श्रीमती मेधा पाटकर गेल्या आठवड्यामध्ये पुण्यास आल्या असता स्नेहसदनात भरलेल्या सभेत त्यांनी जी भूमिका मांडली तिचे माझ्या मते दोन स्थूल विभाग पाडता येतील. पहिला भाग म्हणजे त्यांनी नर्मदा घाटीतील धरणात बुडणार असणाऱ्या ग्रामीण जनतेला जागे करून एक जबरदस्त संघटन उभे केलेले आहे, त्याच्या केंद्रस्थानी असणाऱ्या नर्मदा प्रकल्पाच्या अनावश्यकतेचा, त्याच्या सिद्धीसाठी चाललेल्या अमानुष सरकारी दडपशाहीचा आणि त्या प्रकल्पामुळे अपरिहार्यपणे होणाऱ्या निसर्गविध्वंसाचा प्रश्न.
नर्मदा प्रकल्पाची योजना आखताना शासनाने (गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र ही राज्य शासने व केंद्रशासन या सर्वांनी) जी हरत-हेची माहिती जमा करावयास हवी होती तशी ती मिळवण्याचे कष्ट न घेता सगळी आखणी मनमानीपणाने केलेली आहे, हा मेधा आणि तिचे सहकारी यांनी घेतलेला मूलभूत आक्षेप. तो तर आता जागतिक बँकेने नेमलेल्या मोर्स-बर्गर कमिटीच्या अहवालाने किती योग्य होता ते दाखवून दिलेले आहे. इतकेच नव्हे तर जागतिक बँकेने, ही माहिती जोपर्यंत व्यवस्थितपणे संकलित केली जाऊन तिच्या आधारे नव्याने आखणी होत नाही तोपर्यंत धरण उभारणीचे काम पुढे चालू देऊ नये असेही खणखणीत शब्दात सुनावले आहे !
मेधाचा हा विजय सर्वथैव प्रशंसनीय म्हटला पाहिजे. एका महिला कार्यकर्तीने जागतिक बँकेसारख्या निर्मम आणि व्यवहारवादी संस्थेला गदागदा हालवणे हे सामान्य कृत्य नव्हे. ‘माते नर्मदे’ हा ग्रंथ लिहिणाऱ्या डॉ. दाभोळकरांची या बाबतची ताजी प्रतिक्रिया समजून घ्यायला मी उत्सुक आहे ! त्या संध्याकाळचे मेधाचे स्नेहसदनामधले व्याख्यान म्हणजे अनलंकृत, शुद्ध तळमळीचा एक स्रोतच होता. तिची वाणी आपल्या लखलखीत धारेने विरोधी, जनसामान्यद्रोही, असत्य व लोभी वृत्तीने धरणसमर्थकांनी उपस्थित केलेल्या विचारांना सपासप छाटीत पुढे घुसून समजदार श्रोत्यांची मने जिंकीत चालली होती. श्रोत्यांमध्ये तरुणतरुणींचा भरणा मोठा होता आणि एका भगिनीच्या रूपाने आपणाला एक नवे नेतृत्व मिळते आहे अशा विश्वासू भावनेने मेधाचे विचार तो गट मनात साठवीत होता, असे स्पष्ट दिसत होते. खादीची कापडे ल्यालेली, प्रसाधनांचा स्पर्शही कोठे नसणारी, एकवेणीधरा मेधा जेव्हा तिच्या श्रांत डोळ्यांनी सभेमध्ये बोलायला उभी राहते तेव्हा साध्याभोळ्या कष्टकरी आदिवासींच्या मेळाव्यात स्वखुशीने विलोप पावलेला एक मित्र आता आपल्याशी काय बोलणार आहे अशा निर्मळ भावनेनेच श्रोते सावरून बसतात. मेधाला पाहून मला तरी गांधीयुगात समर्पण भावनेने स्वातंत्र्याच्या लढ्यात उतरलेल्या भगिनींची आठवण झाली. मेधा बोलू लागली की तिची सारी भावुकता. तिची सगळी बुद्धिमत्ता तिच्या डोळ्यांत गोळा होऊन बसते.
