तत्त्वज्ञानाची ओळख (भाग ६)

विधानांची काही महत्त्वाची विभाजने

आपण आतापर्यंत विधानांची काही विभाजने पाहिली आहेत. उदा. अस्तिवाचक (affirmative) आणि नास्तिवाचक (negative) विधाने, तसेच सार्विक (universal) आणि कातिपयिक (particular) विधाने.
आज आपण आणखी तीन विभाजनांची ओळख करून घेणार आहोत. ही विभाजने आहेतः (१) विश्लेषक (analytic) आणि संश्लेषक (synthetic) विधाने; (२) अवश्य (necessary) आणि आयत्त (contingent) विधाने; आणि (३) प्रागनुभविक (a priori) आणि आनुभविक (empirical) विधाने. ही सर्व विभाजने अतिशय महत्त्वाची असून त्यांचा तत्त्वज्ञानात वारंवार उल्लेख येतो.
(१) विश्लेषक आणि संश्लेषक विधाने
हे विभाजन तसे पुष्कळ जुने आहे. ते शाब्दिक (verbal) आणि वास्तव (real) या नावांनी केले जाई. परंतु कांटने (१७२४ ते १८०४) त्यांना analytic’ व ‘synthetic’ ही नावे देऊन ह्या विभाजनाला आपल्या तत्त्वज्ञानात महत्त्वाचे स्थान दिल्यापासून त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले. हे विभाजन करताना कांटच्या डोळ्यांपुढे ज्यांना उद्देश्य-विधेयात्मक विधाने म्हणतात ती विधाने प्रामुख्याने होती. उद्देश्य विधेयात्मक विधान म्हणजे ज्यात एक उद्देश्यपद (subject) आणि एक विधेयपद (predicate) असते असे विधान. उदा. ‘मनुष्य मर्त्य आहे’, ‘गाय चतुष्पाद आहे’, इत्यादि सर्व विधाने या एकाच प्रकारची असतात अशी एक समजूत पूर्वापार चालत आलेली होती. वस्तुतः ही समजूत चुकीची होती. उदा. औपाधिक (conditional किंवा hypothetical) विधाने, म्हणजे जर-तारी विधाने, उघडच उद्देश्यविधेयात्मक नसतात. उदा. ‘जर पाऊस पडेल तर जमीन भिजेल’. परंतु कांटने केलेले विभाजन केवळ उद्देश्यविधेयात्मक विधानांनाच सरळपणे लागू पडते.
हे विभाजन विधानातील उद्देश्य आणि विधेय यांच्या परस्परांशी असणाऱ्या एका विशिष्ट संबंधावर आधारलेले आहे. उद्देश्यपद आणि विधेयपद दोन्ही एकेका संकल्पनेची वाचक असतात. आता काही विधानांतील विधेय-संकल्पना उद्देश्य-संकल्पनेत समाविष्ट असते, तर अन्य काही विधानातील विधेय-संकल्पना उद्देश्य-संकल्पनेच्या बाहेर असते. कांटने दिलेली उदाहरणे शरीरे विस्तारवान असतात आणि शरीरे वजनदार असतात’ अशी आहेत. शरीराची आपली जी संकल्पना असते तिच्यात विस्ताराची संकल्पना समाविष्ट असते हे आपल्याला मान्य करावे लागेल. परंतु वजन असणे ही कल्पना शरीराच्या कल्पनेत समाविष्ट नाही. दुसरे उदाहरण घ्यायचे तर पुढील पाहाः ‘पिते अपत्यवान असतात आणि ‘मनुष्य अपत्यवान असतात. पितृत्वाच्या कल्पनेत अपत्यत्वाची कल्पना समाविष्ट असते. पिता म्हटला की त्याला एखादे तरी अपत्य असावेच लागते. परंतु मनुष्यत्वाच्या कल्पनेत
अपत्यत्वाची कल्पना समाविष्ट नसते. कोणी मनुष्य आहे म्हणून त्याला अपत्य असेलच असे म्हणता येत नाही. पहिल्या प्रकारच्या विधानांना analytic (विश्लेषक) विधाने हे नाव कांटने दिले. कारण त्यांतील उद्देश्याला विधेय लागू पडते ही गोष्ट उद्देश्यकल्पनेचे केवळ विश्लेषण किंवा फोड करून कळते. परंतु ज्या विधानांतील विधेयकल्पना उद्देश्य कल्पनेत समाविष्ट नसून ती तिच्या बाहेर असते, त्यात विधेय उद्देश्याला बाहेरून जोडावे लागते. म्हणून त्यांना कांटने synthetic (संश्लेषक) विधाने असे नाव दिले. उद्देश्यामध्ये समाविष्ट नसलेले विधेय त्याला आपण जोडू शकतो याचे कारण ते उद्देश्याशी संबद्ध असल्याचा अनुभव आपल्याला येतो म्हणून. सर्व मनुष्यांना अपत्ये असतात की नसतात हे आपल्याला अनुभवाने (म्हणजे निरीक्षणाने) कळते; परंतु पित्याला अपत्ये असतात हे ज्ञान प्राप्त करण्याकरिता आपल्याला पित्यांची खानेसुमारी करावी लागत नाही. त्याकरिता फक्त पित्याच्या कल्पनेची फोड केली की झाले.
