सदाचरणी होण्यास व सदाचरणी राहण्यास त्यांस सदाचरणाची किंमत कळली पाहिजे, ती किंमत कळण्यास त्यांची सापेक्ष बुद्धि जागृत झाली पाहिजे, व तसे होण्यास त्यांस सुशिक्षण दिले पाहिजे. लहान मुलांस खोटे बोलणे वगैरे पापांपासून दूर ठेवण्यास छडीचाच केवळ उपयोग नको आहे. पाप केल्यास शरीरदंड होतो येवढेच ज्ञान ज्यास मिळाले आहे तो सदैव पापपराङ्मुख राहील, असे मुळीच नाही. शिक्षा होण्याचा संभव गेला की, तो पाप करण्यास सोडणार नाही. सदाचरण व असत्प्रतिकार यांविषयीं तात्त्विक ज्ञान मनुष्यमात्रास झाल्यावाचून दोहोंचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष परिणाम पूर्णपणे कळून येणे शक्य नाही, व जोपर्यंत हे परिणाम कल्लले नाहीत तोपर्यंत मनुष्यास सदा-चरणाची खरी योग्यता, व असत्पथावलंबनाची स्वपरवंचक प्रवृत्ति ही कधीहि कळणार नाहीत.
मासिक संग्रह: एप्रिल, १९९३
निसर्ग आणि मानव – परिसंवाद
निसर्ग आणि मानव – परिसंवाद
साधना साप्ताहिकाच्या १८ जुलै १९९२ च्या अंकात श्री. ना. ग. गोरे यांचा ‘निसर्ग आणि मानव हा लेख प्रसिद्ध झाला. त्यात गांधीवादी पर्यावरणविचाराविषयी काही प्रतिकूल मते व्यक्त केली होती. त्या लेखाला २९ ऑगस्ट ९२ च्या साधनेत श्री वसंत पळशीकर यांनी उत्तर दिले. या उत्तराला मी साधनेत (नोव्हेंबर ९२) दिलेले उत्तर आजचा सुधारक (नोव्हेंबर-डिसेंबर १९९२) मध्ये पुनर्मुद्रित झाले. या लेखावर दोन प्रतिक्रिया आमच्याकडे आल्या आहेत. एक आहे प्रा. सु.श्री. पांढरीपांडे यांची, आणि दुसरी अर्थात् श्री. पळशीकरांची. या दोन्ही प्रतिक्रियांचे प्रतिपादन असे आहे की ज्या विज्ञानाच्या आधारे मी श्री पळशीकरांना उत्तर दिले होते ते विज्ञान आता जुने झाले असून, आज वैज्ञानिक पद्धतीचा एक नवाच आदर्श (paradigm) निर्माण झाला आहे, आणि त्यानुसार माझे म्हणणे आता जुने आणि कालबाह्य झाले आहे.