माझ्या ‘धारणात् धर्म इत्याहुः’ या लेखावरील प्रा. काशीकरांची प्रतिक्रिया वर दिली आहे. ती वाचून माझ्या लेखातील एकाही प्रतिपादनाचे खंडन झाले असे मला वाटत नाही. उलट त्यांनी दिलेला म.म. पां.वा. काणे यांचा हवाला माझ्याच म्हणण्याला पोषक ठरणार आहे.
मी माझ्या लेखात असे प्रतिपादले आहे की गेल्या दीडशे वर्षांहून अधिक काळ ‘धर्म आणि ‘religion’ हे शब्द परस्परांचे पर्याय म्हणून रूढ आहेत. हे माझे म्हणणे प्रा. काशीकरांना मान्यच आहे. परंतु त्यांचे म्हणणे असे आहे की जर धर्माची मूळ संकल्पना religion च्या संकल्पनेहून वेगळी आहे असे कोणाच्या लक्षात आले तर त्याने तसे म्हणू नये काय?
माझे त्याला उत्तर आहे, ‘अवश्य म्हणावे. पण तसे म्हटल्याने ते दोन शब्द दीडशे वर्षांहून अधिक काळ पर्यायी म्हणून प्रस्थापित आहेत याला बाध येतो काय? प्राचीन भारतात ‘धर्म’ हा शब्द अनेक कमी अधिक वेगवेगळ्या अर्थानी रूढ होता हे कोणाही अभ्यासकाच्या सहज लक्षात येऊ शकते. डॉ. काण्यांनी त्या शब्दाचा एक महत्त्वाचा अर्थ ग्रथित करून दाखविला हे योग्यच आहे. पण तेच काणे ‘धर्म शब्दाचे अन्यही अर्थ आहेत असेही सांगतात. उदा. धर्म हा शब्द एखाद्या वर्णवाचक, आश्रमवाचक किंवा पदवाचक शब्दाला जोडून येतो. उदा. ब्राह्मणधर्म, क्षात्रधर्म, किंवा राजधर्म, गृहस्थधर्म, शिष्यधर्म, पुत्रधर्म इत्यादि. या शब्दांनी त्या त्या वर्ण इत्यादींची कर्तव्ये व्यक्त होतात. एका अर्थाने धर्म हा चार पुरुषार्थांपैकी एक आहे, तर दुसर्या अर्थाने चारी पुरुषार्थ प्राप्त करणे हाही प्रत्येकाचा धर्म आहे. याशिवाय ‘सर्वधर्मान् परित्यज्य मामेक शरणं व्रज’ या श्लोकार्धात उल्लेखलेले धर्म वरील धर्माहून वेगळे असले पाहिजेत हे उघड आहे, कारण सर्व धर्माचा म्हणजे कर्तव्याचा त्याग करावयास येथे भगवंत सांगत आहेत, असा त्याचा अर्थ असणे अर्थात् शक्य नाही. या शब्दाचे आणखीही काही अर्थ आहेत. ह्यांपैकी काहींचा उल्लेख मी माझ्या लेखातही केला होता. माझे एवढेच म्हणणे होते की ‘धर्म ह्या शब्दाच्या अनेक परस्परसंबद्ध अर्थामुळे तो religion या शब्दाच्या अर्थाला फार जवळचा आहे, आणि त्यामुळे गेली दीडशे वर्षे धर्म = religion हे समीकरण प्रस्थापित झाले आहे. आजही प्रा. वैद्यांचे लिखाण सोडले तर अन्य सगळीकडे धर्म हा शब्द religionया अर्थी वापरात आहे. अन्य वृत्तपत्रे सोडा, खुद्द तरुणभारत या हिंदुत्वनिष्ठ आणि संघवादी म्हणून प्रसिद्ध असलेल्या वृत्तपत्राच्या कोणत्याही अंकातील अन्य लेखकांचे लेख पाहिले तर याची प्रचीती येईल.
