सत्तेचाळीस साली स्वातंत्र्याबरोबर फाळणी आली. दोन्हीकडचे अल्पसंख्यक, विशेषतः पंजाबात बळी गेले. संपत्तीइतकीच-किंवा जास्तच-स्त्रियांची लूट झाली. सुजल, सुफल पंजाब “आँधी गम की यूँ चली, बाग उजड़ के रह गया” असा झाला. ‘मारो-काटो’चे वादळ थोडे शमले तेव्हा घरादारांना मुकलेल्या स्त्रियांची आठवण नेते मंडळींना झाली. त्यांचा शोध घेण्यासाठी उभय देशांनी करार केले. पाकिस्तानात लाहोरला आणि भारतात जालंधर येथे मुख्य छावण्या उघडल्या. मिळालेल्या तक्रारींचा तपास करून अपहृत स्त्रियांच्या पुनःप्राप्तीसाठी तळ उभे केले. लाहोरच्या तळावर प्रमुख म्हणून कमळाबेन पटेल या कार्यकर्तीची योजना झाली. सत्तेसाळीस सालच्या डिसेंबरपासून पुढील २ वर्षे त्या तिथे होत्या. त्यांची रोजनिशी गुजरातीत मूळ ‘सोतां उखडेला’ या नावाने प्रसिद्ध झाली. पुस्तक गुजरातमध्ये गाजले. त्याला पुरस्कार लाभले. त्याचा अनुवाद मराठीत ‘रक्त पहाट’ या नावाने झाला. अनुवादक लीला पटेल मूळ मराठीभाषक. यत्नेकरून गुजराती शिकल्या. हा अनुवाद मराठीत करून त्यांनी मातृभाषेचे ऋण फेडले आहे. पुस्तक फार मोलाचा अस्सल ऐतिहासिक दस्तऐवज आहे.
पुस्तक सुमारे दीडशे पानांचे. तसे लहानखोरच. ते वाचताना पानोपानी वाचक बेचैन होतो. लेखिकेचे अस्सल अनुभव अस्तित्वालाच भिडणारे. सत्याबाबत आग्रही वृत्ती, मानवतावादी जीवननिष्ठा आणि निवेदनातला संयम सारेच असामान्य.
आणखी थोडे कमळाबेनबद्दल. महात्माजींच्या साबरमती आश्रमात शिकलेली पस्तिशीतली तरुणी. कमळाबेनचे वडील गांधीजींनी निवडलेले दांडी यात्रेतले एक सत्याग्रही. मृदुलाबेन साराभाईचा पूर्ण विश्वास संपादन केलेली कार्यकर्ती. लाहोरला जाण्यासाठी दिल्लीला विमानात बसली तो आयुष्यातला पहिला विमानप्रवास. विमानात चढली तो जिकडे तिकडे बुरखाधारी स्त्रिया. पुरुषांच्या हातात हुक्के. लांबनळीचे लोटे, टमरेले. गँगवेमध्ये बकऱ्या. या बावरलेल्या मुलीला एक फ्रेंच महिला जवळ करते. आस्थेने विचारपूस करते. कमळाबेनला सराईतपणे इंग्लिश बोलायची सवय नसते. त्या कष्टमय संवादातून इतकाच इत्यर्थ निघतो की त्यांनी या परिस्थितीत लाहोरला जाणे धोक्याचे आहे. त्या संकटात The Might of Mahatma मधले बापूंचे एक वाक्य धीर देते. स्त्रियांच्या हितसंरक्षणाची सुवर्णसंधी आली असता माघार घ्यायची नाही हाच स्वधर्म! मनाला हिंमत मिळते.
लाहोरची छावणी तिथल्या विख्यात गंगाराम हॉस्पिटलमध्ये होती. त्या भव्य इमारतीच्या भिंती तेवढ्या जागेवर राहिल्या होत्या. बटन दाबले की पंखा सुरू होतो हे ज्ञान नसणाऱ्या आणि बांबूंनी पंखे फिरवणाऱ्या मंडळींनी त्या हॉस्पिटलला एखाद्या उद्ध्वस्त धर्मशाळेची अवकळा आणली होती. कमळाबेनच्या चिंताग्रस्त मनात वैरी डोकावतो इथल्या स्त्रियांचंही अपहरण झालं असेल का?
