गोरे, पळशीकर, देशपांडे, पुन्हा पळशीकर, पांढरीपांडे, अशी एक विस्तृत आणि महत्त्वाची चर्चा सुरू आहे. या विचारमंथनात आपलाही हात दोरी ओढण्यास लावावा, म्हणून हे पत्र.
मुळात मी वैज्ञानिक नाही, पण विज्ञानक्षेत्रातील व्यवहार कुतूहलाने पाहणारा आहे. रूढ विज्ञानाच्या चौकटीच्या कडेचे व बाहेरचे संशोधन, त्याचे निष्कर्ष, त्यातून मिळणारे तांत्रिक संकेत, वगैरेंची नेमकी समज मला असेलच, याची मला खात्री नाही. गैरसमज व त्यांच्यावर माझे पूर्वग्रह लादले जाणे यातून चुकीचे युक्तिवाद केले जाणे, वगैरे सारे शक्य आहे. त्यामुळे जागोजागी मी वापरलेले संदर्भ दिले आहेत.
(१) विज्ञानाच्या परिभाषेत रेणू (मोलेक्यूल), अणू (ॲटम), परमाणू (सब अॅटॉमिक कण) वगैरे संज्ञांना अत्यंत नेमके अर्थ आहेत. अणू-रेणू म्हणजे खूप बारीक कण, असा ढोबळ अर्थ विज्ञानविषयक चर्चेसाठी पुरेसा नाही. तसा तो घेतला तर संकल्पनांचा घोटाळा होऊ शकतो. म्हणून पळशीकरांना ‘परमाण-जीवशास्त्र न म्हणण्याची आणि पांढरीपांड्यांना इलेक्ट्रॉनसारखे दोन घटक घेऊन मोलेक्यूल न घडविण्याची माझी विनंती आहे.
(२) विज्ञानात नियम हा शब्द निसर्ग-नियम अशा अर्थी असतो. काही परिस्थिती व काही परिणाम यांच्यात जोड्या पाडण्याइतकी, सरणी ठरविण्याइतकी, कार्यकारणभाव सुचविण्याइतकी नियमितता (Regularity) दिसत असेल, तर या नियमिततेचे वर्णन करणारे वाक्य म्हणजे नियम, निसर्ग-नियम किंवा वैज्ञानिक नियम. हे नेहमीच वर्णनात्मक असतात, आदेशात्मक नव्हे. या भूमिकेतून पळशीकरांची अनेक विधाने व युक्तिवादाचा बराच भाग समजणे मला अशक्य वाटते. उदाहरणार्थ (क) ‘निसर्ग “नियमानुसार कार्य करतो” हे देखील अंतिमतः आधिभौतिक स्वरूपाचे स्पष्टीकरण आहे.’ (ख) ‘कोणत्या “नियमानुसार आपण वर्तन करावयाचे या गोष्टी अणू रेणूंना कशा कळतात?’ (ग) ‘निर्जीव भौतिक निसर्गसृष्टीतही नियमांना सोडून घटना, वर्तन सतत घडत आले आहे.’ इत्यादि.
नियम म्हणजे नियमिततेचे वर्णन हे चूक आहे का? एखादा ज्ञात नियम एखाद्या परिस्थितीत कोणता परिणाम घडेल याकडे निर्देश करतो. ही त्या नियमाची तपासणीच असते. अपेक्षित परिणाम लाभला, तर नियमावरचा वैज्ञानिकाचा विश्वास वाढतो. जर परिणाम लाभला नाही, तर प्रायोगिक रचना व तिच्यात नियमाचा वापर होता काय हे तपासावे लागते. या कशातच चूक आढळली नाही तर नियम शंकास्पद व अखेर चुकीचा ठरवावा लागतो. पळशीकरांनी सतत तोडल्या जाणाऱ्या नियमाची उदाहरणे दिली असती तर ते तपासून घ्यायचा कार्यक्रम वैज्ञानिकांना सुचवता आला असता.
जेथे परिस्थिती व परिणाम यांच्या जोड्यांमध्ये नियमितता आढळत नाही, तेथे काही स्वैर यंत्रणा असावी, अशा शब्दप्रयोगाने वैज्ञानिक आपल्या आकलनाच्या मर्यादा मान्य करतात.
चेतनेची संकल्पना अंतर्भूत करून घेतल्याखेरीज विज्ञानाचेही पाऊल पुढे पडणार नाही, असा टप्पा गाठल्याचे पळशीकर सांगतात. हे तपासायला पळशीकरांनी चेतनेची शक्यतो काटेकोर सोदाहरण व्याख्या द्यायला हवी, अशी चेतना वैज्ञानिकाकडून वापरून हवी असेल, तर तिला काही पथ्ये पाळावी लागतील. जेथे नियमितता दिसते अशा क्रियांमध्ये चेतना काय करते, हे सुचवावे लागेल. मला दोन पर्याय सुचतात. एक म्हणजे नियमित व्यवहारात चेतना निद्रित (Dormant) असते. दुसरे म्हणजे चेतनेचेही नियम असतात, व नियमित व्यवहार अशा नियमांमुळे घडतात. जेथे नियमितता दिसत नाही, तेथे चेतना काही आपल्याला अज्ञात असलेले नियम पाळते, असे म्हणावे लागेल. अखेर अशी चेतना ही “स्वैरपणा” सारखीच अज्ञानाची अप्रत्यक्ष कबुली ठरेल का? चेतना ही संकल्पना वापरून जुने-नवे ज्ञान जर सुसंगत ठरेल, विज्ञानाचे पाऊल जर पुढे पडेल, विश्व-व्यवहाराच्या आकलनात जर मदत होईल, तरच ती वापरण्यात अर्थ आहे. नाही तर आत्ताची अडाणी “स्वैरता” पुरे. बरे, स्वैरपणा कसा ठरवतात, त्यात काही छटा असतात का, हेही पाहणे आवश्यक वाटते. (याचे काटेकोर उदाहरण पाहायचे तर नुकतीच महाराष्ट्र टाईम्समध्ये येऊन गेलेली वि. म. दांडेकरांची फलज्योतिष्यावरची लेखमाला पाहावी. असे एक शाळकरी पातळीवरचे उदाहरण पाहा.