अशी गुणी व्यक्ती जेव्हा जनतेच्या लढ्यात वर्षानुवर्षे आघाडीवर राहते तेव्हा तिच्या शब्दांना आगळेच सामर्थ्य प्राप्त होत असते, याचा अनुभव मी गांधीजी, सुभाषचंद्र, डॉ. आंबेडकर, साने गुरुजी, जयप्रकाश यांच्या बाबतीत घेतलेला आहे. तेव्हा मेधाच्या पाठीशी नर्मदा खोऱ्यातील आदिवासी उभे राहावेत यात नवल ते कसले ? आता तर मोर्स – बर्गर अहवालाच्या प्रसिद्धीमुळे बुद्धिजीवी वर्गातील मंडळींना हे पटू लागलेले दिसते की आदिवासींच्या जीवनाचा जो गाभाच असा जंगल, जमीन आणि पाणी यांचा प्रश्न, त्याची काहीही पर्यायी सोडवणूक न करता आणि त्यांना एका शब्दानेही न विचारता त्यांच्या शेकडो वर्षे वहिवाटीत असलेल्या वस्त्यांवरून त्यांना उठवणे हा एक घोर सामाजिक अन्याय असून त्याचा निषेध व्हायला हवा. वंशविच्छेदाचा हा एक साळसूद प्रकार आहे.
पण या भूमिकेवरून उठाव घेऊन पर्यावरणवादी मंडळी ज्या वेळी अशा पातळीवर पोचतात की जेथे निसर्ग आणि मानव यांच्यामध्ये संघर्षाचा संभवच उद्भवणार नाही, अशी अवस्था निर्माण करणे हेच सर्वश्रेष्ठ उद्दिष्ट मनुष्याने मानले पाहिजे, तेव्हा मतभेदाला प्रारंभ होतो. ह्या मतभेदाचा मुद्दा विचारात घेतल्याविना आपल्या वसुंधरा-मानवविषयक चर्चेला सम्यक स्वरूप प्राप्त होणार नाही असे मला वाटते.
आपण प्रथमतः याचा विचार करू की, निसर्ग व मानव यांच्यामध्ये संघर्ष नाही अशी अवस्था मानवाच्या ज्ञात इतिहासात कधी होती काय ? मनुष्याला ज्ञानाचे फळ चाखायला मिळाले नव्हते तोपर्यंत निसर्ग माणसाचा दोस्त होता अशी कथा आपण बायबलमध्ये वाचतो. पण ज्ञानावाचून मनुष्य अशी स्थिती कधीच नव्हती. तशी ती होती हे आपण बायबल सांगते म्हणून सत्य मानण्याचे काहीच कारण नाही. मन, बुद्धी, विवेक असलेला प्राणी म्हणजेच मनुष्य. पाळलेले प्राणी साफ साफ बुद्धिहीन असतात हे विधानदेखील चुकीचेच आहे. ते अल्पबुद्धि असतील, मानवाच्या तुलनेत. परंतु काही बाबतींत ते मानवाहून श्रेष्ठही असतात!
असा हा मनासह बुद्धी असलेला मानव जेव्हा पृथ्वीतलावर वावरू लागला तेव्हा निसर्ग काय त्याच्यावर कृपाछत्र धरून होता की काय? मानवाचा आत्मा अमर आहे, अक्लेद्य आहे, अच्छेद्य आहे, अशी विलक्षण विधाने ज्या वेळी केली गेली त्या काळापर्यंत मानव जातीच्या हजारो पिढ्या संपून गेल्या होत्या. निसर्गाचे खेळ चालूच होते. समुद्र खवळून मानवी वस्तीचे किनारे स्वाहा करीत होता. वादळवारे मानवाची घरटी भिरकावून देत होते, ज्वालामुखीचे लाव्हारस घरे, गोठे, मळे, शहरे डोळ्यांदेखत जाळून खाक करीत होते किंवा राखेत पुरून टाकीत होते. ते त्याचे खेळ या घटकेलाही चालू नाहीत काय ? मॅमथ, सरडासुरासारख्या लक्षावधी कीटकजाती काही मर्यादेपर्यंत जगल्या-वाढल्या, नष्ट झाल्या. त्या काळी ओझोन पडद्याला भोक थोडे पडले होते ? आजचे प्रदूषक वायू तर त्या काळी कोणी स्वप्नातदेखील पाहिलेले नसावेत. मग त्या काळी काय रोगराई नव्हती, की अपमृत्यू नव्हते? की संहारक महायुद्धे नव्हती ? आदिम क्षणापासून या चालू घटकेपर्यंत निसर्ग होता तसाच आहे : लहरी, निर्हेतुक. मानवासह सगळ्या जीवसृष्टीला कोडी घालीत हुंदाडत खिदळत राहणारा. त्या काळात माणसे म्हणत राहिली : ‘बलीयसी केवलमीश्वरेच्छा !’ हीच ती दैवगती. हाच तो सटवीने लिहिलेला ललाटलेख ! हीच मानवाला भ्रमणयंत्रावर बसवल्याप्रमाणे यथेच्छ गरगरवणारी गीतेमधील माया ! हाच तो कृतीचा पिंगा !