बादशहा आणि बिरबलच्या गोष्टीतील एक वानरीची कथा आहे. ती खोटी नाही. ती कोणाला खोटी वाटेल तर त्याने/तिने कमळाबेनने सांगितलेली ‘वीरा’ची ही कर्मकहाणी वाचावी.
मुलतान जिल्ह्यातल्या एका गावची ही घटना. एका पोलिस इन्सपेक्टरने ‘वीरा’ नावाची हिंदू स्त्री स्वतःच्या घरात दडवून ठेवली अशी माहिती मिळाली. पण वीराने शोधकर्त्या पोलिसांना सांगितले की, माझ्या वडिलांनी या इन्स्पेक्टरशी माझा निका लावून दिला आहे. तिला छावणीत आणून तिचा निर्णय लवादासमोर व्हावा असा आग्रह कमळाबेननी धरला.. तिच्यावर दबाव तर येत नाही ना या आशंकेने. लवादाच्या बैठकीला थोडा अवधी होता. एका रात्री ती कमळाबेनजवळ मन मोकळं करते. तिचा हा नवरा त्यांचा शेजारीच. फाळणीनंतर दंगली उसळल्या तसा त्यांचा त्याने फायदा घ्यायचे ठरवले. ‘वीराचा निका माझ्याशी लावून द्याल तर तुमच्या कुटुंबाला सरहद्दीपर्यंत सुखरूप पोचवतो,’ अशी लालूच दाखवली. वडील या सौद्याला राजी झाले. वर राहते घर आणि तीस तोळे सोनेही. दिले. वडील सलामत सुटले. या इन्स्पेक्टरला पहिली बायको होती. मुलेबाळे होती. तो कामावर गेला की ती छळ सुरू करी. मोलकरणीसारखे राबवी. ‘काफराची जात’ म्हणून हिणवी. वडिलांनी आपला बळी देऊन कुटुंबाची चामडी वाचवली या विचाराने तिला त्यांची घृणा वाटू लागली.
लवादासमोर अपहृत स्त्रीचा जबाब घेताना, नियमाप्रमाणे आरोपीला हजर राहता येत नसे. पण तिचा नवरा पोलिस इन्स्पेक्टर म्हणून चलाख पोलिस प्रमुख मि. रिझवींनी पळवाट काढली. तरी वीराने ‘माझा निका बळजबरीने लावण्यात आलेला आहे. मी भारतात जाण्यास तयार आहे असे धीटपणे सांगितले. हे तिचे बयाण ऐकून इन्स्पेक्टरच्या तळपायाची आग मस्तकात गेली. कमळाबेन म्हणतात, जर त्याचं काही चाललं असतं तर त्याने तिथल्या तिथेच वीराला आणि मला गोळ्या घालून ठार मारून टाकलं असतं.
दंगलग्रस्त लोकांनी आपल्या आयाबहिणींचे, पत्नीचे, मुलींचे भोग देऊन जेथे जीव वाचवले तिथे बिचाऱ्या निराधार विधवा सुनेची काय कथा?
