संपादक , आजचा सुधारक,
स.न.वि.वि.
भारतातून जे लोक अमेरिकेला जातात त्यांच्याबद्दल एक गोष्ट प्रकर्षाने मला फार जाणवते, ती अशी की हे सर्वजण उच्च शिक्षित आहेत. ते हुशार आहेत. ते ज्या काळांत उच्च शिक्षित झाले त्या काळांत कॅपिटेशन फीची कॉलेजेस् नव्हती.
साहजिकच हे सर्वजण शासकीय शिक्षण संस्थांमधून उच्च शिक्षित झाले. तेथे शुल्क अत्यल्पच होते. त्या शुल्कामधून मिळणाऱ्या पैशातून कोणतीही शिक्षणसंस्था चालविता येणार नाही. साहजिकच ह्या उच्च शिक्षणाच्या संस्था सरकारी अनुदानावर चालविण्यात येतात. जे. जे., के. ई. एम. किंवा पवईचे आय. आय. टी. पाहिली की व्याप्तीची आणि खर्चाची कल्पना येईल.
अशा संस्थानातून कमी फीया देऊन हे हुशार विद्यार्थी पदव्या घेऊन अमेरिकेला जातात. शासन हा सर्व खर्च त्यांच्या तिजोरीतून करिते. हा सरकारी तिजोरीतला पैसा गरीबांच्याकडून अप्रत्यक्षकरातून वसूल केला जातो. अनेक अग्रगण्य पुढारी, संपादक, अर्थतज्ञ ह्यांची हुशार मुले अमेरिकेत आहेत.
परंतु ह्या अमेरिकेत स्थायिक झालेल्या मुलांनी आपापल्या शिक्षणसंस्थेला काही देणगी देऊन कमी खर्चात मिळालेल्या पदवीची कधीतरी भरपाई केल्याचे माझ्या वाचनात नाही. कळावे.
आपला तत्त्वबोध
केशवराव जोशी
हायवे चेक नाक्याजवळ, नेरळ ४१० १०१ (जि. रायगड)