आजचा सुधारक च्या ऑगस्ट १९९३ च्या अंकात उपरोक्त विषयावरील माझ्या आधीच्या लेखांवर टीका करणारा श्री वसंत पळशीकर यांचा लेख प्रसिद्ध झाला आहे. त्यांनी आधीच्या सर्व अंकांतील तत्संबंधीचे सर्व लेख सलगपणे वाचून काढले; परंतु त्यांत त्यांना आक्षेप घेण्यासारखे बहुधा काही न आढळल्यामुळे वेगळ्या दिशेने मुद्दयाला भिडायला हवे असे त्यांनी ठरवून हा लेख लिहिलेला दिसतो.
. त्यांचा लेख वाचल्यानंतर मला असे दिसून आले की धर्मविषयक माझ्या प्रतिपादनाला त्यांची हरकत नाही; परंतु त्याबद्दलच्या तपशिलाचा आग्रह धरून ‘तत्त्व मान्य, तपशील अमान्य’ अशी व्यूहरचना करून माझ्या प्रतिपादनाला उखडून लावावयाचा प्रयत्न करावयाचा, असे हे त्यांचे वेगळ्या दिशेने मुद्दयाला भिडणे होय.
निरोगी चर्चेच्या दृष्टीने हे असले डावपेच कितपत श्लाघ्य आहेत याची मला शंका आहे. परंतु काहीही असले तरी श्री पळशीकर यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवरील माझे अभिप्राय मी व्यक्त करीत आहे.
तत्पूर्वी एका गोष्टीचा खुलासा करणे आवश्यक आहे. श्री पळशीकर यांनी आपल्या लेखात ‘मा. गो. वैद्य व काशीकर’ असा उल्लेख वारंवार केला आहे. त्यावरून माझ्या लेखातील मते श्री मा. गो. वैद्य यांची देखील आहेत असा (गैर) समज होण्याचा संभव आहे. श्री वैद्य आणि मी समविचारी जरूर आहोत. परंतु समविचारी असणे म्हणजे सगळे विचार सारखे असणे असे नव्हे. ‘संस्कृती’ शब्दाबाबत श्री वैद्य व माझ्या विचारातील भिन्नता मी व्यक्त केली आहेच. तसेच माझ्या विचारांहून श्री वैद्य यांची काही मते वेगळी असू शकतील. आजचा सुधारक मधून मी केलेले लिखाण सर्वस्वी माझे आहे व त्यातील बऱ्या-वाईटांबद्दल मीच पूर्णपणे जबाबदार आहे. श्री वैद्य यांच्या एका पुस्तिकेवर श्री दि. य. देशपांडे यांनी जो टीका लेख लिहिला त्यातून प्रस्तुत चर्चा सुरू झाली एवढेच.
आता श्री पळशीकर यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांचा त्यांनी दिलेल्या क्रमानेच विचार करू.
(१) आधुनिकपूर्व काळात सर्वच संप्रदाय (रिलिजन) धर्म होते असे माझ्या धर्मविषयक व्याख्येतून निष्पन्न होते असे श्री पळशीकर म्हणतात. हे पूर्णपणे बरोबर नाही. पौर्वात्य किंवा ‘हिंदू’ ह्या व्यापक आवरणाखाली येणारे संप्रदाय-बौद्ध, जैन, शीख इ. यांच्या बाबतीत वरील निष्कर्ष बराचसा लागू होतो. परंतु सेमेटिक संप्रदायांच्या बाबतीत तसे नाही. त्यांच्यातील सर्व ऐहिक क्रियांचा मुख्य उद्देश पारमार्थिक कल्याण हाच आहे आणि हेच संप्रदायाचे व्यवच्छेदक लक्षण आहे. धर्म व मोक्ष हे वेगळे पुरुषार्थ त्यांनी मानलेले नाहीत. ही आशयभिन्नता हाच दोहोंमधील मुख्य भेद आहे. एकच उगमस्थान (ग्रंथ, प्रेषित इ.) असणे किंवा नसणे हाही महत्त्वाचा भेद आहे. परंतु तो औपचारिक असल्यामुळे गौण आहे.
