साधनाच्या (१८ जुलै) अंकातील ‘निसर्ग आणि मानव या आपल्या लेखात श्री. नानासाहेब गोरे यांनी म्हटले आहे, आदिम क्षणापासून या चालू घटकेपर्यंत निसर्ग होता तसाच राहिला आहे : लहरी, निर्हेतुक.’ त्यांनी मानवाचे आणि निसर्गाचे स्वर पूर्वीच्या काळी कधी तरी खरोखर जुळले होते का, असा प्रश्न उपस्थित केला आहे. लेखाच्या अखेरीस ‘स्वस्थितिमग्न निसर्ग व विज्ञानधर पुरुषार्थी मानव यांच्या संयोगाची गोष्ट केली आहे.
निसर्ग कसा आहे याचे वर्णन करते वेळी विश्व, पृथ्वी व पृथ्वीवरील सजीव सृष्टी या व्यवस्था आहेत आणि त्यांना एक इतिहास आहे, या दोन गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. उत्पत्ती, स्थिती व लय यांचा विचार जेथे करावासा वाटतो तेथे लहरी, निर्हेतुक हे वर्णन फार असमाधानकारक व एकांगी ठरते. एकपेशी जीव ते मनुष्य येथपर्यंत जीवसृष्टी उत्क्रांत होत आली आहे असे म्हणणे सार्थ असेल तर, किमानपक्षी, ही एक अगम्य व अद्भुत लीला आहे असे तरी म्हणायला लागते.
‘बुद्धिप्रामाण्यवादाच्या, आधुनिक पाश्चात्य विज्ञानाच्या एका विवक्षित चौकटीत निसर्ग ‘लहरी, निर्हेतुक असल्याचेच आढळू शकते. हे त्या चौकटीचे फलित आहे, ती त्या चौकटीची मर्यादा आहे. या चौकटीतदेखील वैज्ञानिकांना ‘अपघात ‘योगायोग (चान्स) असे शब्द वापरून यांत्रिक पद्धतीच्या कार्यकारण संबंधांपलीकडील घटक व प्रक्रिया यांना जागा करून द्यावी लागली आहे. एरवी सृष्टी नवनवोन्मेषशाली आढळलीच नसती.
विश्व ही एकाच वेळी नियमबद्ध आणि नियमांपलीकडे जाण्याची क्षमता असलेली व्यवस्था आहे. विज्ञानच आपणास ही गोष्ट सांगते. पण तिची वाटचाल एखाद्या हेतूने, एखाद्या लक्ष्याच्या दिशेने चालली आहे का, तो हेतू वा लक्ष्य कोणते, हेतू कोणाचा वा लक्ष्य कोणाचे, या प्रश्नांची उकल विज्ञान कधीच करू शकणार नाही. विज्ञानबाह्य म्हणून हे प्रश्न वैज्ञानिक बाजूला ठेवील. या प्रश्नांची जी कोणती उत्तरे आपण देऊ ती ‘शास्त्रीय सत्य’ या कसोटीला उतरणारी नसतील, पण म्हणून ती असत्यच आहेत असे विज्ञानाच्या आधारे म्हणणे योग्य होणार नाही, असेच वैज्ञानिक म्हणेल.
या प्रश्नांची उत्तरे एक ना एक अर्थी ‘साक्षात्कारी स्वरूपाचीच असणार. त्यांचे समर्थन तार्किक युक्तिवादाच्या आधारे करता येईल, पण वैज्ञानिक पुरावा देता येणार नाही. अशा प्रश्नांची उत्तरे देण्याच्या फंदात व्यर्थ पडू नये अशी भूमिका घेता येईल किंवा मौन बाळगता येईल.
नित्य उत्क्रांत होण्याची क्षमता ज्या अनियमित, स्वायत्त व स्वयंभू सृजनशीलतेमध्ये असते ते सृजनशील चैतन्य ओतप्रोत असलेली नियमबद्ध व्यवस्था असे विश्व, पृथ्वी व निसर्गसृष्टी यांचे स्वरूप आहे. थोडा विचार करता, माणूस व मानवी समूह यादेखील अशाच व्यवस्था आहेत हे ध्यानात येईल. भौतिक, जैव व मानवीय असा भेद केला तर आपण असे म्हणू शकतो की, गतिमानता, स्वतंत्रता, सहेतुकता वाढत जाते.
