ग्रंथावरील परीक्षणात्मक टीकालेख वाचला. (आजचा सुधारक, नोव्हें. डिसे.९२) या ग्रंथाबद्दलचा त्यांचा अभिप्राय जाणून घेण्यास आम्ही अगोदरच उत्सुक असल्यामुळे त्यांच्या या परीक्षणाने आम्हाला साहजिकच आनंद झाला.
परीक्षणकर्त्याने आपल्या ग्रंथाचे कौतुक करावे अशी अपेक्षा करणे अयोग्य आहे. आमच्यापुरते बोलायचे तर आमच्या ग्रंथावर टीकाकारांनी कठोर टीका करावी असे आम्हाला वाटत असते. ‘सावरकरांचा बुद्धिवाद : एक चिकित्सक अभ्यास’ या आपल्या १९८८ साली प्रसिद्ध झालेल्या ग्रंथावर अशी कठोर टीका कुणीही केली नाही याचे आम्हाला दुःखच वाटत आले आहे. मोघम कौतुकापेक्षा कठोर टीका विचारप्रवर्तक व म्हणूनच उपयुक्त असते. त्यामुळे डॉ. भोळे यांनी परीक्षणलेखात आमच्या ग्रंथावर कठोर टीका केली, हे आम्ही स्वागतार्ह मानतो.
अशा प्रकारे डॉ. भोळे याच्या या लेखाबद्दल एवढेच लिहून इथे थांबायला हवे होते. तथापि डॉ. भोळे यांचे हे परीक्षण तटस्थ, समतोल व न्यायोचित मूल्यमापन करणारे न होता ते एकांगी झाल्यामुळे त्यातील एका महत्त्वाच्या मुद्याचा खुलासा करणे आम्हाला आवश्यक वाटत आहे. सावरकरांवर टीका करणार्या पुरोगामी व मार्क्सवादी प्रवाहातील टीकाकारांवर प्रा. मोऱ्यांचा विशेष रोष आहे असे मानून आमच्यावर डॉ. भोळे यांनी जो विशेष रोष व्यक्त केला आहे, त्या मुद्यासंबंधी काहीसे स्पष्टीकरण आम्ही पुढे करीत आहोत.
पुरोगामी व मार्क्सवादी मंडळींबद्दल. विशेषतः रा. वसंत पळशीकर व डॉ. य. दि. फडके यांच्याबद्दल, आम्ही जी आरोपात्मक विशेषणे वापरली आहेत, त्याबद्दल डॉ. भोळे यांनी आम्हाला खूपच दोष दिला आहे. रा. पळशीकर व डॉ. फडके ह्यांची वैचारिक क्षेत्रातील प्रतिष्ठा पाहता, आमची ती विशेषणे जर बाजूला सुटी घेऊन वाचली तर ती वापरल्याबद्दल कोणीही आम्हाला दोषच देईल यात शंका नाही. म्हणून भोळे यांचा हा लेख वाचून वाचकांच्या मनात आमच्याविषयी गैरसमजाची भावना निर्माण होण्याची भीती वाटते. विशेषतः ज्या आमच्या वाचकांना ग्रंथ मुळातून वाचणे शक्य होणार नाही, त्यांच्या मनात हा गैरसमज राहू नये म्हणून पुढील खुलासा करणे आवश्यक वाटते.
या पुरोगामी मंडळींनी जाणीवपूर्वक सावरकरांच्या समाजकारणाचा विपर्यास केला आहे, अशा स्वरूपाचा व अर्थाचा आरोप आम्ही ग्रंथात या मंडळीवर वेळोवेळी केलेला आहे, हे खरेच आहे. विचारवंतांच्या दृष्टीने पाहिल्यास हे गंभीर स्वरूपाचे आहे हे उघड आहे. असे आरोप करण्यात वा तत्संबंधीची विशेषणे वापरण्यात आम्हाला फार आनंद वाटला असे मानण्याचे कारण नाही. अत्यंत जड अंतःकरणाने आम्ही हे काम केलेले आहे, हे आम्ही येथे नोंदवू इच्छितो.