(२) धर्मशास्त्रात सनातन धर्मतत्त्वांना युगधर्माच्या चौकटीत बसविले जाते. युगधर्माचे स्वरूप स्थल-काल-समाजस्थितीनुसार बदलू शकते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतीय राज्यव्यवस्था भारतीय प्रकृतीनुसार बनविण्यात यावी असा गांधीजींनी नेहरूंना पत्र पाठवून प्रयत्न केला होता. परंतु त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले. व पाश्चात्य मुखवट्याची राज्यघटना बनविण्यात आली. त्यामुळे भारतासाठी उपयुक्त अशा युगधर्माचे स्वरूप तिला प्राप्त होऊ शकले नाही. परिणामतः ही राज्यघटना अत्यंत अयशस्वी झाली आहे व ‘विनायक’ निर्माण करण्याचे प्रामाणिक प्रयत्न होऊनही तिचे ‘माकड’ बनले आहे. ही राज्यघटना धर्मशास्त्र जरूर आहे, पण भारताकरिता नाही. कदाचित् इंग्लंडकरिता ती उपयुक्त धर्मशास्त्र सिद्ध होईल. आज तेथे सुधारित युगधर्माची मागणी होत आहे. वंशपरंपरागत राजसत्तेऐवजी गणराज्य असावे, निरनिराळ्या घटकप्रदेशांसाठी संघात्मक व्यवस्था असावी, हिंदु मुस्लिम आदि ख्रिश्चनेतर सांप्रदायिकांची संख्या वाढल्यामुळे धर्मनिरपेक्षतेला सर्वधर्मसमभावाचे स्वरूप असावे व स्कॉटलंड-आयर्लंड सारख्या प्रदेशांसाठी (३७० कलमाने काश्मीरला दिली तशी) खास व्यवस्था असावी असे वारे तेथे वाहात आहेत. म्हणून भारताची राज्यव्यवस्था – जी मुळात इंग्लंडच्याच राज्यव्यवस्थेची सुधारलेली आवृत्ती आहे- तेथे – उपयुक्त धर्मशास्त्र म्हणून सिद्ध होऊ शकेल !
(३) भारतीय राज्यघटनेने धर्माला संप्रदायाच्या (रिलिजनच्या) जोखडातून काढले हे विधान पूर्णतः बरोबर नाही. बहुसंख्यकांच्या संप्रदायाच्या बाबतीत ते खरे आहे; परंतु अल्पसंख्यकांच्या संप्रदायाचे जोखड राज्यघटनेने स्वतःवर लादून घेतले आहे. ३७० कलमामुळेच मुख्यतः काश्मीरमध्ये सांप्रदायिक आतंकवाद वाढायला अवसर मिळाला आहे. कलम ३० ने तर कहर केला आहे. सरकारी अनुदाने मिळूनसुद्धा अल्पसंख्यकांच्या सांप्रदायिक शिक्षण-संस्थांवर सरकारचे नियंत्रण नाही. त्यामुळे ह्या शिक्षण-संस्थांच्या माध्यमातून देशभर सांप्रदायिक कट्टरतावाद जोपासला व वाढविला गेला आहे. सांप्रदायिक कलहांचे विषबीज ह्या कलम ३० मध्ये आहे. शाहबानोसारख्या खटल्यांमध्ये राज्यघटनेवर सांप्रदायिक तत्त्वांना मात करता येईल अशी मोकळीक ह्या राज्यघटनेने ठेवली आहे.
(४) यातील पूर्वार्ध बरोबर आहे. उत्तरार्धही तसा बरोबरच आहे. मी काय म्हणावयास पाहिजे हे जे श्री पळशीकरांनी सांगितले आहे तेच मी म्हटले आहे. मात्र जे माझ्या विधानात अस्पष्ट आहे ते स्पष्ट करून सांगितल्याबद्दल धन्यवाद.
