हिंदू समाजात स्त्रीरक्षण – पुरुषाच्या कामवासनेपासून स्वसंरक्षण- हा महत्त्वाचा उद्योग स्त्रीला पुरातन काळापासून असावा, कारण त्या वासनेला संयम शिकविण्याचे प्रयत्न हिंदू संस्कृतीने केलेले नाहीत. ब्रह्मचर्याचा, तपस्येचा बडिवार करीत, वेश्याव्यवसाय हाच कुळधर्म असणाच्या कळवंत, नायक इत्यादी जाती हिंदू धर्माने निर्माण केल्या, इतकेच नव्हे तर कुळवंतांच्या पोरी देवदासींच्या स्वरूपात मंदिरामधून पोचविल्या व देवद्वाराचाही कुंटणखाना बनवून टाकला. घरच्या स्त्रियांवर देवादिकही पापी दृष्टी ठेवीत, असे आपली पुराणे सांगतात. कामसूत्रात कुलीन स्त्रीला वश करण्याचे अनेक मार्ग सांगितले आहेत. बहुपत्नीकत्व होतेच, पण त्या स्त्रियांचे भरणपोषणही न करता चैन करण्याचा मार्ग बंगालच्या ‘कुलीन भूदेवांनी शोधून काढला. आजही धार्मिक म्हणविणार्यार पुरुषांनी भावजय, सून, मेहुणी, बहीण वा कन्या अशा निकटवर्ती स्त्रियांशी व्याभिचार केल्याचे क्वचित कानावर येते. शस्त्रधारणेचे आधिकार नसलेल्या शूद्रजातींमधल्या स्त्रियांची स्थिती जास्त असहाय होती. सत्ताधारी स्त्रियांनी काय केले असेल याची झलक आजही विविध संस्थानांच्या इतिहासात नमूद आहे. याचा अर्थ सर्व पुरुष वासनेने लिप्त, असंयमी होते वा आहेत असा नाही; पण समाजाचे स्वास्थ्य नासायला पाच टक्केही घाण पुरते. हिंदु समाजात घाण यांपेक्षा जास्त जास्त होती, व ती घाण या सदरात जमा न होता जीवनाचे अभिन्न अंग मानली जात होती.