रावळपिंडी जिल्हयातील एका गर्भश्रीमंत कुटुंबातील ही सून, प्रेमा. पळापळीत प्रेमा कशी मागे राहिली कोण जाणे! कुटुंबाच्या मालकीची भव्य हवेली आणि सात-आठ घरे होती. त्यातल्या एका घरात वाचलेल्या सामानासह ती राहात होती. हवेलीत व इतर घरात मुसलमान कुटुंबे घुसली होती. प्रेमा भारतात गेली की ही मंडळी बिनधोक होणार होती. पण ती जाईना. त्यातून लष्कराच्या कॅप्टन तुफेल या तरुण अधिकाऱ्याशी तिचे सूत जमले. दोघांचा विवाहाचा बेत होता. तुफेलच्या रेजिमेंटला त्यांचे लग्न पसंत नव्हते. ती मुसलमान होणार होती तरी! त्याची बलुचिस्तानात बदली झाली. चोवीस तासांत रुजू व्हायचा हुकूम झाला. ती एकटी पडली. अशा अवस्थेत पोलिसांनी तिला छावणीत दाखल केले. मि. रिझवींनी तिला छावणीत पाहाताच, ही वाईट चालीची बाई इतरांना बिघडवेल. लवकर भारतात पाठवा म्हणून अनाहूत सल्ला दिल्ला. तिने आपली करुण कहाणी कमळाबेनना ऐकवली आणि तुफेलचा तपास घ्या अशी विनवणी केली.बेननी भारतीय यंत्रणेमार्फत त्याचा पत्ता घेऊन त्यास मरियम (प्रेमा)च्या नावे संदेश पाठवला. पण तो आला नाही. शेवटी तिला जालंधरला पाठवावेच लागले. चारपाच महिन्यांनी तुफेल आला. दबकत दबकत भीतभीत. त्याला चारपाच महिन्याआधीचा संदेश आता मिळाला होता. पाकी सत्ताधाऱ्याच्या दंडेलीपुढे लग्नाची हिंमत त्याच्यात राहिली नव्हती. कमळाबेनने त्याला आपली कैफियत कागदावर लिहून काढण्यास सांगितली. प्रेमाला हे पत्र मिळाले तेव्हा ती पुरती खचली. मृदुलाबेननी तिला दिल्लीला बोलावून घेतले, मुंबईला धाडले. तिचे मन कुठेच रमेना. शेवटी गुरुदासपुरच्या छावणीत तिला मन गुंतावे म्हणून काम दिले पण तिथूनही ती नाहीशी झाली.
बेन म्हणतात : फाळणीमुळे ….किती स्त्रियांना अंधकाराच्या गुहेत ढकलून दिले असेल! आणि कितीकींनी आडविहीर जवळ केली असेल!
मियाँवाली हा पंजाबच्या पश्चिम सरहद्दीवरचा जिल्हा. फाळणीआधीदेखील तिथे अपहरणाचे प्रकार होत. फाळणीनंतर तर कहर झाला. अपहृत स्त्रियांची यादी पोलिसांकडे दिली की त्यांच्या नावापुढे Untraceable असा शेरा लिहून ती परत येई. पोलीस जबाबदारी टाळत होते. त्याचा उबग येऊन तिथली खादीधारी कार्यकर्ती उपोषणास बसली. परदेशी पोलिसांसमोर हे उपोषणाचे अहिंसक हत्यार कुचकामाचे ठरेल म्हणून पुनःप्राप्ती समितीच्या प्रमुख श्रीमती रामेश्वरी नेहरू आणि मृदुलाबेन यांच्या संदेशाप्रमाणे कमळाबेन मियाँवालीला गेल्या. तिथे पोलिसांच्या बैठकीनंतर एका अधिकाऱ्याने त्यांना आजू बाजूच्या स्थळांना भेटी द्यायला नेले. त्याने एका ठिकाणी मोटार थांबवली. बोट दाखवून तो म्हणाला, “ती विहीर पाहा. हीच ती गोझारा विहीर. असंख्य हिंदू स्त्रियांनी तिच्यात जीव देऊन आपली अब्रू वाचवली. संबंध विहीर प्रेतांच्या राशींनी भरून गेली होती. तुम्ही दूर मुंबईहून इथे आलात. किती जोखमीचे काम करत आहात. आम्ही मात्र आमच्या गावच्या आयाबहिणींचे रक्षण करू शकलो नाही. आमच्या तोंडाला लागलेला काळिमा कधीही पुसला जाणार नाही.”
हे म्हणताना त्याचे डोळे अजूंनी पाणावले. तो अधिकारी पंजाबी मुसलमान होता.
दंगलीतून वाचण्यासाठी इस्लाम स्वीकारलेला आणखी एक हिंदू वाणी कमळाबेनना भेटला होता. तो म्हणाला, त्या सडलेल्या प्रेतांच्या दुर्गंधीने गावची सबंध वस्ती गाव सोडून गेली.