(५) सर्व संप्रदायांतील ज्यांना धर्मतत्त्वे म्हणता येईल अशी तत्त्वे सारखीच आहेत असे म्हटले जाते ते बढशी खरे आहे. ही धर्मतत्त्वे एकत्र आणून सर्वधर्म एकभाव आणि सर्व संप्रदाय समभाव’ ह्यावर आधारित धर्मराज्य निर्माण करणे भारतासारख्या धर्मप्रवण देशात अशक्य नाही, उलट तोच एक वर्तमान समस्या सोडविण्याचा व्यवहार्य मार्ग आहे. वास्तवाचे समान दडपण सगळ्याच सांप्रदायिकांवर सारखेच असल्यामुळे समान मुख्य घटक असलेला गुणधर्म विकसित करता येईल. समान नागरी कायद्यामध्ये अधिक तपशिलाचा संबंध येतो. म्हणून तो विकसित करण्यामध्ये जेवढ्या अडचणी येतील तेवढ्या समान युगधर्म विकसित करण्यात येणार नाहीत. अर्थात् हे सारे ‘चांगले, इष्ट वआवश्यक कसे आहे हे सर्वांना समजावून व पटवून द्यावे लागेल ह्या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे.
(६) धर्माची मांडणी करताना मी ‘हिंदू’ ह्या शब्दाचा उपयोग करू नये, तसेच परंपरा. ऋपिमुनींचे मत ह्यांच्या आधारे विवेचन करू नये असा अत्यंत विस्मयकारक आग्रह श्री. पळशीकरांनी धरलेला आहे. त्यांच्या पाच पानी लेखांत कमीतकमी सात वेळा ‘हिंदू’ शब्दाला त्यांनी आक्षेप घेतला आहे व पाच वेळा परंपरा’, ‘ऋषिमुनी’ यांचा आधार घेऊ नये असे त्यांनी म्हटले आहे. हा अट्टाहास कशासाठी ? हे आधार घेतले तरी शेवटी माझे प्रतिपादन बुद्धीच्या- विवेकाच्या-कसोटीवर उतरले पाहिजे असे त्यांनी म्हटले असते तर ते मी समजू शकलो असतो. पण तसे नाही ! त्यांना ह्या शब्दांचा वापर’च नको आहे!
जगात ख्रिश्चन, मुस्लिम, ज्यू, बौद्ध इ. पैकी कोणालाही आपले विचार ख्रिश्चन, मुस्लिम, ज्यू किंवा बौद्ध आहेत हे म्हणायला लाज वाटत नाही. फक्त हिंदूंमध्येच असे काही लोक आहेत की ज्यांना ‘हिंदू’ शब्दाची ‘अॅलर्जी आहे. वस्तुतः हिंदूंमध्ये काही गुण, काही दोष आहेत तसेच त्यांच्यातही आहेत. नव्हे काही बाबतीत त्यांच्यातील दोष अधिक गंभीर आहेत असेही म्हणता येईल. तेव्हा आम्ही आमच्या गुणदोषांसहित आमचा ‘हिंदू’ शब्द का स्वीकारू नये व त्यांतील दोप नष्ट करण्याची व गुण वाढविण्याची दृष्टी का ठेवू नये?
हिंदूंमधील काही लोकांचा हा न्यूनगंड संशोधनाचा विषय आहे. पाश्चात्त्य शिक्षणाचा तो परिणाम आहे काय? मानसिक गुलामगिरीचे तर ते लक्षण नाही ना? ब्रिटिश काळातील संस्कारांनी आपल्या मुळांपासून उखडले गेलेले (alienated) तर हे लोक नाहीत ना? अन्य सांप्रदायिकांना काय वाटेल असा तुष्टीकरणाचा वास तर ह्या भूमिकेमागे नाही ना? की ही उथळ विश्ववादाची पोपटपंची आहे?
जे वास्तव आहे ते तसेच घेतले पाहिजे. ‘हिंदू’ म्हटल्याने एखादा विचार सांप्रदायिक आहे की धार्मिक आहे याचा गोंधळ, संदर्भ लक्षात घेतला तर, होण्याचे कारण नाही. गांधीजी स्वतःला अभिमानाने ‘हिंदू’ म्हणवत असत व ऋषि-मुनि-साधु-संतांच्या वचनांचा आधार घेत असत. परंतु त्यामुळे त्यांना कोणताही कमीपणा आला नाही किंवा त्यांच्या विचारांत संकुचितता शिरली नाही.
