आपल्या देशामध्ये धर्माची व्याख्या धारणात् धर्मः।’ अशी केलेली असून त्याबद्दल कोणतीही शंका उरू नये म्हणून लगेच धर्मो धारयते प्रजाः । असेही विधान केलेले आहे. अथातो ब्रह्मजिज्ञासा असा संकल्प उच्चारण्यापूर्वी हजारो वर्षापूर्वी प्रजांना म्हणा किंवा प्राणिमात्राला धारण करणारा धर्म अस्तित्वात होता आणि तो केवळ माणसांमध्येच नसून कृमिकीटकांपासून तो पशुपक्ष्यांतही होता. मुंग्यांची वारुळे, मधमाश्यांची मोहळे, दिगंत संचार करणारे पाखरांचे थवे, लांडगे, हरणे, वानरे ह्यांचे कळप ह्यांच्या जीवनासंबंधी ज्यांना थोडेसेतरी ज्ञान आहे त्यांना त्यांची समाजव्यवस्था कशी बांधीव असते ते सांगण्याची गरज नाही. ह्या मनुष्येतर योनी सोडून मानवाच्या आदिमतम समूहाकडे पाहिले तरी काही ना काही समाजव्यवस्था तेथे आढळतेच. किंबहुना व्यवस्थेशिवाय समूह असे दृश्य सृष्टीमधील प्राणिवर्गात कोठेच दिसणार नाही. मग ती व्यवस्था निसर्गसिद्ध असो की बुद्धिपुरस्सर केलेली असो. अगदी अणुपरमाणूंतदेखील काही व्यवस्था असतेच असे आपणांस शास्त्रज्ञ सांगतात.
आज आपण जे धर्म पाहतो त्यांची दोन अंगे सर्वत्र आढळून येतात. प्रजेचे धारण जो करतो, समाजात व्यवस्था जो लावतो, जो समष्टीचे व व्यक्तीचे स्थान आणि संबंध ठरवितो व तो नियमित करतो तो धर्माचा एक भाग झाला. दुसरा धर्माचा भाग तो की जो माणसाचे ईश्वराशी नाते जोडून देतो….. वस्तुतः समष्टीच्या सुरळीत व्यवहारासाठी ईश्वराच्या शोधाची काही आवश्यकता नाही. मनुष्येतर प्राण्यांचे संघ ईश्वराची त्यांना कल्पनाही नसताना पिढ्यानुपिढ्या चालतात……