वायव्य सरहद्द प्रांतातील १५०० धनिक हिंदू पठाणांना घेऊन एक गाडी जानेवारी १९४८ मध्ये भारतात जाण्यास निघाली. बन्नू स्टेशनपासून ती आधी लाहोरला येणार होती. तिला दोन मार्ग होते. एक व्हाया सरगोदा आणि दुसरा व्हाया गुजरात स्टेशन. गुजरात स्टेशन काश्मीर सरद्दीपासून फार जवळ होते, आणि काश्मिरात भारत पाक लढाई जोरात सुरू होती. म्हणून झेलम, रावळपिंडी आणि गुजरात हे जिल्हे वाहतुकींना बंद होते. तेव्हा बत्रूची ट्रेन सरगोदामार्गेच आणण्याचे नक्की ठरले. लाहोरहून पुढे तिच्यातले उतारू टूकने अमृतसरला नेण्यात येणार होते. या गाडीबरोबर रक्षणासाठी ६० लष्करी सैनिक तैनात केले होते. ड्रायव्हर व गार्ड मात्र पाकिस्तानी होते. हिंदू-पठाणवर्ग लाखो रुपयांची रोकड रक्कम आणि जडजवाहीर घेऊन निघाला ही गोष्ट मुसलमान-पठाणवर्गाला माहीत होती. त्यांनी ही मालमत्ता लुटण्याचा घाट घातला. ती गाडी रातोरात मार्ग बदलून सकाळी ६ च्या सुमारास गुजरात स्टेशनवर हजर झाली. आणि ती पोचण्याच्या आधी लुटारूपण हजर झाले. बंदुका घेऊन ते गाडीवर तुटून पडले. सुरक्षा सैनिकांनी बचावाची शर्थ केली. ६० पैकी ५८ सैनिक धारातीर्थी पडले. उरलेले दोघे जबर जखमी झाले. लुटारूंनी जवळजवळ ५ तास रणकंदन केले. प्रवाशांची मन मानेल तशी कत्तल केली. लूट केली, हाती येईल त्या स्त्रीला उचलून घेऊन गेले. गुजरात हे जिल्ह्याचे ठिकाण, पण पोलिस तिकडे फिरकले देखील नाहीत. (पुढे या लुटीतल्या सुमारे ५०० स्त्रिया पुनःप्राप्तीयोजनेमुळे परत मिळाल्या). सकाळी ११ च्या सुमारास मृदुलाबेन दोन पोलिस अधिकारी घेऊन गुजरातला गेल्या. इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलिस त्यांच्या या तळमळीने प्रभावित झाले होते. रात्री ११ च्या सुमारास त्या जखमींना घेऊन लाहोरला गंगाराम हॉस्पिटलमध्ये परतल्या. पहाटे दिल्लीला धावल्या तेव्हा पाकिस्तानला द्यावयाच्या ५५ कोटी रुपयांच्या संदर्भात महात्मा गांधींचा उपवास दिल्लीत सुरू होता. फ्राँटीयर गाडी कत्तलीची बातमी भारतात पसरून प्रतिक्रिया सुरू झाल्या तर गांधीजींच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम होणार होता. म्हणून ही बातमी गुप्त ठेवण्याचा प्रयत्न झाला. तरी पूर्व पंजाबात ती पसरलीच. अशा स्थितीत भारतातून पाकिस्तानकडे जाणाऱ्या मुसलमानांच्या दोन गाड्या दिल्लीहून सुटल्या होत्या. त्या अमृतसरला अडवून गुजरातच्या कत्तलीचा बदला घेण्याची तयारी सुरू झाली. तिचा सुगावा मृदुलाबेनला लागला तेव्हा, मृदुलाबेन ने स्वतः तेथे जावे, डी.सी. (कलेक्टर) ची मदत घ्यावी व त्या गाड्या सुखरूप अमृतसर पार करतील याची खबरदारी घ्यावी असा संदेश त्यांनी धाडला. त्यांच्या या धडपडीमुळे अमृतसर स्टेशनवर गाडीचे रूळ उखडण्याचा दंगेखोरांचा बेत कसा फसला यांची हकीकत सांगून मोठे हत्याकांड टाळण्याचे श्रेय लेखिका मृदुलाबेनना देतात.