तेव्हा श्री पळशीकर यांचे उपरोक्त विधान विवेकाला पटणारे नाही. त्यांनी ‘प्रामाणिकपणे व गंभीरपणे’ आत्मपरीक्षण करून आपल्या भूमिकेचा फेरविचार करावा अशी माझी त्यांना विनंती आहे.
(७) व (८) यात श्री पळशीकरांनी युगधर्म व आपद्धर्म यांच्या तपशीलात कोणकोणते मुद्दे यावयास पाहिजेत यांची जंत्री दिली आहे. ती सर्व मला मान्य आहे. मूळ धर्मविपयक संकल्पना मान्य झाली तर विचाराचा पुढचा टप्पा म्हणून ह्या जंत्रीचा विचार करता येईल. तेव्हा आतापर्यंत मांडण्यात आलेली धर्मकल्पना मान्य आहे काय हे श्री पळशीकर आदि विचारवंतांनी स्पष्टपणे सांगावे अशी माझी त्यांना विनंती आहे. ‘तत्त्व मान्य पण तपशील अमान्य’ असा डावपेच टाकून तपशिलाच्या आधारे तत्त्वावर अन्याय होऊ नये म्हणून हे आवश्यक आहे.
अशा त-हेचा सूर श्री पळशीकरांच्या लिखाणात दिसतो म्हणून मुद्दाम ही बाब मी स्पष्ट करीत आहे. तपशिलाची जंत्री देऊन श्री पळशीकर म्हणतात, अशा प्रकारची कोणतीच मांडणी, वानगीदाखल देखील, काशीकरांनी आजचा सुधारक मध्ये केलेली नाही.” ह्या विधानाचा हेतू काय ? वस्तुतः धर्म, युगधर्म व आपद्धर्म ह्या संकल्पना स्पष्ट करण्यासाठी मी आवश्यक तेवढा तपशील दिला आहे. धर्मामध्ये अहिंसा, सत्य, अस्तेय, इंद्रिय-निग्रह ही तत्त्वे येतात व युगधर्मात समाजरचना, अर्थव्यवस्था, राज्यव्यवस्था इ. विषय येतात हे मी श्री मोहनी यांना दिलेल्या उत्तरात स्पष्ट केले आहे. आपधर्माचे स्वरूप काय व त्याची उदाहरणे कोणती हेही त्यातच स्पष्ट केले आहे. (आजचा सुधारक, जून १९९३, पृ. ९३ व ९५). कलिवर्ध्यात येणाऱ्या कालबाह्य गोष्टी (उदा. जातिव्यवस्था) यांचाही मी उल्लेख केला आहे. तेव्हा ह्या गोष्टींचा वानगीदाखल देखील मी उल्लेख केला नाही हे श्री पळशीकर कसे काय म्हणतात ? धर्माची मूळ संकल्पना मान्य झाल्यावर अधिक तपशिलाकडे वळता येईल. मग तो तपशील मूळ संकल्पनेला पोषक आहे की नाही ह्याची चर्चाही करता येईल. परंतु मूळ पाया भक्कम झाल्याशिवाय वरची इमारत उभारता येणार नाही.