विश्लेषक आणि संश्लेषक विधानांतील या भेदातून एक भेद असा उद्भवतो की विश्लेषक विधाने सर्व खरीच असतात, ती खोटी असूच शकत नाहीत. कारण विश्लेषक विधानातील विधेय उद्देश्य संकल्पनेत समाविष्ट असल्यामुळे उद्देश्याच्या ठिकाणी विधेय नाही असे घडूच शकत नाही. विश्लेषक विधान असत्य आहे या म्हणण्याचा अर्थ असा होईल की त्यातील उद्देश्यात विधेय नाही, आणि असे म्हणणे म्हणजे विधेय उद्देश्यात आहेही आणि नाहीही असे म्हणणे होय. म्हणजे त्यात व्याघात (contradiction) होईल.
याच्या उलट संश्लेषक विधाने सत्यही असू शकतात आणि असत्यही असू शकतात. ती सत्य आहेत की नाहीत हे ठरविण्याकरिता उद्देश्यपदाने वाचित वस्तूचे निरीक्षण करावे लागते आणि तिच्यात विधेयपदाने वाचित गुण आहे की नाही हे निश्चित करावे लागते. उदा. ‘सर्व गायी रवंथ करतात हे वाक्य विश्लेषक नाही, कारण ‘गाय या शब्दाने जी कल्पना व्यक्त होते तिच्यात रवंथ करण्याची कल्पना समाविष्ट असते असे आपण सामान्यपणे म्हणणार नाही.
याप्रमाणे विश्लेषक विधानांची सत्यता त्यांतील उद्देश्यपद आणि विधेयपद यांच्या अर्थांनीच केवळ ठरते. संश्लेषक विधानांच्या सत्यत्वातही त्यांतील शब्दांच्या अर्थांचा भाग असतोच. पण तो त्यांच्या सत्यत्वाला पुरा पडत नाही. ‘गाय रवंथ करते या वाक्याची सत्यता ‘गाय’, रवंथ’ आणि ‘करणे’ या शब्दांना जे अर्थ आहेत त्यांनी ठरते, म्हणजे त्या शब्दांचे अर्थ जर वेगळे असते तर कदाचित् ते वाक्य असत्य झाले असते. परंतु त्या वाक्याची सत्यता आणखी एका गोष्टीवर अवलंबून आहे. ती गोष्ट म्हणजे गायी खरोखरच रवंथ करतात ही वस्तुस्थिती. ‘गाय, रवंथ आणि करणे या शब्दांचे अर्थ आहेत तेच असते, पण वास्तवात गायी रवंथ करीत नसत्या तर ते वाक्य असत्य झाले असते. म्हणजे संश्लेषक विधानांची सत्यता त्यांतील शब्दांच्या अर्थावर जशी अवलंबून असते तशीच प्रत्यक्ष जगात (निसर्गात) आढळणाऱ्या वस्तुस्थितीवरही अवलंबून असते. विश्लेषक विधानांची सत्यता मात्र केवळ त्यातील शब्दांच्या अर्थावर अवलंबून असते.