रूले (roulette) नावाचा एक जुगाराचा प्रकार आहे. एका परातीच्या आकाराच्या चाकाच्या कडेवर अडतीस खळगे असतात. अक्ष उभा ठेवून चाक उभे करतात. एक जण ते वेगाने घड्याळाच्या गतीच्या दिशेने फिरवतो. याच वेळी घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरेल अशी एक गोटी परातीत टाकली जाते. जरा वेळाने चाक व गोटी फिरण्याचे थांबतील, तेव्हा गोटी कोणत्या खळग्यात असेल, यावर जुगार चालतो. हा प्रयोग जर ‘क्ष वेळा केला, तर प्रत्येक खळग्याला “गोटी पकडायचा मान” ‘क्ष’ च्या अडतिसांश वेळा मिळेल. ‘क्ष’ हा आकडा खूप वाढवला, म्हणजे अनेक वेळा चाक फिरवले व प्रत्येक खळग्याने क्ष अडतिसांश वेळा गोटी पकडली, तर ही क्रिया स्वैर व सच्ची. जर कुणाला विशिष्ट खळगा यापेक्षा जास्त वेळा गोटी पकडतो असे आढळले, तर स्वैरपणा संपून नियम सापडला, असे म्हणता येईल.
काही विद्यार्थ्यांनी यावर विचार केला. चाकाचे फिरणे व गोटीची फेक स्वैर असतीलही. पण एकदा का चाक फिरायला लागले व गोटी फेकली गेली, की मग गतीच्या नियमांप्रमाणे एकूण व्यवस्थेचे वर्णन करणे जमायला हवे. गतीचे नियम सतत तर नव्हेच, कधीच तोडले जाणे पृथ्वीवरील व्यवहारात घडत नाही, असा या विद्यार्थ्यांचा विश्वास होता. तर फिरत्या परातीतल्या पळत्या गोटीच्या प्रवासाचे तीन ‘कालबद्ध टप्पे जर ठरवता आले (म्हणजे ‘शून्य सेकंदाला खळगा पाच, पाच सेकंदाला खळगा बावीस, दहा सेकंदाला खळगा बारा, असे तीन टप्पे), तर शेवटी गोटी कोणत्या खळग्यात स्थिरावेल, याचा नियम ठरवला गेला. या नियमांतर्गत हिशोब गोटी स्थिरावण्याच्या आत व्हावे, म्हणून या कामासाठी एक संगणक नेमला गेला, ज्यामुळे गोटी हलत असतानाच तिचे अंतिम स्थान सांगणे शक्य झाले. अशा रीतीने एका नियमाने वागणाऱ्या, पण स्वैर उत्तर देणाऱ्या यंत्रणेतून नियमित उत्तरही काढणे जमू लागले. स्वैरता अबाधित राहिली, पण नियमिततेचीही खात्री पटली! Eudaemonic Pie या पुस्तकातील ही कहाणी विस्ताराने सांगण्याचे कारण म्हणजे नियमितता किंवा स्वैरता या तपासाच्या पातळीवर ठरतात हे सुचवावे. ( मला स्वतःला भौतिक उदाहरणांखेरीज संकल्पना समजणे जड जाते. अशा नीट न समजलेल्या संकल्पनांवर पूर्वग्रह लादले जातात. इतरांचे जर असे होत असेल, तर ते टाळावे म्हणून हा उदाहरणाचा प्रपंच.)
आज स्वैर वाटणारे उद्या अंशतः तरी नियमित ठरू शकते. असे ठरवणे घडत असताना शक्यतो नवी तत्त्वे, संकल्पना वगैरे सुचवू नयेत, असा तर्कशास्त्राचा दंडक आहे. याला विल्यम ऑफ ऑकॅमचे कंजूषीचे तत्त्व (Law of Parsimony) म्हणतात. हा दंडक आवश्यक का, ते पाहा. पाणी उतारावर खाली का वाहते, हे समजावून सांगताना, “उतारावर खाली वाहणे हा पाण्याचा गुणधर्म आहे.” असे म्हणू नये. गुणधर्म हा शब्द नवे काही सांगत नाही. उलट “खाली वाहणे हा पाण्याचा गुणधर्म” हे विधान लक्षात ठेवायची जबाबदारी मात्र श्रोत्यावर येते. जर गुरुत्वाकर्षणाच्या कल्पनेतून ही एक विशिष्ट स्थिती (Special Case) आहे, असे दाखवता आले, तर कमी वैचारिक सामानसुमान बाळगत वावरणे शक्य होते. या उदाहरणात “गुणधर्म’ हा शब्द अनावश्यक असेलही, पण चेतनेचे तसे नाही, अशी मांडणी जर करायची, तर चेतनेची व्याख्या तरी द्यायला हवी. एकूणच या प्रकारावर स्वतःला वैज्ञानिक समजून मी असे म्हणतो,” चेतना वेगळी मानणे आवश्यक आहे. रचनेच्या क्लिष्टतेची स्पेशल केस नाही, असे सिद्ध करा. तिची व्याख्या द्या. तिच्यामुळे आकलन वाढते, हे दाखवून द्या. मग ती मी मान्य करीन. नाही तर काही काळ, काही क्षेत्रात अज्ञानही मी सहन करीन. ते कमी करायचा प्रयत्न करीन. ही मी स्वतःला लावलेली शिस्त आहे. या शिस्तीने वागून कमावलेल्या ज्ञानाची विश्वासार्हता व उपयुक्तता मी अनुभवली आहे. ही शिस्त जर सोडली तर काही प्रकारच्या तर्कबाह्यतेला वाट मिळेल, अशी मला भीती आहे, म्हणून या शिस्तीच्या साखळ्या मला प्रिय आहेत.”