(९) श्री देशपांडे यांचे बरोबर मी जो ‘वाद’ घातला त्यात ‘वड पांघरून पेडगावला जाण्यासारखा प्रकार आहे’ असे श्री पळशीकर म्हणतात आणि त्याचे उदाहरण म्हणून रामायण-महाभारत ह्या दूरदर्शनवरील धारावाहिकांमधील पात्रे ‘ह्यावेळी माझा धर्म काय?’ हा प्रश्न विचारतात ह्या माझ्या विधानाचा उल्लेख करतात. ह्या प्रश्नाद्वारे माझा धर्म म्हणजे रिलिजन काय हे ते विचारणे शक्यच नाही. धर्म व रिलिजन ह्या संकल्पना कशा भिन्न आहेत हे स्पष्ट करण्यासाठी मी हे उदाहरण दिले. परंतु श्री पळशीकरांचे म्हणणे असे की धारावाहिकांमध्ये पात्रे हा प्रश्न कोणाला व का विचारतात ? आणि त्यांना कोणते उत्तर हवे असते ? अमुक एक आचरण करणे हे धर्माचरण होईल असे म्हणणे हे अर्धेच उत्तर आहे; या म्हणण्याचा आधार कोणता, उत्तराचे प्रामाण्य कशात आहे, याची स्पष्टता झाली म्हणजे उत्तर पूर्ण होते.’ ह्या सर्व प्रश्नांचा विचार न करताही त्या ठिकाणी धर्म याचा अर्थ रिलिजन नाही ही गोष्ट स्पष्ट होणारी आहे व तेवढाच माझा उद्देश आहे. अशा स्थितीत अप्रस्तुत प्रश्नांची सरबत्ती करून श्री पळशीकर स्वतः वेड पांघरून मला पेडगावला नेण्याचा प्रयत्न करतात असे दिसते.
(१०) हिंदूंच्या धर्मकल्पनेचे प्रयोजन म्हणून श्री पळशीकरांनी जी तीन लक्षणे सांगितली आहेत ती स्वरूप म्हणून मला मान्य आहेत. मात्र प्रयोजन’ हा शब्द वापरून त्यांनी जो हेत्वारोप केला आहे व भाषेत हेटाळणीची छटा आणली आहे ती मला मान्य नाही. जे चांगले आहे त्याला चांगले म्हणण्यात मला संकोच वाटत नाही. यात कोणाचा अधिक्षेप करण्याचा प्रश्नच उत्पन्न होत नाही. उलट माझे असे मत आहे की ईसाई, इस्लाम इ. संप्रदाय हे मुळात संप्रदाय (रिलिजन) असले तरी भारतात त्यांचे बहुसंख्य अनुयायी मुळात हिंदू असल्यामुळे म्हणा किंवा त्यांचा हिंदूंशी सतत संपर्कआल्यामुळे म्हणा भारतात त्या संप्रदायांमध्येही काही प्रमाणात धर्मतत्त्वांचा शिरकाव झाला आहे व त्याच्या आधारे सर्व संप्रदायांमध्ये सामंजस्य प्रस्थापित करणे शक्य आहे. तेव्हा विवेचनाला विकृत कलाटणी देण्यामध्ये श्री पळशीकरांची ‘अंदर की बात’ काय आहे ती त्यांनाच ठाऊक!
(११) श्री मोहनी यांना उत्तर देताना मी आपद्धर्माची कल्पना स्पष्ट केली आहे व त्याची उदाहरणेही दिली आहेत. यावर श्री पळशीकरांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत व ‘माघार न घेता’ मी त्यांची उत्तरे द्यावीत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. मात्र असे करताना मी ह्यापूर्वी जी निवेदने केली त्यांची पुनरावृत्ती करू नये असा त्यांचा आग्रह आहे. माझ्या दृष्टीने माझी आधीची निवेदने महत्त्वाची आहेत व पुरेशीही आहेत. अशा स्थितीत ती टाळून उत्तरे देण्याचा श्री पळशीकरांचा आग्रह कशासाठी ? त्याची कोणतीही ठोस कारणे किंवा तपशील श्री पळशीकरांनी दिलेला नाही. माझ्या प्रत्येक विधानासाठी तपशील मागण्याचा आग्रह धरणाऱ्याने स्वतःच्या विधानाच्या समर्थनार्थ कोणताही तपशील देऊ नये हे जरा विचित्रच आहे. असो. तसा तपशील मागून त्यांच्या प्रश्नांना डावलण्याचा माझा इरादा नाही. तेव्हा त्यांच्या प्रश्नांकडे वळतो.