कोणत्याही आरोपाची आक्षेपार्हता त्याच्या गंभीरपणावर किंवा ते आरोप कोणावर केले आहेत त्याच्यावर अवलंबून असते, की त्या आरोपासाठी सादर केलेल्या पुराव्यांवर अवलंबून असते, हे एकदा स्पष्ट झाले पाहिजे. सादर केलेला पुरावा आरोप सिद्ध करण्यास पुरेसा आहे की नाही हा निकष लावून आरोपाची वा तत्संबंधीच्या विशेषणाची आक्षेपार्हता ठरविली पाहिजे, असे आमचे मत आहे. या मताशी वाचकांचे वा डॉ. भोळे यांचे दुमत होईल असे वाटत नाही.
आरोप करण्याइतका सबळ पुरावा सादर केला असेल तर केवळ ज्यांच्यावर आरोप ठेवायचे ते ख्यातनाम विचारवंत आहेत किंवा असे आरोप शिष्टाचाराला वा सुसंस्कृतपणाला शोभत नाहीत, एवढ्याचसाठी तसे आरोप करायचे नाहीत असे म्हणणे योग्य ठरते काय? म्हणजे येथे मुख्य मुद्दा, आम्ही जे आरोप केलेले आहेत त्यासाठी सबळ वा समाधानकारक पुरावा आम्ही सादर केलेला आहे की नाही, हाच आहे!
आम्ही येथे वाचकांना खात्रीपूर्वक सांगू इच्छितो की, ग्रंथात आम्ही ज्यांच्यावर जे जे आरोप केलेले आहेत, त्यासाठीचा सबळ पुरावा त्या त्या ठिकाणी सादर केलेला आहे. हे पुरावे सादर केल्यामुळेच ग्रंथाचा आकार वाढलेला आहे. सत्यापेक्षा विपर्यासांचाच अधिक ऊहापोह या ग्रंथात केलेला आहे, व सातशे पृष्ठांच्या या ग्रंथाचा तीन चतुर्थांश भाग यासाठी खर्च झालेला आहे, असे डॉ. भोळे यांनी टीकेच्या स्वरूपात म्हटले आहे, त्याचा खरा संदर्भ आम्ही ग्रंथात सादर केलेल्या ह्या पुराव्यांशी आहे. आम्ही केलेले आरोप सिद्ध करण्याइतपत हा पुरावा सबळ आहे की नाही याची पुराव्यांच्या तपशिलात जाऊन चर्चा करणे आवश्यक ठरते. तसे करून आमचा पुरावा असमाधानकारक असेल तर तसे नमूद करून आमच्यावर डॉ. भोळे यांनी दोषारोप करणे योग्य व स्वागतार्ह ठरले असते.
परंतु डॉ. भोळे यांचे म्हणणे असे आहे की, सावरकरांच्या या टीकाकारांचे म्हणणे बरोबर की प्रा. मोर्यांचे याबद्दल आम्हाला येथे काही म्हणावयाचे नाही. (पृ. २७७) याचा अर्थ कोणत्या कारणास्तव आम्ही ह्या पुरोगामी मंडळींवर आरोप केलेले आहेत किंवा आरोपासंबंधीचा पुरावा सबळ वा समाधानकारक आहे की नाही हा मुख्य मुद्दा डॉ. भोळे विचारात घेण्यास तयार नाहीत. त्यांचे म्हणणे असे की “ज्या पद्धतीने वा ज्या भाषाशैलीचा वापर करून मोरे त्या टीकाकारांचा समाचार घेतात ती आम्हाला आक्षेपार्ह वाटते. (कित्ता) म्हणजे त्यांचा मुख्य आक्षेप आरोपाच्या गुणवत्तेबद्दलचा नसून आरोपाच्या भाषाशैलीबद्दलचा आहे. आमचे म्हणणे असे की, आरोपच जर गंभीर असतील तर ते व्यक्तविताना त्यानुरूप भाषाशैली येणे अपरिहार्य आहे. जाणीवपूर्वक विपर्यास केल्याचा आरोप सिद्ध होत असेल तर तो त्याच भाषेत मांडायचा नाही तर तो मांडायचा कसा? खोटेपणा सिद्ध होत असेल तर तो त्याच भाषेत मांडला तर त्यात आक्षेपार्ह काय?