(३) डार्विनने उत्क्रांतीच्या क्रियेत नैसर्गिक निवडीला महत्त्वाचे स्थान दिले. तसे ते आहे की नाही याबद्दल पळशीकर व पांढरीपाडे फार साशंक आहेत. पळशीकर सांगतात की कार्ल पॉपरच्या मते “वैज्ञानिक पद्धतीच्या आधारे व त्या पद्धतीत स्वीकृत कसोट्यांच्या जोरावर कधीच सिद्ध न होऊ शकणारा” असा डार्विनने सुचवलेल्या अभ्युपगमाचा (hypothesis) दर्जा आहे. ‘तत्त्वे असिद्धच केवळ ठरू शकतात, सिद्ध कधीच होत नाहीत असे पॉपर म्हणाला होता. पण समजा, डार्विनचे तत्त्व “कधीच सिद्ध न होऊ शकणारे” असे तो म्हणालाही. खरे तर तो पळशीकरांनी मांडलेल्या वाक्यापेक्षाही डार्विनीय तत्त्वाला मारक असे बोलला! तो या तत्त्वाला अतिभौतिक (metaphysical) संशोधन प्रकल्प म्हणाला. पण पुढे त्याने हे मत बदलले, आणि म्हणाला, “मी माझे नैसर्गिक निवडीच्या तत्त्वाबद्दल ते तपासण्यायोग्य असण्याबद्दल त्याच्या तार्किक पदस्थितीबद्दल (status) माझे मत बदलले आहे. या मतपरिवर्तनाच्या कबुलीच्या (recantation) संधीमुळे मला आनंद झाला आहे.” हे १९७८ सालच्या डायलेकटिक्स मधले पॉपरचे मत विल्मा जॉर्जच्या डार्विन मध्ये उद्धृत केले आहे. अर्थात पॉपर आधी किंवा नंतर काय म्हणाला, हे वैज्ञानिक दृष्टीने प्रमाणभूत नाही. मूळ पुरावे तपासू न शकणाऱ्या माझ्यासारख्यांना जरा दिलासा, एवढेच.
सजीव रचना प्रथम कशा उद्भवल्या असतील, याच्या विवेचनात पाढंरीपाडे तीन मते सांगतात. एक आहे असिमॉव्हचे मत, की न्यूक्लेइक आम्लांच्या (DNA च्या) अपघाती मिश्रणातून सजीव रचना उद्भवल्या. दुसरे आहे मॉस्को मत, की आदिम वातावरणात सध्याच्या सजीव रचनांमधील द्रव्यांसारखी स्वजातिजननक्षम द्रव्ये (म्हणजे DNA, प्रथिने, एन्झाइम्स, – खरे) होती. ही दोन मते पांढरीपांड्यांना एकमेकांपासून भिन्न वाटतात. पांढरीपांडे तिसरे मत म्हणून डार्विनीय उत्क्रांती सांगतात.
यावर कॉर्नेल विद्यापीठात झालेल्या प्रयोगांची Carl Sagan ने Cosmos या पुस्तकात दिलेली माहिती पाहा. पृथ्वीच्या आदिम वातावरणातील वायू एकत्र करून त्यांच्यात दहाच मिनिटे ठिणग्या पाडल्या असता प्रथिने व DNA चे घटक असलेले सेंद्रिय रेणूंचे समृद्ध मिश्रण घडले. या घटकांपासून लांब साखळ्यांचे रेणू बनविण्यात प्रयोगशाळांमध्ये बरीच प्रगति झाली आहे. DNA च्या आखूड साखळ्याही स्वतःच्या प्रतिकृतींचे संघटन प्रयोगशाळेत करू शकल्या आहेत. मला तरी ही माहिती, मॉस्को मत व असिमॉव्ह मत एकरूप वाटतात.
“डिस्कव्हर” मासिकातल्या एका लेखात Kramer अशाच प्रकारच्या पण जरा पुढच्या प्रयोगाचे वर्णन करतो. RNA च्या (DNA चा एक ‘भाऊ) साखळ्यांना प्रजनन करायला पूरक अशा परिस्थितीत ठेवले. असे प्रजनन वेगाने होऊ लागल्यावर प्रजननाला अवरोध करणारी रसायने मिसळली. लवकरच या अवरोधाला न जुमानता प्रजनन करू शकणारी एक ‘उपजाती’ (variety) प्रजनन करतांना आढळली. कॅमरच्या या शब्दात “थोडक्यात म्हणजे एका दुपारी आम्ही डार्विनीय उत्क्रांती करून दाखवली.” पण पांढरीपांड्याना असिमॉव्ह व मॉस्को मते डार्विनच्या तत्त्वाहून भिन्न वाटतात. DNA RNAचे प्रजनन हे रेणू – जीवशास्त्रावर आधारित डार्विनच्या तत्त्वाच्या मांडणीत केंद्रस्थानी आहे. Monod चे Chance and Necessity आणि टाइम-लाइफ प्रकाशनाचे the cell ही दोन्ही पुस्तके या क्रियेची सचित्र वर्णने देतात. ती पाहून समजावून घेणे डार्विनीय तत्त्व समजण्यासाठी मला आवश्यक वाटते.
(४) स्पर्धा संघर्षामुळे एका जीवजातीपासून विवक्षित जागा (niche) वापरणाऱ्या अनेक अजाती निर्माण झाल्या, हे डार्विनीय तत्त्वाचे अंग आहे. “हे आव्हान पत्करल्याखेरीज गत्यंतर नव्हते,” असे डार्विनवाद मानतो, असे पळशीकर सांगतात. येथे कोण, कुणाला, कशाचे आव्हान देत आहे, हे कळत नाही. त्यातही मुद्राराक्षसाने ‘विवक्षित’ला ‘विकसित करून एक वेगळाच घोळ निर्माण केला आहे.