माणूस हा निसर्गसृष्टीचेच एक अपत्य आहे असे आपण म्हणतो. निसर्गसृष्टीच्या अपत्याच्या ठायी जर आत्मभान, विवेक, सहेतुकता आढळत असतील तर निसर्गसृष्टी ही ‘लहरी, निर्हेतुक’ असे कसे म्हणता येईल?
आत्मभान व विवेक हे मनुष्यप्राण्याचे विशेष आहेत हे नानासाहेबांचे म्हणणे खरेच आहे. इतर प्राण्यांच्या व वनस्पतींच्याही ठायी प्रारंभिक स्वरूपात कमीअधिक प्रमाणात याचा आढळ होतो खरा. पण माणसाच्या ठायी हे गुण विशेषत्वाने आढळतात. किंबहुना, त्याच्या दैनंदिन ऐहिक जीवनासाठी त्यांची माणसाला हरघडी मदत घ्यावी लागते. त्याची स्वतंत्रताही जवळजवळ अमर्याद आहे. महात्मा फुल्यांचा शब्द वापरून म्हणावयाचे तर तो प्रति-निर्मिक आहे.
ज्या निसर्गसृष्टीत व विश्वात आपण जगतो त्या विश्वाचे व निसर्गसृष्टीचे स्वरूप काय, त्यांच्याशी आपला संबंध काय, आपले स्थान काय, आपले यांच्याशी वागणे कसे असायला हवे हे प्रश्न, समाज करून माणसे एकत्र राहू लागली त्या अतिप्राचीन क्षणापासून माणसाला पडलेले आहेत. या प्रश्नांभोवती बहरणाऱ्या तत्त्वचिंतन. कल्पनाविलास, कला या गोष्टी आपल्याला आदिम टोळीसमाजांमध्येही आढळतात.
निसर्गसृष्टीचा प्रत्यय माणसाला एकाच वेळी शक्ती, चैतन्य व व्यवस्था म्हणून निरंतर येत आला आहे. तिचे गूढ कमीअधिक प्रमाणात अनाकलनीय राहते; तिच्यावर आपण पूर्ण नियंत्रण प्रस्थापित करू शकत नाही. ज्या तर्कवा विवेकाच्या आधारे ती कार्य करते, ते तर्क वा विवेक आपणास समजण्याच्या पलीकडे आहेत, हा देखील प्राचीन काळापासून आजतागायत माणसाचा अनुभव आहे. विज्ञानधर मानवही ही मर्यादा ओलांडू शकत नाही.
ईश्वरविषयक ज्या संकल्पना, प्रतिमा माणसाने प्राचीन काळापासून आजपर्यंत जन्माला घातल्या त्यांच्यामध्ये हेच सत्य वेगवेगळ्या प्रकारे ग्रथित झालेले आढळेल. ‘बुद्धिप्रामाण्याच्या आणि आधुनिक विज्ञानाच्या नावे मधल्या काळात हे सत्य नाकारण्याची गोष्ट घडली. संकल्पना, प्रतिमा नाकारण्याने तसे काही बिघडत नाही; व्यक्ती वा समूह अज्ञेयवादी वा नास्तिक भूमिका घेऊ शकतात. पण निसर्गसृष्टीविषयीचे सत्य नाकारण्यामधून विकृती व घोटाळे निर्माण होणार, आणि तसे ते झालेले आपण अनुभवीत आहोत.