लतीफ हा ३-४ वर्षांचा मुलगा. छावणीत आला तेव्हा त्याचा घसा बसला होता. रडून रडून डोळे सुजले होते. तो धास्तावला होता. खेळणी-पेपरमिंट कश्शाला हात लावत नव्हता.बरोबरीच्या मुलांमध्ये तो दुसऱ्या दिवशी खुलला आपले नाव लतीफ एवढेच तो सांगे. आईवडिलांचे नाव त्याला सांगता येत नव्हते. पोलिसांनी तर त्याला हिंदू ठरवून आणले होते. लवकरच त्याचे आजी आजोबा शोध घेत आले. त्यांची भेट होताच सगळ्यांच्या डोळ्यांना धारा लागल्या. आजोबांची बाजू अशी की तो त्यांच्या एकुलत्या एक मुलीचा मुलगा. ती तो लहान असतानाच गेली. आता त्याला वाढवण्यातच त्यांच्या जीवनाचं सार्थक होतं. त्यांचं म्हणणं खरं असलं तरी लवादाचा निर्णय झाल्याशिवाय त्याला त्यांच्या स्वाधीन करता येत नव्हतं. लवादाला त्यांचे म्हणणे पटेना. भारताने दिलेल्या अपहृतांच्या यादीत त्याचे नाव नव्हते. दुसऱ्या बैठकीत सरगोद्याच्या पोलिसांना पाचारण केले. त्यांनी जे सांगितलं ते ऐकून सारेच चकित झाले. लतीफच्या आजोबांची फेरतपासणी झाली. तीमध्ये बाहेर आली ती हकीकत अशी :
लतीफच्या आजोबांची एकुलती मुलगी अपत्यहीन होती.तिच्या शेजारच्या हिंदू कारागीर कुटुंबाला तीन मुले होती. त्यातल्या धाकट्याला त्यांचा फार लळा लागला. तोच लतीफ. फाळणीनंतरच्या दंगलीत जीव वाचवायला लतीफच्या जन्मदात्या आईने हिंदू छावणीत जाताना त्याला या पालनकर्त्या शेजारणीच्या ओटीत घातले. आईचे पुढे काय झाले कोणालाच माहीत नाही. लतीफ मुसलमान आईलाच खरी आई मानायला लागला. त्याच्या दुर्देवाने वर्षभरात त्याची हीही आई वारली. मरण्यापूर्वी तिने लतीफला आपल्या आईबापांच्या स्वाधीन केले. आपली संपत्ती त्याला द्या आणि त्यांची जी मालमत्ता तिला मिळायची तीही त्यालाच देऊन त्याला वाढवा अशी अखेरची इच्छा सांगितली. तेव्हा लतीफला वाढवणे यातच आजी-आजोबांच्या जीवनाचे सार्थक होते हे एका परीने खरेच होते. पण लवादाचे काम भावनेवर चालणार नव्हते. तो हिंदू आहे हे सिद्ध झाले होते. दोन देशांच्या करारानुसार त्याला मानलेल्या आजी-आजोबांजवळ राहाता येणार नव्हते. पण त्यांची काकुळतीला आलेली नजर आणि त्यांच्या गळ्यात हात टाकून बसलेला लतीफ यांच्याकडे पाहून कमळाबेनच्या अंतःकरणाची फार तडफड झाली. एका कोवळ्या बाळाच्या जीवनाचा सुरक्षित मार्ग दोन देशांच्या करारमदारांच्या दुष्ट कुदळीने उखडून टाकला होता. त्याच्या जन्मदात्रीचा ठावठिकाणा नव्हता. त्या लेकराला अंधकारमय भविष्यात ढकलण्याच्या कामात मी का म्हणून सहभागी व्हावे या विचाराने त्यांच्या हृदयाची घालमेल झाली. त्या मुळातून हादरल्या.शेवटी त्यांच्या आयाच्या बोलण्यातून त्यांना मार्ग सुचला. लतीफला भारतात जालंधर छावणीतून कोणाला तरी दत्तक देता येणे शक्य होते. तो मार्ग त्यांनी अनुसरला.
