आपल्या शिक्षणपद्धतीत आमूलाग्र परिवर्तन आवश्यक असल्याची भाषा गेले एक शतक आपण केलेली आहे. या पद्धतीत स्वतंत्र भारतात… नजरेत भरणारा एक बदल पालकांनी घडवून आणला आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळांची वाढती संख्या व त्यांच्याकडे ‘देणग्या’ देऊनही प्रवेश मिळविण्यासाठी वाहणारा पालकांचा लोंढा. तथापि धनिक व वरिष्ठ वर्गाची मुले तेथे मोठ्या प्रमाणात जाऊ लागल्याने आणि या विद्यार्थ्यांच्या हातातच पुढे समाजातील सर्व क्षेत्रांमधली सत्ताकेंद्रे जात असल्याने त्या शाळांना एक आगळी प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे. त्यांच्या नावाला दिपून आता औद्योगिक मजूरही आपली मुले त्या महागड्या शाळांत पाठवताना दिसू लागले आहेत.
शाळांचे माध्यम इंग्रजीअसले तरी बहसंख्य विद्यार्थ्यांच्या घरांत इंग्रजी फारसे वापरले जात नाही. त्यामुळे मुलांना विचार-भावनांच्या देवाणघेवाणीचे मार्ग काही वर्षे बंद असतात. या काळात मुले फळ्यावर लिहिलेले पाठ करून वर्गात उत्तरे देत असतात. मुलांना इंग्रजीत वाचता-बोलता येऊ लागेपर्यंतचा त्यांचा हा काळ वाया जातो. या शाळांतला अध्यापक वर्गही सर्व सामान्य शाळांसारखाच असतो. तेव्हा मुलांना नवे विचार शिकण्याची कुठलीही संधी तेथे मिळत नाही… ही मुले मराठी-इंग्रजी व काही प्रमाणात हिंदी यांचे चमत्कारिक मिश्रण करूनच आपले व्यवहार उरकीत असतात. शब्दांशी जवळीक नसली तर विचार करण्याचे साधनच नष्ट होते.
भारतीय स्त्रीजीवन : पृ २१५