मधल्या काळात जी बुद्धिप्रामाण्यवादी भूमिका अंगीकारली गेली तिच्या आधारे उपस्थित केले जाणारे प्रश्न वा केली जाणारी मांडणी अविवेकी व असमंजस ठरत असल्यास नवल नाही. विश्व व पृथ्वी या स्वरूपात जी गतिमान शक्ती कार्यरत आहे, तिची जी अंशतः कळणारी व बरीचशी न कळणारी अशी गुंतागुंतीची व्यवस्था आहे तिचे अस्तित्व मान्य करणे, मानवाच्या मर्यादा स्वीकारणे हा केवळ विज्ञानयुगापूर्वीच्या माणसांच्या अज्ञानाचा, तंत्रवैज्ञानिक दुबळेपणाचा किंवा बुद्धीच्या अप्रगल्भतेचा भाग नव्हता, ही गोष्ट तुलनेने विज्ञान कमालीचे प्रगत झाल्यानंतर, आज आपल्या ध्यानात येत आहे. अविवेकी, असमंजस, उन्मत्त मानव प्रसंगी तंत्रवैज्ञानिक सामर्थ्याच्या जोरावर पृथ्वी व निसर्गसृष्टी यांना उद्ध्वस्त करू शकतो, त्यांची मोठ्या प्रमाणावर मोडतोड करू शकतो, पण पृथ्वी व निसर्गसृष्टी यांचे विज्ञान तो पूर्णपणे जाणून घेऊ शकत नाही आणि त्यांचे स्वायत्त, स्वयंभू स्वरूप शिल्लकच उरते. ज्याला आपण माणसे पृथ्वी व निसर्ग यांचा विनाश म्हणतो तो मानवाकरवी घडवून आणणे, आणि नंतर एका वेगळ्या दिशेने उत्क्रांत होत राहणे हा देखील पृथ्वी व निसर्ग या व्यवस्थांचा खेळ असेल हे शक्य ठरते.
प्रति-निर्मिकाचे सामर्थ्य व क्षमता प्राप्त झालेल्या माणसाने, या क्षमता सामर्थ्याबद्दल पृथ्वी व निसर्गसृष्टी यांचे ऋणी राहावे, आपला मायलेकराचा संबंध जाणावा आणि आपल्या ज्ञानाच्या व अज्ञानाच्या, दोन्हींच्या कक्षांचे भान राखून मर्यादेने वागावे हा विवेक पर्यावरणीय दृष्टी व भूमिका यांच्या गाभ्याशी आहे. हा विवेक बाळगणाऱ्या मानवालाच ‘विज्ञानधर’ म्हणता येणार आहे.
आधुनिक पाश्चात्य सभ्यतेच्या (सिव्हिलायझेशन) एका टप्प्यावर ‘निसर्गावर मात करण्याची जी अहंमन्य, उन्मत्त व अविवेकी भूमिका प्रकर्ष पावली तिच्या प्रभावातून, नानासाहेब, आपणही मुक्त झालेले नाहीत, असे मोठ्या खेदाने म्हणावे लागते. एरवी, ‘निसर्ग प्रभू आणि मानव दास ह्या परंपरामान्य चित्राऐवजी मानव प्रभू आणि निसर्ग दास असे चित्र निर्माण होण्याचा संभव क्षितिजावर दिसू लागला असून या प्रकारचे वाक्य ते लिहिते ना. प्रार्थना, कृपा यांची गरजच उरणार नाही इतके सर्वकष नियंत्रण विज्ञानाच्या आधारे प्रस्थापित करणारे तंत्रज्ञान आपण हस्तगत करू व वापरू ही धारणा घमेंडीचाच भाग आहे. पृथ्वी व निसर्ग यांच्या संबंधात स्वतःच्या अंगभूत मर्यादांचे भाव व विनम्रता ही खऱ्या विज्ञानधराची गुणवैशिष्ट्ये व व्यवच्छेदक लक्षणे आहेत.
‘निसर्गावर मात करण्याची भाषा करणाऱ्या आधुनिक पाश्चात्य समतेने जी मनोधारणा जोपासली तिच्यामधून आदिवासींना ‘रानटी (सॅव्हेज) असे म्हटले गेले आणि पाश्चात्येतर लोकांना हीन, अडाणी, मागास, असंस्कृत, अविवेकी इत्यादी ठरविले गेले. आदिवासींच्या जीवनाला उद्देशून वापरलेली सर्व विशेषणे इंग्रजांनी भारतीयांना उद्देशून वापरली होती ही गोष्ट ध्यानात घ्यायला हवी.