प्रा. काशीकर म्हणतात की डॉ. काण्यांनी सांगितलेला धर्म या शब्दाचा अर्थ पूर्णपणे ऐहिक आहे. याबाबतीत मी मतभेद व्यक्त करू इच्छितो. कारण धर्मशास्त्राचा इतिहास या ग्रंथाच्या पहिल्या प्रकरणात धर्म शब्दाचा अर्थ स्पष्ट केल्यानंतर डॉ. काणे सर्व ग्रंथभरधर्मशास्त्राचे जे विवरण करतात ते पाहता त्यांना धर्म शब्दाचा ऐहिक अर्थ अभिप्रेत आहे असे मानणे कतीन आहे. दुसऱ्याच प्रकरणात धर्माची आधारस्थाने सागतांना त्याचा सर्वात श्रेष्ठ आधार वेद असे ते म्हणतात. नंतर धर्मासुत्राचे विवेचन करतांना त्यातील विषयांची एक लांबलचक यादी त्यांनी दिली आहे. तिच्यात, पुढील विषय आले आहेत. उपनयन, चार आश्रम, विवाह, दैनिक पंचमहायज्ञ, चाळीस संस्कार. आशौच, श्राद्ध्ये, महापातके, उपपातके, प्रायचीत्ते, इ. याच प्रकरणात ते लिहतात की परमेश्वराने धर्माशास्त्रावर एक लक्ष श्लोकांचा एक ग्रंथ लिहला, आणि त्या धर्माचा प्रसार स्वयंभुव मनुने केला. आता या सर्व गोष्टी पूर्णपणे एहिक आहेत असे मानायचे काय? काशिकारांनी दिलेला धर्मशात्राचा हवाला माझ्या म्हणण्याला पोषकच ठरणार आहे असे जे मी म्हणालो त्याचे कारण हे आहे. धर्मशास्त्रातील कोणता भाग religion – निरपेक्ष आहे ते काशिकारांनी सांगावे अशी अशी त्यांना माझी विनंती आहे. अभ्युदये आणि निःश्रेयस या दोन गोष्टी साध्य करण्याचे साधन म्हणजे धर्म असे सांगून त्यांपैकी अभ्युदयाचा संबंध ऐहिक उन्नतीशी आहे असे ते म्हणतात. परंतु मी माझ्या लेखात म्हटल्याप्रमाणे आपल्या धर्मशास्त्रानुसार अभ्युदय हा कधीही निःश्रेयस, निरपेक्ष असू शकत नाही. अभ्युदय म्हणजे ऐहिक उन्नती असेल, पण ती निःश्रेयसाला अविरोधी असली पाहिजे, एवढेच नव्हे तर ती निःश्रेयसाला साधनीभूत असली पाहिजे. धर्मशास्त्रात अभ्युदय आणि निःश्रेयस ह्या दोन विभक्त गोष्टी नाहीतच, एकाच अविभाज्य गोष्टींची ती दोन अंगे आहेत. आपल्या कर्तव्यांचा विचार करताना धर्मशास्त्रात निःश्रेयसाचा संदर्भ कधीही सुटलेला नाही. म्हणून तर कोणताही संस्कार असो, तो मंत्रांशिवाय होऊ शकत नाही. मग तो विवाह असो, उपनयन असो, जातकर्म असो की अंत्यसंस्कार असो, वास्तुप्रवेश असो की राज्याभिषेक असो. फार काय रोजचे भोजनसुद्धा यज्ञकर्म म्हणून करायचे असते. हे पूर्ण धर्मप्रकरण सर्वार्थाने religious आहे हे उघड आहे. प्रा. काशीकर म्हणतात तो ऐहिक धर्म मला त्यात कोठेही दिसत नाही.