विधानांचा विश्लेषक-संश्लेषक हा भेद विशद करताना कांटच्या डोळ्यांसमोर फक्त उद्देश्य-विधेयात्मक विधानेच होती हे वर म्हटलेच आहे. अन्य आकाराच्या विधानांना हा भेद कसा लागू करायचा असा प्रश्न तत्त्वज्ञांपुढे होता. पण ही उणीव नंतरच्या काळात काही तत्त्वज्ञांनी भरून काढली. त्यांनी त्या भेदाची व्याख्या अशी केलीः विश्लेषक विधाने म्हणजे ज्या विधानांची सत्यता त्यांतील शब्दांच्या अर्थानीच ठरते अशी विधाने. अशी व्याख्या केल्याने गेल्या लेखांकात ज्यांचे विवरण केले आहे ती तार्किकीबलाने सत्य असणारी विधानेही विश्लेषक आहेत असे म्हणता येते. पुढील उदाहरणावरून हे लक्षात येईल.
आता पाऊस पडतो आहे किंवा पडत नाही.
हे वाक्य सत्य आहे हे उघड आहे. हे त्यातील ‘किंवा’ व ‘नाही’ या तार्किकीय शब्दांच्या अर्थाने ठरते. ‘किंवाचा अर्थ असा आहे की त्याने जोडलेल्या विधानांपैकी निदान एक सत्य असले पाहिजे. तसेच ‘नाही या तार्किकीय अव्ययाचा अर्थ असा आहे की एखाद्या विधानाला हे अव्यय जोडले म्हणजे तयार होणारे विधान आणि मूळ विधान दोन्ही खरी आहेत असे असू शकत नाही, तसेच ती दोन्ही खोटी आहेत असेही असू शकत नाही. म्हणजे ‘आता पाऊस पडतो आहे आणि ‘आता पाऊस पडत नाही ही दोन्ही विधाने खरी असू शकत नाहीत, तसेच ती दोन्ही खोटीही असू शकत नाही. म्हणजे त्यांच्यापैकी कोणते तरी एक खरेच असते आणि ही गोष्ट ते सबंध वैकल्पिक वाक्य खरे असण्यास पुरे आहे. याप्रमाणे ‘आता पाऊस पडतो आहे किंवा पडत नाही हे विधान त्यातील ‘किंवा’ आणि ‘नाही या दोन शब्दांच्या अर्थामुळे सत्यच असते, असत्य असू शकत नाहीत. म्हणून याही विधानाला ह्या विस्तारित अर्थाने विश्लेषक म्हणण्याचा प्रघात आहे.
आता आपण दुसऱ्या विभाजनाकडे वळू.
(२) अवश्य (necessary) आणि आयत्त (contingent) विधाने
हेही विभाजन खूप जुने, अॅरिस्टॉटलइतके, म्हणजे इ.स.पू. चौथ्या शतकाइतके. पण त्या भेदाचे लाइब्नित्स (१७ वे शतक) आणि कांट (१८ वे शतक) यांनी विशेष विवरण केले. लाइब्नित्सप्रणीत व्याख्या अशी आहेः अवश्य विधान म्हणजे असे विधान की ज्याच्या विरुद्ध विधान अशक्य म्हणजे व्याघातयुक्त असते, याच्याउलट आयत्त विधानाच्या विरुद्ध विधान शक्य (म्हणजे व्याघातमुक्त) असते. आपण वर विश्लेषक आणि संश्लेषक विधानांची जी उदाहरणे घेतली होती तीच अवश्य आणि आयत्त विधानांची उदाहरणे म्हणूनही चालतील. उदा. ‘सर्व भाऊ पुरुष असतात हे विधान अवश्य आहे, कारण त्याचे विरुद्ध विधान व्याघातयुक्त आहे; ‘सर्व भाऊ पुरुष असतात’ याच्या विरुद्ध विधान ‘निदान एक भाऊ पुरुष नाही असे होईल, आणि हे अशक्य आहे, कारण भावाच्या संकल्पनेत पुरुषत्वाची कल्पना समाविष्ट आहे, आणि म्हणून अमुक मनुष्य भाऊ आहे परंतु पुरुष नाही असे म्हणणे व्याघातमय होते. विश्वात कोठेही व्याघात असू शकत नाही ही गोष्ट स्वयंसिद्ध आहे. याउलट ‘सर्व मनुष्य पुरुष असतात हे विधान आयत्त आहे, कारण त्याच्याविरुद्ध परिस्थिती शक्य आहे, (म्हणजे व्याघातमय नाही). मनुष्यांमध्ये स्त्रियांचाही अंतर्भाव होतो, त्यामुळे ‘सर्व मनुष्य पुरुष असतात हे विधान आयत्त आहे हे स्पष्ट आहे. हे विधान नुसतेच आयत्त आहे असे नसून ते असत्यही आहे. परंतु आयत्त विधाने सत्यही असू शकतात. उदा. ‘गायी रवंथ करतात ह्या विधानाच्या विरुद्ध स्थिती शक्य आहे, व्याघातमय नाही; कारण गायीच्या संकल्पनेत रवंथ करण्याची कल्पना समाविष्ट आहे असे आपण सामान्यपणे म्हणणार नाही. गायी रवंथ करतात ही गोष्ट गायींच्या निरीक्षणानेच आपल्याला ज्ञात होते. म्हणून एखादा प्राणी गाय आहे परंतु तो रवंथ करीत नाही अशी कल्पना आपण करू शकतो. वस्तुतः सर्व गायी रवंथ करतात हे खरे आहे, पण हे विधान अवश्य नाही, आयत्त आहे; एखादी गाय रवंथ करीत नाही असे म्हणण्यात व्याघात नाही.