पुस्तकाच्या पानोपानी अशा अंतर्मुख करणाऱ्या कथा आहेत. त्या किती सांगाव्या! कमळाबेनची भाषा कमालीची साधी. शैली एखाद्या आश्रम कन्येसारखी अनलंकृत पण करारी. पुस्तकाच्या शेवटी दोन परिशिष्टे दिली आहेत. एकात पाकिस्तानातून आणि दुसऱ्यात भारतातून पुनःप्राप्त स्त्रिया-बालकांची आकडेवारी दिली आहे. १ डिसेंबर १९४७ पासून ३१ ऑगस्ट १९५५ पर्यंत आठ वर्षांच्या काळात पाकिस्तानातून सुमारे ९ हजार आणि भारतातून सुमारे २० हजार बायकामुलें परत पाठवली गेली. याआकड्यांमधे इतकी तफावत का? आणि भयानक संहार टाळता आला नसता का, फाळणी अटळ होती का असे प्रश्न वाचकास पडतात. यातल्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर कमळाबेनच्या पुस्तकातच इतस्ततः विखुरले आहे. त्याचा एकत्रित सारांश असाः –
१. हिंदू-शीखांची मनोवृत्ती अशी होती की पळविल्या गेलेल्या स्त्रियांना परत घेताना ते अनमान करीत. त्यांच्या स्त्रियांनाही वाटे आपण अपवित्र झालो आहोत. उलट असा विचारही मुसलमान स्त्रियांच्या मनात येत नव्हता. श्री. ना.ग. गोऱ्यांनीही प्रस्तावनेत हा मुद्दा नोंदला आहे.
२. पंजाब-काश्मिरातून अपहृत स्त्रियांची विक्री करून त्यांना सिंधमध्ये पाठविण्यात आले. पोलिसांना पत्ता लागू नये या हेतूने.
३. लाहोर हायकोर्टाच्या निर्णयाने पुनःप्राप्तीच्या कामाला मोठीच खीळ बसली. पहिल्याच दाव्याचा निकाल विरुद्ध गेला. पुढे प्रत्येक वेळी या निर्णयाच्या आधारे निवाडे होत. हेबियस कॉर्पसचा अर्ज करून अपहत महिलांना लाहोर कोर्टासमोर हजर करण्यापुरते यश मिळाले. पण पुनःप्राप्ती ही दोन देशातल्या कराराची बाब होती. तसा कायदा झालेला नव्हता. त्या अभावी हायकोर्टाने हस्तक्षेप करण्यास नकार दिला. त्यावर कमळाबेन म्हणतातः त्या बायकामुलांना आम्हाला परत करावं लागलं त्यापेक्षा वकिलांच्या घोषणांचं आणि वर्तनाचं दुःख अधिक झालं.
कोर्टरूममध्ये वकिलांनी ‘पाकिस्तानातल्या बायकांना आम्ही परत करणार नाही’ अशा घोषणा दिल्या होत्या.
पुनःप्राप्तीचा करार भारत-पाक मंत्र्यांच्या दुसऱ्या बैठकीत रद्द करण्यात आला. भारताने वटहुकूम जारी केला. पाकिस्ताननेही तसा वटहुकूम जारी करावा यासाठी खुद्द पाकिस्तानातल्या वजनदार लोकांनी फार मोठी खटपट केली; पण ते काम म्हणजे वळचणीचं पाणी छताकडे वळविण्याच्या कामाइतकं कठीण होतं असं त्यांना आढळून आलं.
आता राहिला ‘फाळणी अटळ होती का हा प्रश्न?
पाकिस्तान होणे म्हणजेच फाळणी होणे अटळ होते, असा निष्कर्ष गोविंद तळवलकरांनी काढला आहे. ‘मुसलमानांच्या स्वयंनिर्णयास मान्यता देऊन व अहिंसा हे ध्येय बनवून गांधी व काँग्रेस यांनी आपल्या कृतिस्वातंत्र्यास पूर्वीच मर्यादा घातल्यामुळे फाळणी मान्य करणे त्यांना भागच होते क्रिप्स योजनेपासून जिनांच्या हाती नकाराधिकार आला आणि काँग्रेस नेत्यांचे राजकीय अंदाज व डावपेच फसले. पाकिस्तानचे जन्मरहस्य समजावून घेण्याच्या दृष्टीने तळवलकरांच्या सत्तांतर, खंड २ मधील ‘समारोप हे समग्र प्रकरण एक कमालीचे परखड विश्लेषण आहे.
जीना न होते तर पाकिस्तान न घडते असेही म्हणता येईल.