निच म्हणजे जागा नव्हे. “आपली सृष्टी, आपले धन” निचला “परिसराने उपलब्ध करून दिलेली एक संधी” म्हणते. जास्त खुलाशाने सांगायचे तर प्रत्येक व्यक्तीला (उपजातीला किंवा जीवजातीलाही) उपयुक्त व मारक असा परिसरातील घटकांचा संच म्हणजे त्या व्यक्तीची ‘निच्’. यात जागा, अन्न, भक्ष्य, भक्षक, हवामान, तापमान, आर्द्रता, सारेच आले. तर व्यक्ती परिसरात आपापल्या निचेस् शोधून जगतात. एकाच परिसरात अनेक जीवांच्या अनेक निचेस् असतात. आता प्रत्येक व्यक्तीच्या संततीमध्ये मूळ व्यक्तीचे गुण जराजरा भिन्न प्रमाणात उतरतात. हे स्वैरपणाने घडते, पण या स्वैरपणाचा काही भाग नियमित आहे. तर या नव्या व्यक्तींचे गुण भिन्न, गरजा भिन्न म्हणून निचेसही भिन्न. आता स्पर्धेमध्ये तगून राहण्याचा “स्पर्धा टाळणे” हाही मार्ग आहे. तर इतरेजनांच्या परिसरातील ज्या घटकांवर उड्या पडल्यामुळे जे घटक ‘शॉर्टेजमध्ये जातात त्यांना आपल्या गरजांमधून वजा करणाऱ्या व्यक्तींची प्रजा मूळ प्रजेहून काही पिढ्यात जरा वेगळी पडेल. ही झाली उपजाती. पुण्याजवळच्या जलाशयांमध्ये गेली काही वर्षे ‘वॉटर हायासिंथ’ ही जलचर वनस्पती उपद्रव होण्याइतक्या संख्येने दिसू लागली आहे. त्यात दिवसभर उन्हात असणाऱ्या वनस्पती व बराच वेळ सावलीत असणाऱ्या वनस्पती रंगाने वेगळ्या झाल्या आहेत. माझ्या आठवणीप्रमाणे अधिकउण्या पंचवीसेक वर्षांत या वनस्पतीत उपजाती घडू लागल्या आहेत. मला वाटते हे पळशीकरांना आव्हान ठरावे, पण काय करायला उद्युक्त करणारे, कुणास ठाऊक.
जर पळशीकर एकाच निचमध्ये राहणाऱ्या अनेक जाती असे म्हणत असतील, तर मात्र ते जीवशास्त्राला कधीच न आढळणाऱ्या रचनेबद्दल बोलत आहेत, कारण एकाच निचमध्ये दोन जाती राहू शकत नाहीत, (Colimaux, Why Big, Firse Animals are Rave ? Gould, Ever since Darwin)
“भिन्न पर्यावरणाच्या रेट्यातून आंतरिक बदल घडून” येणे, ही कल्पना पळशीकर नेमकी कोणाबद्दल वापरतात ? एखाद्या व्यक्तीमध्ये असे बदल घडून येणे डार्विनीय नाही, एकाच व्यक्तीच्या वैविध्यपूर्ण संततीपैकी पर्यावरणाशी अनुरूप व्यक्तीची प्रजा वाढणे, व अशा त-हेने ‘रेट्याने ढकलले जाणे हे डार्विनीय. जीवजात उत्क्रांत होते, व्यक्ती नाही, हे डार्विनीय. पर्यावरण व जाणीवपूर्वक धडपडीचे व्यक्तीवर होणारे परिणाम तिच्या संततीकडे DNA मध्ये साठलेल्या माहितीच्या रूपात जात नाहीत. पर्यावरणाच्या वा धडपडीच्या परिणामस्वरूप व्यक्तीने संततीला दिलेली ‘देन बदलणे अजून जमलेले नाही. अशा एका असफल प्रयत्नाचे वर्णन “डिस्कव्हर” मासिकाने दिले आहे. माहितीच्या हस्तांतरणात आजवर तरी “DNA ते व्यक्ती” असा कडक एक-दिशा-मार्गच केवळ दिसतो. विपरीत उदाहरण सापडलेच, तर हा “रहदारीचा” नियम बदलावा लागेल. तो केव्हा, कुठे, कसा मोडला जातो, हे तपासावे लागेल. निरीक्षणात न आढळलेली वाट स्वतःसाठी बंद करून घेणे, हेच तर्कशुद्ध आहे.
मी डार्विनवाद वाचला तो मेनार्ड स्मिथ (द थिअरी ऑफ इव्होल्युशन), जी.जी. सिंप्सन (द मीनिंग ऑफ इव्होल्युशन) आणि स्टीफन जे. गूल्डच्या पुस्तकांवरून. हा “मला उमजलेला डार्विन.” पळशीकर दाखवतात तो डार्विन वेगळाच असावा, असे वाटण्याइतका भिन्न आहे. हे अस्वस्थ करणारे आहे.
(५) ई. ओ. विल्सनची सोशियोबायॉलॉजी हा डार्विनीय परंपरेचा अविभाज्य भाग आहे, असे पळशीकर सुचवतात. तसा तो नाही. विल्सन हा डार्विनचा सध्या हयात असलेला शिष्टमान्य वारस नाही. विल्सनची “सोशियोबायॉलॉजी”, लव्हलॉकची “गाया”, शेल्ड्रेकचे “फॉर्मेटिव्ह कॉजेशन” बोमची “इंप्लिकेट ऑर्डर” ही सारी शिप्टमान्यतेसाठी धडपडणारी नवी तत्त्वेच केवळ आहेत.