(i) लखनौ करारापासून तो विभाजन टाळण्यासाठी जीनांनी स्वतःच मंत्रिमंडळ बनवावे ह्या सूचनेपर्यंत मुस्लिम समाजाचे मन वळविण्याचे प्रयत्न झाले. अहिंसा, प्रेम, बंधुभाव ह्याच सनातन धर्माच्या प्रेरणा त्यामागे होत्या. देशाच्या विभाजनानंतर देशाला हिंदुराष्ट्र घोषित न करता धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व (हिंदूंसाठी) स्वीकारण्यात आले व ह्या तत्त्वाला अपवाद करून कलम ३० व ३७० ने मुस्लिम व अन्य अल्पसंख्य समाजांसाठी विशेष सवलती देण्यात आल्या. हेतू हा की त्यांच्या मनातील गैरसमज दूर होऊन देशाच्या मुख्य प्रवाहात त्यांनी सामील व्हावे.
(ii) ह्या प्रयत्नांना अपयश येण्याची अनेक कारणे आहेत. परंतु सर्वांत मुख्य कारण मुस्लिम नेतृत्वांची संकुचित, सांप्रदायिक व हटवादी भूमिका व त्या भूमिकेला आंधळेपणाने मुस्लिम जनतेने दिलेले पाठबळ होय. आणि सर्वांत कमी महत्त्वाचे कारण काही हिंदुत्ववाद्यांची टोकाची भूमिका, कारण हे लोक आता आतापर्यंत निष्प्रभ होते व जनसामान्यांचे त्यांना पाठबळ मिळाले नाही.
(iii) हिंदू हा बहुसंख्य समाज आहे व देशाच्या हितात त्याचे सर्वात जास्त हितसंबंध गुंतले आहेत. त्यामुळे देशहितविरोधी शक्तींच्या विरुद्ध त्यांनी कृती करण्यात काहीही गैर नाही. शिवाय ती एक स्वाभाविक प्रतिक्रिया आहे.
(iv) कृती करण्याचा राज्यसत्तेचा अधिकार जरूर आहे. परंतु राज्यसत्तेची कृती सत्तेवर असलेल्या पक्षाकडून व नेत्यांकडून होत असते. ते जर कृती करीत नसतील किंवा अनुनयासारखी चुकीची कृती करीत असतील तर समाजाला कृती करण्याचा अधिकार आहे आणि समाजाचा मोठा व मुख्य घटक म्हणून हिंदू समाजालाही तो अधिकार आहे.
(v) बाबरी ढाच्याचा प्रश्न सामंजस्याने व तद्विषयक पुराव्यांच्या आधारे सोडविण्याचे प्रदीर्घ प्रयत्न होऊनही तो सुटत नाही, तेव्हा आपद्धर्म म्हणून अन्य मार्गाने तो सोडविणे स्वाभाविक आहे. हा तात्पुरता अपवादात्मक उपाय असल्यामुळे त्याला आपद्धर्म म्हणणेच योग्य आहे.
(vi) बाबरी ढाच्याचे मशीद म्हणून अस्तित्व इस्लामच्या अनेक तत्त्वांशी विसंगत आहे. मुस्लिम देशांतही तेथील मशीदी आवश्यक तेथे पाडण्यात आल्या आहेत. सुरवातीच्या काळातील मुस्लिम राज्यकर्ते हे परकीयच होते व त्यांनी लादलेल्या गुलामीचे बाबरी ढाचा प्रतीक होते. अशा स्थितीतही मुस्लिम मानसिकता आज ना उद्या स्वेच्छेने बदलेल ह्या आशेने ‘आपद्धर्म म्हणूनच हिंदू समाजाने बाबरी ढाचा आजवर राहू दिला. ती मानसिकता बदलली असती तर आजही बाबरी ढाचा जसाचा तसा राहिला असता. परंतु एका ‘आपद्धर्माच्या उपायाने तो बदलत नाही असे दिसून आल्यावर आपद्धर्माचा पर्यायी उपाय अवलंबणे हिंदू समाजाला भाग पडले. बाबरी ढाच्याच्या पतनाबद्दल श्री नायपॉल व श्री नीरद चौधरी यांसारख्या परदेशस्थ तटस्थ विचारवंतांचे टाइम्स ऑफ इंडियामधून जे विचार प्रसिद्ध झाले आहेत त्यांची ह्या संदर्भात अवश्य दखल घेतली पाहिजे.