डॉ. भोळे यांना आमची विनंती आहे की, आम्ही दिलेल्या पुराव्यांच्या तपशिलात जाऊन त्यांनी त्यांचे मूल्यमापन करावे व पुरावा देण्यात आम्ही कुठे कमी पडतो हे त्यांनी दाखवून द्यावे. असे करताना त्यांनाही या मंडळींनी केलेल्या कृत्याबद्दल संताप आल्याशिवाय राहणार नाही असे आम्हांस वाटते. परंतु त्यांनी नेमके हेच टाळलेले आहे. संतापाच्या वा आरोपाच्या कारणांचा निर्देश पूर्णपणे टाळून फक्त संतापाच्या वा आरोपाच्या अभिव्यक्तीच्या पद्धतीच्या औचित्याबद्दल त्यांनी आमच्यावर टीका केलेली आहे.
ज्या जाणीवपूर्वक विपर्यासाचा संदर्भ आमच्या ग्रंथात आला आहे तो विपर्यास वस्तुस्थितीच्या (about facts) संबंधातील आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. आपल्याला जे वाटते तसेच इतरांनाही वाटले पाहिजे असे कोणीच म्हणू नये, ही डॉ. भोळे यांची भूमिका योग्यच आहे. वस्तुस्थितीचे निर्वचन अभ्यासक आपापल्या परिप्रेक्ष्यात करणार हे उघड आहे, हेही त्यांचे म्हणणे अगदी बरोबर आहे. परंतु अशा प्रसंगी जाणीवपूर्वक विपर्यासांचा आरोप आम्ही केलेलाच नाही. ज्या ठिकाणी नेमकी वस्तुस्थिती (fact) दाखवून देता येते अशा ठिकाणीच आम्ही हा आरोप केलेला आहे. अर्थात् तपशिलाने व उदाहरणे घेऊन हा मुद्दा आम्हाला येथे स्थलाभावी सांगता येणार नाही. तथापि त्याचे साधारण स्वरूप सांगता येईल. उदाहरणासाठी आपण रा. पळशीकरच घेऊ.
रा. पळशीकरांनी सावरकरांच्या अवतरणातील मूळ विचारात बदल करून मूळ अर्थाचा अनर्थ होईल अशा पद्धतीने ते अवतरण बदलून सावरकरांच्या नावे मांडलेले आहे. आता या ठिकाणी सावरकरांचे मूळ अवतरण कोणते आहे, हे दाखवून देणे म्हणजे वस्तुस्थिती दाखवून देणे होय. अशा प्रकरणी प्रत्येक अभ्यासकाचे वेगवेगळे मत असण्याची शक्यता फार कमी असते. तुलनेसाठी जे अवतरण घेतलेले आहे, त्याऐवजी अन्य एखादे अवतरण सावरकरांच्या साहित्यात असू शकते, एवढीच एक शक्यता शिल्लक उरते. ही शक्यतासुद्धा आम्ही ग्रंथात गृहीत धरलेली आहे व आमचेच खरे असा दावा आम्ही केलेला नाही. या संबंधात ग्रंथातील पुढील एक विधान उल्लेखनीय ठरेल : ‘आम्ही सावरकरांचा जो मूळ उतारा दिला आहे, त्यापेक्षा पळशीकरांनी उद्धृत केलेल्या उतार्यांशी जुळणारा अधिक जवळचा उतारा आम्हाला सापडला नसल्यामुळे, निदान पळशीकर याचा खुलासा करीपर्यंतकिंवा नवा संशोधक तसे दाखवून देईपर्यंत, वर आम्ही दिलेल्या उतार्याचेच पळशीकरांनी विकृतीकरण केलेले आहे, असे वाचकांनी समजावे अशी आमची विनंती आहे.’ (पृ.