(६) पण “अपघाताने चान्स, रँडम, स्वैर, अशा शब्दांना पळशीकर व त्याहूनही पांढरीपांडे फारच बिचकतात. अशा निर्बुद्ध, आंधळ्या, यांत्रिक, निर्हेतुक क्रियामधून जाती उपजणे, टिकणे, नष्ट होणे, व “उत्तरोत्तर जाणीव, आत्मभान यांची कोटी वाढत जाऊन मानवाचा अवतार होणे, ही पळशीकरांना कोडी वाटतात. गूल्डमध्ये यातल्या अनेक कोड्यांना उत्तरे आहेत. नाव घेऊन “चान्स” चे कोडे तो सोडवीत नाही. पण एक पाहावे. ज्या जगात “अवतारी” मानव आहे, त्यातच व्हायरॉइड्ज, एकपेशीय प्राणी, वडाची झाडे, हत्ती वगैरेही आहेत. जर एकेक जीवजात नष्ट होऊन नवी जीवजात तिची जागा घेत असती, तर हेतू मानणे सोपे होते. पण जुने, नवे, कमीजास्त क्लिष्ट रचनेचे अनेक जीव एकत्र जगतात, हे स्वैरपणाला पुष्टी देते.
हे स्पेक्युलेटिव्ह, काल्पनिक अभ्युपगमाचे उदाहरण आहे का? असेलही. पण आजवरची निरीक्षणे हेच दाखवतात. “माणूस गुणात्मकदृष्ट्या वेगळा आहे हा त्याचा आत्मप्रत्ययही” त्यामागच्या स्वैरपणाच्या चौकटीला बाधा आणत नाही. पळशीकर सलग रेषेने आत्मप्रत्ययापासून सहेतुक चौकटीपर्यंत युक्तिवाद नेत नाहीत. उलट वारंवार निर्बुद्ध, आंधळा, गोड भ्रम, असे भावनाकुल शब्द वापरून व विवेचनात तुच्छतादर्शक उद्गारचिन्हे व प्रश्नचिन्हे यांचा पाऊस पाडून स्वतःच्या मांडणीची अपूर्णताच अधोरेखित करतात.
जसे “विश्वातील व्यवहाराच्या मुळाशी एक क्रियाशील चैतन्य आहे व तिचे कार्य आपणास अनुभवास येते,” हे केवळ एक ठाम विधानच (Assertion) आहे. हा युक्तिवादही नव्हे, आणि त्याचा पूरक पुरावाही नव्हे. आणि त्याच्यानंतर निर्हेतुकता व सहेतुकता यांपैकी कोणतेही गृहीत तत्त्व मानणे सारखेच शक्य आहे, असेही पळशीकर सांगतात. जर त्यांच्या स्वतःच्या ठाम विधानावर विश्वास असेल तर ते एका निर्हेतुक क्रियाशील चैतन्यतत्त्वाला जन्म देत आहेत व ते सहेतुक चैतन्यतत्त्वाइतकेच शक्य मानताहेत. असो.
(७) व्यवस्थेला हेतू नाही, पण तिच्या घटकांना वैयक्तिक हेतू आहेत, हे मानण्याची पाळी देशपांड्यांसारखी माझ्यावरही आली. जर समूहपातळीवर मुंग्यांच्या वारुळांना हेतू, पण मुंग्यांना व्यक्तिशः काही रचना त्यांच्या हातून करविणारा हेतू नाही, असे मला वाटते, तर त्याचा व्यत्यास (Converse) मला पटायला अडचण नाही. माझ्यावर काही “पाळी” आली असे वाटण्याऐवजी किंचित निरर्थक नसलेला, डोळस असा आश्चर्याचा भाव जाणवला.
याहून आश्चर्य वाटले पळशीकरांच्या तर्कपरंपरेचे, की एका निर्बुद्ध, आंधळ्या, निर्हेतुक व यांत्रिक प्रकार घडत असलेल्या प्रक्रियेमधून अद्भुत अशी सृष्टी निर्माण व्हावी याने आश्चर्यचकित वा मुग्ध होणेही निरर्थक ठरते. माफ करावे, पण निर्बुद्ध, आंधळ्या चौकटीत काम करणारे वैज्ञानिक ज्या बुद्धिमान डोळसपणाने आश्चर्यचकित होतात, त्याचा अनुभव पळशीकरांनी घ्यावा. एक नवा निसर्ग-नियम आपल्याला सापडला आहे, व ही रात्र तरी हे ज्ञान आपलेच आहे, याने हरवून जाणारा रिचर्ड फेनमन त्यांना शुअर्ली यू आर जोकिंग, मिस्टर फेनमन मध्ये भेटेल. “केवल ज्ञान वाढो, व सोबत तुलनात्मक अज्ञानही,” असे म्हणणारा गूल्ड त्यांना एव्हर सिन्स डार्विन मध्ये भेटेल. “लक डिफर्ज ग्रेटली फ्रॉम आर्ट, यट क्रिएट्स मेनी थिंग्ज इँट आर लाईक इट” असे म्हणणारा Ion of Chios त्यांना शेकलीच्या द नेमोन या विज्ञानकथेत भेटेल. तो आंधळ्या, निर्हेतुक, निर्बुद्ध, अपघाती, यांत्रिक, स्वैर व्यवहाराबद्दल बोलत असेल. हे आश्चर्य “क्या ऊपरवालेकी कमाल है!” च्या पोरकटपणापेक्षा किती आनंददायक, सार्थ आहे, ते पळशीकरांना कळेल.