भारतातील उच्चवर्णीयांचा सांस्कृतिक, बौद्धिक अहंकार आपणास परिचित आहे. कनिष्ठ व अस्पृश्य गणल्या गेलेल्या जातीयांच्या ठायी खऱ्या सुसंगततेला आवश्यक ती बौद्धिक, भावनिक क्षमताही नसते, ते केवळ तामसिक प्रकृतीचे असतात, आणि आदिवासी, भटके तर केवळ पशुवत् होत हा ग्रह फार खोलवर रुजलेला आढळतो. कालपरवापर्यंत शूद्र बहुजन समाजात समाविष्ट असणारा व उच्चवर्णीयांच्या पूर्वग्रहांचा बळी ठरलेला शेतकरी समाजही स्वतःला क्षत्रिय म्हणवू लागतो तेव्हा तोही हे सारे पूर्वग्रह आत्मसात करतो हे आज आपण मराठा राज्यकर्त्या वर्गाच्या संदर्भात महाराष्ट्रात अनुभवीत आहोत.
पुरातत्त्वसंशोधक आणि मानवसंस्कृतिशास्त्रज्ञ आज असे सांगतात की कंदमुळे गोळा करून छोटी शिकार करून गुजराण करणारे, फिरती ‘झूम शेती करणारे जनसमूह हे दारिद्र्याने गांजलेले नव्हते; त्यांचा आहार सकस व पुरेसा असे. तो त्यांना, तुलनेने कमी कष्टाने व निश्चितपणे मिळे. त्यांचे विश्व लहान होते यात शंका नाही. पण त्यांचा दृष्टिकोन संकुचित होता असे म्हणण्याला काही आधार नाही. मन, बुद्धी व विवेक यांची देणगी त्यांनाही तेवढीच होती. जगण्यासाठी त्यांनाही तंत्रविद्या विकसित करावी लागली, आणि त्यांचे ज्ञान काही क्षेत्रांमध्ये आजही थक्क करणारे असते.
जे जीवन अद्ययावत वा आधुनिक ते प्रगत, ज्यात उपभोगाची रेलचेल आहे ते प्रगत, जे जीवन जास्त तंत्रविज्ञानाधिष्ठित आहे ते उच्चतर, जी संस्कृती व सभ्यता (सिव्हिलायझेशन) बुद्धिप्रामाण्यवादी, विज्ञाननिष्ठ असल्याचा दावा करते ती श्रेष्ठ ही विधाने वस्तुनिष्ठ आहेत असे आपण सुशिक्षित गृहीतच धरून चालतो. आपल्याला जी गोष्ट सूर्यप्रकाशाहूनही अधिक स्वच्छ ‘दिसते ती आपल्यापुरती ‘वस्तुनिष्ठ’ असते. स्वतंत्रपणे विचार करता तो वास्तविक एक मूल्यात्मक निवाडा असतो. प्रगत, उच्चतर, ज्ञानसंपन्न, श्रेष्ठ हे शब्द निवाडादर्शक आहेत. स्थलकाल व संस्कृतिनिरपेक्ष वस्तुनिष्ठता ही मर्यादित क्षेत्रातच असते. अद्ययावत गोष्टी कोणत्या, उपभोगाचे मान कोणते अधिक, तंत्रज्ञानाचा जीवनाच्या सर्व क्षेत्रांत शिरकाव किती, माहितीचा संयम कोणाजवळ जास्त यांसारख्या प्रश्नांची वस्तुनिष्ठ उत्तरे शक्य आहेत. पण या उत्तरांच्या आधारे श्रेष्ठ कनिष्ठ, श्रेयस्कर अश्रेयस्कर असा निवाडा करून दुसऱ्याच्या जीवनाचा ताबा आपण घेणे समर्थनीय नाही.
आदिवासींचे जीवन, त्यांची संस्कृती, त्यांचे सुखसमाधान यांच्याविषयी आपण निवाडा करावयास मोकळे आहोत. पण तो निवाडा आपला आहे. मात्र त्याच्या आधारे त्यांच्या जीवनाची फेररचना करण्याचा, त्यांची जीवनाधार नैसर्गिक संसाधने ताब्यात घेण्याचा आपणास कोणताही अधिकार पोचत नाही.