अवश्य विधानाची व्याख्या करताना आपण वापरलेल्या ‘शक्य’ आणि ‘अशक्य या दोन शब्दांविषयी दोन शब्द लिहिणे अवश्य आहे. एखादी गोष्ट शक्य आहे याचा अर्थ एवढाच आहे की ती अशक्य नाही, आणि अशक्य’ याचा अर्थ व्याघातयुक्त. अनेकदा अवश्य विधानांची व्याख्या अशी करतातः ज्या विधानाच्या विरुद्ध स्थितीची आपण कल्पनाही करू शकत नाही. पण अशी व्याख्या करणे गैरसोयीचे आहे. कारण कोण कशाची कल्पना करू शकतो आणि कशाची नाही याबाबतीत मतभेद संभवतो. म्हणून ‘अवश्य विधानाच्या वर केलेल्या व्याख्येत व्याघातकल्पनेचा उपयोग केला आहे. व्याघात-नियमानुसार कोठेही व्याघात असू शकत नाही. व्याघात म्हणजे एखाद्या वस्तूत एखादा गुण एकाच वेळी असणे आणि नसणे. हे अर्थात् अशक्य आहे. याच्या उलट जे व्याघातयुक्त नाही ते शक्य. दहा तोंडांचा रावण किंवा नृसिंह या कल्पना आपण करू शकतो, कारण त्यात व्याघात नाही. म्हणून त्या शक्य आहेत.
आता आपण तिसऱ्या विभाजनाकडे वळू शकतो.
(३) प्रागनुभविक (a priori) आणि आनुभविक (empirical) विधाने
हे विभाजन ज्ञानमीमांसेतील (epistemology) आहे. एखादे विधान आपल्याला कसे, म्हणजे कोणत्या मार्गाने ज्ञात होते या प्रश्नाला उत्तर देणारे ते विभाजन आहे. हेही विभाजन जुने आहे, परंतु कांटने त्याचा वापर केल्यापासून त्याला विशेष प्रसिद्धी मिळाली आहे. काही विधाने अशी आहेत की त्यांचे ज्ञान आपल्याला निसर्गाचा जो अनुभव येतो त्यातून प्राप्त होते. उदा. ‘कावळे काळे असतात’ किंवा ‘गायी रवंथ करतात. परंतु काही विधाने अशी असतात की त्यांचे ज्ञान आपल्याला अनुभवातून प्राप्त होत नाही. ती अनुभवपूर्व विधाने असतात असे तत्त्वज्ञांचे म्हणणे आहे. ‘a priori’ या लॅटिन शब्दबंधाचा अर्थ ‘आधीपासून’, आणि त्याचा अर्थ अनुभवाच्या आधीपासून. काही ज्ञान a priori असते याचा शब्दशः अर्थ अनुभवाआधीपासून असलेले ज्ञान. अनुभव म्हणजे अर्थात इंद्रियानुभव. आता काही ज्ञान आपल्याला अनुभवाआधीपासूनच मिळालेले असते असे जरी पूर्वी मानीत असले तरी आज कोणी तसे मानीत नाही. परंतु a priori’ या शब्दबंधाला एक काहीसा वेगळा अर्थ देऊन आपल्याला त्या प्रकारचे ज्ञान असते असे मत तत्त्वज्ञ स्वीकारतात. एखादे ज्ञान प्रागनुभविक असते असे म्हणताना ते त्या ज्ञानाच्या काही वैशिष्ट्यांकडे लक्ष वेधतात. अनुभवाला मर्यादा असतात, तो अमर्याद नसतो. तसेच अनुभवामुळे एखादी गोष्ट अशी आहे हे आपल्याला कळते, पण ती अन्यथा असू शकत नाही हे सांगायला अनुभव असमर्थ आहे. म्हणून जर आपल्याला असे ज्ञान आढळले की जे अमर्यादपणे सार्विक आहे, आणि तसेच ते अवश्यही आहे, तर ते ज्ञान अनुभवोद्भूत नाही असे म्हणता येते. आनुभविक ज्ञान अमर्यादपणे सार्विक असू शकत नाही; ते फक्त आतापर्यंत अमुक प्रकारच्या वस्तूंत अमुक गुण आपण अनुभवला असे असते. परंतु या प्रकारच्या सर्व वस्तूत तो गुण असतोच किंवा असलाच पाहिजे असे विधान असेल तर ते आनुभविक असू शकणार नाही.