‘१९४० साली पाकिस्तानचा ठराव झाल्यावर म.गांधी व काँग्रेस यांनी मुसलमानांना स्वयंनिर्णयाचे हक्क असल्याचे मान्य करून … राष्ट्रीय सरकारच्या मार्गात धोंड निर्माण करण्यास जिनांना अवसर दिला.
मार्च १९४४ मध्ये अलिगढ येथील भाषणात जीना म्हणाले होते ‘ज्या दिवशी व ज्या क्षणी भारतात पहिल्या माणसाने इस्लामचा स्वीकार केला त्या दिवशी व त्या क्षणीच पाकिस्तानचा जन्म झाला.’ जिनांच्या डावपेचांचे आकलन गांधींना व काँग्रेस पुढाऱ्यांना झाले नाही या निष्कर्षावर तळवलकर येतात. ते म्हणतात, ‘कलकत्त्यात व नंतर नौखालीत हत्याकांड होऊन हिंदूंची कत्तल होत होती तेव्हा जिनांनी निषेध केला नाही. पण ….. नौखालीचे पडसाद बिहारमध्ये उठले, तेव्हा त्यांनी आकाशपाताळ एक केले. १६ ऑगस्ट शेहेचाळीस रोजी डायरेक्ट अॅक्शनच्या नावाखाली कलकत्त्यात मुसलमान हिंदूंच्या कत्तली करत होते. मालमत्ता,- दुकाने लुटत होते, त्यावेळी शहीद सुन्हावर्दी बंगालचा मुख्यमंत्री मौज बघत होता. गांधीजींनी त्याला आपला मानसपुत्र मानले होते. शेजवलकर ‘पानिपतची अप्रकाशित प्रस्तावना या लेखात म्हणतात, ‘महात्माजींनी खरोखरीच इतिहासाची गरज नाही हे गृहीत धरून जगास चकित करून सोडणारे राजकारण आरंभिले…. त्याचा परिणाम पाकिस्तान देण्यात झाला…. जर माझ्याऐवजी गांधी किंवा नेहरू यांनी पानिपतचा इतिहास अभ्यासिला असता तर किती चांगले झाले असते बरे!”शेजवलकरांचे म्हणणे असे की पाकिस्तान व पानिपत ही एकाच प्रश्नाची दोन रूपे आहेत. दोहोंचाही उगम खोटी हाक उठविण्यात आहे. दिल्लीच्या मुसलमान बादशहाच्या रक्षणासाठी भाऊसाहेब पेशवा मराठी फौज घेऊन गेलेला. पण ‘इस्लाम खतरे में’ ही खोटी आरोळी ठोकून नजीबखान रोहिल्याने मुसलमानांना अहमदशहा अब्दालीच्या पाठीशी उभे करून मराठ्यांचा मोड करविला.
तत्त्वभ्रान्त गांधी व आत्माभिनिविष्ट बॅ. जीना (यांच्यात).. जिनांनी (इस्लाम खतरे में) या कल्पनेचा उपयोग आपले म्हणणे खरे करण्यासाठी नजिबाप्रमाणे यशस्वी रीतीने करून घेतला.’ ५ तळवलकर म्हणतात, ‘पं. नेहरूही वेगळ्या रीतीने तत्त्वभ्रांत होते. ‘धर्माच्या प्रेरणेचा प्रभाव पाकिस्तान अव्यवहार्य ठरवणाऱ्यांनी विचारात घेतला नाही.’ लोकसंख्येची पद्धतशीर अदलाबदल झाली असती तर जिनांना आणखी चार कोटी मुसलमानांचा भार सहन करावा लागला असता. पण नेहरूंनी विरोध का करावा ? त्यांचा ‘पाकिस्तानच्या संबधातला तत्त्वभ्रांतपणा या रीतीने पुन्हा एकदा प्रकट झाला.’ तात्पर्य राजकारण्यांच्या सत्तालोभाने आणि वार्धक्यातील दुबळेपणाने त्यांनी जो उतावळेपणा केला तो केला नसता तर निरपराध हिंदू-मुसलमान प्रजेची प्राणहानी टळली असती.
शांतिविहार, चिटणीस मार्ग, सिव्हिल लाइन्स, नागपूर-४४०००१