२००) यापेक्षा अधिक सावधगिरीने व संयमाने विपर्यास कसा दाखवून द्यावा? अवतरणे जेथून घेतली त्या ग्रंथातील पृष्ठांकाचा उल्लेख पळशीकरांनी कुठेही केलेला नाही. मूळ हस्तलिखितात असे पृष्ठांक होते, मात्र प्रकाशित लेखात पळशीकरांनी ते येऊ दिलेले नाहीत, याचा पुरावा आम्ही ग्रंथात सादर केलेला आहे. सावरकरांना अनुवंशवादी व ब्राम्हण्यवादी ठरविण्यासाठी केलेले हे उद्योग आहेत. यालाच आम्ही वस्तुस्थितीचा विपर्यास असे मानतो. अशा स्वरूपाच्या आक्षेपार्ह बदलाला ‘जाणीवपूर्वक विपर्यास वा ‘खोटेपणा’ याशिवाय दुसरे काय नाव द्यावे? ही वैचारिक मतभिन्नता आहे काय? असा प्रकार ख्यातनाम व पुरोगामी विचारवंतांनी केला म्हणून तो दुर्लक्षणीय मानावा काय? भोळेसाहेब, या पुराव्यांच्या तपशिलात न जाता या मंडळींचे म्हणणे बरोबर की मोऱ्यांचे बरोबर याच्याशी आम्हाला कर्तव्य नाही, अशा पळवाटेने जाऊन आम्ही केलेल्या आरोपाला आपेक्षार्ह कसे ठरविता येईल?
अर्थात डॉ. भोळे यांना एकतर आपल्या लेखाच्या मर्यादेत पुराव्यांच्या तपशिलात व त्यांच्या मूल्यमापनात जाता येणार नाही, हेही खरे आहे. आणि दुसरे म्हणजे त्यासाठी टीकाकारांचे सर्व साहित्य व सावरकरांचे साहित्य समोरासमोर ठेवून अभ्यास करावा लागतो. ग्रंथपरीक्षण करताना एवढे करण्यास कुणाला वेळ नसतो. मात्र या बाबतीत डॉ. भोळे यांना एक मार्ग उपलब्ध होता. तो म्हणजे ज्यांच्यावर आम्ही आरोप केलेले आहेत, त्यांना त्यांच्यावरील आरोपाचा खुलासा करण्यासंबंधी डॉ. भोळे यांनी त्यांना आवाहन वा विनंती करणे. रा. पळशीकर तर त्यांच्या स्नेहसंबंधातीलच आहेत. (दोघे मिळून आमच्या नांदेडच्या डॉ. स.रा. गाडगीळांशी ‘आजचा सुधारक’मध्ये संघर्ष करीतच आहेत.) तेव्हा रा. पळशीकरांनी त्यांची ही विनंती वा आवाहन नाकारले नसते. विशेषतः आमच्या ग्रंथाबद्दल कौतुक करणारा रा. पळशीकरांचा जो अभिप्राय डॉ. भोळे यांनी उद्धृत केलेला आहे, त्याच ठिकाणी त्यांना हे आवाहन करता आले असते. पण हाही मार्ग त्यांनी योजला नाही. शेवटी प्रश्न हा उरतोच की, आमच्या पुराव्यांतील फोलपणा, कच्चेपणा वा खोटेपणा कुणीतरी दाखवून दिल्याशिवाय आमच्या आरोपांना आक्षेपार्ह कसे ठरविता येईल?
आपल्या परीक्षणात डॉ. भोळे यांनी अनेक मुद्दे व आक्षेप उपस्थित केलेले आहेत. त्यांपैकी वाचकांचा गैरसमज होऊ नये म्हणून फक्त एकाच महत्त्वाच्या मुद्द्याचे स्पष्टीकरण आम्ही वर दिलेले आहे. जाता जाता एक गोष्ट नमूद करून ठेवितो की, आम्ही केवळ पुरोगाम्यांवरच ग्रंथात टीका केलेली नसून त्याचप्रमाणे अनेक सावरकर अनुयायांवर व हिंदुत्वनिष्ठांवरही तशीच कठोर टीका केलेली आहे.