पण निसर्गाच्या हातचे हे मानवस्वरूपी खेळणे पिनोचिओसारखे आता सजीव, चेत व बरेचसे स्वावलंबी झालेले असून त्यामुळे निसर्ग आणि मानव यांच्यामधील नाते सुलट्याचे उलटे झालेले आहे. ‘तुझ्यासाठी ही भूमी शापित केलेली आहे. निढळाचा घाम गाळ तर भाकरी मिळेल असले करंटे समीकरण आता कोणी मानणार नाही. निसर्ग प्रभू आणि मानव दास ह्या परंपरा मान्य चित्राऐवजी मानव प्रभू आणि निसर्ग दास असे चित्र निर्माण होण्याचा संभव क्षितिजावर दिसू लागला असून आपल्याकडून चाललेले निसर्गाचे दोहन जर अधिकाधिक कर्कश बनत गेले तर अनर्थ गुदरेल असा इशारा माणसानेच स्वतःला मनोमन दिलेला आहे.
आता या संदर्भात उपस्थित करावासा वाटतो तो प्रश्न असा की, आदिमानवापासून आतापर्यंत ज्या काही पायऱ्या मानवाने पार केलेल्या आहेत, त्यांपैकी कोणत्या पायरीवर मानवजात पोचलेली असताना मानवाचे आणि निसर्गाचे स्वर जुळलेले होते ? कारण तशी जर एखादी जागा आढळली तर तेथवर मागे जाण्यास माझ्यासारख्याची काहीच हरकत असणार नाही. मुद्दा असा आहे की, न डागळलेली अशी जागाच इतिहास जरी उलटापालटा केला तरी सापडत नाही ! कोणाच्या राजवटीत माणसाने झाडे तोडून शेती आणि वसाहती केल्या नाहीत ? वणवे पेटवले नाहीत किंवा दुष्काळ पडला नाही ? शाकुंतलाच्या भरतवाक्यात ‘इंद्र तुला सदैव अनुकूल राहो ! तो तुझ्या राज्यात पाऊस पाडो आणि तूही यज्ञ करून त्याला संतुष्ट कर’ अशी शुभेच्छा व्यक्त केलेली आहे.अनुकूल पर्जन्यवृष्टी होण्यासाठी राजे-महाराजे अशा समजुतीने यज्ञ करीत की, इंद्राला (निसर्गाला) खूष ठेवल्यावाचून तो आल्यावर प्रसन्न होणार नाही. ग्रह, तारे, वारे, या सर्वांच्यापुढे नम्र होऊन माणूस त्यांच्याकडून कृपा भाकीत असे. गेल्या केवळ शंभर वर्षांत ही स्थिती विज्ञानाच्या आसऱ्याने माणसाने इतकी बदलून टाकली आहे की, विज्ञानाच्या कोणत्याही शाखेकडे पाहिले तरी माणसाच्या अंगी आलेल्या सामर्थ्याचे आश्चर्य वाटावे आणि भीतीही वाटावी.
माझा असा तर्क आहे की, सध्याची परिस्थिती आपल्याला कितीही अनिष्ट वाटत असली, विनाशक वाटत असली, तरी मनुष्य आता मागे फिरण्यास तयार होणार नाही. नर्मदा घाटीच्या दुर्गम भागात राहणाऱ्या किंवा सोमनाथच्या जंगलात राहणाऱ्या आदिवासींचे जीवन हे निसर्गाच्या कुशीत कितीही विसावलेले असो, ते दरिद्री जीवन होते आणि आहे. भूक, रोग, अज्ञान, संकुचित दृष्टिकोन यांनी ते वेढलेले आहे. त्यांचे पुनर्वसन करावे म्हणजे त्यांना आहे त्या स्थितीत राहू द्यावे – हा विचार स्वीकारायला माझी तयारी नाही. नर्मदा घाटीतील आदिवासी हे सुखाचे जीवन जगत आहेत असे मानले तर अंदमान द्वीपसमूहातील जावरा हे आदिवासी त्यांच्याहून सुखी म्हटले पाहिजेत, कारण ते अद्यापि नग्नावस्थेत राहतात आणि कोणीही सफेतपोश मनुष्य दिसला की खोल जंगलात पळून जातात किंवा दगडधोंडे, बाण यांचा मारा करून त्याला पळवून लावतात.