नर्मदेच्या खोऱ्यातील वा बस्तर गडचिरोली भागातील किंवा अंदमान द्वीपसमूहातील आदिवासींच्या इच्छेविरुद्ध त्यांना त्यांच्या परंपरागत जीवनपद्धतीत बंदिस्त करून संग्रहालयातील ‘नमुने बनविण्याचा निर्णय घेण्याचाही अधिकार कोणाला पोचत नाही. पण नर्मदा बचाव आंदोलनाची वा पर्यावरणीय दृष्टी बाळगणाऱ्यांची ही भूमिका आहे असे म्हणणे भूमिकेचा विपर्यास करणारे आहे.
राष्ट्राचे हित, प्रगती, समृद्धी, आधुनिकता, विकास यांच्या नावे आदिवासी जमातींशी किंवा समाजातील कोणत्याही समूहांशी एकतर्फी एकाधिकारवादी वसाहतवादी शोषणाचे संबंध प्रस्थापित करणे गैर व अन्याय्य आहे. औपचारिक लोकशाही राज्यव्यवस्थेत प्रकल्पांना, धोरणांना, कार्यक्रमांना संमती आपण मिळवली, सगळ्या रीती (प्रोसिजर्स) पाळल्या असे म्हणणे पुरेसे ठरत नाही. कारण आजची लोकशाही व्यवस्थाही सत्तेच्या व निर्णयप्रक्रियेच्या केंद्रीकरणावर आधारलेली आहे.
जंगल, जमीन, पाणी यांसारखी नैसर्गिक संसाधने, जीवनपद्धती, सांस्कृतिक धार्मिक वारसा व पिढीजाद निवासक्षेत्रे यांच्यावर त्या त्या पातळीवरील लोकसमुदायांचे मूलभूत स्वायत्त अधिकार प्रस्थापित करण्याची निकड यातून उत्पन्न होते. केंद्रीय सत्तेने उदार होऊन हे अधिकार देण्याची गोष्ट आपण करीत नसून, या समुदायांच्या अधिकारांचे, स्वायत्ततेचे अपहरण झाले आहे हे ओळखून, त्यांचे जन्मसिद्ध अधिकार पुन्हा प्रस्थापित करण्याची गोष्ट आपण करीत आहोत. असे त्यांचे अधिकार प्रस्थापित झाल्यास आजच्या वरिष्ठ वर्गीयांची, शहरी लोकांची नक्कीच अडचण होणार आहे. त्यांच्या जीवनावर आघात होणार आहे. पण ही गोष्ट स्वागतार्ह व इष्टच होईल. न्याय व समता यांच्या प्रस्थापनेच्या दृष्टीने ते आवश्यक आहे.
अशी स्वायत्तता व अधिकार प्राप्त झाल्यावर असे समुदाय, विशेषतः आदिवासी जमाती, आपले भविष्य स्वतः होऊन घडवतील. त्यांचे पुनर्वसन दुसऱ्या कोणी करण्याचा प्रश्न उपस्थित होणार नाही. ते सर्वच निर्णय शहाणपणाने घेतील असे नाही. शहरी, शिक्षित उच्चवर्गीयांच्या संस्कृती व सभ्यतेचा प्रभाव या जमातींवरही मोठ्या प्रमाणात पडला आहे. चुका त्यांच्या ते करतील, ते जबाबदार असतील व चुकांचे परिणामही ते भोगतील. तो त्यांचा स्वराज्याचा अधिकार असेल.