(८) होलिझम-होलिस्टिक या शब्दांसाठी अनेक पर्याय पळशीकर व पांढरीपांडे वापरतात. हे शब्द रिडक्शनिस्ट, रिडक्शनिझम या शब्दांचे विरुद्धार्थी शब्द आहेत. या शब्दांच्या जोड्यांमधला विरोध मला समजला तसा दाखवतो. परिस्थिती व परिणाम यांच्या तपासणीतील निरिक्षणांचे संच घेऊन वैज्ञानिक बसतात. त्यात काही संबंध, सरणी वगैरे दिसतात का हे पाहिले जात असते. बहुतेक वेळा पूर्ण परिस्थिती एकाच सर्वसंग्राहक चित्राने, सूत्राने समजून घेता येत नाही. मग काही घटक सुटे काढून त्यांचे एकमेकांशी संबंध तपासले जातात. एवढ्यावरच थांबावे, पूर्ण चित्राकडे दुर्लक्ष करावे, त्याला घटकांच्या संबंधांची “मिसळ” समजावे- हा झाला रिडक्शनिझम. या उलट सुट्या घटकांचे संबंध तपासणेच चूक आहे, पूर्ण चित्र समजून घेणेच इष्ट – हा झाला होलिझम. या एकाच क्रियेच्या दोन पातळ्या आहेत. या आलटून पालटून, एकमेकांना पूरक ठरतच काम करतात, हे होफस्टाटरने “गोडेल-एशर-बाख” या पुस्तकात बऱ्याच तपशिलाने दाखवून दिले आहे. मीही एका उदाहरणाने हे स्पष्ट करायचा प्रयत्न करतो.
केप्लरने ग्रहांच्या निरीक्षणातून त्यांच्या गतीचे नियम शोधून काढले. झाडे, तारे, माणसे, यांना यात स्थान नव्हते, म्हणून हा अभ्यास रिडक्शनिस्ट. असाच एक रिडक्शनिस्ट अभ्यास करून न्यूटनने गतीचे नियम शोधून काढले. आता हे नियम पाळून ग्रहांनी केप्लरच्या नियमाप्रमाणे फिरायचे, तर ग्रह व सूर्य यामध्ये एकमेकांना ओढणारे एक ‘बल हवे. हे गुरूत्वाकर्षणाच्या तत्त्वाच्या रूपात न्यूटनला सापडले. हे गुरुत्वाकर्षणाच्या अणुरेणूंपासून ग्रहताऱ्यांपर्यंत सर्वावर काम करते, म्हणून हे होलिस्ट. न्युटनने प्रकाशकिरणांचाही अभ्यास केला. त्यातून प्रकाशाचे कण असतात, व त्यांना गुरुत्वाकर्षण ओढत नाही, असे दिसले. म्हणजे गुरुत्वाकर्षण होलिस्ट होते, ते रिड्यूस झाले. नवनवे घटक एकत्र सांधायच्या प्रयत्नातून हा होलिस्ट-रिडक्शनिस्ट खेळ चालू राहिला. हा सारा दृष्टिभ्रम आहे. “आधिभौतिक तत्त्वज्ञानाच्या कूटप्रश्नांच्या खोलीत” शिरणाऱ्यांना झालेली रानभुली. ज्यांचा आज होलिझमवर भर आहे, त्यांना उद्या नवे ज्ञान या होलिझमला रिड्यूस करेल, हे जाणवताना दिसत नाही. ज्ञान मिळविणे, हे ध्येय आहे. त्याची वाट रिडक्शनिझममधून कमीजास्त भासमान अशा होलिझमकडे जाते. होलिझम हे अंतिम उद्दिष्टच असू शकते, पहिले पाऊल नव्हे. जर पूर्ण चित्र दिसतेच आहे, असे समजून निरीक्षणे केली, अणि आपणच सुचवलेल्या चित्राला विपरीत काही दिसले, तर? पूर्ण चित्रात चेतना आणि हेतू आहेत. असे म्हटले. आणि पुढे नवी निरीक्षणे चित्राची अर्थ बदलून त्याला चेतनाहीन, निर्हेतुक ठरवू लागली, तर? नवे ज्ञान येणारच. ते चित्र बदलणारच.
(९) हेतू, लक्ष्य, intelligence, स्मृती या गोष्टी व्यक्तींच्या ठायी असतात. एखाद्या समूहाला किंवा व्यवस्थेला व्यक्ती मानता येणे स्पष्ट असेल, तर अशा समूह व्यवस्थेच्याही ठायी या गोष्टी सापडतील. या संदर्भात यूजीन मारे (द सोल ऑफ द व्हाईट अँट) याने वाळवीवर केलेले संशोधन मजेदार आहे. ज्या वारुळात राणी वाळवी, तिची प्रजननक्षम पिल्ले, लढाऊ व कामकरी किडे, असे सारे असते, त्याची तर पडझड झाली, जर ती ताबडतोब दुरुस्त केली जाते. राणी जर नसेल, तर कामकरी व लढाऊ किडे दुरुस्तीत भाग घेत नाहीत. लढाऊ व कामकरी किडे मेले, तर दुरुस्ती करायलाच कोणी नसते. म्हणून “वारुळाची देखभाल” या बाबतीत “राणी माशी ते वारूळ खुद्द”, ही एक व्यक्ती मानावी लागते. अन्न खाणे, विष्ठा बाहेर टाकणे, या बाबतीत मात्र प्रत्येक कीटक ही सुटी व्यक्ती.
माणसाच्या शरीरातील पेशीही अशाच स्वतंत्रपणे अन्नव्यवहार करतात. पण पूर्ण “समूहाच्या” प्रजननाची क्रिया एकाच पेशी समूहाने नव्हे, तर नर-मादी अशा जोड्यानेच होऊ शकते. पेशीमध्ये मायटोकाँड्रिया नावाचे छोटे ‘जीव’ असतात. यांनाही एका पातळीवर सुटे जीव, तर वेगळ्या पातळीवर पेशींचे अवयव मानावे लागते. एकूणच कोणत्या पातळीवर चर्चा होते आहे, त्याप्रमाणे कोणाला व्यक्ती मानायचे ते ठरत असते.