प्रा. काशीकर म्हणतात की वंशभेद, जातिभेद, इ. कल्पना आता कालबाह्य ठरल्यामुळे वर्तमानकाळाच्या संदर्भात ‘समाजधारणेच्या दृष्टीने उपयुक्त असा व्यक्तींचा आचार-विचार-समूह म्हणजे धर्म’ अशी धर्माची व्याख्या करता येईल. संस्कृती या शब्दाने श्री. वैद्यांना हाच अर्थ अभिप्रेत आहे. आता वंशभेद आणि जातिभेद आज कालबाह्य झाले आहेत असे म्हणताना प्रा. काशीकरांना काय अभिप्रेत आहे? ते केव्हातरी कालोचित होते असे त्यांना सुचवायचे आहे. पण ते एकेकाळी कालोचित होते आणि आज कालबाह्य झाले आहेत हे त्यांनी कसे ठरविले? हे ते सांगत नाहीत. अमुक युगात किंवा शतकात अनुक आचार युक्त आणि अमुक युगात तो अयुक्त, पण दुसराच कोणता युक्त असे सांगणारे एखादे शास्त्र आहे की काय?
प्रा. वैद्यांना ‘धर्म’ शब्दाने संस्कृती अभिप्रेत आहे आणि संस्कृती’ शब्दाने त्यांना वर सांगितलेल्या गोष्टी अभिप्रेत आहे असे काशीकर म्हणतात. म्हणजे प्रा. वैद्यांना शब्दार्थात हवे असलेले बदल केवढे व्यापक आहेत हे पाहण्यासारखे आहे. त्यांना प्रथम धर्म हा religion या अर्थी स्थिरपद असलेला शब्द त्या अर्थापासून विभक्त करायचा आहे. तसेच ‘संस्कृती’ या मुळात नवीन असलेल्या शब्दाचा रूढ अर्थ बदलून त्याला व्यक्तीची कर्तव्ये असा अर्थ त्यांना द्यावयाचा आहे. आणि religion ला पर्याय म्हणून उपासनापद्धती ‘हा शब्द त्यांना रूढ करावयाचा आहे. पण हा द्राविडी प्राणायम जितका अनावश्यक तितकाच अशक्यही आहे. येथे जर एखादे हुकूमशाही राज्य आले तरच ते करता येण्याची आशा आहे, एरव्ही ते साध्य होण्याची सुतराम शक्यता नाही.
धर्माला religion च्या जोखडातून काढून त्याला खर्या ऐहिक स्वरूपात प्रस्थापित केले तर ते सुधारणावादी पाऊल ठरणार नाही काय? आणि विवेकी माणसाने त्याचे स्वागत करावयास नको काय? प्रा. वैद्यांना हे करावयाचे आहे असे प्रा. काशीकर सुचवितात. हेच जर प्रा. काशीकर आणि प्रा. वैद्य यांना करायचे असेल तर ती फार स्वागतार्ह गोष्ट होईल. पण तसे करण्याचा उपाय सोपा आहे. तो म्हणजे आम्हा इहवादी विवेकवाद्यांच्या पंथात सामील होणे. परमेश्वर, पापपुण्य, मरणोत्तर अस्तित्व, पुनर्जन्म प्रार्थना इत्यादि अतिभौतिक गोष्टींचा पूर्ण त्याग करावा. ज्याच्या अस्तित्वाचा कसलाही पुरावा नाही अशा गोष्टींवर विश्वास ठेवू नये. ज्याचा खरेपणा पडताळून पाहण्याचे कसलेही साधन नाही त्यावरील श्रद्धा काढून घ्यावी, आणि जास्तीत जास्त लोकांचे जास्तीत जास्त सुख ज्याने निर्माण होईल असा पूर्ण इहवादी जीवनक्रम आखून त्यानुसार आयुष्य घालवावे. असे केल्याने religion चे आपल्या जीवनातून पूर्ण उच्चाटन होईल. पण प्रा. वैद्यांना ते नको आहे. त्यांना ‘संस्कृती या बुरख्याखाली वरील सर्व गोष्टी हव्या आहेत. एरव्ही त्यांच्या व्यष्टि-समाष्टि-सृष्टि-परमेष्टि या चतुष्ट्याला काही अर्थ राहणार नाही.