पण अशी विधाने खरोखर आहेत काय ? असा प्रश्न वाचक विचारतील. त्याला उत्तर आहे, आहेत. त्यांची उदाहरणे म्हणून आपण गणितातील विधाने घेऊ शकतो. उदा. ७+५=१२ हे विधान प्रागनुभविक आहे, कारण ते अमर्यादपणे साविक आहे. ७+५ यांची बेरीज केव्हाही आणि कुठेही १२ च होईल अन्य होऊ शकत नाही असे आपण म्हणू शकतो. तसेच तार्किकीबलाने सत्य असणारी विधानेही अशीच आहेत. एवढेच नव्हे तर ज्यांना आपण विश्लेषक विधाने म्हणालो आहोत तीही अशीच प्रागनुभविकही आहेत. उदा. ‘सर्व भाऊ पुरुष असतात हे विधान अवश्य आणि अमर्यादपणे सार्विक आहे हे उघड आहे. म्हणून ते प्रागनुभविक आहे.
वरील तीन विभाजनांचे तीन स्वतंत्र आधार आहेत. ती तीन भिन्न प्रश्नांना उत्तरे देण्यातून उद्भवली आहेत. विश्लेषक-संश्लेषक हे विभाजन उद्देश्य आणि विधेय यांच्या संकल्पनांच्या समावेश-असमावेशात्मक संबंधातून उद्भवले आहे. म्हणजे ते अर्थमीमांसीय विभाजन आहे. अवश्य-आयत्त हे विभाजन एखाद्या विधानाच्या विरुद्ध विधान शक्य आहे की नाही या प्रश्नाच्या उत्तरातून निर्माण झाले आहे. हे विभाजन तार्किकीय आहे. प्रागनुभविक-आनुभविक हे विभाजन आपल्याला एखाद्या विधानाचे ज्ञान कसे (म्हणजे कोणत्या मार्गान) होते या प्रश्नाच्या उत्तरातून उद्भवले आहे. म्हणजे हे विभाजन ज्ञानमीमांसीय आहे. परंतु या विभाजनांचे आधारभूत प्रश्न जरी भिन्न आणि स्वतंत्र असले तरी त्या तिघांनीही ओढलेली विभाजन-रेषा एकाच ठिकाणी पडली आहे. म्हणजे जो विश्लेषक विधानांचा वर्ग आहे तोच अवश्य आणि प्रागनुभविक विधानांचाही आहे. आणि तसेच जी संश्लेषक विधाने आहेत तीच आयत्त आणि आनुभविकही असतात.
वर जे दिले आहे ते सध्याचे प्रतिष्ठित मत आहे. त्याला सर्वांची मान्यता आहे असे नव्हे हेही लक्षात ठेवायला हवे. उदा. कांटच्या मते काही संश्लेषक विधाने अवश्य आणि म्हणून प्रागनुभविक आहेत असे होते. पण त्या मताविषयी पुन्हा केव्हातरी.

रिसबूड यांचे पत्र व त्याला उत्तर
दि. य. देशपांडे
पत्र पहिले
श्री. रा. रा. दि. य. देशपांडे यांना स.न.वि.वि.
तुमच्या पुण्याच्या भाषणातील एक मुद्दा मला समजला नाही.