लव्हलॉक हा वैज्ञानिक पृथ्वी व तिच्यावरील सजीव-निर्जीव सृष्टी यांना एकत्रपणे व्यक्ती मानायचे सुचवतो आहे. या रचनेला तो गाया (गाईया, Gaia, भूदेवी) असे नाव देतो. कोणत्या पातळीवर ही भूदेवी व्यक्ती मानणे सोईचे आहे, आवश्यक आहे, हे लव्हलॉक व त्याच्या सहकाऱ्यांना दाखवून द्यावे लागेल. एकदा का निर्जीव सृष्टी असलेल्या ग्रहालाही व्यक्तित्व द्यायचे ठरले तर सर्वच ग्रहांना, ताऱ्यांना असे व्यक्तिरूप मानावे लागेल. हेही अजून पूर्ण तपासणी न झालेले गायाचे अंग आहे. ही तपासणी होऊन गाया तत्त्व मान्य, की अंशतः मान्य की अमान्य ते ठरायच्या आधीच काही भूदेवीला भजायला नको, असे मला वाटते. ती मोकळे केस, हाती ध्वजा, पायाशी सिंह, अशी भारतमाताही आज दिसत नाही. भूदेवी, तिच्यात भारतीयांना दिसणारी गाय, वात्सल्यमूर्ती मैय्या, हे सारे अजून कल्पितच आहे. ते जरा स्पष्ट होऊ द्यावे,मगच त्यावर आधिभौतिक तत्त्वज्ञानाची तोफ डागावी, असे मला वाटते.
(१०) बोम व शेलड्रेक यांनीही अशी नवी तत्त्वे सुचवली आहेत, व तीही तपासाधीन आहेत. रूढ विचारधारेहून फार वेगळ्या तत्त्वांना तपासनीस मिळणे अवघड असते. याबद्दल वाईट वाटते, पण इलाज नाही. विज्ञानाच्या उपयोजनातील संशोधनाला जसे भरघोस साधन साहाय्य मिळते, तसे मूलभूत संशोधनाला मिळत नाही. याबद्दलही वाईट वाटते, पण इलाज नसतो. प्रमुख विचारधारेपासून दूरच्या तत्त्वांना हे सारे भोगावेच लागते. डार्विनलाही हे भोगावे लागले होते. म्हणून हक्स्लेला स्पष्टपणे सांगावे लागले, “अभ्युपगम हा अभ्युपगमच आहे म्हणून तो बिनभरवशाचा आहे, या सार्वत्रिक गैरसमजुतीला बळी पडू नका” (विल्मा जॉर्जच्या डार्विन मध्ये उद्धृत.)
(११) बेटसनच्या नावासोबत जोडलेल्या अँथ्रोपिक तत्त्वालाही असेच नवे तत्त्व मानायचे का? बेटसनच्या “माईंड अँड नेचर” च्या कव्हरावर त्याला “सायबर्नेटिक्सचा संस्थापक म्हटले आहे. माझ्या माहितीप्रमाणे हा मान नॉर्बर्ट वीनरचा आहे. अँथ्रोपिक तत्त्वाची वैज्ञानिकांमध्ये विचाराधीन असलेली माडंणी बेटसनच्या पांढरीपांड्यांनी दिलेल्या मांडणीहून भिन्न आहे. पुढे मागे बेटसन अँथ्रोपिक तत्त्वाचा “जनक” ठरला, तर ही एक शंका नोंदवली होती, याचा विचार व्हावा.
बेटसनच्या भूमिकेचे प्रांढरीपांड्यांनी केलेले वर्णन अंशतः असेः (क) निसर्गाचे संघटन आणि मानवी मनाची रचना ही एकमेकांची प्रतिबिंबे आहेत. (ख) ‘मन’ ही एका अत्यंत संकीर्ण व्यवस्थेची निर्मिती आहे, पण ती व्यवस्था म्हणजे मन नव्हे. आता (ख) मधील ‘मन’ (क) मध्ये घातले, तर निघते – “एका अत्यंत विस्कटलेल्या (किंवा अशुद्ध किंवा अस्पष्ट) मानवी व्यवस्थेच्या निर्मितीच्या रचनेच्या विघटनाचे प्रतिबिंब म्हणजे निसर्ग” – कारण संकीर्ण म्हणजे अशुद्ध, अस्पष्ट, विस्कटलेले, वगैरे. मला तरी येथे शब्दबेंबाळपणा हे चुकीच्या विचारांचे प्रतिबिंब दिसते.
“मानवी मन” म्हणजे कोणाचे, तेही स्पष्ट नाही. जर माझे मन पांढरीपांड्यांच्या मनाहून वेगळे असेल, तर माझा निसर्ग त्यांच्या निसर्गाहून वेगळा मानायचा का ? जर आमची दोघांची मते एका संकीर्ण मानवी” मनाचे भाग असतील, तर मी या “सभासदत्त्वाचा” राजिनामा देऊ शकतो का ? मला तरी हे बेटसन-पांढरीपांडे मत आत्यंतिक व्यक्तिनिष्ठ चिद्वाद उर्फ सॉलिप्सिझमला जवळ वाटते.
(१३) अँथ्रोपिक तत्त्व जे म्हणतात, त्यात दोन भाग. एक “क्षीण” (Weak), दुसरे “सबळ” (Strong). क्षीण तत्त्व सांगते, की विश्वाच्या ज्या भागात आणि ज्या वयात “माणूस” हा सचेतन, बुद्धिमान प्राणी घडू शकणे शक्य होण्यासारखी भौतिक, परिस्थिती होती, तेथे तो घडला. सूर्याचा मध्य, किंवा बिग बँगचा काळ, या वेळी-स्थळी भौतिक परिस्थिती बुध्दीमान जीव घडण्याला अनुकूल नव्हती, म्हणून तेथे माणसासारखे जीव घडलेनाहीत. रॉजर पेनरोज “द एंपरर्ज न्यू माइंड” मध्ये ही मांडणी देऊन म्हणतो, की हे जर मानले, तर सचेतन असण्याला नैसर्गिक निवडीच्या दृष्टीने काही महत्त्व आहे असे मानणे एखादेवेळी आवश्यक ठरणार नाही. रिचर्ड फेनमन “कॅरॅक्टर ऑफ फिजिकल लॉ’ मध्ये याहून कठोरपणे अँथ्रोपिक तत्त्वाला अमान्य ठरवतो. स्ट्राँग अँथ्रोपिक तत्त्व “याहूनहीं” अमान्य मानले गेले आहे, व मला ते मांडणेही येथे गरजेचे वाटत नाही.