गांधीवादी ज्या स्वायत्त ग्रामव्यवस्थेची शिफारस करीत असतात, तिचादेखील फेरविचार झाला पाहिजे, असे मला नम्रतापूर्वक वाटते. लोकमत जर विचारात घेतले, तर असे ग्रामस्थ कुठे सापडतील का की जे चांगला रस्ता, बसची सेवा, वीज, शाळा, रुग्णालय, शेतीसाठी पंप, दळणाचे यंत्र – इत्यादी सुविधांपासून आमचे गाव वंचित राहिले तरी हरकत नाही असे म्हणावयाला तयार होतील? मराठेशाहीच्या आणि तत्पूर्वीच्या काळात भारतातील खेडी अशीच होती की ! खानदेशात दुष्काळ पडला, तर पुण्यात त्याची गंधवार्ताही नसे. दुर्गादेवीच्या दुष्काळात शेकडो खेड्यापाड्यांतून लोकांनी शेकडो मैल स्थलांतर केले हा इतिहास आपणाला माहीत आहे. माझ्या अल्प मतीप्रमाणे, ‘स्वयंपूर्ण खेडे ही कल्पना मान्य केल्यावर पाच लाख खेड्यांचे राष्ट्र चालवणारे, त्याच्या रक्षणाची जबाबदारी स्वतःवर घेणारे, राष्ट्रातील लोकमत पाहून त्याप्रमाणे कारभार करणारे किंवा करू म्हणणारे, शासन – या सगळ्याच कल्पना मोडीत काढाव्या लागतील.८५ कोटींच्या या राष्ट्रातील लोकांची जीवने एकमेकांत किती मिसळून गेली आहेत, हे नुकत्याच झालेल्या मोटर वाहतुकीच्या देशव्यापी संपामुळे स्पष्ट झालेले आहे.
सांगण्याचे तात्पर्य असे की, यापुढे संपर्कसाधनांविरहित, किंवा ऊर्जाविरहित समाजाची रचना करणे कोणालाही शक्य होणार नाही. म्हणून ज्या मार्गाने गेले असता अपयश हमखास, निश्चित आहे त्या मार्गाने न जाता आधुनिक विज्ञानातील विनाशक तत्त्वे बाजूला सारून, त्याच्या द्वारा सुखाचे जीवन जगातल्या सर्व मनुष्यांना कसे उपलब्ध करून देता येईल, याचा आराखडा मांडावयास हवा. परंपरेने आलेल्या धर्मभेद, जातिभेद, राष्ट्रभेद इत्यादि संकल्पनांचा अतिरेक हीच आजच्या प्रगतीच्या मार्गातील धोंड आहे. पण मनुष्यजात स्वतःचा विनाश उघड्या डोळ्यांनी पाहात बसेल, असे मला वाटत नाही. अणुशस्त्रांसारख्या संहारकारी शस्त्रांचा आणि विषारी वायूंचा त्याग, पर्यावरणाबद्दल योग्य ते भान, जगात वंशवादी शक्ती वाढू लागल्या तर त्यांना आळा घालण्याकरिता यूनोसारखी संस्था, यासंबंधीचे विचार जोराने पुढे येत आहेत, हेच मला शुभलक्षण वाटते. ती उद्दिष्टे साध्य होण्यास अजून काही शतकांचा काळ लागेल, हे मी मान्य करतो. अहिंसक प्रतिकार आणि विधायकसहकार्य, ही गांधीमार्गातील जी सूत्रे आहेत ती हळूहळू जगभर पसरत जातील. पण त्यासाठीही आधुनिक तंत्राचा उपयोग करावा लागेल. म्हणून कोठल्याही गतकालीन युगाचे अनुकरण करण्याची भाषा सोडून देऊन जगाने आतापर्यंत कधीही न आढळलेले नवयुग कसे निर्माण करता येईल आणि त्यासाठी विज्ञानाने उपलब्ध करून दिलेल्या साधनांपैकी कोणती साधने हवीत, याचा विचार करणे आवश्यक ठरेल. या युगात निसर्ग विरुद्ध मानव असे चित्र समाप्त होऊन ‘मानवासहित निसर्ग असे चित्र व्हावे. त्यात मानव हे निसर्गाच्या हातचे खेळणे न राहता लहरी निसर्ग व विज्ञानयुक्त मानव हे सहकारी म्हणून हातांत हात गुंफून नांदावयास हवेत. शेवटी भगवद्गीतेतील शेवटचा श्लोक येथे देण्यास हरकत नाही. तो असा आहे :
यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः।
तत्र श्रीविजयो भूतिर्बुवा नीतिर्मतिर्मम।।
या श्लोकामधील योगेश्वर कृष्ण म्हणजे स्वस्थितिमग्न असलेला निसर्ग आणि धनुर्धर अर्जुन म्हणजे विज्ञानधर पुरुषार्थी मानव असा केला तर त्यांचा संयोग जेथे घडेल तेथे श्री (संपदा), यश आणि सौख्य नांदू लागेल असे संजयाप्रमाणेच आपणाला म्हणता येईल!