सदाचरणी होण्यास व सदाचरणी राहण्यास त्यांस सदाचरणाची किंमत कळली पाहिजे, ती किंमत कळण्यास त्यांची सापेक्ष बुद्धि जागृत झाली पाहिजे, व तसे होण्यास त्यांस सुशिक्षण दिले पाहिजे. लहान मुलांस खोटे बोलणे वगैरे पापांपासून दूर ठेवण्यास छडीचाच केवळ उपयोग नको आहे. पाप केल्यास शरीरदंड होतो येवढेच ज्ञान ज्यास मिळाले आहे तो सदैव पापपराङ्मुख राहील, असे मुळीच नाही. शिक्षा होण्याचा संभव गेला की, तो पाप करण्यास सोडणार नाही. सदाचरण व असत्प्रतिकार यांविषयीं तात्त्विक ज्ञान मनुष्यमात्रास झाल्यावाचून दोहोंचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष परिणाम पूर्णपणे कळून येणे शक्य नाही, व जोपर्यंत हे परिणाम कल्लले नाहीत तोपर्यंत मनुष्यास सदा-चरणाची खरी योग्यता, व असत्पथावलंबनाची स्वपरवंचक प्रवृत्ति ही कधीहि कळणार नाहीत. हेच नीतिशास्त्राचे तत्त्व स्त्रियांसहि लागू पडते व त्यांस सदाचरणी होण्याचा मुख्य उपाय ज्ञानप्राप्ति व तत्साधनीभूत स्वातंत्र्य ही होत.
– गोपाळ गणेश आगरकर