वडिलांनी मुंबईला जाताना लाखो रुपये नेले. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी ठेवलेले सगळे धन आपल्यालाच मिळाले पाहिजे यासाठी त्याने दांडगाई करून पाहिली. घरोब्याचे वकील मुर्डेश्वर यांच्या मसलतीने नोटीस देऊन झाली. लेखक बधले नाहीत म्हणून शेवटी तो स्वस्थ बसला.

यशवंतांना संसारात सुख लाभले नाही. ते त्यांना सरशी या सखीने दिले. ती गाणारी कलावंतीण होती. त्यांच्यापासून तिला दोन मुले झाली. त्यातल्या धारेश्वर शीन या मुलाला दरमहा म.ऑ. जाई. सारे सोडून निघताना त्यांनी तिला विचारले, काय पाहिजे? तिला ह्यांना लुटता आले असते. पण ती म्हणाली, ‘तुमचा माझ्यावर विश्वास आहे तेवढंच पुरे. चार मुलांना संगीत शिकवून चरितार्थ चालवीन.’

तिसरी दादी मेरी ही नर्स. एका अनाथ बालकाला वाचवण्याच्या खटपटीत ती त्यांना काही काळ बिलगली. वाऱ्याने उडून बांडगुळाचे बी वृक्षाच्या फांद्यावर मूळ धरते तशी. त्यांची रोजनिशी सांगते- ‘माणसाचं मन कितीही घट्ट असो, स्तुती ऐकली की ते वितळतं. मेरीने हेच काम केलं.’ पण यशवंतांचा पराभव तिने स्तुतीपेक्षाही जास्त दुसऱ्या चातुर्याने केला. संसाराचा उबग येऊन जरी मुंबईला आले असले तरी ‘स्त्री या वस्तूबद्दल वैराग्य’ तर त्यांना नव्हतं. हीच उणीव तिने कुशलतेनं जाणली. ‘या बाबतीत ती केवळ दादी, अविवाहित अशी स्त्री होती. लग्न झालं नाही म्हणून एखादी स्त्री एकाकी जीवन कंठणं शक्य नाही. तिच्या वाढत्या वयामुळे तिच्या वाट्याला मी पूर्णपणे लाभू शकेन असं तीला वाटलं असावं? (पृ. ४४) स्त्रीपुरुषांच्या प्रेमनामक भावनेला यशवंत कोणते नामरूप देतात? त्यांचा प्रति-प्रश्न आहे, ‘उसळत्या पाण्याच्या फेसाला बडवलं तर त्याचा आकार कसा राहील?’… ‘आपण प्रेम करतो ते परोपकारासाठी नव्हे. औदार्य म्हणूनही नव्हे, बहुतेक स्वतःसाठी, आपल्या स्वार्थासाठी’ हेच त्यांनी काढलेल्या वेगवेगळ्या चित्रांमधून दाखवले आहे.

कारंतांची ही मित्रकथा एका परीने त्यांची वैचारिक आत्मकथाही आहे असे भूमिका वाचायला सुरुवात केल्यापासून वाटत राहते. आपले मित्र बी. एस्. तुंग यांच्यावरून त्यांना यशवंत हे पात्र सुचले असावे. ती लिहीत असता त्यांनी तुंगांना पत्रात म्हटले, ‘आज माझे मन तीव्र वेदना, व्यथा व तळमळीनी पीडलेले आहे. … त्यांना हाणून पाडण्यासाठीच एका नवीन कादंबरीची सृष्टी रचण्याच्या प्रयत्नात मी गुंतलो आहे.’ यशवंतांप्रमाणेच त्यांनी धन आणि मान यांची कधी पर्वा केली नही. मानवी जीवनाच्या गंभीर अशा खोलात उतरून तळाचा अंदाज घेण्याचे साहस करणे हेच त्यांच्या जीवनाचे ध्येय होते. यशवंतांची ही कथा त्यांना अर्पण होणारी ‘आसवांजली ठरली आहे.

प्र.ब. कुळकर्णी
शांतिविहार, चिटणवीस मार्ग, सिव्हिल लाइन्स. नागपूर (४४०००१) TTER

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.