(१२) तर जी वाट पाहण्याची पाळी डार्विनवर आली, तीच बोमादींवर येणार. त्यांची तत्त्वे निरीक्षण, प्रयोग यांच्या कसोट्यांवर खरी वाटली, तरच ती डार्विनला हटवून किंवा न हटवता रूढ विज्ञानात शिरणार. त्यांच्याबद्दल पॉपरसारखे तत्त्वज्ञ “रिकँटेशन्श” करणार. या तत्त्वांचा विज्ञानाबाहेरच्या क्षेत्रांवर परिणाम होणार. त्यातून मानवी जीवन, समाजजीवन वगैरे बदलणार. पण आधी तपासणी.
अभ्युपगमाने तत्त्वाच्या पदापर्यंत न पोचणेही नवलाचे नाही. उलट सफल ठरलेले अभ्युपगम चूक ठरलेल्यांहून संख्येने बरेच कमी असावे.
पॅराडाइम म्हणजे तर ‘महातत्त्व. जुन्या नव्या ज्ञानाला सुसूत्रता, सुसंगती देणारे तत्त्व विश्वाबद्दलच्या मूलभूत प्रश्नाबद्दल सुचवलेली व निरीक्षणांनी खोटी न पडलेली ‘स्पेक्युलेटिव्ह संकल्पना म्हणजे पॅराडाइम. जेव्हा नवी निरीक्षणे या तत्त्वाला खोटी पाडू लागतात, जेव्हा या तत्त्वाने नव्या प्रयोगाला वाट करून देणे संपुष्टात यायला लागते, तेव्हा याची जागा घेऊ पाहणाऱ्या नव्या तत्त्वांची चर्चा, तपासणी वगैरे व्हायला लागते.
कोणताच पॅराडाइम अंतिम, परिपूर्ण , फायनल, पर्फेक्ट असणे अशक्य. जेव्हा एखाद्या पॅराडाइमच्या परिपूर्णतेची ग्वाही द्यायचे सुचते, तेव्हा ज्ञानाच्या कुठल्या तरी क्षेत्रात पॅराडाइम ‘विरणेही सुरू झालेले असते. न्युटोनीय पॅराडाइमचे हे झाले. आज नवडार्विनवादी, हॉकिंगसारखे कॉस्मॉलॉजिस्ट आपापल्या तत्त्वांबाबत आग्रही होऊ लागले आहेत. त्यामुळे नवी तत्त्वे सुचवणारेही बरेच लोक निघताहेत. पॅराडाइम बदलणार असे दिसते आहे. पण नवा पॅराडाइम उद्भवेपर्यंत व तपासला जाईपर्यंच हे होणार नाही. तोवर जुनाच पॅराडाइम “चालणार.”
(१४) मानवी जीवनाच्या आणि समाजाच्या पुनर्बाधणीला पूरक असा नवा होलिस्टिक पॅराडाइम शोधून काढणे हे सध्याच्या विचारवंतांचे कार्य आहे, असे पांढरीपांडे सांगतात. नवे पॅराडाइम कसे असावे, त्यात काय असावे हे आधीच नेमून देण्याचा इतिहास “चांगला” नाही. लायसेंकोने स्टालिनच्या काळात द्वंद्वात्मक जडवादाला जीवशास्त्रात घुसवायचा प्रयत्न केला, आणि रशियन विज्ञान दहा एक वर्षे मागे पडले. उद्या हिंदुत्वनिष्ठ, इस्लामनिष्ठ, असेही पॅराडाइम घडवायचे प्रयत्न होतील. यांच्या सुरुवाती आज दिसत आहेत. हा धोका आहे.
रिचर्ड फेनमन (द कॅरॅक्टर ऑफ फिजिकल लॉ म्हणतो, “What is necessary for the very existence of science and what the characteristics of nature are, are not to be determined by pompous preconditions; they are determined always by the material with which we work, by nature her self.” जर पांढरीपांडे जबरदस्तीने त्यांना योग्य वाटणारी कोणती पुनबांधणी विज्ञानावर लादू पाहतील, तर तो खरा भीषण आणि अल्टिमेट’ सिंघलवाद ठरेल. ( आणि एका वादाला त्याचे नाव देऊन सिंघलला मान तरीका द्यायचा? हटवाद हा शब्द मराठीत आहेच की!)
(१५) विज्ञानाच्या वृत्तीत मला एक सुखद ‘टेंटेटिव्ह भाव आढळतो. रिचर्ड फेनमन म्हणतो, “तुम्हाला जर आधी विज्ञान खात्रीलायक आहे असे वाटत होते तर ती तुमची चूक होती.” हा नम्र भाव आहे. असेच “अभ्यासातून माझी जी समज बनलीय ती माझा आधार आहे’, असे सांगणारे पळशीकरही मला सुखद वाटतात. पण लिखाणभर उपहास करणाऱ्या भावनाकुल शब्दप्रयोगांचा वापर पटत नाही. घाई, पूर्वग्रह, प्रत्यक्ष निरीक्षण यांपेक्षा इतर बाबींना वजन देणे, हे पटत नाही. अशाने तत्त्वबोधाऐवजी कंठशोष केवळ होणार.
एका मर्यादित आयुष्यात विश्वाची सर्व गुह्ये एका व्यक्तीला उमजणे अशक्य. त्याऐवजी जमले ते पाहणे सयुक्तिक, पण या निमित्ताने मराठी भाषेत अनेक नव्या कल्पना मांडल्या जात आहेत, अनेक विचारांकडे, कल्पनांकडे लोकांचे लक्ष वेधले जात आहे, हे अत्यंत सुखाचे मानायला हवे. वादात हरणे- हरवणे’ हा भाव मात्र नसावा, ही आशा आहे.
१९३ मश्रूवाला मार्ग, शिवाजीनगर, नागपूर -४४० ०१०