(vii) हिंदू = राष्ट्रीय प्रवाह असे समीकरण मी मांडत नाही. राष्ट्रीय प्रवाहाचा मुख्य घटक ‘हिंदू’ आहे असा माझा दावा आहे. इतकेच नव्हे तर भारतातील मुस्लिम अस्मिते (identity) चा महत्त्वाचा व मूळ घटक हिंदूच’ आहे असाही माझा दावा आहे. हिंदू मुळावरच इस्लामचे येथे अधिरोपण झाले आहे असे माझे मत आहे. मुस्लिम अस्मितेतील हा हिंदू घटक किती विस्तृत आहे ह्याचे वर्णन, माझ्या स्मरणाप्रमाणे, डॉ. आंबेडकरांनी आपल्या पाकिस्तानविषयक ग्रंथांत समर्थपणे केले आहे. पाकिस्तानच्या निर्मितीपूर्वी मुस्लिम लीगचे असे प्रतिपादन असे की त्यांचा धर्म (संप्रदाय) च नव्हे तर त्यांचा इतिहास, त्यांची संस्कृति, त्यांची भाषा, वंश इ. सर्व काही हिंदूंहून भिन्न आहे. परंतु पाकिस्तानच्या निर्मितीनंतर हळूहळू त्यांना जाणीव होत गेली की भारताचा इतिहास हाच त्यांचा इतिहास, येथील संस्कृती त्यांचीही संस्कृती आहे, येथील वंश हाच त्यांचाही वंश आहे, येथील संगीत, कला ह्या त्यांच्याही आहेत. त्यामुळेच पाकिस्तानला पाच हजार वर्षांचा इतिहास आहे असे भुट्टो म्हणू लागले. भारताच्या प्राचीन संस्कृतीशी नाते जोडण्यासाठी आपण पाकिस्तानची राजधानी कराचीवरून तक्षशिलेजवळील इस्लामाबाद येथे आणली असे प्रे. अयुबखान यांनी Friends, not Masters ह्या आपल्या ग्रंथात म्हटले आहे. एका पाकिस्तानी व्याकरणकाराने आपले पुस्तक ‘पाकिस्तानचा पहिला घ्याकरणकार’ म्हणून पाणिनीला अर्पण केले आहे. ही वस्तुस्थिती भारतातील मुस्लिम जनतेने ओळखली पाहिजे. त्यांना आपल्या अस्मितेच्या एका महत्त्वाच्या घटकापासून दूर करण्याचे प्रयत्न होत आहेत ही दुर्दैवाची गोष्ट आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन एकेकाळी सर सय्यद अहमद स्वतःला ‘महंमदीय हिंदू’ म्हणवून घेत असत. अलीकडे न्या. मू. छागलांसारखे मुस्लिम विचारवंतही असेच म्हणू लागले होते. ख्रिस्ती समाजातील एक विचारवंत फादर दिब्रुतो यांनीही आपल्या ग्रंथात माझा उपासना धर्म ख्रिस्ती व राष्ट्रधर्म हिंदू आहे असे म्हटले आहे. ह्याबाबतीत मुस्लिम समाजाचे योग्य प्रबोधन झाले तर ‘हिंदू’ शब्द नाकारणाऱ्या तथाकथित हिंदूंपेक्षाही अधिक लवकर ते स्वतःला महंमदीय हिंदू म्हणवून घेतील. त्यामुळे त्यांच्या सांप्रदायिक मुस्लिमपणाला कोणतीही बाधा येणार नाही.
(viii) मुस्लिमांना राष्ट्रीय प्रवाहात आणण्याची जशी गरज आहे, तशीच पाश्चात्त्य शिक्षणाने व संस्काराने ज्या हिंदूंची राष्ट्रीय मुळे उखडली जात आहेत त्यांनाही राष्ट्रीय प्रवाहात आणण्याची गरज आहे. प्रतिक्रिया म्हणून जे हिंदुत्वाची टोकाची भाषा बोलतात तेही ह्या प्रतिक्रियेचे कारण नष्ट होताच आपली टोकाची भूमिका सोडतील असा मला विश्वास वाटतो. कारण, आजही ते आम्ही मुस्लिमविरोधी नाही असे आवर्जून सांगतात, इतकेच नव्हे तर राष्ट्रीय प्रवाहात आलेल्या अनेक मुस्लिमांना त्यांनी जवळ केले आहे व आपल्यातील उच्च पदेही त्यांना दिली आहेत.