‘स्वायत्त ग्रामव्यवस्थेच्या पुरस्काराच्या मुळाशी साम्राज्यवादी वासाहतिक शोषणांचे संबंध उलट्याचे सुलटे करण्याचा उद्देश आहे. गाव, पंचक्रोशी, खोरे (पाणवहाळ क्षेत्र) वा एकात्म पर्यावरणीय व्यवस्थेचे क्षेत्र त्याच्या त्याच्या पातळीवर बाहेरच्या अतिक्रमणाला थोपवून धरण्याइतके सशक्त बनण्याची, स्वतःच्या अभ्युदयाचे प्रश्न सोडविण्यासाठी निर्णय करण्याचे स्वतः अधिकारी बनण्याची आणि बरोबरीच्या नात्याने बाहेरच्या जगाशी संबंध ठेवण्याइतके स्वावलंबी बनण्याची गोष्ट गांधींनी केली. त्या दृष्टीने त्यांनी गाव, पंचक्रोशी वा तत्सम लहानातले लहान क्षेत्र प्राथमिक पायाभूत गरजांच्या दृष्टीने स्वावलंबी होण्याचे महत्त्व सांगितले. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि जीवनशिक्षण या गरजांच्या जोडीला गावचा कारभार, न्यायव्यवस्था आणि रक्षणव्यवस्था यांच्या बाबतीतही गाव स्वावलंबी झाले पाहिजे; गाव, पंचक्रोशी, खोरे या क्षेत्रांना प्रसंगी असहकार पुकारूनही व्यवस्थित जगता आले पाहिजे. वेढा पडला तरी जगता आले पाहिजे. ऊर्जेचे स्रोतही पुरेशा किमान प्रमाणात आपले स्वतःचे हवेत. दुसरे तत्त्व गांधीजींनी स्वदेशीचे सांगितले. ‘वसुधैव कुटुंबकम्’ वृत्तीचा योग्य आविष्कार शेजाऱ्याविषयीचे कर्तव्य अग्रक्रमाने पुरे करण्यातूनच होतो असे त्यांनी सांगितले. सुसंस्कृतता ही भौतिक उपभोगाचे मान केवढे, सत्ता, मानमरातब व कीर्ती किती मोठी, ऐषआराम किती यावर ठरत नाही व ठरूही नये; ती माणसाची, समाजाची नैतिक उंची किती, वागणे माणुसकीला साजेसे किती, करुणा व प्रेम यांनी ओतप्रोत किती यावरून मोजावयाची असते असे त्यांनी सांगितले. या दृष्टीने ‘गरजा’, उत्पादन, व्यापार आदी गोष्टी मर्यादेत ठरवण्याचे तिसरे तत्त्व आग्रहाने प्रतिपादले.
चांगला रस्ता, बसची सेवा, वीज, शाळा, रुग्णालय, शेतीसाठी पंप, दळण्याचे यंत्र इत्यादी सुविधा गावास प्राप्त होण्याची किंमत व्यक्ती व गावे जर अन्याय, शोषण, विषम वागणूक, लाचारी, परावलंबन व पारतंत्र्य या स्वरूपात देत असतील तर ते श्रेयस्कर व सुसंस्कृत नाही. नानासाहेबांनी गेल्या महिन्यातील मोटार वाहतूक मालकांच्या संपाचे उदाहरण दिले आहे. हे उदाहरण, आत्यंतिक केंद्रीकृत व्यवस्था लोकांना कशी ओलीस ठेवून घेऊ शकते याचे उदाहरण म्हणूनही पाहता येते. ज्या सुविधांचा नानासाहेबांनी निर्देश केला आहे त्या सुविधा जनसामान्य व गावे यांच्या शोषणाची साधने/माध्यमे बनावयाची नसतील तर प्रकाश व ऊर्जा, शिक्षण, दळणवळण, आरोग्य, शेतीचे उत्पादन, दैनंदिन जीवन यांच्यासाठी गावाची स्वावलंबी व्यवस्था असणे अधिक महत्त्वाचे आहे.
महात्मा गांधी पुनरुज्जीवनवादी होते हा गैरसमज बाळगण्याचे वस्तुतः काही कारण नाही. दारिद्र्य, उपासमार यांची पूजा ते खचितच बांधीत नव्हते. साध्या जीवनाची आवश्यकता ते नक्कीच प्रतिपादत होते. पण प्रत्येकाचे जीवन सुखी व्हावे यासाठी प्रत्येकाला काम मिळावे व पोटाला मिळावे हा त्यांचा आग्रह होता.