सृष्टीचा जो व्यवहार चालला आहे, त्यामागे काही तरी आदिकारण, म्हणजे परमेश्वर असला पाहिजे, असे म्हणणाऱ्यांच्या पुढे तुम्ही एक अडचण उपस्थित केलीत; ती अडचण म्हणजे या आदिकारणाच्या मागे कोणते कारण आहे या प्रश्नाचे उत्तर देता येत नाही, आणि ज्याअर्थी या प्रश्नाचे उत्तर देता येत नाही, त्याअर्थी – तुमच्या म्हणण्याप्रमाणे सृष्टीच्या व्यवहारामागे काही तरी अज्ञेय शक्ती आहे असे मानण्याचा आग्रह तरी कशासाठी धरायचा ? ज्याप्रमाणे ‘आदिकारण हे कोणत्याही कारणाशिवाय अस्तित्वात आले, त्याचप्रमाणे ही सर्व सृष्टीही कुठल्याही कारणाशिवायच अस्तित्वात आली, आणि तिचा व्यवहार हा सुद्धा कुठल्याही प्रेरणेशिवायच चालू आहे, असे म्हणण्यास काय प्रत्यवाय आहे?
मला या प्रतिपादनात एक तांत्रिक त्रुटी आढळते ती अशी:
विज्ञानाची धडपड कशासाठी चालू असते ? मूळ तत्त्वांचा शोध घेण्यासाठी जितके खोल खणत जाता येईल तितके जायचे. असे करता करता कुठेतरी असा स्तर लागतो की त्याच्या खाली जाणे उपलब्ध साधनांद्वारे शक्य होत नाही. मग तिथे निरुपायाने थांबायचे. पण त्याच वेळी, आणखी काही निराळी, नवी साधने मिळवून आणखी खोल जाण्याची ईर्षा मात्र जागी ठेवायची.
माझे म्हणणे असे की, ‘सृष्टीचे आदिकारण म्हणजे एक अज्ञेय अशी शक्ती’ हा आजच्या घटकेला तरी तो दुर्भेद्य स्तर आहे. त्याच्याखाली आज जाता येत नाही, पुढेही कदाचित जाता येणार नाही.
यावर तुमचे म्हणणे असे की त्या दुर्भेद्य स्तराच्यापर्यंत तरी जायचेच कशाला ? थोडे आधीच थांबावे; – म्हणजे, सृष्टीला काही आदिकारण नसून हे सर्व आपोआप चालले आहे असे मानावे, हेच सुज्ञपणाचेआहे. असे केले म्हणजे मग परमेश्वर’ ही कल्पना आपोआपच अनावश्यक ठरते.
इथे बुद्धिवादी- किंवा विवेकवादी लोक- स्वतःच्या बुद्धीशी प्रतारणा करतात असे मला वाटते. या माझ्या मताच्या समर्थनार्थ मी माझ्या पुस्तकात एक स्वतंत्र विवेचन, “बुद्धिवादाचा पंथ होऊ नये” या शीर्षकाखाली केले आहे. * (ते पुस्तक – “सहज समजेल-फलज्योतिष काय आहे व काय नाही ?’) या ज्योतिष-विरोधी पुस्तकात मी अगदी निराळ्या पद्धतीने फलज्योतिषाचा फोलपणा दाखवून दिला आहे. बुद्धिवादी किंवा विवेकवादी- लोकांना सहज पटणार नाहीत, अशा काही गोष्टी त्यात आहेत, पण त्यांचा त्यांनी प्रांजळपणे विचार करायला हवा. या उद्देशाने मी शेवटचे प्रकरण त्यांना उद्देशून लिहिले आहे. तुम्हाला ते वाचून माझा सुरुवातीचा मुद्दा जास्त स्पष्टपणे कळेल अशी आशा आहे.
विवेकवाद प्रांतातला तुमचा अधिकार फारच मोठा आहे हे ठाऊक असूनही तुमच्याशी मतभेद व्यक्त करण्याचा संकोच मला वाटत नाही, याचे कारण म्हणजे तुम्ही विवेकवादी आहात ! असो.
सोबत माझे पुस्तक पाठवले आहे, ते मिळाल्याचे कृपया कळवावे.
आपला
मा. श्री. रिसबूड,
* हा उतारा पुढे उद्धृत केला आहे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.