(ix) ह्या परिच्छेदातील भूमिकेचा मी पुरस्कर्ता नाही. तेव्हा मी करीत असलेल्या चर्चेत त्याला स्थान असू नये. जैन, बौद्ध, शीख इ. जे लोक आपण हिंदू नाही असे म्हणू लागले आहेत ते अल्पसंख्यक म्हणवून घेण्यात जे स्पष्ट व भासमान लाभ आहेत त्यांवर नजर ठेवून तसे बोलत आहेत. रामकृष्ण-आश्रमाचे उदाहरण ह्याबाबतीत बोलके आहे. अल्पसंख्यकांच्या बाबतीत भेद करून जे लाभ दिले जातात ते बंद केले किंवा सर्वांना ते सारखेच मिळतील असे केले तर हा विभक्ततावाद संपुष्टात येईल.
(x) विसाव्या शतकाच्या अखेरच्या भारताच्या राष्ट्रीय संस्कृतीत अनेक प्रवाह सामील झाले असले तरी ती मुख्यतः व मुळात हिंदू संस्कृतीच आहे. ‘मुख्य असली तरी अनेकांपैकी एक घटक’ असे तिचे स्वरूप नसून अनेकांपैकी एक असली तरी मुख्य घटक’ हेच तिचे वास्तव स्वरूप आहे. हा केवळ शब्दच्छल नाही. एक महत्त्वाचा की मुख्य महत्त्वाचा हा त्यांतील महत्त्वाचा प्रश्न आहे.
(x) व (xi) यांत ‘हिंदू’ शब्दावर आक्षेप घेण्यात आला आहे. त्याचे उत्तर मी ह्यापूर्वी दिले आहेच.
शेवटी मला एका महत्त्वाच्या गोष्टीचा खुलासा करावयाचा आहे. आजवर जी चर्चा झाली तीत बऱ्याच प्रमाणात शह-काटशह देण्याचे प्रयत्न झाले आहेत. माझे विवेचनही (प्रस्तुत लेख धरून) ह्या दोषापासून मुक्त नाही हे मला मोकळेपणाने मान्य केले पाहिजे. ज्या प्रकारचा हल्ला झाला त्याला त्या प्रकारचे मी उत्तर दिले एवढेच त्याबाबत माझे समर्थन आहे. परंतु त्याने मी समाधानी नाही. शह-प्रतिशहाची ही वकिली वादविवाद पद्धती पाश्चात्त्यांची भारताला देणगी आहे असे मला वाटते. तीत मी खरा व तू खोटा ठरविण्याचा प्रयत्न असतो व त्यात बहुधा सत्याचा बळी जातो. पूर्वी आपलेकडे वादविवाद होत असत, पक्ष-प्रतिपक्ष आपापल्या भूमिका हिरीरीनेही मांडत असत. परंतु त्यांतून सत्याचा शोध घेण्याची सर्वांचीच सामाईक दृष्टी असे. कोण जिंकतो, कोण हारतो ह्याला महत्त्व नसून सत्याचा विजय व्हावा ही कामना असे व त्याचे श्रेय सर्वांच्या सामूहिक विचारमंथनाला असे. प्रस्तुत चर्चा ह्यापुढे अशा पद्धतीने व्हावी असे मला वाटते. त्यासाठी आजवर मांडलेली धर्मसंकल्पना जर मान्य असेल तर त्यापुढचा तपशील चर्चेत भाग घेणाऱ्या सर्व विचारवंतांच्या सामूहिक प्रयत्नाने ठरविता येईल. ती संकल्पना मान्य नसेल तर तिच्यावरही आणखी चर्चा करता येईल.
११३, शिवाजीनगर, नागपूर – ४४० ०१०