भारताच्या समाजाची व इतिहासाची गांधींची समज ही अधिक वास्तविक, सखोल व मार्मिक होती. या उलट साम्राज्यवाद्यांनी जोपासलेली भारतीय समाजाची व इतिहासाची समज, त्यांनी केलेली मांडणी ही त्यांचे हितसंबंध व उद्दिष्टे यांना समर्थन पुरविणारी होती, ही गोष्ट अलीकडील ऐतिहासिक संशोधन व लेखन यांमधून स्पष्ट होत आहे. सर्वांना रोजगार पुरविण्याची क्षमता असलेली, शेती व उद्योग यांचे संतुलन साधलेली ग्रामाधारित पण नागर – अर्थव्यवस्था, स्वराज्याचे अधिकार उपभोगत असलेली गावे व शहरे यांची व्यवस्था ब्रिटिशांनी पद्धतशीरपणे मोडून काढली. पाश्चात्य राष्ट्रवादी विचारप्रणाली आधारभूत मानून, पार्लमेंटरी लोकशाही आदर्श मानून त्यांना नवभारताची उभारणी करावयाची नव्हती. या दोन्ही गोष्टी-व भांडवली अर्थव्यवस्थाही – लोकांचे स्वराज्य हिरावून घेणाऱ्या संरचना आहेत हे मर्म त्यांनी जाणले होते. भारत राष्ट्र व भारतीय लोकशाही आणि भारतीय अर्थव्यवस्था यांची उभारणी नागरिकांच्या छोट्या समुदायांचा सहभाग, स्वावलंबन व स्वराज्य यांच्या पायावर करण्याची त्यांची भूमिका होती.
किंबहुना विज्ञानाच्या द्वारे सुखाचे जीवन जगातल्या सर्व मनुष्यांना उपलब्ध करून देण्याचा व्यक्ती व समाज यांच्या दृष्टीने सुसंस्कृत मार्ग कोणता, व्यवहार्य मार्ग कोणता याचे दिग्दर्शन गांधींनी केले आहे.
‘निसर्गासहित माणसाने वाटचाल केली पाहिजे हे नानासाहेबही म्हणतात. ‘विज्ञानातील विनाशक तत्त्वे असा शब्दप्रयोग त्यांनी केला आहे. यात गफलत आहे. विज्ञानातील विनाशक तत्त्वे असा काही प्रकार नसतो. विज्ञानाचा विनाशकारी तंत्रवैज्ञानिक आविष्कार रोखावयाचा असला तर कोणत्या गोष्टींचा पुनर्विचार होणे अगत्याचे आहे ?
धर्माची नाही, पण गांधी-विनोबांच्या अर्थाने विज्ञानाची सांगड घातली पाहिजे. धर्मश्रद्धांचा उच्छेद करून नव्हे तर, त्यांचे परिष्करण करून, धर्मश्रद्धा उन्नत बनवून, विभिन्न धर्मामधील संत/फकीर/साधू यांना अनुसरून अशी सांगड घालणे अधिक व्यवहार्य आहे. दुसरी गरज आहे ती, प्रगती, समृद्धी, विकास, सुखसमाधान इ. संकल्पनांचा मुळातून फेरविचार करण्याची. आजचे अर्थशास्त्र हे अनर्थशास्त्र आहे ही गोष्ट जाणण्याची नितांत गरज आहे. राष्ट्रवाद, राष्ट्र-राज्यांच्या आधारे जगाची संरचना आणि केंद्रीभूत व्यवस्था यांच्याही बाबतीत मुळातून चिकित्सा केली जायला हवी. धर्मभेद, जातिभेद, राष्ट्रभेद हे मानवाच्या सुखसमाधानाच्या व प्रगतीच्या आड धोंड कधी व का बनतात त्यांचा शोध घेणे उद्बोधक ठरेल.
निसर्गसृष्टीची व्यवस्था ही पूर्णात पूर्ण Whole within wholes व ती गांधींच्या ‘ओशियानिक सर्कलच्या प्रतिमेशी मिळतीजुळती आहे. निसर्ग व मानव यांचे स्वर भविष्यात जुळावयाचे असतील तर निसर्गाचे विज्ञापन माणसाला आत्मसात करावे लागेल आणि निसर्गाला अनुसरून व्यक्ती व समूह यांच्या मानवी जीवनाची व्यवस्था लावावी लागेल.